
गंधर्वयुग
कृ. द. दीक्षित
बालगंधर्वाच्या जन्माने महाराष्ट्रात – भारतातच एक नाट्यगीतनिपुण असा अवतार झाला आणि गंधर्वयुग निर्माण झाले असं म्हटलं तर अतिशयोक्ती केली असे म्हणायला नको. भारतीय कालगणनेत आणि विचारात ‘युग’ या शब्दाने एक महत्वाचा कालावधी आणि त्या काळाचा समर्थ असा नेता अभिप्रेत असतो. भगवंतालाही ‘संभवामि युगे युगे’ असे आश्वासन द्यावेसे वाटले. मराठी रंगभूमी-संगीत नाटक या शब्दांना वा विद्याराला आपण जो अर्थ दिला आहे, जो प्राप्त झाला आहे तो बालगंधर्वांनी जोपासलेले, आपलेसे केलेले आणि बालगंधर्वमेव असे असलेले संगीत नाटक असाच आहे.
बालगंधर्वांचा जन्म २६ जून १८८८ चा आणि लोकमान्य टिळकांनी नारायणला बालगंधर्व म्हणून जो सार्थ गौरव केला तो. १८९८ मध्ये. म्हणजे अवघे दहा वर्षांचे असतानाच. १९०५ मध्ये बालगंधर्वांनी किर्लोस्कर संगीत नाटक मंडळीत प्रवेश केला – गुरुद्वादशीला आणि तेव्हापासून बालगंधर्वांची नाट्यकलेची सेवा सुरू झाली. शारदा, मालिनी, शकुन्तला अशा बहुढंगी भूमिका करताना नाट्याभिनय आणि गायन अशा दोन्ही, गुणांनी बालगंधर्वांची रंगभूमीसेवा बहरत चालली. १९११त बालगंधर्व टाळ्यांच्या कडकडाटात रंगभूमीवर आले. आणि गंधर्व-युगाला सुरवात झाली.
युगपुरुष होण्याचे गुण आणि सामर्थ्य त्यांच्यात होते याची प्रचीती त्याचवेळी आली. प्रयोगाच्या दिवशीच पहाटे त्यांची पहिली मुलगी हिरा देवाघरी गेली. पण त्यावेळी नारायणराव तर अवघे २३ वर्षाचे होते – जो आत्मसंयम आणि रंगभूमीनिष्ठा यांचा धीरोदात्त आविष्कार बालगंधर्वांनी केला त्यातच त्यांच्या युगपुरुषत्वाची खंबीरपणाची साक्ष पटली. पुढे त्यांच्यावर कर्जफेडीची आपत्ती आली. तिथेही त्यांना मदतीचे हजारो हात पुढे झाले असताना त्यांनी हिंमतीने स्वतःचे कर्ज स्वतःच फेडले, पुरे केले. नंतरच्या आयुष्यातही बालगंधर्वांनी हिंमत सोडली नाही. आपत्ती, विपत्ती आणि संपत्ती सारखीच मानणारे खरे थोर वीर असे सुभाषित आहे. तसेच ते वागले.
