
गंधर्व-गायकीची वैशिष्ट्ये
पं. वामनराव सडोलीकर
शब्दांकन : सौ. श्रुति सडोलीकर - काटकर
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षितिजावर अढळपदी पोचलेले व्यक्तिमत्व म्हणजे नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व ! असे एकमेवद्वितीय स्थान त्यांना मिळण्यास कारणीभूत ठरलेल्या गोष्टी अनेक आहेत. त्यांचे रंगभूमीवर आगमन होण्यापूर्वीची स्थिती काय होती याचा थोडक्यात आढावा घेतो.
घरची बिकट आर्थिक परिस्थिती व मूळची संगीताची ओढ या जोडीला छत्रपती शाहू महाराजांची शिफारस यामुळे वयाच्या १७ व्या वर्षी (ऑक्टोबर १९०५ साली) किर्लोस्कर संगीत मंडळीत प्रवेश केला. कंपनीला मोरोबा वाघोलीकर, बाळकोबा नाटेकर, भाऊराव कोल्हटकर, कृष्णराव गोरे या नटांनी प्रतिष्ठा मिळवून दिली होती. प्रारंभी सरावासाठी बालगंधर्वांना नटी, शारदा या भूमिका देण्यात आल्या. कंपनीत भाऊराव व कृष्णराव गोरे स्त्री पार्ट करीत. पण भाऊरावांचा मृत्यू झाला आणि कृष्णराव कंपनी सोडून अचानक गेले. त्यामुळे बालगंधर्व नायिकेच्या भूमिकेत उभे राहिले. लहान वय, लोभस रूप व गोड गळा यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले. जात्याच त्यांच्या स्वभावात किंवा स्वरांच्या लगावात पुरुषी दांडगेपणा किंवा धसमुसळेपणा नव्हता. म्हणून ते स्त्री भूमिकात अधिक शोभून दिसले. कंपनीला तारणारे नट ठरले.
केवळ रूप किंवा गोड गळा एवढेच गुण त्यांच्याजवळ होते असे नाही तर देवल मास्तरांनी दिलेले अभिनयाचे धडे त्यांनी डोळसपणाने आत्मसात केले व त्याला स्त्री मनाचा अभ्यास व स्वतःच्या उपजत सौंदर्यदृष्टीची जोड दिली. त्यामुळे त्यांनी साकार केलेल्या नायिका लोकांनी आदर्श मानल्या.
मी गंधर्वांची नाटके प्रथम १९२० साली पाहिली. त्यांच्या रुक्मिणी, सिंधू, सुभद्रा, वसंतसेना, भामिनी, रेवती, देवयानी, लकेरी, कान्होपात्रा, इंदिराकाकू, अर्जुन अशा भूमिका रंगभूमीवर पाहिल्या. धर्मात्मातील एकनाथ पाहिले आणि अनेक खाजगी मैफिलीतून त्यांची गाणी ऐकली, पदे, अभंग ऐकले. या सर्व कालावधीत त्यांच्या गायकीची जी वैशिष्टचे म्हणून मी जाणली ती आता विस्ताराने पाहू.
नाट्यपदांचा शास्त्रसंगत विचार करताना असे दिसते की पदांची लय हा एक महत्त्वाचा पैलू असतो. काही पदांची लय स्पष्ट दिसून येणारी व सर्वसामान्यांना चटकन पकडता येणारी असते. उदा. नाही मी बोलत नाथा (दादरा), स्वकुल तारक सुता (त्रिताल). या लयीत गंधर्व जे गात ते सामान्यांना रुचेल असे तर होतेच, पण त्यातील मात्रांची अंतर्गत विभागणी तज्ज्ञांची दाद घेत असे.
काही पदांची रागदारी अंगाची लय थोडी अवघड वाटली तरी त्या पदांचा विस्तार ते असा करीत की, नयने लाजवीत (झपताल), खरा तो प्रेमा (केहरवा), मम सुखाची ठेव (रूपक) ही पदेही प्रेषकांच्या तोंडी घोळत व पदांच्या आशय मनी ठसे.
