अखेरचा चमत्कार
सीताकांत लाड
गिरगावात ऑपेराहाऊस नजिकच्या भटवाडीतील घरात दिवाणखान्याच्या भिंती मोहक चेहेऱ्यांच्या व वेषभूषेच्या स्त्रियांच्या रंगीत चित्रांनी सजलेल्या. सर्व चित्रातील दर्शन एकाच स्त्रीचे असल्याचा भास. दिवसभराच्या वर्दळीत स्वच्छ धोतर, शॉर्ट कोटावर सफेत पिवळसर शर्टाची कॉलर बसवलेली, डोक्यावरील लांब केस बहुधा उंचेल्या मखमली टोपीत लपवलेले, अशा आकर्षक वेषांतील देखण्या पुरुषांची येजा अधिक. नाटकांच्या व गाण्याच्या गप्पा. ‘हो देवा, खरं आहे देवा’ असे अधूनमधून कुणाकडून तरी देवाचे स्मरण. बोलणे गाणेच वाटावे असा मधासारखा गोड आवाज आणि त्या माणसाचे स्वागतही दरवाजापासून ‘या देवा’ म्हणून झालेले कानी पडायचे.
पडदा वर जातो आणि…
एखाद्या खास कार्याला जावे तशा शिस्तीत ठेवणीतले कपडे घालूनच शाळेच्या वयात गंधर्वांच्या नाटकाला प्रथम गेलों तो पडद्याच्या डाव्या बाजूला, कुणाचातरी नेम चुकवण्यासाठी हात तिरपे करून उभ्या राहिलेल्या सुंदर स्त्रीचे घरातील ते चित्र. स्टेजच्याखाली डाव्या स्टँडवर तर गळाबंद बाजूच्या स्टँडवर हातात चकाकणारे बसकट भांडे घेतलेल्या एकाने त्यांतून फिरवलेला उदाचा सुवास. बाजाची पेंटी, सारंग्यांची सारखी जुळवाजुळव. एक सारंगीवाला मध्येच तबल्यांचेही अंदाज घेणारा. तिसऱ्या घंटेबरोबर पडदा वर, डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या सृष्टीत प्रवेश. पात्रांच्या आवाजांनी देखावा दुमदुमू लागतो. त्या कल्लोळात एका महालाच्या पायऱ्या उतरत खाली पसरलेल्या रंगीबेरंगी गालीच्यावरून त्या चित्रातल्या सारखेच दिसणारे दर्शन जवळ येऊ लागते, गाऊही लागते, – “नाथ हा माझा” वाटते, या बाईची ओळख व्हावी, तिचे मिष्ठ्ठास बोलणे ऐकत राहावे, तिच्याशी खूप बोलायला मिळावे. गाण्याप्रमाणे बोलणारी अशी स्त्री कुटुबातही असावी. जमलेल्या सगळ्यांना असेच वाटत असणार.
अनेक दिवस घरातील वातावरण प्रसन्न. पदांच्या, भाषणाच्याही नकला. प्रत्येकजण उल्हासाने, मुक्तकंठाने गाऊ लागायचा. गंधर्वांचे नाटक पाहिल्यावर कुटुंबेच्या कुटुंबे दिवसचे दिवस अशा आनंदात रमत राहातात. कलागुणांचे कोण हे सामर्थ्य.
