तो राजहंस एक...
लेखिका - मंजूषा आमडेकर
८. रुपेरी पडदा आणि दारूण पराभव
गणपतराव परतले
१९२८ साल उजाडलं. नवीन वर्षांच्या सुरुवातीपासूनच चांगल्या चांगल्या शुभ घटना घडायला लागल्या होत्या. १९२२ साली गणपतराव गेल्यापासून तालीममास्तर म्हणून कुणीच मंडळीत नव्हतं. तालमींच्या अभावी आपल्या जुन्या यशस्वी नाटकातलीही सफाई कमी होत चालली आहे असं बालगंधर्वांना वाटायला लागलं होतं. सर्वांना तालीममास्तर म्हणून एकच व्यक्ती योग्य वाटत होती आणि ती म्हणजे गणपतराव बोडस. गंधर्व मंडळी सोडून जाताना गणपतरावांनी मंडळीवर फिर्याद लावली होती. कारण त्यांचे एकोणीसशे रुपये मिळालेले नव्हते. १८ ऑगस्ट १९२७ रोजी दोन्ही पक्षात सन्माननीय तडजोड होऊन वाद मिटला. त्यांना आता गंधर्व मंडळीत परत बोलवायचा निर्णय बालगंधर्वांच्या मनात पक्का झाला होता. पण मध्यंतरीच्या काळात गणपतराव ललितकलादर्श आणि यशवंत या दोन नाटक मंडळींसाठी खेळाबरहुकूम काम करायला लागले होते.
अखेरीस चर्चा आणि वाटाघाटी होऊन गणपतरावांनी पुन्हा गंधर्व मंडळीत यायचं असं निश्चित झालं. लाडसाहेबांनी मध्यस्थी केली. गणपतरावांना वर्षांला साडेपाच हजार रुपये द्यायचे ठरले. एवढा मोठा पगार आजवरच्या नाट्य इतिहासात कुणालाही मिळालेला नव्हता. १९२८ च्या सुरुवातीलाच कर्जमुक्त झालेली कंपनी बालगंधर्वांच्या ताब्यात आलेली होती. गणपतरावही परत आले. त्यामुळे सगळीकडे चैतन्याचं वातावरण पसरलं. बालगंधर्व तर उघडपणे म्हणाले की, ‘गणपतरावांमुळे माझ्यावरची तालमींची जबाबदारी कमी झाली तर मी पाच वर्षं जास्त काम करू शकेन.’
याच दरम्यान अखिल भारतीय कीर्तीचे तबलजी अहमदजान तिरखवा गंधर्व मंडळीत यायला कबूल झाले. सुरुवातीला इतरांची यावर नाराजी होती. खर्च कशाला उगीच वाढवून ठेवायचा? कारण राजण्णा तर होतेच ना. असं सर्वांचं मत होतं. पण बालगंधर्व ठाम होते. ते म्हणाले, ‘तिरखवा आला म्हणजे तुम्ही बघालच!’
त्याप्रमाणे तिरखवा आला. त्याला दरमहा खाऊन पिऊन एकशे पंचवीस रुपये पगार ठरला. मुंबईच्या पहिल्याच प्रयोगाला तिरखवानं सगळ्यांची मनं जिंकली. सुरुवातीला खट्टू असलेल्या राजण्णानं त्याचं शिष्यत्व पत्करलं. आता नाटकांमध्ये चांगलाच रंग भरायला लागला होता. ऑर्गनवर केशवराव कांबळे, सारंगीवर कादरबक्ष आणि तबल्यावर तिरखवा हा अपूर्व संगम प्रेक्षकांना आणि कलाकारांनासुद्धा भुरळ घालायला लागला. खुद्द दादा काटदरे बोलून गेले की, ‘नारायणराव खर्च वाढवतात म्हणून मी ओरडतो खरा, पण ही अशी माणसं अगदी आवश्यक आहेत.’
