तो राजहंस एक...
लेखिका - मंजूषा आमडेकर
२. संगीत क्षेत्रातील पहिला गंधर्व
गायनाचा कौटुंबिक वारसा आणि कलेचा विकास
बालगंधर्वांचे राजहंस घराणे हे मूळचे नागठाणे गावचे. हे नागठाणे सातारा जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात होते. तिथे राजहंसांची वडिलोपार्जित शेतीवाडी आणि घरदार होतं. तसं त्यांचं मूळ आडनाव कुलकर्णी असलं तरी ते पुढे राजहंस होऊन जगप्रसिद्ध झालं. राजहंस कुटुंब हे देशस्थी यजुर्वेदी ब्राह्मण होतं. नारायण उर्फ बालगंधर्व यांचे आजोबा कृष्णाजीपंत हे त्यांच्या वडिलांचे एकुलते एक चिरंजीव होते. त्यांना पाच मुलगे झाले. वामनराव, विष्णुपंत, गणपतराव, भास्करराव आणि श्रीपादराव. यातील सर्वात लहान श्रीपादराव आणि त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई यांना अकरा मुलं झाली. त्यापैकी शंकर, नारायण, व्यंकटेश आणि वेणू यांना दीर्घायुष्य प्राप्त झाले. नारायणाचा जन्म पुण्यात शुक्रवार पेठेतील एका घरात झाला. २६ जून १९८८ रोजी संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी त्यांनी या जगाच्या रंगभूमीवर प्रवेश केला.
श्रीपादराव मुंबई सरकारच्या इरिगेशन खात्यात ड्राफ्समन म्हणून नोकरी करत होते. आमदनी बेताची आणि गोतावळा मोठा यामुळे आर्थिक परिस्थिती सामान्यच होती. पण घरात कलेचा वारसा होता. स्वत: श्रीपादराव गात असत आणि सतारही वाजवत असत. त्यांची बहीण हरीबाई आणि पत्नीही गोड आवाजात गुणगुणत असत. नारायणाचे चुलते, गणपतराव यांनी तर गायकाचाच पेशा स्वीकारला होता. ते बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचे शिष्य होते. उत्तम गायनासोबत ते मृदंगही वाजवत असत. पुण्यातील पर्वती देवस्थानामध्ये ते गायनसेवा देत असत. नारायणाचे मामा वासुदेवराव पुणतांबेकर हे ‘नाट्यकला प्रवर्तक नाटक मंडळी’ च्या संस्थापकांपैकी एक होते. अशा प्रकारे नारायणावर सुरांचे गर्भसंस्कार जन्माला येण्याआधीपासूनच होत होते. नाट्यकला आणि संगिताचं बाळकडू जन्मापासूनच मिळालेलं होतं.
नारायणाच्या शिक्षणाची सुरुवात जरी नागठाण्याला झाली असली तरी नंतर शिक्षणासाठी त्यांची जळगावला पाठवणी करण्यात आली. नारायणाची आत्या हरिबाईचे जावई आबासाहेब म्हाळस हे जळगावात सुप्रसिद्ध वकील म्हणून ओळखले जायचे. त्यांचा नारायणाकडे विशेष ओढा होता त्यामुळे त्यांच्याकडेच राहून नारायणानं पुढील शिक्षण घेतलं. पण हे शिक्षण नावालाच चाललेलं होतं. नारायणाचा अभ्यास आणि शिक्षणाकडे मुळीच कल नव्हता. त्यांना गाण्याची आवड होती. त्यातून आबासाहेबांनाही नाटक आणि गाण्याची आवड असल्यामुळे त्यांच्यासोबत नारायणही नाटकांना, गाण्याच्या कार्यक्रमांना जायचा.
त्याचा गाण्याकडे असलेला कल पाहून आबासाहेबांनी त्याला मेहबूबखांसाहेबांकडे गाणं शिकायला पाठवलं. ते त्यावेळी फारसे प्रख्यात नसले तरी स्पष्ट शब्दोच्चार आणि सहज सुरेलता ही त्यांच्या गाण्याची वैशिष्ट्ये नारायणावर छाप पाडून गेली. त्यांच्या संगीत शिक्षणाचा पाया उत्तम रचला गेला.
