Logo

नटसम्राट

शरद तळवलकर

सम्राट अशोकाच्या राज्यातील प्रजा हा इतिहास संशोधनाचा विषय आहे. परंतु नटसम्राट बालगंधर्वांच्या युगातील प्रेक्षक अपार संतुष्ट होते हा चक्षुर्वे सत्यम् असा इतिहास आहे. त्यांच्या युगातील माणसे आजही तो इतिहास सांगताना भारावून जातात. प्रेक्षक हे आपले अन्नदाते आहेत असे मानत असल्यामुळे त्यांच्या सेवेसाठी तनमन लावून रंगभूमीवर हा सम्राट उभा रहात असे. त्या आनंदात पहाटेचा कोंबडा केव्हा आरवला याचे प्रेक्षकांना भान रहात नसे. बालगंधर्व प्रेक्षकांशी आणि प्रेक्षक बालगंधर्वांशी एकरूप झालेले असत.

वास्तवतेचा विचार

भूमिकेपासून रंगमंचावरील देखाव्यापर्यन्त वास्तवतेकडे त्यांचे अत्यंत बारकाईने लक्ष असे. ‘एकच प्याला’ नाटकात प्रथम मी त्यांच्या बरोबर तळिरामाची भूमिका केली त्यावेळी त्यांची आणि माझी ओळख नव्हती. त्यावेळी मला नावही नव्हते. परंतु नाटकाच्या सुरवातीला त्यांनी मला जवळ बोलावून सांगितले “हे बघ, तिसऱ्या अंकात, माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढताना, मी बालगंधर्व आहे हे मनात घ्यायचं नाही. मी सिंधू आणि तू तळीराम एवढंच लक्षात ठेवायचं आणि मंगळसूत्र ओढण्याच्या अगोदर माझ्या खांद्यावर हात ठेवायला बिचकू नको. कारण पुढे सुधाकराचं वाक्य आहे “तळिरामासारख्या नरपशूला तुझ्या अंगाला स्पर्श करायला लावलं” या त्यांच्या वाक्याला तू मला हात लावला नाहीस तर काही अर्थ राहाणार नाही.” त्यावेळी अकादमी नव्हती किंवा शिबिरंही नव्हती. परंतु नाटकातील वास्तवतेचा विचार किती बारकाईने होत असे हे लक्षांत येईल.

तिरखयाँ आले

बालगंधर्व आपल्या साथीदारांशी सुरांनी तर एकरूप व्हायचेच पण ते मनानेही त्यांच्याशी एकरूप झाले होते. या बाबतीत १९५० साली मी कै. गणपतराव बोडसांच्या घरी ‘फाल्गुनराव’ व ‘लक्ष्मीधर’ या भूमिका शिकण्यासाठी राहिलो होतो तेव्हा त्यांनी मला एक किस्सा सांगितला. त्यांचे तबलिये तिरखवा खाँसाहेब अत्यंत लहरी होते. एकदा. व्यवस्थापक बापूराव राजहंस यांच्याशी पैशावरून त्यांचे काहीतरी भांडण झाले व ते रामपूरला निघून गेले. तिरखवाँसाहेब तबल्याच्या साथीला नाहीत म्हणून महिना दीड महिना बालगंधर्वांनी ‘स्वयंवर’ नाटकाचा प्रयोग लावला नाही. त्यावेळी कंपनीचा मुक्काम पुण्यात होता. ‘स्वयंवर’ म्हणजे भरघोस उत्पन्नाचे खात्रीचे नाटक. शेवटी गणपतराव बोडस, मास्तर कृष्णराव सर्वांनी खूप आग्रह केल्यामुळे बालगंधर्वांनी ‘स्वयंवर’ नाटकाचा प्रयोग लावायची नाइलाजाने अनुज्ञा दिली. बालगंधर्व अत्यंत नाराजीने रंगपटात रंगत होते. त्याचवेळी पुण्यातील एका कोठीवालीकडे आदल्या दिवशीच आलेले तिरखवाँसाहेब तबले जुळवत होते. त्या कोठीवालीकडे गाण्यासाठी श्रोते जमले होते. त्यापैकी एकानं खाँसाहेबांना धिटाई करून विचारले, “खाँसाहेब, आज रात्रौ बालगंधर्वांचं ‘स्वयंवर’ नाटक आहे, और आप यहाँ कैसे?” हे ऐकल्यावर तिरखवाँसाहेब उठले व त्या बाईला म्हणाले “बेटी मुझे माफ करना, मैं जाता हूँ. मैं नहीं बजाऊंगा तो नारायणराव गायेंगे कैसे?” असे म्हणून ते व्हिक्टोरिया करून किर्लोस्कर थिएटरवर आले. तिथे जो तबलजी तबले लावीत होता, त्याला म्हणाले ‘ए चल हट, आज मैं बजाऊंगा” असे म्हणून त्यांनी केशवराव कांबळ्यांनी दिलेल्या सुरावर तबला लावायला सुरवात केली. बाहेर थिएटरमध्ये त्यांची तबल्यावर पडलेली चाट नारायणरावांच्या कानावर पडल्यावर ते हर्षभरीत झाले. त्यांनी व्यवस्थापक बापूराव राजहंसांना बोलावून सांगितले “बापू, बाहेर खाँसाहेब आलेले दिसत आहेत. त्यांना लागतील ते पैसे दे, नाही म्हणू नकोस. मला आज मनापासून गाऊ दे.”