जागा खरेदी आणि मुलीचा विवाह
बालगंधर्वांचं कर्ज फिटल्यापासून त्यांची स्वत:ची स्थावर मालमत्ता असावी आणि निवृत्तीनंतरची त्यांची व्यवस्था असावी असा दादांना ध्यास लागला होता. स्वत: बालगंधर्वांना अशी काही गरज आहे याची जाणीवही नव्हती. परंतू दादांच्या आग्रहास्तव त्यांनी पुण्यात वेधशाळेसमोरील पेरुची बाग जागा बारा हजारात घेतली. त्या जागेत तिघा भावांचे तीन बंगले बांधायचे अशी योजना होती. पण आता नवीन कर्ज नको, पैसे जमतील तसं सावकाशीनं करू, असं स्वत: बालगंधर्वच म्हणाले.
बराच काळ पुणे मुंबई सोडल्यास बाहेरगावी प्रयोग झाले नव्हते. आणि लहानसहान गावातही प्रतिसाद चांगला मिळतो असा अनुभव तर आलेलाच होता. त्यामुळे तिकडचे प्रयोग घ्यायचे ठरले.
१९३० साली बालगंधर्वांची मुलगी सरोजिनी हिचा विवाह करण्याचं ठरलं. डॉ भास्करराव वाबळे यांच्याशी तिचा विवाह इतक्या थाटामाटात झाला की लोकंही बघतच राहिली होती. बालगंधर्वांनी या विवाहात ३० हजार रुपये खर्च केले.
दैवगती अविचारी
पण सर्व काही चांगलं चाललेलं असताना दैवगती किती अविचारी असते याचा पुन्हा प्रत्यय आला. बालगंधर्वांची पहिली तीन अपत्ये गेली. पुढे तीन मुलीच झाल्या. त्यापैकी मोठी कमला कानात जखम होण्याचं निमित्त होऊन गेली. तिची कानाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली, पण तिला विषमज्वर झाला आणि ती दगावली. स्वत: बालगंधर्वही घसा बसून आजारी पडले होते. कारण ते रोज थंड पाण्यानं अंघोळी करत आणि सतत बर्फ घातलेलं पाणी पीत. मुलीच्या मृत्यूनंतर ते पुण्यात परत आले तो मृच्छकटिक नाटकाचा प्रयोग लागलेला होता. बालगंधर्वांनी तशाही स्थितीत तो केला. ते स्वत:ला कलेत झोकून देत दु:खाला विसरून जात. पण त्यांच्या पत्नी ही एकापाठोपाठ आपत्ये गमावण्याचे सल कधीच विसरू शकल्या नाहीत.
मुलगा हवा म्हणून त्या सतत व्रतवैकल्ये, उपासतापास करत असत. त्याला यश येऊन त्यांना पुन्हा दिवस गेले. सरोजच्या लग्नाच्या वेळी त्यांचा प्रसूतीचा समय जवळ आलेला होता. बालगंधर्वांची स्वयंवर आणि द्रौपदी ही दोन नाटकं लागलेली होती. त्यातलं द्रौपदी नाटक रद्द करून प्रेक्षकांचे पैसे परत दिले गेले आणि बालगंधर्व स्वत: पत्नीजवळ थांबले. त्यांना एक गोजिरवाणा मुलगा झाला. सगळीकडे आनंदीआनंद झाला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. पहाटेचा सूर्य उगवण्यापूर्वीच बाळ परलोकी निघून गेला.
रविवारी दुपारचा खेळ होणार असल्यानं बालगंधर्व अश्रू पुसून प्रयोगाला उभे राहिले. आजवर त्यांनी अनेक आघात झेलून आपला रसिकांना दिलेला शब्द पाळलेला होता. याही वेळेस त्यांनी आपली भूमिका समरसून केली. त्यांच्यावर इतका मोठा आघात झाल्याचं त्यांच्या रंगमंचावर वावरण्यातून कुणालाही जाणवलं नाही.