बालगंधर्व उपाधी
अशातच नारायण दहा वर्षांचा असताना पुण्याला यशवंतराव कुलकर्णी यांच्याकडे गेला. ते त्याचे चुलत चुलते असून लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’ मध्ये व्यवस्थापन विभागात नोकरी करत होते. ही पुणे वारी नारायणाच्या जीवनाला एक महत्वाचं वळण देणारी ठरली. एक विलक्षण योगायोग जुळून आला आणि नारायणाला प्रत्यक्ष लोकमान्यांना आपलं गाणं ऐकवण्याची संधी मिळाली. ते नारायणाचं गाणं ऐकून इतके मुग्ध झाले की त्यांच्या तोंडून उत्स्फूर्त उद्गार बाहेर पडला, ‘हा बालगंधर्व फारच सुरेख गातो!’
आणि तेव्हापासून नारायणाला ‘बालगंधर्व’ ही उपाधी प्राप्त झाली!!
याच नावाने ते जगप्रसिद्ध झाले हा एक भाग आहेच; पण मुळात महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रातीलही ते पहिले ‘गंधर्व’ ठरले. आणि त्यानंतर त्यांनी न भूतो न भविष्यति असा इतिहास रचून ठेवला.
जबाबदारी पडली, मार्गही सापडला
१९०३ सालापर्यंत नारायणाचे इंग्रजी दुसर्या इयत्तेपर्यंत शिक्षण झाले. पण श्रीपादरावांना पायाचा अपघात होऊन ते जे आजारी पडले ते बिनपगारी रजा घेऊन त्यांच्यावर घरी बसायची वेळ आली. आता घर चालवण्याची सगळी जबाबदारी नारायणावर येऊन पडली. ‘नाट्यकला प्रवर्तक’ मध्ये जाण्याची त्यांनी खटपट केली पण त्यात यश आले नाही. नारायणाचे मोठे भाऊ शंकरदादा अजून कमावते झाले नव्हते. त्यात त्यांची आई आजारी पडली. आणि भरीला भर म्हणून स्वत: नारायणाला मालेगावात कुत्रं चावलं. अशी सर्व बाजूंनी या कुटुंबाची कुतरओढ चालू झाली.
पण वाईटातूनही चांगले निघते म्हणतात तसा नारायणाला याच काळात अनुभवही आला. त्याच्या पायाला कुत्रं चावलं हे जणू उपकारकच ठरलं. त्यावर उपचार करणं आवश्यक असल्यानं त्यांच्या परिचित बाबामहाराजांनी त्यांना कोल्हापूरला नेऊन उपचार करायला सुरुवात केली. नारायणाच्या आईचे वडील अप्पाशास्त्री बेलेकर हे कोल्हापुरच्या बाबामहाराज पंडित यांच्याकडे पुराणिक होते. त्यांच्या पत्नी ताईमहाराजांना आणि बाबासाहेबांना नारायणाबद्दल विशेष आपुलकी असल्यानं त्यांनी त्याला बरं करायचं ठरवलं. या काळात कोल्हापुरात अप्पय्याबुवा नावाचे एक गायक रहात होते. नारायण त्यांच्याकडे गाणं शिकायला जायला लागला. बाबामहाराजांमुळे नारायणाला छत्रपती शाहू महाराजांकडे जाण्याचा योग आला. छ. शाहूमहाराज हे स्वत: संगीत आणि नाट्यकलेचे चाहते आणि आश्रयदाते होते.
नारायणाचं सुमधूर गायन ऐकून छत्रपतींना त्याच्याबद्दल इतकं कौतुक दाटून आलं की त्यांनी राजदरबारी राज-गायक असलेल्या अल्लादियाखांसाहेब यांच्याकडे त्याचं शिक्षण चालू ठेवायचं ठरवलं. पण एका प्रसंगी छत्रपतींच्या लक्षात आलं की नारायणाला नीट ऐकू येत नाही. त्याबाबत विचारपूस केली असता नारायण म्हणाला, ‘होय महाराज, माझा उजवा कान फुटलाय. त्यामुळे मला त्या कानानं नीट ऐकायला येत नाही.’