गंधर्वांच्या पदांची लय अतिविलंबित किंवा अति द्रुत नसून किंचित द्रुत अशी मध्यलय असे. त्यामुळे पदातील भावनेचा आविष्कार किंवा आशयाचा ओघ गाण्यामुळे न थांबता, त्यांच्या मुळात चपल व डौलदार गतीने जाणाऱ्या आवाजाला शब्दांबरोबर लयीचे खेळ खेळता येत. रागदारी, ठुमऱ्या, लावणी, भजने अशा कोणत्याही बाजात त्यांना कधी कुठे अडखळलेले मी पाहिलेले नाही. सहज व सुगम वाटणाऱ्या गंधर्व-गायकीचे मर्म म्हणजे त्यांची शिस्त. त्यांची तालीम अतिशय विचारपूर्वक, गुरुमुखाने ऐकून झाली होती. नाट्यप्रयोग नसताना सुट्टीच्या दिवशी सुद्धा नाट्यगृहात जाऊन ऑर्गन, सारंगी, तबला अशा सर्व संचानिशी ते पदांच्या तालिमी ४-४ तास करीत असत. या रियाजानेच अवघड गायकी त्यांच्या गळयाचा सहजधर्म, स्वभावधर्म झाली होती.
बालगंधर्व हे ” कोठीवाले” किंवा “विद्वान गवई” नव्हते. पण त्यांना पदांच्या अनुषंगाने येणाऱ्या रागांची मात्र तालीम होती. जळगावातील त्यांचे गुरु, महबूब खाँ हे फैज महमद खाँचे शिष्य. त्यामुळे चिजेप्रमाणेच पदांची मांडणीही स्पष्ट, शुद्ध शब्दोच्चार व अर्थवाही होत असे. अस्ताईतून अंतरा उमलत असे. त्यात कधी शुष्कपणा आला नाही. ज्या रागात पद आहे तो राग पिसून काढणे हे त्यांचे ध्येय कधीच नव्हते. पदातील आशयाच्या पुष्टीसाठी, त्यातील भावनेला शोभतील असे आजुबाजूचे कधी समप्रकृतिक तर कधी विरुद्ध प्रकृतीचे रागही ते मिसळीत असत. कारण पदाने लोकरंजन करणे ही त्यांची मूळ प्रतिज्ञा होती.
सुगम संगीतात रंजकतेसाठी काही पथ्ये पाळावी लागतात. “सूर से बात पैदा होना”, “बोलसे बात पैदा होना” व “बात से बात पैदा होना “. गंधर्वांच्या गायकीत या तिन्हींचा उत्तम परिपोष झालेला दिसून येई. -स्वर तर स्वर्गीय होताच, पण शब्दांचे उच्चार व फेक अचूक असे. शब्द टाकणे असे होते की गद्यातून चालणारा आशयाचा ओघ पद्यातून पुढे जात राही. संवाद व पद वेगळे वाटतच नसे. रागदारातील बोलतानाचा रुक्षपणा त्यांच्या ” बोल से बात” मध्ये ” पैदा” झाला नाही. पद्यातूनही ते बोलतच असत. शृंगार व करुणरसपूर्ण पदात त्यांच्या या खासीयतचे मनोहर दर्शन होई. ” नाथ हा माझा” मधील कृष्णावर अनुरक्त झालेल्या रुक्मिणीच्या मनातून उचबंळून येणारा कृष्णाच्या शौर्याच्या बद्दलचा अभिमान व भक्ती त्यांच्या प्रत्येक शब्दा-स्वरातून ओसंडून जात असे. दुसरे उदा. एकच प्यालातील “राजसा बाळा, बघू नको मजकडे ” या पदाचे देता येईल. बघू नको मधील “को” या अक्षरावरील कोमल धैवतावरील स्वरांदोलन व तो शब्द टाकणे इतके कारुण्यपूर्व व प्रभावी असे की डोळयात अश्रू उभे राहात. हा परिणाम साधण्यासाठी किती विचार तद्रुपता व तपश्चर्या असावी लागते हे प्रत्यक्ष ते करून पाहाणाऱ्यालाच कळेल.