पुन्हा कर्जाचा ससेमिरा
वाढत्या वयानुसार कदाचित बालगंधर्वांचीही आघात सहन करण्याची क्षमता कमी झाली असावी की काय असं वाटण्याइतपत त्यांच्यावर परिणाम व्हायला लागला होता. भूमिकेशी एकरुप होणं त्यांना जड जायला लागलं. नकला पाठ होईनात. तालमीत प्रभाव पडेना. या सगळ्यात भरीला भर म्हणून आता नवनवीन कर्जं तयार व्हायला लागली होती. त्यावरचं व्याजही फुगत चाललेलं होतं. हा ताणतणावही होताच. लग्नानंतर त्यांनी आपल्या जावयाला पुढील शिक्षणासाठी परदेशी पाठवलेलं होतं. तोही खर्च वाढून तीस हजारापर्यंत जाऊन पोचलेला होता.
कंपनीत शंभरएक माणसं होती. सर्वांचे पगार होते. खाण्यापिण्याचा, प्रवासाचा, नाटकांचा खर्च होताच. बालगंधर्वांच्या सौंदर्योपासनेच्या हट्टापायी रंगभूमीवरचा खर्चही दिवसेंदिवस वाढतच चालला होता .
उंची शालू शेले तर होतेच. पण त्याचबरोबर महागडी अत्तरं घेऊन ती या कपड्यांना चोपडायची बालगंधर्वांनी पद्धत पाडली होती. जेणेकरून शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकापर्यंत त्या अत्तराचा सुगंध पोचला पाहिजे आणि प्रेक्षक खुश झाले पाहिजेत. प्रेक्षकांवर चांदीच्या गुलाबदाणीतून अत्तर गुलाबपाणी शिंपडलं जात असे. रात्रीच्या जेवणानंतर पंचपदी म्हणायची किर्लोस्करांची पद्धत इथेही चालू ठेवण्यात आली होती. मात्र बालगंधर्वांचा आवाज बसायला लागल्यामुळे खेळ बंद पडायला लागले. इंदूरच्या मुक्कामी तर चक्क महिनाभर खेळ बंद होते.
कान्होपात्रा
लवकरच ‘कान्होपात्रा’ नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. मास्टर कृष्णरावांनी लावलेल्या चाली सर्वांना इतक्या आवडल्या की दर सोमवारी संध्याकाळी बिर्हाडी भजनं गायली जाऊ लागली. या भजनांची लोकप्रियता इतकी वाढली की बिर्हाडी दर सोमवारी भजनं ऐकायला लोक गर्दी करायला लागले. या भजनांच्या निमित्तानं का होईना, पण उतारवयात आपल्याला लोकांची सहानुभूती मिळेल असं बालगंधर्वांना वाटायचं. तर दादा काटदरेंना वेगळीच चिंता सतावायला लागलेली होती. जर बालगंधर्वांची गाणी अशी फुकटात ऐकायला मिळू लागली तर लोक तिकीट काढून नाटकाला कशाला येतील अशी त्यांना धास्ती वाटायला लागली.
बालगंधर्वांनी वेळोवेळी लिहिलेल्या काही पत्रात परिस्थिती कशी खालावली आहे, उत्पन्न कसं घटत चाललं आहे, आवाज बसत असल्यामुळे खेळांवर परिणाम कसा होतो याविषयी लिहिलेलं आढळतं. अशा परिस्थितीत नव्यानं पुन्हा झालेली कर्जफेड कशी होणार हा प्रश्नच होता. एकीकडे कर्ज आणि वय वाढत होतं तर दुसरीकडे उत्पन्न घटत होतं. त्याच दरम्यान मास्टर कृष्णराव पंजाब सिंध प्रांतात दौर्यावर गेले असताना त्यांची लखमीचंद शेटजींशी ओळख झाली. त्यांनी बालगंधर्वांची नाटकं पाहिली आणि ते त्यांचे भक्तच बनले. अडचणीच्या वेळी लागेल तेव्हा, बालगंधर्व मागतील तेवढे पैसे ते द्यायला लागले. गंमत म्हणजे शेटजी हे पैसे प्रेमानं देत. ना ते कर्ज होतं ना त्यांची बालगंधर्वांकडून परतफेडीची अपेक्षा होती.