घराघरात आणि समाजातही
नाटक-पुस्तकांच्या मुखपृष्ठावरील चित्रासाठी काकासाहेब खाडिलकर बालगंधर्वांसह येत. कधी शेजारी राहाणारे न. र. फाटक, तत्कालीन मासिक- साप्ताहिकांच्या खास अंकांवर आणि प्रमुख व्यापारी कंपन्यांच्या कॅलेंडरांवर बालगंधर्वांच्या वैभवी भूमिकातील मोठ्या आकाराची चित्रे दिसत. समाजाच्या आकर्षणासाठी बालगंधर्वांच्या चित्रांची सजावट अशी सर्रास वापरात येत होती. हा, त्यांनी केलेला स्त्री सौंदर्याचाही पराभवच म्हटला पाहिजे. घराची शोभनीयता वाढविण्याबरोबरच माणसाच्या तबियतीला आनंदवीत ठेवणारी मोहिनी त्या दर्शनात असली पाहिजे. दुकाने-हॉटेलांप्रमाणे घराघरात त्या चित्रांनी लोकमान्य टिळकांच्या शेजारी जागा पटकावलेली दिसे. राजेरजवाड्यांच्या स्त्रिया बालगंधर्वांच्या वेषभूषेचे अनुकरण साधण्यासाठी वस्त्रालंकार-संपन्न मानापमान-स्वयंवरासारखी नाटके पुन्हा पुन्हा पहात, तर सर्वसामान्य समाजात हावभाव- हालचाली-भाषा- शैलीवर क्वचित गंधर्व छाप उमटू लागल्याचे लक्षात येई. गोवालिया टैंकवरील गंधर्व कंपनीच्या बिऱ्हाडालगतच्या देवळात देवदर्शनासाठी येणारे भक्तजन या ‘देवा’च्या साध्या वेषातील दर्शनासाठी ताटकळत उभे असलेले दिसत. तसे रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये तीन तास आधी रंगायला येणाऱ्या देवाला डोळे भरून पहाण्यासाठी थिएटरच्या प्रशस्त आवारात घिरट्या घालणारे भाविक रसिकजनही दिसत असत. एखाद्या समारंभाचा विषय कोणताही असो, व्यासपीठावर कुणीही असो, बालगंधर्व तिथे प्रेक्षक म्हणून उपस्थित राहिले तरी प्रेक्षकांच्या नजरा व कुजबुज त्यांच्या जागेवर खिळलेली ।
नव्या पिढीचा छंद
मुंबईच्या गिरगावात आणि पुण्याच्या, विशेषतः सदाशिव-नारायण पेठांत संगीत विद्यालयातून गंधर्व-स्तवन चाललेले ऐकू यायचे. विद्यालयांतील गायनवादनाचे धडे बालगंधर्वांच्या पदांनी सुरू. बालगंधर्वांना मूळ चीजांसह पदांची तालीम देऊन भास्करबुवांनी ‘स्वयंवरा’ पासून रंगभूमीवरील संगीताचे संमिश्र प्रवाह थोपवले, निबळ अभिजात संगीताचे युग सुरु केलें, पदांना मैफिलींची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. संगीत विद्यालयातील धडे हे पुढचे पाऊल. या लाटेत नामवंत गायक नटांनाही बालगंधर्वाच्या आलाप-हरकतींचे अनुकरण करण्याचा मोह आवरत नसे आणि मातब्बर गवैय्यांच्या जलशांची मेजवानी, बालगंधर्वांच्या एकदोन पदांचे पक्वान्न श्रोत्यापुढे वाढल्याशिवाय पूर्ण होत नसे. पदांच्या माध्यमांमुळे गरजेपुरते रागज्ञान सामान्य रसिकांपर्यंत पोहोचू लागले. शास्त्रीय गायनाचे स्वर कानी पडताच बालगंधर्वांच्या कोणत्या पदाशी ते मिळतेजुळते आहेत याचा हिशेब करीत राग अंदाजण्याचा आणि पदाचे पहिले चरण म्हणत हातावर टाकी देण्या-घेण्याचा एक छंद नव्या पिढीला जडला होता. पदाच्या अंतऱ्यांतील पुढील ओळींच्या जाळ्यांत गुरफटण्याचे साहस बहुधा कुणी करीत नसे.
रुक्मिणीची आरास
‘स्वयंवर’ हे खाडिलकरांनी सर्वस्वी बालगंधर्वांसाठी लिहिलेले गंधर्व कंपनीचे पहिले नाटक. गद्याच्या तेजः पुंज कोदणात बसवलेल्या पद्यालंकारांच्या रचनांसाठी भास्करबुवा चीजा गाऊन दाखवीत असता चीजांबरहुकूम शब्दरचना करतांना, आकर्षक चीजांभोवती लपेटलेली खाडिलकरांच्या पदांची काही वेष्टने दुर्बोधतेकडे झुकण्याइतकी अनाकर्षक झाली असली तरी पदांची तोंडे रसिकांनी क्षणभरांत प्रभावित हावे इतक्या गोंडस चेहऱ्यामोहऱ्याची उतरली आहेत. गद्यपद्याचा सहयोग इतका बेमालुम व शोभिवंत की उस्ताद तिरखवाँच्या दिमाखदार साथीचा मजा घेत हपापलेल्या प्रेक्षकांनी सभेची वाट पहात तिला उत्स्फूर्त दाद द्यावी !
