gb
English
maharashtra - 4
मराठी
india
हिंदी
Logo

मान्यवरांचे मनोगत

हे साधे वाटणारे गंधर्वांचे गाणे अभिजात रागसंगीताची  जाणकारी असलेल्या श्रोत्यांना आपले कुळशील  किती थोर आहे याची साक्ष पट‍वून जायचे. मन हलता हलता हातही जोडले जायचे.

“गाण्याला सुरवात केल्याक्षणी  सगळ्या रागाचा सुगंध धूपा सारखा इतक्या सहजपणे दरवळायला लावायच सामर्थ्य ख्याल गायकात देखील आढळणं मुश्किल असत”

महाराष्ट्रभूषण पु. ल देशपांडे (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ-१९)

“संगीत क्षेत्रातली बालगंधर्वांची सगळ्यात मोठी देणगी म्हणजे स्तोत्र आणि आरत्या ह्या पलीकडे न जाणारी असंख्य मराठी कुटुंबाच्या कुटुंब बालगंधर्वांनी ‘गाती’ केली. जिथून ‘वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना‘ ऐकू यायचे तिथून ‘नरवर  कृष्णा समान‘, ‘स्वकुल तारक सुताच’ काय पण ‘मला मदन भासे’, नाही मी बोलत नाथा’ ही ऐकू यायला लागलं” 

महाराष्ट्रभूषण पु. ल देशपांडे (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ-२५)

“संगीत ऐकावेसे वाटले तर मी गंधर्वांच्या नाटकाला जाऊन बसतो. वो मिठी जबान से गलत सूर भी मुझे प्यारे लागते है. इनकी निषाद भी कितनी मिठी; मेरे से भी नहीं निकलती”

संगीतसम्राट अलादिया खान (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ-३४)

“बालगंधर्वांची गायकी वाटते सोपी पण ती तितकी सहज सोपी नाही हे स्वत: गायला लागल्यानंतर कळते. त्यांची लयीची जन्मताच आलेली समज आणि पंडित भास्करबुवांनी त्यांच्याकडून घेतलेली रेखीव मेहनत यामुळे बालगंधर्व लयतालकालाचे अलंकार ललना कर्णफुलं ज्या सहजतेने लेवतात तसे वापरू लागले. त्यांची ही असामान्य कर्तबगारी – यतोवाचो निवर्तन्ते अश्या उच्चतम कोटीतली झाली आहे.”

गोविंदराव टेंबे (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - ५६)

“संगीताबाबत बालगंधर्वांमध्ये अनेक गुण आहेत. जवारीदार स्वरेल आवाज, अत्यंत लवचिक गळा, दाणेदार तान, ताल व लय यांचा उपजत पक्केपणा, याशिवाय त्यांच्या गळ्यात अशी काही लडिवाळ लटक होती की जणू काय मुलीच्या कानातले डूलच! निर्व्याज लीलेने ते केव्हा व कोठे हलतील याचा नियम नाही! एकंदर गाण्यातील संथपणा व संयम त्यांच्या इतका क्वचितच पहावयास मिळेल. गायनाच्या शास्त्रीय प्रमादाचे गालबोट त्यांच्या दृष्टीच्या तिटीसारखे शोभादायक ठरते. अगदी सर्वसामान्य रागातील पदात ते एखादा विसंवादी अशास्त्रीय स्वर लावतील, किंवा तो अभावितपणे लागून जाईल, पण तो इतक्या सहजपणे व अशा झोकाने की त्यायोगे रागाला नाही तरी चालीला नवीनच शोभा यावी. त्यांच्या गळ्याला तान म्हणजे तळहाताचा मळ ! ‘नको नको’ म्हणता गळ्याला लागून जायची, आणि तीत पुसटपणा नाही की तालसुरला धक्का नाही. अशा गायनाची जाणत्यानेणत्या आबालवृद्धावर मोहिनी पडावी व ती चाळीस वर्षे अबाधित रहावी, यापलीकडे परमेश्वरी प्रसाद तो काय असू शकेल?”            

गोविंदराव टेंबे (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - १३७)

“अभिनय म्हणजे काय याची जाण आल्यानंतर मी ज्या नटांना पाहीलं त्यात बालगंधर्वांच्या तोडीचा अभिनय पुन्हा दिसला नाही. आपला संवाद आणि सूर यांचा उत्कृष्ट मेळ घालण्याचे आगळे कौशल्य त्यांना साधले होते. अभिनय कसा मनातून उमलला पाहिजे, व्यक्तिरेखेशी कसा नट पूर्णपणे एकजीव झाला पाहिजे. बालगंधर्वांकडे हे असामान्य अभिनय सामर्थ्य होते. म्हणूनच त्यांची जागा अन्य कुणालाही घेता आली नाही.”