१९३१ सालच्या ऑक्टोबर महिन्यात ‘कान्होपात्रा’ नाटक मुंबईच्या रंगभूमीवर पहिल्यांदा सादर झालं. त्यातली अवघाची संसार, पतीत तू पावना, अगा पंढरीच्या राया, दीन पतित अन्यायी वगैरे अभंग प्रचंड लोकप्रिय झाले. नाटक यशस्वी झालं तरी उत्पन्न वाढेना, कर्ज फिटेना. त्यामुळे खर्चात कपात करण्यासाठी बोडसांबरोबर केलेला करार संपवण्यात आला. त्यानंतर मंडळी प्रथमच गोव्यात खेळ करायला गेली. तिथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. विनायकरावबुवा पटवर्धन कंपनी सोडून निघून गेले. विष्णु दिगंबर पलुस्कर वारल्यावर त्यांचे चिरंजीवही कंपनी सोडून गेले. त्यांनी जाऊ नये म्हणून बालगंधर्वांनी खूप प्रयत्न केला. पण त्या प्रयत्नांना यश आलं नाही.
पुन्हा नवीन कर्ज
पाठोपाठ दादा काटदरेंचीही तब्येत बिघडली आणि तेही कंपनी सोडून आपल्या मुलाकडे निघून गेले. त्यांनी जमाखर्चाचा हिशोब चोखपणे लिहून ठेवलेला असे. त्या आरपार प्रामाणिक आरशात कर्जाचा चेहरा आता विद्रूप आणि भेसूर दिसायला लागला होता. बालगंधर्वांचं बेहिशोबी वागणं पाहून आता यापुढे कर्ज फिटणार नाही अशी त्यांची खात्री पटली होती आणि ते निराश मनानंच निघून गेले होते.
एव्हाना कर्जाचा आकडा पन्नास हजारापर्यंत जाऊन पोचला होता. १९३२ च्या जून महिन्यात त्यांच्या वयाला चव्वेचाळीस वर्षं पूर्ण झाली होती. वारंवार खोकला होऊन आवाज बिघडत होता. ओरडल्यामुळे आवाज रुंद झाला होता. त्यांच्या व्यक्तिमत्वातला कोवळेपणा निघून गेला होता. त्यांच्या स्त्रीभूमिकांमधला गोडवा कमी झाला होता. हिराबाई बडोदेकर आणि ज्योत्स्नाबाई भोळे यांनी रंगभूमीवर प्रवेश केलेला असल्यानं रसिकांचं लक्ष तिकडं वेधलं जायला लागलं होतं.
याच काळात करमणुकीच्या क्षेत्रातील एका नवीन घडामोडीमुळे वेगळीच क्रांती घडायला सुरुवात झाली होती. प्रभात फिल्म कंपनीचा ‘अयोध्येचा राजा’ आणि ‘मायामच्छिंद्र’ या दोन बोलपटांनी अफाट लोकप्रियता मिळवून रसिकांचं मन रंगभूमीवरून ओढून पडद्याकडे वळवलं होतं. इतर सर्वच नाट्यसंस्थांप्रमाणेच बालगंधर्वांच्या गंधर्व मंडळीलाही याची झळ बसलीच. याखेरीज नाटकांमध्ये आलेला तोचतोपणा आणि जुने नट निरुत्साही आणि वयस्कर होऊ लागणं ही पण कारणं होतीच. त्यामुळे रंगभूमीला उतरती कळा लागायला लागली. आता बायकाच नाटकात कामं करायला लागल्यामुळे पुरुषांना स्त्री म्हणून पाहणं प्रेक्षकांना आवडेनासं झालं. काळाची पावलं ओळखून काही नाटक कंपन्यांनी विसर्जन करून टाकलं.