या शृंगार काव्यांतील स्वगतांचा ओघ संगीताच्या मीलनासाठी आसुसलेला. संभाषणे स्वरांना सहजरम्यतेने बिलगू पहाणारी. श्रीकृष्णाच्या सहवासासाठी उत्सुक असलेली रुक्मिणी आपल्या आनंदात प्रेक्षकांनाही सामील करून घेण्याच्या उत्साहात, गलत स्वरांनी रसनिष्पत्ती होत असल्याचे अंदाजात आणि जाणकारांना राग बिघडत असल्याचे वाटू नये अशी सावधता बाळगत, ते स्वर लावून मोकळी ! पदांतील काही ओळी किंवा निब्बळ शब्द प्रसंगानुकूल स्वराभिनयासह कुठे किती आळवायचे ह्याचे हिशेब पक्के. रसबाह्य, प्रसंगबाह्य मुद्राभिनय चुकूनही न होणारा. पद ऐकण्यात आनंद, पहाण्यातही आनंद. मुलायम आवाजीतील बोल आळवीत शृंगार रसाला खेळवतांना गंधर्वगायन हस्तगत केलेल्या तिरखवाँ – राजण्णासारख्या बलाढ्य तबलजींच्या बोटांनाही बालगंधर्व असे खेळवत राहातील की वाटावे, खेळ संपूच नये । ‘नरवर कृष्णासमान’ सारख्या पदात रंगताना दाणेदार तानांची फेक आणि मांडणी अशा झोंकात करतील की मोत्यांच्या तेजस्वी माला बहरता बहरता क्षणात रंगभूमीवर गुंफल्या जाऊन आपल्या स्वयंवरासाठी त्यांची आरास रुक्मिणी मांडीत आहे असाच भास व्हावा !
‘निषादभी कितनी मिठ्ठी’
तबलानवाझ उस्ताद अहमदजान तिरखवाँ संगीतक्षेत्री या देवापुढे झुकला, म्हणू लागला, “सिर्फ दो नवाब मानता हूं, गानेवालों का रामपूर का नवाब, मराठी नाटक का गानेवाला नवाब !’
“संगीत ऐकावेसेच वाटले तर मी गंधर्वाच्या नाटकाला जाऊन बसतो. वो मिठी जबान के गलत सूर भी मुझे प्यारे लगते है. इनकी निषाद भी कितनी मिठ्ठी, मेरे से भी नहीं निकलती,” असे उघड उघड म्हणत, सहसा गाण्याच्या मैफलींना उपस्थित न राहाणाऱ्या संगीतसम्राट अल्लादिया खांसाहेबांसारख्या हिंदुस्थानी संगीताच्या गौरीशंकराचे हे गौरवोद्गार पंडितांना कुंठित करणारे आणि संगीताच्या व्याकरणाला धक्का देणारे।
‘माझे कर्ज मलाच फेडू दे’
रंगभूमीवर पदार्पण केल्याच्या काळापासून सर्वांगी अनुकूलतेमुळे अंकूरत गेलेल्या दांडग्या आत्म- विश्वासातून वाढलेला इच्छिताचा ध्यास आणि त्यापोटी हट्ट ह्यांची पूर्तता झाल्याशिवाय बालगंधर्वांना स्वस्थता लाभत नसे. अन्नदात्या प्रेक्षकांना प्रसन्न ठेवणाऱ्या निर्माण करण्याच्या ध्यासाने त्यांनी लाखोंची कर्जे काढली. बालगंधर्वावर प्रेम करीत राहणे आणि संकटकाली त्यांना हात देण्यासाठी धावून जाणे हा महाराष्ट्राच्या रसिकतेने आपला धर्म मानला आणि रसिकांची निष्ठापूर्वक सेवा हा आपला धर्म मानून त्यांच्या सुखापुढे आपली वैयक्तिक दुःखे बालगंधर्वांनी तुच्छ लेखली. नाटक संपून पडदा पडताच अंगावरील वेषभूषेतच स्टेजवर गुडघे व डोके टेकून “अन्नदाते मायबा-प” म्हणत प्रेक्षकांच्या दिशेने नमस्कार घालण्याचा बालगंधर्वांचा नेम कधीही चुकला नाही! भारत सेवक समाजाच्या पुढाकाराने स्नेहीमंडळींनी दोन लाख रुपयांची थैली कर्ज फेडीसाठी देऊ केली असता ती नाकारताना बालगंधर्व म्हणाले होते, “माझ्या चुकांमुळे झालेले कर्ज अन्नदात्यापुढे कष्ट करून माझे मलाच फेडले पाहिजे !’