गाताना गंधर्वांची मुद्रा कधी कष्टी झाली नाही. पदानुरुप भाव कायम चेहऱ्यांवर असे. त्यांची वाणी शुद्ध होती म्हणजे काय, तर भाविकांना साजेसे आर्जव व लडिवाळपणा त्यांच्या गाण्यात होता, स्वरांचे सच्चेपणही होतेच, तरीही स्वराच्या नादी लागून, शब्दांच्या अ, आ, इ, ई इत्यादि स्वरांच्या उच्चारावर त्यांच्याकडून कधी अन्याय घडला नाही. सौंदर्य कल्पनेला बाधक असा सानुनासिक किंवा भेसूर आवाज त्यांनी कधी लावला नाही. फार काय “अ” कार “उ” कार बरोबर रेफ (रफार) शद्धत्वापासून ढळले नाहीत. संवाद काय, पदे काय, त्यातील स्वदीर्घाची लयीच्या खेळात खेचाखेच होऊ नये याबद्दल ते जागरुक असत.
बालगंधर्वाच्या कंठ मंजषेत मींड, मरकी, हरकत, तानांचे विविध प्रकार कण, बेहलावे असे अनेक अलंकार मौजूद होते. पण त्यांनी उथळपणाने, अप्रस्तुत वाटेल असे त्या श्रीमंतीचे फाजील प्रदर्शन केले नाही. जरूर तेथे प्रसंग व भावनेला शोभतील. पोषक ठरतील असेच अलंकार वापरले. मुख्य म्हणजे त्यांच्या आवाजात एका लगावासरशी क्षणार्धात हजारो श्रोत्यांची हृदयमंडले भेदून टाकणारी “पुकार” हा मोठा गुण होता. तशी दुसरी पुकार मी बेगम अख्तर यांच्या आवाजात ऐकली.
भिंगरीसारखी फिरणारी गंधर्वांची तान उत्तम लयदार व पेचदार असे. त्यांचे सहज चाललेले लाडिक गाणे हे वरपांगी सुगम व प्रासादिक वाटणाऱ्या अभंगासारखे असे. त्यांच्या गाण्यामागील पक्की तालीम व खानदानीपणा यांचा साक्षात्कार ज्ञानेश्वर, तुकोबाच्या आध्यात्मिक परिपक्वतेप्रमाणे विद्वानांना देखील ” नेति नेति” म्हणायला लावित होता. गोविंदराव टेंबे, भास्करबुवा बखले व गुरुस्थानी बसलेले मास्तर कृष्णराव यांची तालीम व ग्रामोफोनवर ऐकलेल्या मौजुद्दीन खाँ, मलकाजान इत्यादींच्या रेकॉर्डस्चे संस्कार या सर्वांचा सम्यक परिणाम म्हणजे गंधर्व गायकी.
वयाच्या २३ व्या वर्षी बालगंधर्वांनी ” मानापमाना” तील भामिनी सादर केली. काकासाहेब खाडिलकरांच्या जटिल शब्दयुक्त, पदरचना चालीव तालांच्या नाविन्यपूर्ण योजनेद्वारे गोविंदरावांनी लोकप्रिय केल्या. “विद्याहरण” लाही संगीत टेंबे यांनीच दिले, खाडिलकरी पदांचे मुखडे मात्र आकर्षक असतात हे नक्की! स्वतः गोविंदराव टेंबे गौहरजानच्या गाण्यातील भावनाविष्काराने खूपच प्रभावित झाले होते तोच गुण त्यांनी गंधर्वांच्या गळ्यात उतरविला.
ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर अंशा तीन घराण्यांची गायकी आत्मसात करणारे पं. भास्करबुवा बखले गुरु म्हणून लाभावेत हा गंधर्वांच्या आयुष्यातील फार महत्त्वाचा असा अमृतयोग होता. त्यांच्यामुळे गंधर्वांच्या गाण्याला खानदानीपणाची बैठक मिळाली. बुवांनी हया रुक्मिणीचा गळा घडविला तो रागदारीचा भारदस्तपणा राखून. तिचा घरंदाजपणा, तडफदारपणा आणि प्रेमातील आर्तता हे सारे बुवांच्या स्वर योजनेतून एकजीवपणे साकार झाले.