फ्लॅशबॅक
१९४५ नंतर बालगंधर्व आकाशवाणीत येत असत-बसने थेट माहीमपासून – गोहरबाईंच्या घरापासून ते क्वीन्स रस्त्यावरच्या आमच्या कार्यालयापर्यंत. एके काळी चार दारांची ओपेल गाडी त्यांनी घेतली होती. एक पॅकार्डही काही दिवस दिमतीला होती. पण बालगंधर्वांच्या तोंडी कधी त्याबद्दल खेद केलेला, सुस्कारा टाकलेला ऐकला नाही. आमचा आणि बालगंधर्वांचा जास्त परिचय १९४५ नंतरचा – म्हणजे त्यावेळी ते साठीला आले होते. पण वैभवाच्या गोष्टी सांगताना ते प्रसन्न असत आणि त्या वेळच्या त्यांच्या हलाखीच्या दिवसातही बालगंधर्व विषण्ण कधीही नसत. पुढे पुढे त्यांना चालता येणे कठिण झाले. दोन दोन माणसांनी त्यांना हलवावे लागे अशा दुखणाइत अवस्थेतही त्यांनी आमच्यासाठी भजनाचे- नाटकातील गाण्यांचे ध्वनिमुद्रण केले. पण हसत आणि उत्साहाने. त्यांना एकदा भेटायला गेलो. बरोबर सुंदराबाई होत्या. त्यांच्या ध्वनिमुद्रणाचे ठरविले आणि निघालो – पोचवायला येता येत नाही – वरच्या मजल्यावर त्यांचं वास्तव्य होतं- म्हणून थोडेसे कष्टी झाले – पण तेवढंच. खाली आल्यावर मात्र सुंदराबाईंनी खरोखरच हंबरडा फोडला- “माझ्या दादाला असं कसं रे झालं?”
बालगंधर्वांच्याकडून त्यांच्या गुरुंच्या, पंडित भास्करबुवांच्या, अनेक कथा ऐकायला मिळाल्या. त्या सांगताना बालगंधर्व एकदम आपल्या मागच्या- कंपनीच्या वैभवाच्या काळात जात आणि फ्लॅशबॅकसारखे एकदम तरुण होत. पं. भास्करबुवांच्या बद्दल बोलतांना, पडले असले तरी जरासे उठत- नमस्कार करीत आणि मग बोलत असत.
ती माऊली
पुण्याला वकील परांजपे यांच्या घरी बालगंधर्व उतरत असत. राममंदिराचे परांजपे असे त्यांना ओळखत. त्यांच्या घरी असताना आम्ही बालगंधर्वांची मुलाखतवजा बैठक ध्वनिमुदित केली. जवळजवळ २॥-३ तास. म्हणजे आमचे ध्वनिमुद्रक सुद्धा तापून बंद पडले इतका वेळ. आता त्या फिती आकाशवाणीच्या अलमारीत असाव्यात. त्यातल्या बऱ्याच गाण्यांचं रेकॉर्डिंग झालं. कारण वकील परांजपे यांना त्यात जास्त रस होता. मुलाखत भगवान् पंडित आणि मी असे दोघेजण विचारीत होतो. बालगंधर्वांना मधेच आईची आठवण झाली, म्हणाले ‘बरं का भाऊसाहेब – मी नाटकातून घरी आलो की माझी दृष्ट काढे हो-‘ नाटकात काम करायला वडिलांची आडकाठी होती पण त्यांच्या आईनेच संमती दिली. नुसती संमतीच नव्हे तर आपणहून जोर धरला. त्या काळात नाटकात जाणं हे भूषणावह मानलं जात नसे. पण शंभरावर्षांपूर्वीच्या त्या माऊलीने जो शहाणपणा दाखविला तो युगपुरुषाच्या आईला शोभेल असाच.
प्रियकर-प्रेयसी
बालगंधर्व नेहमी पं. भास्करबुवांनी त्यांना उपदेश म्हणून सांगितलेली गोष्ट सांगत असत. ती त्यांनी पुन्हा सांगितली. पडल्या पडल्या स्वर आणि ताल हे कसे असावेत? तर प्रियकर-प्रेयसीसारखे. हा किस्सा तसा थोडासा चटोर मिस्किलपणाने माखलेला. प्रियकर म्हणतो, माझं प्रेम खरं जास्त, तुझ्याहून जास्त आहे. प्रेयसी तेच म्हणते. तसं स्वर आणि ताल-लय यांचं होता कामा नये. मग मीलन होतं. तेव्हा कोणीच जास्त नसतं – वगैरे.