सर्वस्वाने तयार केलेली ‘सिंधू’
बालगंधर्व स्वतःसंबंधी कधी बोलत नसत, कर्तृत्वासंबंधी बोलणे दूरच. टीकांची दखल घेत, वाचाळता नाही. गणपतराव बोडस अभिमानाने बोलत, मित्रवर्य गडकऱ्यांनी सुधाकराच्या भूमिकेला अधिक उठाव दिला असल्याचे वारंवार सांगत. पुण्यप्रभावातील वसुंधरा-वृंदावन सामना गडकऱ्यांच्या अटींमुळे हुकला ही जाणीव त्यांच्या मनांत सतत जागती. सहसा मानवणार नाहीत अशाही अटींचे आव्हान स्वीकारून बालगंधर्वांनी ‘एकच प्याला’चे हस्तलिखित काबीज केले आणि सिंधू सर्वस्वाने तयार केली. बोडसांच्या प्रसिद्धीला अधिक उठाव देण्यासाठी, ‘एकच प्याल्या’त उभ्या राहिलेल्या सुधाकराचे एक छायाचित्रही प्रसंगी जाहिरातीत वापरण्याच्या सूचना दिल्या.
आणि – “हे काय भलतंच, आपलं नावानंच हाका मारीत सुटायचं,” असे म्हणून सुधाकरावरील लटका राग प्रगट करीत प्रवेशणाऱ्या सिंधूपासून तो “भरल्या हाती हळदीकुंकवानं आपल्या मांडीवर मरण यावं याहून आणखी कोणतं भाग्य हवं मला?” असे म्हणत प्राण सोडणाऱ्या सिंधूपर्यंतचा ‘एकच प्याला’ बालगंधर्वांनी निर्माण केलेल्या उदात्त करुण रसानेच काठोकाठ भरतो. झपाट्याने बदलत जाणाऱ्या जीवनाशी बालगंधर्व असे एकजीव की. इतर पात्रे देवतास्वरूप सिंधूपुढे निस्तेज होऊन प्रेक्षकांची सहानुभूती सिंधूवर केंदित होते. “चंद्र चवधिचा, रामाच्या ग बागेमध्ये चाफा नवतिचा” व “स्वस्थ कसा तू? ऊठ गड्या, ऊठ गड्या, झणि टाक उड्या” या सिंधूच्या ओळी प्रेक्षकांना वत्सल रसात न्हावू घालतात तर “बघु नको मजकडे केविलवाणा राजसबाळा” या पदातील ‘राजसबाळा’ हा एकच शब्द विविध आर्तरवांनी बालगंधर्व असा ओलावून टाकतात की प्रेक्षकांच्या डोळ्यांतून खळखळा पाणी यावे !
फाटक्या वस्त्रांनी केलेला राजवस्त्रांचा पराभव पहाण्यासाठी गडकरी थांबले नाहीत. त्यांच्या असामान्य प्रतिभेने सुधाकर विलक्षण सामर्थ्याने रंगवला आणि बोडसांनी तशाच ताकदीने तो उभा केला हे निर्विवाद, पण नाटक पाहून परतणाऱ्या प्रेक्षकांच्या मनात कित्येक दिवस कारुण्यमूर्ती सिंधूशिवाय दुसऱ्या कोणत्याही विषयाला जागाच राहात नाही ।
माझ्या चालींचे सोनं केलं !
‘एकच प्याला’ हे, प्रलयावस्थेत देखील हिऱ्यामाणकांच्या तोलामोलाची भाषा बोलणाऱ्या सुधाकरापेक्षां, वात्सल्याने ओथंबलेली भाषा गाणाऱ्या बालगंधर्वांच्या सिंधूचेच नाटक !
सुंदाबाईंची समयोचित संगीत सजावट गुर्जरांच्या सुंदर पदांना प्रसंगानुकूल उठाव देणारी. आपल्या दरबारातील संगीतकारांच्या पंक्तीत बालगंधर्वांनी तिला स्थान दिले, खजिन्यात गझल-कव्वाली ढंगाची भर घातली. सुंदाबाईची समाजातील प्रतिष्ठा उंचावण्याबरोबर, उभे राहून जनतेची सेवा करणारी बाईची लावणीही प्रतिष्ठित व्यासपीठावरील बैठकीत जाऊन बसली. मैफलीत पदांच्या मूळ चीजा. पेश करताना म्हणायची, “त्यांनीच गाव्यात या चाली. तशा सुंदरतेनं गाणं मलासुद्धा जमायचं नाही. सोनं केलं त्यांनी माझ्या चालीचं ।’
आव्हानात्मक काळ
खाडिलकरांच्या ‘द्रौपदी’वर अभिजात गायकीचे संस्कार करीत भास्करबुवांनी बालगंधर्वांना अखेरच्या तालमी दिल्या. बुवानंतर गायनाचार्यांची गादी त्यांचे पट्टशिष्य संगीतकलानिधी मास्तर कृष्णराव यांनी अशा समर्थपणे सांभाळली की नाटके यशस्वी होवोत न होवोत, त्यांतील ढंगदार गायकी पदांना बैठकीचा दर्जा प्राप्त झाला. बालगंधर्वांच्या चाळीशीनंतर १९३० पासूनच्या काळात तीन तासांच्या नाटिका लोकप्रिय होऊ लागल्या, मन्वंतराचे वारे वाहू लागले. या आव्हानात्मक काळातही ना. वि. कुलकर्णी, खाडिलकर आणि वसंत शांताराम देसाई यांची कान्होपात्रा-सावित्री-अमृतसिद्धी ही नवी नाटके बालगंधर्वांनी खर्चिक वैभवातच रंगभूमीवर आणली.