रात्रीच्या खेळांना प्रतिसाद मिळेनासा झाला. फक्त दिवसा चालणार्या खेळांवर चांगलं उत्पन्न होऊन कर्जफेड करता येणं शक्य होईल असं दिसेना. स्वत: बालगंधर्वही उदासीन होत चालले होते. दिवसेंदिवस उत्पन्न घटतच चाललं होतं. आता बालगंधर्वांच्या एकट्याच्या जिवावर नाटकं लोकप्रिय होईनाशी झाली होती. सावित्री आणि अमृतसिद्धी ही नव्यानं आणलेली नाटकंही कंपनीला तारू शकली नाहीत.
सिनेमाच्या चंदेरी दुनियेत प्रवेश
अशातच सोलापूरच्या मुक्कामात व्ही. शांताराम यांनी एकच प्याला हे नाटक पाहिलं. १९१३ मध्ये ते काही काळ गंधर्व मंडळीत होते. पण ते तिथे न रमल्यानं सोडून गेले होते. पुढे चित्रपट व्यवसायात त्यांनी चांगलेच पाय रोवले होते. आधी मूकपट आणि नंतर बोलपट काढून ते खूपच यशस्वी झाले होते. त्यांनी कोल्हापूरमध्ये स्थापन केलेली प्रभात कंपनी सिनेजगतात फारच नावारुपाला आलेली होती. बालगंधर्वांनी साकारलेली सिंधू पाहून ते अक्षरश: थक्क झाले होते. त्यांनी असा अंदाज व्यक्त केला की, ‘नारायणरावांनी आमच्या भागीत तीन वर्षांत सहा चित्रपट केले तर त्यांना कमीत कमी सहा लाख रुपये मिळतील!’
१९२८ साली कलकत्त्याच्या ‘मादन’ कंपनीनं आपल्या मूकपटात काम करण्यासाठी बालगंधर्वांना आमंत्रण दिलं होतं. पण त्यांनी ते नाकारलं होतं. कारण तेव्हा ते ऐन बहरात होते. पण आता परिस्थिती वेगळी होती. आता ते कष्टांना कंटाळले होते. कर्जाची रक्कम सत्तर हजारांना पोचली होती. अशा स्थितीत व्ही. शांताराम यांचा प्रस्ताव त्यांना आकर्षक वाटला. गंधर्व मंडळी बंद करून प्रभातमध्ये भागीदारी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पण आश्चर्य म्हणजे त्यापूर्वी आपण लाडसाहेब आणि खाडिलकरांचा सल्ला घ्यावा अशी त्यांना गरजच वाटली नाही. ज्यांनी उतरत्या काळात हात दिला होता त्यांच्याशी विचारविनिमय करावा, त्यांना विश्वासात घेऊन हा महत्वाचा निर्णय सांगावा असं त्यांना वाटलं नाही. पण ही बातमी चहूकडे पसरलीच.
लोक उलटसुलट विचार करायला लागले. बालगंधर्वांची पुरुष भूमिका प्रेक्षकांना आवडेल का, रंगभूमीवरच्या नटाला चित्रपटांचं जग रुचेल आणि पचेल का? त्यांचे संवाद प्रभावी होतील का? तीन मिनिटांचं गाणं लोकांना आवडेल का? पण गंमत म्हणजे हे सगळे विचार ना बालगंधर्वांनी केले होते ना शांतारामांनी. त्या दोघांनी फक्त एकमेकांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवलेला होता. गंधर्व मंडळीतील कलाकारांनी आपापल्या वाटांनी जावे आणि महागामोलाचे सगळे सामान गोदामात ठेवून द्यावे, एवढाच बालगंधर्वांनी विचार केला होता. कलेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ पैशासाठी बालगंधर्वांनी केलला तो पहिला व्यवहार होता असं म्हणायला हरकत नाही.