बालगंधर्वांच्या गाण्यांत आणि रंगभूमीवर ते वठविण्यात बालगंधर्वांच्या अतुलनीय अशा स्वराचीच खरी महत्ता आहे. ‘रत्नाकर’ मासिकाच्या बालगंधर्व विशेषांकात कै. पं. विनायकराव पटवर्धन यांनी बालगंधवांच्या आवाजाची-स्वराची आणि गाण्याची जी प्रशंसा केली आहे ती त्यांच्यासारख्या उत्तम गायकाने केल्याने जास्तच पटते.
बालगंधर्वांचा स्वर ऐकला म्हणजे आनंदाने अंगावर रोमांच उभे राहात. असे अनेकदा झाले आहे. त्यांच्या सुराला – आवाजाला निसर्गानेच प्रविविक्त म्हणजे नितांत सुंदर केले आहे. त्यांना जन्मही मिळाला राजहंसाच्या कुळात. बालगंधर्वांनी म्हटले नाही – पण म्हणता येईल ‘दैवायत्तं कुले जन्म- मदायत्तं तु पौरुषम” हे त्यांनाच लाभलं.
अर्थवाहिका
छांदोग्योपनिषदात सामवेदातील उद्गात्याने काय-कसे गावे याची एक मनोवेधक पण उपयुक्त गोष्ट सांगितली आहे. देव-दानवांच्यात उद्गीत गाण्यात चढाओढ लागली आणि देव एकामागोमाग हरू लागले. कारण देव नाकांत गाऊ लागले, स्वराकडे लक्ष न देता गाऊ लागले. नुसत्या शब्दांनी गाऊ लागले, डोळ्यांनी गायले म्हणजे हातवारे करून गाऊ लागले. मनातल्या मनात गाऊ लागले. या सर्व अवगुणामुळे दानव देवावर मात करू लागले. मग देवांनी हे दोष टाकायला सुरवात केली आणि हृदयस्थ प्राणाने अंतःकरणपूर्वक भावनापूर्ण, श्रद्धेने गाऊ लागले आणि दानवांचा पराभव झाला. गायकाने कसे गावे, काय दोष टाळावे याची ही गोष्ट म्हणजे एक अर्थवाहिका आहे. कै. कृष्णराव मुळे यांच्या अप्रतिम ग्रंथात ही गोष्ट विशद केली आहे.
स्वररेषांचा चित्रपट
बालगंधर्व हृदयस्थ प्राणाने सूर लावीत. एक तर त्यांना जन्मतःच सुरेलपणा मिळाला आणि तो त्यांनी पं. भास्करबुवांच्या शिकवणीप्रमाणे एखाद्या हिऱ्याला पैलू पाडून चमकावे तसा तेजस्वी केला. बालगंधर्वांनी आपली अशी पद्धती निर्माण केली. जाणून बुजून एखादे घराणे निर्माण केले असे म्हणणे हे गंधर्वांच्या विनीतवेषेला अनुसरून होणार नाही. बालगंधर्वांनी गाणं आणि अभिनय याच दोन बाबी रंगभूमीवर सव्यसाची धनंजयासारख्या पेलल्या. स्वयंवरात- ‘प्रेम नच जाई’ हे म्हणत असताना त्या प्रवेशात ते सहजसुंदर तर गातच. पण त्यांचा वेष – काळे साधे पण जरीचे पातळ आणि निश्चयी पण आर्त अशी रुक्मिणी ते उभी करत. ते गाऊ लागले की आपणापुढे त्यांच्या विलक्षण स्वरसामर्थ्यामुळे मनावर, स्मृतीवर त्यांच्या स्वराचे आलेख उमटू लागत. बालगंधर्वांचे हे पद किंवा ‘मानस का बधिरावे’ किंवा कान्होपात्रेतला ‘भूप सरे तव कान्हे सुख आनं’- ही पदं ऐकतांना मनःपटलावर नुसत्या सुरांचा – असहाय्यतेचा- निराशेचा स्वररेषांचा चित्रपट उमटत असे. त्याच्या उलट ‘अजि राधा बाला’चा देसकारातला आनंद – किंवा ‘थाट समरिचा दावी नट-‘ हा हमीरातला दिमाख आपल्यालाही स्फुरण देणारा होई.