गायकी थाटाचे भजन
सर्व संग्राहक मनोवृत्तीमुळे सर्व लोकाभिरुचीना, सर्व संगीत-पंथीयाना, प्रकृती-प्रवृत्तींना मानवतील – रुचतील असे गानप्रकार बालगंधर्वांनी रंगभूमीवर लीलया खेळवले. काही उणीव राहू नये म्हणूनच की काय, ‘कान्होपात्रा’ नाटकापासून भक्ती-संगीताचा पारंपारिक भजनी बाज बदलून त्यावर अभिजात साज चढवला आणि गायकी थाटाचे भजनी फड रंगभूमीवर व बाहेर उभे केले. “बेसुमार भजन करून बालगंधर्व आपल्या गळ्यातील नाजूक रेशमी धाग्यांचे दोरखंड करून घेत आहेत” अशी जाहीर टीका गोविंदराव टेब्यांनी करताच, योग्य संधीची वाट पहाणाऱ्या बालगंधर्वांनी त्यांना पुण्यांतील एका ‘स्वयंवरा’चे आमंत्रण दिले आणि पहिल्या यमनापासून स्वरांचे झोत त्यांच्या जागेवर असे वर्षावले की अस्वस्थ झालेले गोविंदराव दुसऱ्या अंकांतील ‘मम सुखाची’ हे पद संपवत रुक्मिणी आत जात असता विंगेत येऊन बालगंधर्वांचे दोन्ही हात घट्ट पकडीत म्हणाले, “नारायणराव, काही लिहिल्या- बोलल्याचं मनात ठेवृ नका, माझी चूक झाली. तुम्ही आयुष्यभर गात राहावं आणि त्यासाठी परमेश्वरानं माझं उरलेलं आयुष्य तुम्हाला द्यावं !”
ऐतिहासिक करार
आचार्य अत्र्यांनी बालगंधर्वांच्या स्वाधीन केलेले ‘घराबाहेर’ रंगभूमीची वाट पहात होते, काकासाहेब अष्टपुत्रा देवकीच्या कथानकावरील विचारात होते. दामुअण्णा जोशांच्या बालमोहन-रंगभूमीवरील अत्र्यांच्या ‘साष्टांग नमस्कारा’ने बापू माने- सौदागर – नागेश जोशी, धुमाळ, आपटे इत्यादी बालनट एका रात्रीत प्रकाशात आणून हास्यस्फोटांचा आगळा आनंद देण्यास सुरुवात केली, तर नाट्यमन्वंतरची ‘आंधळ्यांची शाळा’ स्त्रियांसह, रंगभूमीवरील नव्या दिशेकडे प्रेक्षकांना घेऊन जाऊ लागली.
नव्या नाटकाच्या निर्मितीची दगदग सहन करण्या इतकी उमेद जुन्या मंडळीत राहिली नव्हती. बालगंधर्वांच्या तिसऱ्या कर्जाचा आकडा पाऊण लाखाच्या घरात गेला होता !