पुढे नाटक सुरू झालं. तिरखवाँ आल्याचा आनंद बालगंधर्वांना इतका झाला होता की “मम आत्मा गमला हा” ह्या पदाला “मम आत्मा गमला हा” ही ओळ ते पंधरा वीस मिनिटे घोळवीत होते, अखेर तिरखवाँ साहेबांना राहावेना. त्यांनीही गंधर्वांना आपल्या आगमनानं झालेला आनंद ओळखला व तबल्याचे वजन हलके करून स्टेजवरल्या रुक्मिणीला हळूच सांगितले “मालिक, आगे बढो ना”, आनंदाने बालगंधर्व त्या दिवशी आपल्या आत्म्याला झालेला खरा आनंदच स्पष्ट करत होते. इतके ते खाँसाहेबांशी एकरूप झाले होते. याला म्हणतात कलावंत.

 नादलायींचा दुग्धशर्करा योग : तिरखयाँ आणि बालगंधर्व

‘रामाच्या ग बागेमध्ये…

बालगंधर्व मनाने हळवे होते. या संबंधी कै. गणपतराव बोडसांनी सांगितलेला प्रसंग अत्यंत हृद्य आहे. बालगंधर्व कंपनीला श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचा आश्रयं होता. त्यामुळे वर्षातील काही महिने कंपनीचा मुक्काम बडोद्याला असायचा. अशाच एका मुक्कामात ‘सौभद्र’, ‘मानापमान’, ‘मृच्छकटिक’ याचे प्रयोग झाले होते. मुक्काम संपत आला होता व कंपनी मुंबईला जाणार होती. इतक्यात सयाजीराव गायकवाड विलायतेहून आले. त्यांच्यासाठी ‘सौभद्र’ व ‘मानापमानाचे’ प्रयोग झाले. त्यावेळी सयाजीरावांनी गणपतराव बोडसांना विचारले “गणपतराव नवीन नाटक कोणते आणताय्”? त्यावर गणपतरावांनी सांगितले की, राम गणेश गडकरी यांचे नाटक तालमी वगैरे घेऊन पूर्ण बसले आहे. सीनसिनरी, कपडेही तयार आहते. नाटकाचे संगीत सुंदराबाईंनी दिले आहे. मुंबईत ‘एकच प्याला’ रंगभूमीवर आणण्याचा विचार आहे”. यावर सयाजीरावांनी ‘एकच प्याला’ तयार असल्यास दरबारसाठी इथेच एक खेळ करा असे सांगितले. श्रीमंत सयाजीरावांची विनंती नाकारणे शक्य नव्हते. शिवाय एक रंगीत तालीमही होईल व प्रेक्षकांचा प्रतिसादही कळेल या उद्देशाने बालगंधर्वांची अनुमती घेऊन गणपतरावांनी ‘एकच प्याला’ चा प्रयोग बडोद्यात लावला. प्रथमपासून प्रयोग रंगत होता. ‘अजि लागे हृदयी हुरहुर’ या पदापासून बालगंधर्वांच्या पदाला सयाजीराव वन्समोअरची घंटा वाजवत होते. तीन अंक झाले. चौथा अंक लवकर सुरू होईना म्हणून निरोप पाठवले. तरीही अंक सुरू होण्याचे चिन्ह दिसेना. शेवटी सयाजीराव स्वतः आत गेले आणि म्हणाले “गणपतराव चौथा अंक सुरू करा. या नाटककाराच्या लिखाणाने मी प्रभावीत झालो आहे. अंक का सुरू करत नाही. काही अडचण आहे का?” त्यावर गणपतरावांनी सयाजीरावांना, गडकरी निवर्तल्याची तार आलेली दाखवली व कोपऱ्यात बसलेल्या बालगंधर्वांच्याकडे बोट केले. बालगंधर्व ओक्साबोक्सी रडत होते. शेवटी गणपतरावांनी व सयाजीरावांनी त्यांची समजूत घातली व चौथा अंक सुरू केला. त्या अंकातल्या कारुण्यमय सिंधूच्या अवस्थेत स्वतः नारायणराव असल्यामुळे अंक अत्यंत रंगत होता. “चंद्र चवथि चा। रामाच्या ग बागेमधे चाफा नवतिचा” हे पद म्हणताना “रामाच्या ग बागेमध्ये” या ओळीला बालगंधर्वाना हुंदका अनावर होत होता. बरोबरच आहे. कारण ‘राम’ गेल्याचे नुकतेच त्यांना कळले होते.