मास्तर कृष्णांनी दिलेल्या द्रौपदी, संशयकल्लोळ, मेनका, आशा-निराशा इत्यादी नाटकांच्या चाली आकर्षक, सोप्या वाटणाऱ्या व हरप्रकारे नटवून म्हणता येण्याजोग्या असत. या तीनही संगीतकारांची मदार जशी गंधर्वांच्या लवचिक, सुरेल गळ्यावर होती तशीच नाट्यकलेच्या पायांशी नत अशा त्यांच्या भक्तिभावावरही होती.
ज्यांना आज ग्लॅमरस म्हणता येतील अशी रुक्मिणी, सुभद्रा, भामिनी अशा भूमिकातून वावरलेले आणि रंगभूमीला असीम राजवैभवाचा साक्षात्कार घडविणारे बालगंधर्व राम गणेश गडकऱ्यांच्या ” एकच प्याला” तील “सिधू” म्हणून पाहताना मराठी (व अमराठीही) प्रेक्षक उरी फुटला. हमसून रडला. केवळ सुखान्तिका व वैभवाची दृष्ये हे आपल्या यशाचे मर्म नसून, जी भूमिका वठवायची तिच्याशी समरसून केलेला अभिनय, त्याला शोभेसे स्वरवैभव हेच खरे आपल्या यशाचे मर्म आहे हे नारायणरावांनी सिद्ध केले ते सुधाकराची सिंधू होऊन !
खास विणून घेतलेल्या शालूत वावरणाऱ्या, तरत-हेच्या दागिन्यांनी नटलेल्या बालगंधर्वांनी, फाटकी लुगडी नेसून व्यसनाधीन नवऱ्याची स्वाभिमानी व सत्शील पत्नी इतक्या उत्कटतेने साकार केली की, “नाथ हा माझा” या रुक्मिणीच्या पदाप्रमाणेच “सत्य वदे वचनाला नाथा” हे सिधूचे पदही प्रेक्षकांच्या मनी-मुखी घोळू लागले. “एकच प्याला” च्या संगीत दिग्दर्शिका सुंदराबाई यांनी दिलेल्या लावणी-ठुमऱ्यांच्या चालींना कुलस्त्रीची प्रतिष्ठा प्राप्त झाली. या चाली बालगंधर्वांनीच गाव्यात असे बाईंना मान्य करावे लागले.
नाटकातील पदाचा प्रारंभ अथवा उठाव करण्याची तरकीब गंधर्व गायकीचे वैशिष्ट्ये होती. संवाद संपून पद जेथे सुरू होते तो सांधा ते अशा खुबीने जोडीत असत, की वाहवा, नायिकेच्या सुखदुःखात प्रेक्षकाला नकळत ओढून घेऊन गंधर्व आपल्या आर्जवी संभाषणाचा सूर पदाला देत आणि पदाच्या अर्थाची व रागाची पूर्ण जाणीव ठेवून भावनेच्या पृष्टीसाठी काही विशिष्ट शब्दपुंज व स्वरावलींचा वारंवार कौशल्यपूर्ण उपयोग करीत, प्रसंगी विवादी स्वरांचाही प्रयोग करीत आणि हमखास दाद घेत. प्रेक्षकांचा मानसशास्त्राचा डोळस अभ्यास व मेहनती शिवाय हे कसे शक्य आहे ?