अशा परिस्थितीत बालगंधर्वांच्या सुखीसमाधानी निवृत्त जीवनाच्या तरतुदीसाठी, त्यांच्या पुरुषभूमिका असलेले काही बोलपट काढण्याच्या महत्वाकांक्षी योजनांतर्गत, सुविख्यात चित्रनिर्माते-दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या पुढाकाराने आणि गंधर्व कंपनीचे नाटककार, सुप्रसिद्ध नाट्यसमीक्षक वसंत शांताराम देसाई यांच्या मध्यस्थीने प्रथम दोन बोलपटांसाठी झालेला बालगंधर्व-प्रभात प्रॉडक्शन्स’चा करार बालगंधर्वांना दिलासा देणारा होता. के. नारायण काळे लिखित पहिल्या बोलपटाचे नाव ‘महात्मा’ ! पैचेही भांडवल न गुंतवता, प्रभातचे पाच मालक एका बाजूस आणि दुसऱ्या बाजूला एकटे बालगंधर्व, अशा आश्वासनात पन्नास पन्नास टक्के नफा देणारा चित्रसृष्टीतील हा एकमेव करार ऐतिहासिक महत्त्वाचाच. बालगंधर्वांच्या कलेचे माहात्म्य हेच त्यांचे भांडवल ।
मानापमान : नाथा नाही मी बोलत आता – भामिनी (बालगंधर्व) आणि कुसुम (सदुभाऊ रानडे)
‘महात्मा’ ते ‘धर्मात्मा’
सतत तीस वर्षे, मोहविणाऱ्या वेषभूषेतील स्त्रीभूमिका मराठी समाजापुढे ठेवणाऱ्या बालगंधर्वांच्या, धोतर-बाराबंदी – चमनगोट्यावरील घेऱ्यात शेंडी भरदार मिशा, अशा रूपात रुपेरी पडद्यावरील प्रथम दर्शनाप्रमाणेच, रंगभूमीवर स्वच्छंद गानविहार करणाऱ्या महात्म्याचे तीन मिनिटांचे गायन रसिकांना व त्यांनाही कितपत पटणारे व समाधान देऊ शकणारे असेल हा प्रश्नच होता. शिवाय ब्रिटिश सत्तेविरुद्धचा ‘महात्मा’ गांधींचा उठाव वाढत चाललेला, हरिजनोद्धाराची चळवळ जोर धरू लागलेली.
“राजकीय दस्तुस्थिती आणि प्रचलित धार्मिक प्रश्न यासंबंधांत अनावश्यक व विपर्यस्त भूमिका” घेतल्याच्या आरोपावरून ब्रिटिश सेन्सॉरने बोलपटाच्या प्रकाशनावरच बंदी घातली आणि मुंबई सरकारच्या गॅझेटमध्ये तसे प्रसिद्धही करण्यात आले !
भगीरथ प्रयत्नांनी सेन्सॉरचे मन वळविण्यात आले, त्यांच्या सूचनांवर हुकूम आक्षेपार्ह दृश्ये पुन्हा चित्रीत करण्यात येऊन ‘महात्मा’चे ‘धर्मात्मा’ करण करण्यात आले. बोलपट झळकला, उत्पन्नही देऊ लागला. पण त्या व्यापातापात बालगंधर्वांचे मन त्या सृष्टीवरून उडाले. यंत्रांची मर्जी, हालचाली-भाषण-गाण्यावरील मर्यादा इत्यादी कारणांमुळे दोन चित्रपटांच्या पहिल्या करारातूनच सुटका करून घेऊन बालगंधर्वांनी पुनरपी रंगभूमीकडे धाव घेतली आणि संत तुकारामाची तंबूरी विष्णुपंत पागनीसांच्या हाती गेली !
‘धर्मात्मा’च्या भागीतून तिसरे कर्ज बालगंधर्वांनी बहुतांशी फेडले.
अत्रेही विरघळले !
रुपेरी पडदा नाट्यगृहे काबीज करू लागला, पडद्यावरील ती बोलती-गाती-नाचती करमणूक नाटकांच्या प्रेक्षकांनाही आकर्षित करू लागली. पुरुषांनी केलेल्या स्त्रीभूमिका पहाणारे दिवस मावळून गात गात प्रवेश करणाऱ्या स्त्रियांची पहाट रंगभूमीवर उगवू लागली.
काही अल्पकालीन भूमिकांसाठी गंधर्व कंपनीत प्रवेश करून घेतलेल्या नटमंडळींनी प्रमुख स्त्रीभूमिकेसाठी गायिकांच्या शिफारसी चालू केल्या आणि कंपनीतील किंवा स्नेहातील कुणाच्या ध्यानी मनी स्वप्नीही नसता स्त्रीपात्राचा आपला क्रांतिकारक निर्णय बालगंधर्वांनी अकस्मात जाहीर केला !