आपली शैली निर्माण केली
बालगंधर्वानी ही अभिजात संगीत शैली आणि अभिनय यांची एकात्मता केली. तीच बालगंधर्व युगाची- युगपुरुषाची मराठी रंगभूमीवरची विशिष्ट शैली झाली. संगीत नाटक म्हणजे असं संगीत- असं नाटक असं ठरून गेले कै. गोविंदराव टेंबे हे बालगंधर्वांचे नाटक मंडळीतले भागीदार, रंगभूमीवर नायक-नट आणि त्यांच्या गायनविद्येने- वादनविद्येने गंधर्व समकालीन मातब्बर संगीततज्ज्ञ आपल्या, ‘माझा संगीत व्यासंग’ पुस्तकात म्हणतात की महाराष्ट्रात गंधर्वांच्या नाटकातील विशिष्ट शैली- गायनपद्धती चोहोकडे फैलावली होती… या गायकीच्या फैलावाचे सर्व श्रेय केवळ श्रीयुत बालगंधर्वांना आहे यात संशय नाही. श्री. टेबे यांच्या म्हणण्याप्रमाणे बालगंधर्वांनी ‘एकच प्याला’ ऐवजी ‘स्वयंवरा’कडे नजर लावली असती तर जनतेची अभिरुची उच्च संगीताकडे. नेता आली असती. यात अभिजात संगीताची आस्था असली तरी बालगंधर्वांचे ध्येय, उद्दिष्ट संगीताची उंची वाढवणे असेच असावयाला हवे होते हे म्हणणे मान्य होण्यासारखे नाही.
बालगंधर्व युगात म्हणजे १९११ ते १९६२ या काळात ज्यांनी मराठी रंगभूमीवरील संगीतात आपला असा बाज आणला ते म्हणजे केशवराव भोसले, व्यं. बा. पेंढारकर आणि मा. दीनानाथ. इतर सर्व चमकले पण आपली अशी त्यांची कधी छाप राहिली नाही. केशवराव भोसले अल्पकाळ राहिले. पेंढारकरांची वेगळी शैली खरी पण त्यांचे पुत्र भालचंद्रपंत आणि दामले यांच्याशिवाय ती कोणी उचलली नाही. मा. दीनानाथ हे खरे प्रतिभावंत गायक. त्यांची अभिनयाची विशिष्ट शैली नव्हती. पण त्यांच्याही गायनाची परंपरा झाली नाही. होण्यासारखी नव्हतीही. ‘क्षणे-क्षणे यन्नवता- मुपैति’ अशा प्रज्ञेचे ते कलावंत. वसंतराव देशपांडे यांनाच फक्त मा. दीनानाथ उमगले होते. पण बलवंत संगीत मंडळीची स्वतःची नाटकं होत नसत आणि त्यामुळे परंपरा टिकली नाही. पण बालगंधर्वांनी मात्र नाटकांत सजावट, संगीताची साथ, नटांना योग्य तो मान आणि स्वतः संगीत आणि नाट्याभिनय यांची मनापासून उपासना करून आपली अशी शैली निर्माण केली. गोविंदराव टेंबे त्यांच्याबाबत गौरवाने म्हणतात, ‘बालगंधर्वांच्यात गळ्याचा मोहकपणा, चेहऱ्याचा दिखाऊपणा आणि ललनेचा नखवेपणा हे तिन्ही गुण होते.’