पदांचे राग शक्यतो सोपे असावेत अशी त्यांची धारणा होती. एरव्ही आपला अभ्यास व मेहनत यांचे प्रदर्शन करण्याच्या मोहात गायक व ऐकण्याच्या नादात प्रेक्षक मूळ संहितेपासून दूर जातील असे त्यांना वाटे. काही वेळा वन्समोअर मिळाला की नाविन्याच्या सोसापायी कलाकार पदाच्या मूळ रागाशी व भावनेशी विसंगत अशा रागसागरात गटांगळ्या खाताना दिसतात. एकदा विद्याहरणातील “आता राग देई मना” या बागेश्रीतील पदाला वन्समोअर मिळाल्यावर त्या बागेश्रीत त्यांनी तितक्याच गंभीर प्रकृतीचा मालकंस मिसळला. पण किती ? अगदी वासापुरता. पुन्हा त्यांची नवनवोन्मेष शालिनी प्रज्ञा बागेश्रीचीच नवीन रूपे घेऊन सामोरी आली.
त्यांचे यमन, बिहाग, काफी, जंगला, मांड, भूप, भैरवी, पिलू, जोगिया इत्यादी राग चांगलेच लोकप्रिय झाले होते. त्यांचा गळाही त्यात सहज वावरे. पण भास्करब्वांच्या तालमीमुळे देसी, बरवा, खोकर, बिहागडा, ललतपंचम अशा त्याकाळी अनवट वाटणाऱ्या रागातूनही लयीशी खेळताना त्यांचा गळा अडखळला नाही. त्यांच्या गळ्याचा धर्म नेमका ओळखून बखले बुवांनी त्यांना “तरकीब” दिली.
गंधर्वांमुळे अभिजात संगीत व नाट्यसंगीत यातील दरी मिटली. मैफलीत नाट्यसंगीत गायले जाऊ लागले. लावणीवर आधारीत “वद जाऊ कुणाला” हे पद हमखास वन्समोअर घेई. संत कान्होपात्रा या नाटकाद्वारे त्यांचा खास शास्त्रीय संगीताने संस्कारीत असा भजनी बाज लोकप्रिय झाला. भक्तिसंगीताचे पारंपारिक रुप त्यांनी बदलले. त्यांची भजने, नाटक, सिनेमा व खाजगी मैफलीतही लोकप्रिय झाली. गाता गाता त्यांचा गळा तापला की गंधर्व पांढरी १ पासून पांढरी ७ पर्यंत पोचत व कोणत्याही तन्हेने रसिकांच्या सेवेत कमतरता न ठेवता
भूमिकेशी समरस होऊन गात असत. “मी बालगंधर्व गातो आहे ” ही भावना कधी बाळगीत नसत. रंगमंचावर अवतीर्ण झालेली गंधर्वमूर्ती क्षणातच प्रेक्षकांच्या नयनांचा एकला विषय होत असे आणि गायन सुरू होताच अवयवच नव्हे तर पंचप्राणच कर्मस्थानी एकवटत असत.
गंधर्वांच्या गाण्याची मोहिनी इतकी जबरदस्त होती, की गंधर्व हा मराठी मनावर एक संस्कारच झाला. गंधर्व संस्काराने सुसंस्कृत झालेल्या प्रेक्षकाला संवादातून व स्वरातून एकाच वेळी संयत व उत्कट असा भावनाविष्कार चाखण्याची चटक लागली. संगीत नाटकांचे लोकांना व्यसन लागले.
गंधर्व ज्याकाळी गाजत होते त्याकाळी प्रतिष्ठितांच्या वस्तीत सारंगी वााजत नसे. पण पायपेटी बरोबरच मंद आवाजाचा अधिक सप्तके देणारा ऑर्गन व सारंगी ही वाद्ये त्यांनी नटेश्वर चरणी सादर केली. केशवराव कांबळेंचा गंभीर पण मधुर स्वराचा ऑर्गन, जव्हारीदार आवाजात गळ्याबरहुकूम जाणारी कादरबक्षांची सारंगी, जोडीला राजण्णा किंवा तिरखवाँची तबल्यावरील थाप या तिन्हीच्या नादसमुद्रातक्रीडा करणारा बालगंधर्वांचा सोनसळीसारखा स्वर याची नशा मराठी संगीत नाटकांच्या प्रेक्षकाला जी चढली ती गंधर्वांच्या उतारवयातही उतरली नव्हती. अगदी नाद ब्रह्मानंदी लागलेली टाळीच म्हणा ना.