आपल्या रंगभूमीच्या पुनरुज्जीवनाच्या ध्यासाने त्यांना घेरले ।
आपली नवयोजना एका विस्तृत लेखातून मांडतांना, गंधर्व कंपनीची संस्कृती आणि ‘घराबाहेर’ रंगभूमीवर येऊ न शकल्याची कारणे यांच्या विवेचनात आचार्य अत्र्यांना किंचित दुखावणारी एकदोन वाक्ये लेखात उतरल्याने अत्रे खवळले आणि आपल्या ‘नवयुग’ साप्ताहिकाच्या ‘अत्रे उवाच’मधून त्यांनी बालगंधर्वांवर तोफ डागली, युद्धास तोंड लागले, अत्रे-गंधर्व वाद दीर्घकाल गाजत राहिला, चिघळत गेला. सुखावली की साखरेने लिहिणारी आणि दुखावली की तिखटाने झोडपणारी आत्रेय लेखणी व प्रतिपक्षीयांच्या लेखण्या, अप्रिय वळणे घेऊ लागताच युद्धविरामाची निकड भासू लागली. बालगंधर्व म्हणाले, “भेट होताच शांत होतील बाबुराव.” समेटप्रसंगी भेट होताच बालगंधर्वांना मिठी मारून वर उचलत आचार्य म्हणाले, “नारायणराव, तुम्हाला पाहिले की कटुता विरघळते. आजपासून वाद बंद !’
मम् मनी कृष्णसखा रमला : स्वयंवर (बालगंधर्व)
शतसांवत्सरिक महोत्सवाचे नवल !
१९४४ च्या एप्रिल महिन्यात मुंबईत चर्नीरोड स्टेशनजवळ सागरतीरावरील मैदानात प्रचंड उत्साहात साजरा झालेला मराठी रंगभूमीचा शतसांवत्सरिक महोत्सव ऐतिहासिक महत्वाचा तसाच बालगंधर्वांच्या पुण्याईची कसोटी घेणाराही होता. हा सोहळा सारी मुंबई हादरविणाऱ्या भयानक स्फोटांच्या पार्श्वभूमीवर सुरू झाला.
अध्यक्षपदावर न. चिं. केळकर, भा. वि. वरेरकर आणि ना. श्री. राजहंस या नावांतील बालगंधर्वांची निवड बहुमतांनी झाली होती. बालगंधर्वांच्या नेतृत्वाने व साक्षीने- वैभवाप्रत पोहोचलेल्या रंगभूमीच्या पुण्याईला संकटांची पर्वा नव्हती. अनेक दिवसांच्या अविश्रांत मेहनतीने तयार झालेले. उघडे नाट्यगृह, प्रेक्षागार, निवासी मंडप इत्यादी भाग आपत्तीला न जुमानता जशाचा तसा मूळ दिमाखात उभा होता. १४ एप्रिलला सुरू व्हावयाचा हा भव्योत्सव १५ एप्रिलपासून, सुरू झाला त्याच थाटामाटात बारा दिवस चालला.
अध्यक्ष बालगंधर्व आणि स्वागताध्यक्ष आचार्य अत्रे यांचा, इतके दिवस महोत्सवाच्या महन्मंगल कार्यात गुण्यागोविंदाने चाललेला उत्साही वावर हा सातआठ हजार प्रेक्षकांच्या अनेक चर्चातील एक सुखद विषय होता !
‘गातेही रहना बेटा !’
महोत्सवातील ‘स्वयंवर’ नाटकाच्या प्रयोगात रुक्मिणीचे दर्शन घडते न घडते तोच आठ हजार प्रेक्षकांचे लक्ष मुख्य प्रवेशद्वारांतून कार्यकत्यांच्या हातांनी अक्षरशः झेलून आणलेल्या गुलाबी साफ्यातील शुभ्र दाढीमिशांच्या वृद्धाकडे गेले. अस्वास्थ्यात उपस्थित राहिलेल्या अल्लादियाखांसाहेबांना रुक्मिणीसमोरच्या खास आसनावर बसविण्यात आले. भावाबरोबरचा लडिवाळ संवाद आटोपता घेऊन रुक्मिणी पुढे सरकली आणि आपली मान काही क्षण खांसाहेबांसमोर झुकती ठेऊन तिने सुरुवात केली, – ‘नाथ’ हा माझा’ -।
दुसऱ्या अंकात जगदंबेच्या प्रार्थनेसाठी जोडलेले हात तसेच खांसाहेबांकडे वळवून बालगंधर्व रंगवू लागले, – “ममे सुखाचि ठेव, देवा, तुम्हांपाशी ठेवा-‘
उंचावलेल्या थरथरत्या हातांनी नव्वद वर्षांचे खांसाहेब रुक्मिणीच्या पदांना दाद देत होते. तिसऱ्या अंकानंतर सूचना करताच त्यांना आत नेण्यात आले. पायांवर डोके ठेऊन नमस्कार करणाऱ्या बालगंधर्वांना खांसाहेबांनी अखेरचा आशीर्वाद दिला, “बहोत सुनाया, गातेही रहना बेटा।” आणि ते निघाले. खांसाहेबांनी ऐकलेले बालगंधर्वांचे ते शेवटचे नाटक.