बालगंधर्वांची गायकी वाटते सोपी पण ती तितकी सहजसोपी नाही हे स्वतः गायला लागल्यानंतर कळते. त्यांची लयीची जन्मतःच आलेली समज आणि पं. भास्करबुवांनी त्यांच्याकडून घेतलेली रेखीव मेहनत यामुळे बालगंधर्व लयतालकालाचे अलंकार ललना कर्णफुलं ज्या सहजतेने लेवतात तसे वापरू लागले. त्यांची ही असामान्य कर्तबगारी- ‘यतो वाचो निवर्तन्ते’ अशा उच्चतम कोटीतली झाली आहे.
गंधर्वांचं देणं
गंधर्वांच्या रंगभूमीवरच्या प्रत्येक भूमिकेला स्वतंत्र स्थान आहे. त्यामुळे. त्या त्या नाटकातलं संगीत आणि त्या त्या भूमिकेची समज या गोष्टी अन्योन्याश्रयी झाल्या आहेत. ‘रत्नाकरच्या’ विशेषांकात बालगंधर्वांची कोणती भूमिका जास्त प्रिय असे विचारता प्रेक्षकांनी सिंधूला अग्रस्थान दिले. सिंधू- २०५२ आणि रुक्मिणी १०३१- अशी मते मिळाली. याचा अर्थ असा की बालगंधर्वांच्या अभिनयाला संगीतापेक्षाही प्रेक्षका जास्त मानले. कारण ‘एकच प्याला’तली गाणी ‘स्वयंवरा’च्या भरजरी गाण्यापुढे साधीसुधीच, जाडी भरडी.
बालगंधर्वांच्या. उत्तरकाळात १९५२ नंतर त्यां आमचा खूपच सहवास झाला. त्यावेळीही त्यांच्यात कलावंत अष्टौप्रहर जागा होता. नाटकमंडळी पुन्हा करावी असा निदिध्यास. माझ्या घरी येऊन के दिल्लीला विनायकराव पटवर्धन गात होते त्यांच्या संपर्क साधला – नाटक मंडळी काढायला त्यांची संम हवी म्हणून.
बालगंधर्वांनी आकाशवाणीसाठी सर्व संगी- नाटकांतली पदं सात मिनिटांच्या कालावधीत बसवू ध्वनिमुद्रित केली. त्यासाठी आधी भरपूर मेहनत करीत स्वतः श्री. दिनकरराव अमेबल ऑर्गनवर साथ करीन आणि मग रात्री ११ नंतर ध्वनिमुद्रण करीत होतो. त सर्व गाणी तबकड्यावर झाल्याने शिल्लक राहिल नाहीत. हे एक महत्पापच घडलं. पण बालगंधर्वांच गायकी अजूनही आजही रसिकांना श्रवणीय अनुकरणीय, स्वीय झाली आहे. हे त्या युगपुरुषाच् कार्य.
एकदा रविशंकर मला म्हणाले, तुमचं अभिजात संगीत हे उत्तरेपेक्षा वेगळं वाटतं. महाराष्ट्रीय अभिजात संगीत असं म्हणावंसं वाटतं. या महाराष्ट्रीयत्वात नाट्यसंगीताचा बराचसा वळसा आहे. आणि त्या नाट्यसंगीतात गंधर्वसंगीताचा प्रामुख्याने भाग आहे- महात्मा गांधीजींनी

कांग्रेससभाजनांना खादीची टोपी दिली आणि ती सर्वमान्य स्वातंत्र्यभक्तांची खूण झाली. तसंच नाटकातील संगीतात बालगंधर्वांच्या गळ्यातल्या जागा, हरकती या पदांच्या म्हणण्यात दिसू लागल्या आणि जाणकार म्हणू लागले, हे गंधर्वांचं देणं बरं !