आज रंगभूमी अथवा दूरदर्शन वर दिसणाऱ्या गायन अभिनयाशी, आमच्या किंवा त्याही पूर्वीच्या काळातील गानअभिनयाशी तुलना करू पाहाता पूर्वीचा अभिनय अधिकच अभिनीत झालेला दिसतो. गाणी ही उंच पट्टयात गायली जात. पण याला कारणीभूत तत्कालीन परिस्थिती होती हे ध्यानात घ्यावे लागते. पूर्वी नाट्यगृहात आजच्यासारखे ध्वनिक्षेपक नसत. प्रकाश योजनेचे तंत्रही इतके विकसित नव्हते. त्यामळे संवाद किवा पदातील प्रत्येक शब्द न शब्द शेवटच्या रांगेतील प्रेक्षकापर्यंत पोचलाच पाहिजे असा दंडक होता. आश्चर्याने वर गेलेली भुवई किवा रागाने मोठे केलेले डोळे शेवटच्या रांगेतील प्रेक्षकासाठी अधिकच ताणून व वटारून ठेवावे लागत. स्वरातील चढ-उतारही अधिक कत्रिम व भडक असत मीही या शिस्तीतून गेलो आहे. परंतु त्यामुळे संवादाची स्वरांची जी फेक होत असे, ती औरच. सरावाने कालांतराने, आवाजाची जातच वजनदार व धारदार होत असे. आज ध्वनिक्षेपक बंद पडले तर दुसऱ्या रांगेतही प्रेक्षकाला संवाद ऐक जाणे मुष्किल होते..
कानाच्या दुखण्यावरील औषधोपचारासाठी गावात आलेल्या मुलामुळे कंपनीला संजीवनी मिळावी व पुढे त्याच मुलाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर स्वामित्व गाजवावे आणि त्यांच्या दृष्टीचे व श्रवणांचे पारणे फेडावे अशा अभूतपूर्व योगाला काय म्हणावे ? मराठी संगीत रंगभूमीवरील हा गंधवं योगच नव्हे का ?
बालगंधर्वामुळे ग्रामोफोनचे यंत्र लोकप्रिय झाले !
मानापमान आणि विद्याहरणापासून बालगंधर्वांच्या भूमिकांची आणि गायनाची मोहिनी प्रतिदिन वाढत होती. कोणत्याही कॉलेजातल्या स्नानगृहाकडे फिरकले तर ‘नाही मी बोलत नाथा’, ‘खरा तो प्रेमा’, ‘मधुकर वनवन’, ‘आता राग’ वगैरे पदांचे स्वर ऐकू येत असत. सामान्य श्रोत्यालासुद्धा नाटकातले पद गुणगुणावेसे वाटावे, ही त्या पदाच्या लोकप्रियतेची पावतीच समजली पाहिजे. आरशासमोर उभी असलेली भामिनी आणि मधुवनात केस सावरणारी देवयानी, या प्रसंगीची त्यांची छायाचित्रे ठिकठिकाणी नजरेला पडत असत. त्यांच्या ध्वनिमुद्रिकांमुळे ग्रामोफोनचे यंत्र महाराष्ट्रात लोकप्रिय झाले होते. ‘रंगभूमीबाहेर वालगंधर्व कसा दिसतो” हे पाहण्याकरता त्यांच्या नेहमीच्या येण्याजाण्याच्या वाटेकडे अनेकांचे लक्ष असे. भाऊरावांना न पाहिलेल्या रसिकांचे बालगंधर्व हे एकमेव दैवत असावे यात नवल नाही. पण भाऊरावांच्या भूमिका पाहिलेले जे रसिक त्यावेळी हयात होते त्यांनीसुद्धा बालगंधर्वांना मान्य केले होते. भाऊरावांची सुभद्रेची भूमिका पाहिलेले रसिकसुद्धा बालगंधर्वांची भूमिका पाहताना, “हे ते नव्हे” अशारीतीने नाखूश होत नसत.