व्ही. शांतारामांनी सहा चित्रपटांची बोलणी जरी केलेली असली तरी सुरुवातीचा करार केवळ दोनच चित्रपटांचा असावा असं ठरवलं. बालगंधर्वांनी ते मान्य केलं. कारण पहिल्या दोन चित्रपटात कर्जफेड होऊन शिवाय वर पैसे उरणार होते. त्यामुळे १८ मे १९३४ रोजी पुण्याला हा करार कागदावर आला. याला अनुसरून बालगंधर्वांनी कोल्हापूरचा मुक्काम संपल्यावर ३१ डिसेंबर १९३४ रोजी गंधर्व मंडळी विसर्जित केली. एकोणतीस वर्षांपूर्वी ज्या कोल्हापुरात छ. शाहूमहाराजांनी लहानग्या बालगंधर्वांला रंगभूमीवर पाठवलं होतं त्याच शहरात बालगंधर्वांनी नाट्यकलेचा, व्यवसायाचा निरोप घेतला. सगळेजणच इतके भावुक झाले होते की कुणालाच काही बोलता येईना. ‘कर्ज फेडण्यासाठी नाईलाजानं कंपनी बंद करून सिनेमात जाणं भाग आहे,’ एवढंच कसंबसं बालगंधर्व बोलू शकले.
प्रभात नगरात पाऊल टाकलं
१ जानेवारी १९३५ पासून भागीदार या नात्यानं बालगंधर्व प्रभात नगरात जायला लागले. ते पुण्यात डेक्कन जिमखाना भागात कुटुंबासह रहात होते, आई भावासोबत शुक्रवार पेठेत तर मुलगी आणि जावई नाशिकमध्ये रहात होते. बालगंधर्वांना उतायवयात स्त्रीभूमिका चांगल्या दिसणार नाहीत म्हणून त्यांना संत एकनाथांची भूमिका देण्याचं निश्चित झालं. नायिका होत्या रत्नप्रभा, तर वासंती ही बालकलाकार म्हणून काम करणार होती.
बालगंधर्वांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की ते त्याचा ध्यास घेत असत. सडपातळ होण्यासाठी त्यांनी भात सोडला. दररोज पाचसात मैल चालण्याचा व्यायाम करायला लागले. स्टुडिओमध्ये लोक त्यांना अतिशय आदरानं वागवत असत. नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायचा ते मन लावून प्रयत्न करत होते. पण तरीही त्यांचं मन तिथे रमेना. कलेच्या ज्या वातावरणात त्यांनी वर्षानुवर्षं अपरिमित आनंद उपभोगला होता तो त्यांना चित्रपटांच्या जगात कुठेच गवसेना. प्रेक्षकांनी खच्चून भरलेल्या रंगमंदिरात पावला पावलावर दाद घेण्याची, वन्समोअर मिळवण्याची सवय असलेल्या बालगंधर्वांना चित्रपटातील दृश्यांचं तुटक चित्रण भावेना. त्यांना सूरच सापडेनासा झाला होता जणू काही. स्टुडिओमधला प्रखर प्रकाशझोत त्यांना सहन होईना. अतिउष्ण वातावरणात त्यांचा घसाही सारखा बसायला लागला. अखेरीस त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडलेच की, ‘देवा, या धंद्यात आमच्या नाटक धंद्यासारखा आनंद नाही.’
पहिला पराभव आणि पुन्हा गंधर्व मंडळी
तिकडे गंधर्व मंडळी विसर्जित झाल्यानं पुढे काय करावं हे समजत नसलेला नटवर्ग काहीतरी घडेल याची वाट बघत होता. त्यातच बालगंधर्व सिनेमाजगतात रमत नाहीत असं लक्षात येताच गंधर्व मंडळी परत उभी करण्याचं निश्चित झालं. 4 एप्रिल 1935 रोजी या नव्यानं उभ्या राहिलेल्या गंधर्व मंडळीचा उद्घाटन समारंभ थाटामाटात पार पडला. या धाडसी प्रयोगाला प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभला आणि बरं उत्पन्नही व्हायला लागलं. ७ डिसेंबर १९३५ रोजी बालगंधर्वांचा चित्रपट थिएटरमध्ये झळकला. लोक मोठ्या उत्कंठेनं बालगंधर्वांना पडद्यावर बघायला आले खरे. पण सर्वांची घोर निराशाच झाली. त्यांना अपेक्षित असलेले बालगंधर्व त्यांना पडद्यावर सापडलेच नाहीत.