खरोखरीचा वैष्णवजन

गणपतरावांनी बालगंधर्वांच्या भिडस्त स्वभावाबद्दलही एक गंमतीदार गोष्ट सांगितली कुणीही नाटकाला यायचं म्हटलं की “या ना बाप्पा” असे म्हणून अनेकांना नाटकाला बोलवीत. थिएटर भरलेले असल्यामुळे अशा वेळी व्यवस्थापकाची मोठी पंचाईत व्हायची. बालगंधर्वांच्या आमंत्रणावरून आलेल्या मंडळींना बसवायचं कुठे, असा प्रश्न पडत असे. अखेर व्यवस्थापक बापूराव राजहंस यांनी त्यावर उपाय काढला. आलेल्या मंडळींना ते वहांड्यातील बाकांवर बसवून ठेवीत. अत्यंत आदराने त्यांचे नाव विचारीत आणि रंगमंच्याकडे जाणाऱ्या दरवाज्याकडे जाऊन उगीच मोठ्याने सांगत “अरे हरी, नारायणरावांना म्हणावं देशपांडे आले आहेत.” पुन्हा व्यवस्था बघता बघता त्या गृहस्थांना विचारीत “हरी आला नाही अजून?” त्यांनी नाही म्हटले की पुन्हा रंगमंच्याच्या दाराकडे जात व म्हणत “अरे पांडू, नारायणरावांना म्हणावं देशपांडे, शिनोळे वगैरे मंडळी आली आहेत.” असे अनेक वेळा निरनिराळ्या गड्यांच्या नावाने ते ओरडत. एव्हाना पहिला अंक निम्मा झालेला असे. अखेर ‘अर्धवट नाटक काय पहायचं, पुन्हा केव्हा तरी येऊं’ असे मनाशी ठरवून आलेली मंडळी तेथून काढता पाय घेत.

मराठी चित्रपटाच्या आगमनाने मराठी नाट्यव्यवसायावर परिणाम झाला. वैभवाच्या शिखरावर असलेली गंधर्व नाटक मंडळीही त्याला अपवाद राहिली नाही. सर्वच बाबतीत काटकसर करावी लागत होती. एके दिवशी नाटक झाल्यावर कंपनीतील मंडळी पत्रावळीवर जेवताना पाहून बालगंधर्वांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. हा नटसम्राट मनानं खरोखरच ‘वैष्णवजन’ होता. लोकांचे दुःख तो जाणत होता.