बालगंधर्व थकले होते पण पीळ कायम होता. त्यांची हिंमत दांडगी. जीविताशाही, दुर्दम्य नाटक हा विषय तर त्यांच्या मनातून कधीच निघाला नाही. त्यांची लोकप्रियता अगदी पूर्वीसारखीच होती. आमच्या घरी, बहिणीच्या लग्नाला त्यांचे गाणे ठरले. खरं म्हणजे त्यांनी हो म्हटले त्यातच आम्ही भरून पावलो होतो. कारण पुण्यात त्या दिवशी संततधार पाऊस होता. पण गंधर्व गाणार म्हणजे आमच्या आयुष्यातली सुवर्णपर्वणी. स्टेशनवर जाऊन माझ्या भावाने खुर्ची मागितली. कुणासाठी हे कळल्यावर हमाल आपापसांत भांडू लागले कोण खुर्ची उचलणार म्हणून. गंधर्वांची गाडी आली तर हमाल लोक महाराज आले, महाराज आले असं म्हणत धावू लागले. बाहेर एक मोठा असा टांगा बघितला तर टांगेवालाही खाली उतरून गंधर्वांना हात देऊन वर बसविण्याला धावला. पैसे कुणीही घेतले नाहीत. उलट गंधर्वांच्या पाया पडले आणि सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी.
ते क्षण…
बालगंधर्व आजारी झाले आणि हॉस्पिटलात तर त्यांची शुद्धच गेलेली होती. भोवताली मंडळी भजन करीत होती. ते दृश्य मला पाहवेना. कसातरी घरी आलो. त्यावेळी मी बंगलोरला होतो. सुटीसाठी आलो आणि हे दर्शन घेऊन परतलो. काय होणार याचा धसका घेऊनच हॉस्पिटल सोडले. चोवीस तासाच्या बंगलोर प्रवासात बालगंधर्वांच्या आमच्या भक्तीचे क्षण माळेसारखे संथपणाने ओढीत होतो.
आकाशवाणीत १९४५ नंतर त्यांची आमची रोजची भेट होऊ लागली. सीताकांत लाड या आमच्या सहकाऱ्यामुळे गंधर्व आकाशवाणीवर आले. बालगंधर्व आमच्यात इतके रमले की कधीकधी तर प्रोग्राम मिटिंगला येऊन बसत. आमच्या काही सहकाऱ्यांना आपल्या शेजारी हा युगपुरुष बसला आहे, याच्या मधुर स्वरांनी महाराष्ट्रातल्या लाखो रसिकांना रोमांचित केले आहे, याची पुरेशी कल्पनाही नसे.त्या काळात सुंदराबाई आणि बालगंधर्वांची गुळमुळीत जुगलबंदी चाले. एका कार्यक्रमात सुंदराबाई डोळ्यावर एक भला मोठा चष्मा चढवून आणि बालगंधर्व दुसऱ्याचाच नाकावरून सारखा खाली घसरणारा चष्मा लावून वाचत होते. एक नटसम्राट- दुसरी लावणीसम्राज्ञी. बालगंधर्व घरी जेवायला आले. घरी त्यांचं एक गाणं झालं. मास्तर कृष्णरावही त्यावेळी आले होते. ‘धाव घाली विठू आता, चालू नको मंद’ हे भजन बालगंधर्वांनी इतक्या बहारीनं, इतक्या तळमळीनं, भक्तिभावानं म्हटलं की सारेजण होश नसल्याप्रमाणे गुंगलो होतो. मास्तर कृष्णरावांनी तर त्यांना मिठी मारली.
रात्रभर मी असा अस्वस्थ होतो आणि सकाळी बंगलोरला उतरलो. उदास, हरवलेला.
पं. मल्लिकार्जुनांचं गाणं ठरलं सकाळी. मी अर्थात् जाणार होतोच. तेवढंच गंधर्वांच्या आजाराचं सावट विरळ होईल.