हे ऐकताच महाराजांना मनस्वी वाईट वाटलं. इतका गुणी मुलगा, त्याच्यामध्ये दैवानं अशी कमतरता का ठेवावी हेच त्यांना कळेना. त्यांनी ताबडतोब त्याला मिशन हॉस्पिटलमध्ये उपचार देऊन बरं करायचं ठरवलं. डॉ व्हेल हे मिरजेच्या मिशन हॉस्पिटलचे प्रमुख होते आणि किर्लोस्कर नाटक मंडळी पण मिरजेतच होती. त्यामुळे नारायणानं किर्लोस्कर मंडळींमध्ये राहून डॉ व्हेल यांच्याकडे उपचार घ्यावेत असं ठरलं. छत्रपतींनी किर्लोस्कर नाटक मंडळींना सांगितलं की, ‘या मुलाची चांगली काळजी घ्या.’ पण किर्लोस्कर मंडळींकडे पाहुणा म्हणून उपचार घ्यायला आलेला हा नारायण नावाचा मुलगा पुढे किर्लोस्कर नाटक मंडळींनाच जीवदान देणार आहे या नियतीच्या संकेताची कुणालाही कल्पना आली नाही.
‘फुटक्या काठाचं मडकं’
खरं तर या नाटक मंडळींचा आणि नारायणाचा पूर्वपरिचय होता. १९०३ साली आबासाहेब म्हाळसांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत नारायणाचं गाणं ठेवलेलं होतं. हेतू हा की त्याला नोकरी मिळावी, चार पैसे मिळावेत, घरची गरिबीची परिस्थिती सुधारावी. पण दुर्दैवानं त्या वेळी तारुण्यात पदार्पण करत असलेल्या नारायणाचा आवाज निसर्गनियमानुसार फुटलेला असल्यानं मंडळींनी त्याची, ‘फुटक्या काठाचं मडकं,’ अशी संभावना केली होती. पण नंतर कोल्हापूर वास्तव्यात नारायणाचा आवाज हळुहळू सुधारला. छत्रपतींच्या मार्फत मंडळींना एक देखणा आणि चांगलं गाणारा मुलगा मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याची कुणकुण सर्वांना लागली. लोकांनी त्याच्यासाठी शब्दही टाकला, पण महाराजांनी, ‘अजून नारायणाचं गाण्याचं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे,’ असं सांगून नकार दिला होता.
नारायण मिरजेला किर्लोस्कर नाटक मंडळीत हळुहळू रुळायला लागला होता. त्याचं गाणं सर्वांना मोहवत होतं. आपण या मुलाची, ‘फुटक्या काठाचं मडकं,’ म्हणून संभावना केली होती याची तिथे सर्वांना आठवण होती. पण नारायणानं आपल्या गोड, अकृत्रिम वागणुकीनं सर्वांची मनं जिंकून घेतली होती. डॉ गाडगीळांच्या शिफारसीवरून नारायणाचं गाणं पुन्हा एकदा किर्लोस्कर नाटक मंडळींपुढे ठेवण्यात आलं. या खेपेला मात्र त्याचा आवाज रुळलेला, गोड आणि सराईत व्हायला लागलेला असल्यानं त्याचं गाणं सर्वांच्या हृदयांना भिडलं.
स्त्रीभूमिकेचा प्रस्ताव
शेवटी देवल मास्तरांनी त्याला विचारून टाकलंच, ‘नारायणा, तुला स्त्रीपार्ट करायला आवडेल का?’ नारायणानं उत्तर दिलं की, ‘तुम्ही शिकवलंत तर करेन.’ नारायण आता सतरा वर्षांचा कोवळा तरुण होता. दिसायला देखणा होताच आणि आवाजही सुरेल झाला होता. मनानं तो आता रंगभूमीवर यायला तयार होता. शिवाय त्याचे वडील बिनपगारी रजा घेऊन घरीच आलेले असल्यानं त्यांना भरपूर कर्ज झालेलं होतं. त्यामुळे परिस्थितीचा रेटाही होताच. आपण कामाला लागलो, चार पैसे मिळवायला लागलो तर कुटुंबाला हातभारच लागेल, या कल्पनेनं नारायण लगेच तयार झाला होता. मग देवलांनी त्याला आधी एक छोटी भूमिका दिली आणि तालमी घ्यायला सुरुवात केली.