या कंपनीच्या खालावलेल्या स्थितीबद्दल श्री. रणजित देसाई यांनी मला एक प्रसंग सांगितला. उतारवयामुळे बालगंधर्व पुरुष भूमिका करू लागलेले होते. कंपनीचा मुक्काम कोल्हापूरला होता. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज कोल्हापूर संस्थानच्या गादीवर होते. त्या दिवशी कंपनीचे ‘मृच्छकटिक’ नाटक केशवराव भोसले नाट्यगृहात होते. राजाराम महाराजांनी बालगंधर्वांना निरोप पाठवला की आम्ही वाड्यावरली मंडळी नाटकाला येत आहोत. श्री. रणजित देसाई त्यावेळी राजाराम कॉलेजमध्ये होते व ते महाराजांच्या बरोबर राजवाड्यातच राहात होते. तेही महाराजांच्या बरोबर ‘मृच्छकटिक’ नाटकाला गेले. नाटक सुरू झाले. विटलेले पडदे, वगैरे एकंदर रंगमंचावरील अवस्था पाहून रणजित देसाईंना वाईट वाटले. पुढे मैत्रेय चारुदत्ताला सांगतो “मित्रा, एक माणूस शिरेल एवढा मोठा भोसका भिंतीला पडला आहे”. चारुदत्ताला शंका येते आणि तो मैत्रेयाला सांगतो “अरे त्या गणिकेने ठेवलेले दागिने तरी नीट आहेत का नाही पहा”. यावर मैत्रेय धावत येऊन सांगतो, ‘दागिने कुठे दिसत नाहीत.’ यावर चारुदत्त म्हणतो “ठीक आहे. शर्विलक तरी चारुदत्ताच्या घरातून रिक्त हस्तानं गेला नाही. पण” असे म्हणून “जन सारे मजला म्हणतिल की” हे पद गाऊ लागले. गाता गाता त्या पदाच्या अर्थाबरोबर त्यांना स्वतःची आर्थिक परिस्थिती आठवली आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत होत्या. ते तन्मय होऊन, गात होते. राजाराम महाराजसुद्धा अस्वस्थ झाले.

अंकाचा पडदा पडल्यावर राजाराममहाराज आत गेले आणि रंगमंचावरून आत येत असलेल्या बालगंधर्वांना जवळ घेऊन म्हणाले, “हे बघ मी असताना तू रडायचं नाही. तुला काय पाहिजे असेल ते सांग.” त्यांनी दिवाणजींना जवळ बोलावले व हुकूम सोडला “दिवाणजी, उद्या नारायण काय मागेल ते पैसे त्याला द्या”. असे दातृत्व व अशी समरसता आता पाहायला मिळणे दुर्मिळ आहे. पुढे त्यांनी कलेच्या सेवेसाठी दारिद्यसुद्धा अत्यंत निर्धाराने पचवले.

१९५२ साली मी पुणे विद्यापीठाच्या कामासाठी सकाळच्या मेलने मुंबईला निघालो होतो. शिवाजीनगर स्टेशनवर कै. विनायकबुवा पटवर्धन भेटले. त्यांच्याशी बोलत उभा होतो. इतक्यात पांढरी हाफ पैंट, पांढरा हाफ शर्ट व खादीची टोपी घातलेले नारायणराव बालगंधर्व स्टेशनवर आले. आम्ही दोघांनी त्यांना नमस्कार केला. तेव्हा आमचे हात धरून नारायणराव म्हणाले, “आज मुंबई रेडिओवर माझं गाणं आहे. तुमच्यापैकी कोणी माझं मुंबईचं तिकीट काढाल का? रेडिओचा चेक मिळाल्यावर तुमचे पैसे मी परत करीन.” त्यांचे हे वाक्य ऐकून मला गलबलून आले. मीच तिकीट काढणार होतो. पण विनायकराव म्हणाले “थांब. मी काढतो, त्यांनी नारायणरावना विचारले, “फर्स्ट क्लासचं काढू की सेकंड क्लासचं” न्यावर नारायणराव म्हणाले, “कशाला, मी तुमच्याबरोबरच थर्डक्लासमध्ये बसतो” विनायकबुवांनी तिकीट काढून आणले व नारायणराव आमच्या बरोबरच तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसले. आपल्याला पैसे उसने मागावे लागले, थर्डक्लासमध्ये बसावे लागले वगैरे घटनांचा त्यांच्या मनावर काहीही परिणाम झालेला नव्हता, आपण रेडिओत कोणती पदं गाणार आहोत व त्या पदांच्या वेळच्या पूर्वीच्या आठवणी दिलखुलासपणे बोलत होते. माझे विचारचक मात्र चालू होते. ज्यांनी कंपनीच्या प्रवासासाठी गाडीचे खास डबे रिझर्व्ह केले त्याला आज तिसऱ्या वर्गात प्रवास करावा लागतो आहे. यालाच नियती म्हणतात. परंतु बालगंधर्व खरोखरच योगी पुरुष होते. त्यांच्यावर त्याचा काही परिणाम दिसत नव्हता.

आज व्यवसायात ‘एकच प्याल्याच्या’ आणि ‘मानापमानाच्या’ शेकडो प्रयोगांत अनेक आधुनिक नटींच्या बरोबर मी काम करतो. परंतु सतत माझं मन मला सांगत असतं, “नाही, तसा बालगंधर्व पुन्हा होणे नाही.”

Copyright © 2025 Balgandharva

Designed & Developed By Hans Technologies 

Scroll to Top