त्यांचे चालतेबोलते दर्शन त्यानंतर कधीच घडले नाही । महोत्सवाच्या वर्षभराआधीची एक घटना बालगंधर्वांना त्रस्त करीत होती. बडोदे संस्थानच्या सेवेतील सरदार माधवदास मुनशी नावाच्या कारभाऱ्याकडून कधीकाळी घेतलेल्या बारा हजार रुपयांच्या रकमेची मुदतीत परत फेड न केल्याने सरदारसाहेबांनी तत्कालीन संस्थानी कोर्टात बालगंधर्वांवर फौजदारी फिर्याद दाखल केली होती. उत्सवात समावेश न केलेल्या ‘एकच प्याला’चा खास प्रयोग करून केसचा निकाल लावावा असे ठरले. उत्सवात प्रसिद्धी झाल्यास दैनिक उत्पन्नावर परिणाम होण्याची खात्री असल्याने, शेवटच्या दिवशी घोषणा करून एका दिवसाच्या अंतराने प्रयोग पार पाडण्याचे निश्चित झाले. सरदारसाहेबांनीही आठ हजारांच्या तडजोडीस मान्यता दिली होती.
प्रयोगाच्या दिवशी ‘एकच प्याला’चे उत्पन्न पंधरा हजारांच्या आसपास पोहोचले होते, तिकिटविक्री चालूच होती.
नाटकाने रंगतीचा कळस गांठला. नाटक पहाटे सहाला संपले. प्रयोगाचे हिशेब होऊन आठ हजार रुपये सरदार मुनशींच्या स्वाधीन केल्यावर, ‘बालगंधर्वांसाठी खास’ झालेल्या त्या उत्पन्नातील उरलेली रक्कम डॉ. भालेरावांनी त्यांना देऊ करताच बालगंधर्व म्हणाले, “डॉक्टर, त्या स्फोटात निराधार झालेल्यांसाठी फंड जमवला जातो आहे ना, त्याला माझी देणगी म्हणून ती द्या!”
पर्वधर्मीय-सर्वपक्षीय समाजाने सर्वसमभावी एकात्पतेचे दर्शन बालगंधर्वांच्या कारकीर्दीच्या अखेरच्या काळापर्यंत त्यांच्या नाट्यमंदिरातील संमेलनात घडवले. भारतीय संस्कृती-परंपरेत वाढलेल्या सुकन्या-सुप्रिया-सुमाता इत्यादी आदर्श स्त्रियांचे सद्गुण दर्शनीय आणि श्रवणीय पैलूंनी बालगंधर्वांनी अशा प्रभावीपणे समाजापुढे मांडले की सौदर्यसंपन्न पुरुषांनी स्त्रीभूमिका करण्याच्या विसाव्या शतकातील अद्भुत पर्वाचे ते अतुलनीय शिल्पकार ठरले. पूर्वस्मृतींच्या नशेने धुंद होण्यासाठी, सर्व अपराध-अपघात विसरून त्यांच्या उत्तर आयुष्यांतील भूमिकांकडेही रसिकांनी भक्तिभावाने धाव घेतली आणि सतत पन्नास वर्षे त्यांच्यापुढे तेवत राहिलेल्या नाट्यकला-संस्कृतीच्या या तेजोमय नंदादीपाची पूजा बांधली ।
लोकमान्य टिळकांनी गौरविलेला आणि छत्रपती शाहू महाराजांची मर्जी संपादन केलेला वेदशास्त्र संपन्नाच्या कुळातील गाणारा राजहंस, श्वानदंशामुळे अधू झालेल्या कानांवरील उपचारांसाठी, छत्रपतींच्या आदेशाने व आश्रयाने मिरज संस्थानी गेला आणि तिथे नायिकेच्या अभावी बंद पडलेल्या किर्लोस्कर कंपनीतील कुशल कारागिरांनी त्याच्याभोवती विणलेल्या मोहमयी जाळ्यात अनपेक्षितपणे सांपडला, हा सोळा वर्षे वयाच्या बालगंधर्वांच्या आयुष्यातील पहिला चमत्कार ।
त्यांच्या असामान्य कर्तृत्वाने रंगभूमीवर असंख्य चमत्कार केले आणि नवयुगात आपल्या रंगभूमीच्या पुनरुज्जीवनासाठी घेतलेल्या ध्यासाने त्यांच्या आयुष्यातील अखेरचा चमत्कार घडवला ।