ज्ञानपीठ पारितोषिक विजेते शिवराम कारंथ (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - १३५)

“त्यांच्यात एक स्त्री दडपलेली होती. मेकअपला बसले की ती स्त्री मोहरून येई. – – –  बाकीचे स्त्रीपार्टी हे स्त्री-पार्टीच राहिले. गंधर्व हे स्त्रीमनाचे निरूपक झाले.”

ज्येष्ठ कवी व गायकनट हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - २५)

“त्यांच्या गाण्यातली अपूर्वता ही होती की आवाजाच्या कलेच्या दुनियेत ‘आवाज’ (आघात) न करता ते प्रत्येक गोष्ट करत. नारायणरावांच वैशिष्ठ्य हे की ते आपलं गाणं फुलांसारखे श्रोत्यांपुढे ठेवीत.”

पंडित कुमार गंधर्व (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ- २५)

“सर्व नाट्य संगीत गाणाऱ्यांनी संगीताची नासाडी केली – अपवाद फक्त बालगंधर्वांचा!”

गानसरस्वती किशोरी आमोणकर

“एखाद्या गायकाच्या गळ्यात जे गुण असावेत ते सर्व बालगंधर्वांच्या गळ्यात होते आणि जे दोष गळ्यात नसावेत ते त्यांच्यात नव्हते”

आनंद गंधर्व आनंद भाटे (गंधर्वगान)

“लय पहावी गंधर्वांच्या गाण्यात“

प्रसिद्ध तबला वादक खाप्रूमामा पर्वतकर (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - २६)

“जोपर्यंत लोकांना नादब्रह्माची ओढ आहे तोपर्यंत बालगंधर्व आणि त्यांच्यासारख्या बेगम अख्तर या व्यक्ती अजरामर राहतील.”

पंडित मल्लिकार्जुन मन्सूर (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - २६)

“पंडित मन्सूर किंवा पद्मावतीबाई यांना बालगंधर्व आणि बेगम अख्तर ह्यांच्या गाण्यात हे नाटकातील पद, ही गझल असले भेद दिसत नाहीत. त्यांना मी मी म्हणणार्‍या ख्याल-गायकातही न दिसणार सूरलयीचं अलौकिक अद्वैत दिसत. त्यांना त्यातलं निखळ गाणेपण दिसत आणि ही श्रेष्ठ कलावंत त्या गाणेपणापुढे नम्र होतात.”

महाराष्ट्रभूषण पु. ल. देशपांडे (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - २६)

“मला  गंधर्वांच्या चेहर्‍याच्या जागी फक्त तेजस्वी वलय दिसू लागले. त्या  वलयात बाजूचे  शंकरराव सरदेसाई दिसेनात. मी त्या वलयालाच वंदन केले.”

गायकनट जयराम शिलेदार (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - २६)

“जसं बोलत असत तस गात असतं  – प्रेमाने “

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - ७९)

“स्वर व लय दोन्ही काबूत असलेला हा कलाकार होता. त्यांनी काहीही म्हटलेलं त्यांना शोभत असे. भीमपलासमध्ये शुद्ध निषाद लावायचा नाही पण हे लावत. आमचे गुरु त्यांना म्हणत, ‘हे तुझचं काम. इतकं ते गोड लागायचं. कितीही अवघड जागा ते सहज घेत. चांगले लयीतले समजले जाणारे कधी कधी आश्चर्य करीत, की ते समेवर कसे येतात? ते कुठलाही शब्द तोडीत नसत. हे त्यांचीच विशेषता होती.”

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - २६)

“अशावेळी वाटत की बालगंधर्वांची प्रत्येक बाबतीतली  उत्कटता आणि त्यांच्या गळ्यातला तो अत्यंत आर्जवी दिव्यस्वर एखाद्या अज्ञात शक्तीच्या कृपेने मला लाभला असता तर त्या सुरात आणि त्या उत्कटतेने मी खुद्द बालगंधर्वांनाच मुजरा करीत म्हणालो असतो “जोहार  मायबाप जोहार”

महाराष्ट्रभूषण पु. ल. देशपांडे (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - ३२)

“(मै) सिर्फ दो नवाब मानता हूं, गानेवालेका रामपूरका नवाब, मराठी नाटक का गानेवाला नवाब”

उस्ताद अहमदजान तिरखवा (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - ३४)

Scroll to Top