सकाळी उठलो. नेहमीप्रमाणे रेडिओ लावला आणि हिंदी बातम्यांत शेवटी कळलंच की बालगंधर्व गंधर्वलोकांत गेले. मी अगदी एकटा. हॉटेलातल्या इतर मंडळींना या गोष्टीचं तसं काहीच नव्हतं. माझ्या दुःखाला वाट दिली आणि कामाला लागलो. पं. मन्सूरांच्या गाण्याचं विसरूनही गेलो. आमचे सहाय्यक श्री. भुसनूरमठ होते, त्यांना बोलावलं. आदल्या दिवशी मी त्यांना कल्पना दिली होतीच. बंगलोरच्या कानडी वर्तमानपत्रांतही बातमी आली होतीच. त्यावेळी मला गंधर्वांची महती आणखी कळली. बंगलोरात कानडी श्रोत्यांना गंधर्वांच्या नाटक-गायनाबद्दल भरपूर प्रेम, अपार श्रद्धा.
आम्ही श्री. गुब्बी वीरण्णा यांच्या घरी गेलो. त्यांची सुस्वरूप कन्या उत्तम नृत्य करीत असे. माझी ओळख झालेली होती. श्री. गुब्बी वीरण्णा म्हणजे कानडी नाट्यसृष्टीतले बडे प्रस्थ. श्रीमंत नाटक मंडळी. असा किस्सा सांगत की त्यांच्या एका नाटकांत ते स्टेजवर हत्ती आणत. एका वेळी गंधर्वांची कंपनी आणि त्यांची कंपनी हुँबळीला नाटक करीत. आणि एकमेकांची नाटकं पाहात असत. त्यांची पत्नीही नाटकात असे. उत्तम गाणं गात त्यांच्याकडे गेलो. त्यांना गंधर्वांच्या मृत्यूने गहिवरून आलं. त्या दोघांनीही आपली श्रद्धांजली ध्वनिमुदित केली. आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या नाटकातलं एक कानडी गाणं ध्वनिमुद्रित केलं. ‘सत्य वदे वचनाला नाथा’ या चालीवर. आणखी असे एक दोन जाणकार मिळाले. त्यांची श्रद्धांजली घेतली. पण सगळ्यांत भावपूर्ण बोलले प्रसिद्ध कादंबरीकार आ. ना. कृष्णराव. त्यांनी गंधर्वांना नाट्यसृष्टीचा सम्राट असं म्हणून त्यांच्या अनेक नाटकावर उत्तम असं भाष्य केलं. ‘फार मोठा’ ‘फार मोठा’ असं संपवलं. पं. मल्लिकार्जुन वाट पहात होते. दोन तंबोरे झणकारत होते. तंबोऱ्यावर तिथल्या दोन शिकाऊ मुलीच बसल्या होत्या. ‘काय हा उशीर हो?’ पंडितजींनी विचारलं आणि मी उभ्याउभ्याच कोसळलो. पंडितजींना कल्पना नव्हती. मी कसंबसंच सांगितलं- ‘गंधर्व गेले. काल.’ –
पं. मल्लिकार्जुनांनी एकदम दोन हात पसरले. तंबोऱ्यावर – मान सावकाश, हलवत म्हणाले – भाऊसाहेब- सूर गेला. नुसती मान हलवत होते. सर्वजण शांत. मला पंडितजींनी हाताला धरून बसवलं. इतर मंडळीही आमची विवशता जाणत होते. समजत होते.
पं. मल्लिकार्जुनांनी एकदम तंबोऱ्यावरचे हात काढले. तंबोऱ्यांनी सूर दिला आणि पंडितजींनी एकवम तार षड्ज लावला. बालगंधर्वाच्यासारखाच पंडितजींचा तार षड्ज म्हणजे एक अद्भुत चमत्कार आहे. तंबोऱ्याची आस-झार- आणि मन्सुरांचा षड्ङ्ग- एक रंग, एक रस, एकरूप. चांगला वमसास संपेपर्यंत तार षड्ज गुंजन करीत राहिला.
एका स्वरसम्राटाला दुसऱ्या स्वरसम्राटाने वंदना केली. आणि आमचे गंधर्व-युग संपले.