चित्रपटाविषयी बालगंधर्वांना फारशी माहिती नव्हती. आणि व्ही. शांताराम यांना बालगंधर्वांच्या कलाकौशल्याची पुरेशी माहिती नव्हती. तरीपण एकमेकांवर विश्वास ठेवून ते एकत्र आले होते. मात्र हा प्रयोग अयशस्वीच ठरला. व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली काम करणारे नवखे नट प्रसिद्धीला पोचले. पण बालगंधर्व काही नवोदित नव्हते. प्रेक्षकांना त्यांच्यातील कलागुण माहीत होते. त्यामुळे त्यांना पारखण्याच्या फूटपट्ट्या आधीपासूनच तयार होत्या. आणि म्हणूनच नवीन रुपात बालगंधर्वांना प्रेक्षकांनी स्वीकारलं नाही. वाढत्या वयामुळे बालगंधर्व स्त्रीभूमिकेत शोभणार नाहीत हा व्ही. शांताराम यांचा कयास बरोबरच होता. पण पुरुष भूमिकेतील त्यांच्या शक्यता आणि मर्यादा शांतारामांना माहीतच नव्हत्या. हिंदी भाषिकांना एकनाथ माहीत नव्हते. अभंगांच्या चालीसुद्धा पकड घेणार्या ठरल्या नाहीत. चित्रिकरणाच्या प्रक्रियेशी समरस होता न आल्यानं बालगंधर्व दिग्दर्शक सांगतील तसं वागत राहिले. त्यामुळे भूमिकेत कृत्रिमता आली. या चित्रपटातील एकही गाणं प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं नाही आणि गुणगुणलं गेलं नाही हेच खूप मोठं अपयश होतं.
बालगंधर्वांच्या कलाजीवनातील हा पहिला दारुण पराभव होता असं म्हणता येईल!
बालगंधर्व आधीच सिनेमाजगतातील वातावरणाला कंटाळलेले होते. त्यात हा पराभव. त्यामुळे प्रभातनं आपल्याला करारातून मोकळं केलं तर आपल्याला ताबडतोब रंगभूमीवर परत जाता येईल अशी त्यांच्या मनात आशा निर्माण झाली. या अपयशामुळे प्रभातचे मालकही ही भागीदारी पुढे चालवायला उत्सुक नव्हते. त्यामुळे त्यांनी बालगंधर्वांचा प्रस्ताव तात्काळ मान्य केला आणि त्यांनी बालगंधर्वांना मोकळं केलं. तेही आनंदानं रंगभूमीकडे पुन्हा वळले.
दुसरा दारूण पराभव
बालगंधर्व रंगभूमीकडे परत आले तेव्हा ते सडपातळ झालेले होते. त्यांना गायनाचे श्रम कमी पडले असल्यानं आवाज बरा झाला होता. त्यातून रंगभूमीप्रमाणे जागरणं करावी न लागल्यानं ते टवटवीत दिसत होते. त्यामुळे त्यांच्या स्त्रीभूमिका रसरसशीत वाटायला लागल्या होत्या. लोक पुन्हा त्यांना पहायला गर्दी करायला लागले होते. पण या दरम्यान त्यांचे सहकलाकार कादरबक्ष मरण पावले होते आणि तिरखवांनी रामपूरच्या नवाबाकडे नोकरी घेतली होती.
स्वयंवर, एकच प्याला आणि द्रौपदी ही नाटकं उत्पन्न देत होती. पण बाकीची नाटकं चालत नव्हती. कर्जफेड अवघड होत चालली होती. अशा स्थितीत रुपेरी पडद्यानं बालगंधर्वांना पुन्हा एकदा कर्जफेडीचं मृगजळ दाखवलं. सरस्वती सिनेमाचे दादासाहेब तोरणे यांनी स्वयंवर नाटकातला एक लहानसा प्रसंग चित्रित आणि ध्वनिमुद्रित केला होता. त्यात बालगंधर्व सर्वपरीनं आकर्षक वाटत होते. एखाद्या राजघराण्यातील स्थूल स्त्रीसारखं त्यांचं रुपही सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं. स्वकुल तारकसुता या गाण्याचं रेकॉर्डिंगही उत्तम झालं होतं. बाबुराव रुईकर या कोल्हापूरच्या रॉयल सिनेमाच्या मालकांनी ते चित्रण पाहिलं आणि ध्वनिमुद्रण ऐकलं. त्यांना असा मोह झाला की चित्रपटात बालगंधर्वांना स्त्रीभूमिकेतच दाखवलं तर प्रेक्षकांना ते फार आवडेल. त्यामुळे मुंबईच्या मुक्कामातच अमृतसिद्धी नाटकाचा प्रयोग करून त्याचं चित्रिकरण करायचं ठरलं. याच्या बदल्यात रुईकर बालगंधर्वांना पंचवीस हजार रुपये देणार होते. नाटकातील इतर कलावंतांनाही एका महिन्याचा पगार जादा देणार होते. ही योजना बालगंधर्वांना पसंत पडली कारण त्यांना रंगभूमीवरून सिनेसृष्टीत जाऊन तिथल्या रुक्ष वातावरणात तुकड्या तुकड्यात चित्रिकरण करण्याची गरज पडणार नव्हती.
फक्त सिनेमात आपण स्त्री म्हणून चांगले दिसणार नाही अशी बालगंधर्वांना धास्ती वाटत होती. पण बाबुराव पेंटर यांनी त्यांना निश्चिंत राहण्याची हमी दिली. त्यांच्या सौंदर्य दृष्टीकोनावर सर्वांचाच विश्वास असल्यानं कल्पना पुढे सरकली. अखेरीस ३ जून १९३७ रोजी बालगंधर्व आणि रुईकर करारावर सह्या झाल्या.
हे सगळं चालू असताना मुंबईतील प्रयोगांचं उत्पन्न घटायला लागलं होतं. त्यातच हिंदू मुस्लीम दंगे झाले आणि प्रयोगांवर आणि उत्पन्नावर फारच वाईट परिणाम झाला. बालगंधर्व आणि रुईकरांचा एकत्रित प्रकल्प, ‘साध्वी मीराबाई’ हा चित्रपट १८ सप्टेंबर १९३७ रोजी पडद्यावर आला. नाट्यप्रयोगालाच चित्रपटात घेण्याच्या तंत्राला ‘स्टेज टॉकी’ असं म्हणतात. पाश्चात्य देशात हा प्रकार लोकप्रिय झाला असला तरी त्याचं तंत्र बाबुराव पेंटरांना ना माहीत होतं ना त्यांनी ते शिकण्याचे कष्ट घेतले होते. मुंबईतील फिल्म सिटीत नाटकाचा पडदा सोडून नाटकातले प्रवेश चित्रित करावेत आणि त्याच वेळी ध्वनिमुद्रणही करावे असं ठरलं होतं. त्याप्रमाणे दीडच महिन्यात चित्रिकरण झालं सुद्धा. पण या तंत्राला कमी लेखल्यानं हा प्रयोग कलाशून्य आणि संपूर्णपणे अयशस्वी ठरला.
व्ही. शांताराम आणि रुईकरांबरोबर केलेले चित्रपटांचे दोन्ही प्रयत्न सपशेल अयशस्वी ठरले!