आता या मुलामध्ये चमकण्यासारखं काहीतरी आहे याची सर्वांना कल्पना येऊन चुकलेली होती. त्यामुळे घरच्यांची परवानगी मिळवण्यासाठी लोकांची खटपट सुरू झाली. लोकमान्य टिळक आणि दादासाहेब खापर्डे तर नारायणावर प्रसन्न होतेच, पण छत्रपती शाहू महाराजांचाही त्याच्यावर लोभ होता. त्यामुळे एके दिवशी दारं बंद करून मोजक्या लोकांपुढे एक रंगीत तालीम करण्यात आली. ती बघायला नारायणाची आई हजर होती. तिला त्याची भूमिका फार आवडली आणि तिनं होकार दिला. तिनं होकार दिल्यावर वडिलांची अनुकूलता मिळणार यात शंकाच नव्हती. पण नारायणाच्या मामांना, दत्तूमामा बेलेकरांना काही हे पसंत पडेना. मुलाचं नुकसान होईल अशी त्यांना भीती वाटत होती. पण स्वत: लोकमान्यांनी या शब्दात हमी घेतली की, ‘या मुलाचं थोडं जरी नुकसान झालं तर मी माझ्या पदरचे वीस हजार रुपये त्याला देईन.’
किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश
आता एवढी मोठी हमी मिळाल्यावर काय विचारता? १९०५ साली नारायणानं किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये प्रवेश केला. तो दिवस गुरुद्वादशीचा होता. मुहूर्त तर चांगला मिळाला होता. देवलमास्तरांनी त्याला पहिली भूमिका शकुंतलेची द्यायचं ठरवलं आणि तालमी सुरू केल्या. पण पूर्ण तयारी होईपर्यंत किर्लोस्कर नाटक मंडळीला सुट्टी द्यायचं ठरलं. अण्णासाहेबांच्या काळापासूनच तिथे एक प्रघात होता. कंपनीला दरवर्षी एक महिना भरपगारी सुट्टी दिली जात असे. ती अशा प्रकारे दिली गेली.
कुठल्याही क्षेत्रात चांगले गुरू लाभणं यावर शिष्याचं उज्वल भवितव्य अवलंबून असतं. नारायणाला देवलांसारखा गुरू अगदी सुरुवातीलाच मिळावा हे त्यांचं भाग्यच म्हणावं लागेल. शिष्य तर मोठं काम करून दाखवण्यासाठी जन्मालाच आलेला होता. असा दुग्धशर्करा योग जुळून आल्यावर भूमिका बसायला कितीसा वेळ लागणार होता? नारायण बघता बघता तयार झाला. अक्षरश: एका महिन्यात नारायणाकडून चार अंकांचे काम बसवून घेण्यात आलं. तो समाधानकारक रीत्या भूमिका वठवतो आहे अशी खात्री पटताच शाकुंतलचा पहिला प्रयोग जाहीर झाला. जाहिरातही करण्यात आली की, ‘लोकमान्यांनी ज्याला बालगंधर्वाची पदवी दिली आहे तो नारायण राजहंस शकुंतलेची भूमिका करणार आहे…’
हां हां म्हणता तिकीटं खपलीसुद्धा. बुकिंगसाठी तारा येऊ लागल्या. पत्रं येऊ लागली. निरोप मिळायला लागले. नाटक नऊ वाजता सुरू होणार होते. पण प्रेक्षक इतके अधीर झाले होते की त्यांनी आठपासूनच तोबा गर्दी केली होती. थिएटर खच्चून भरलेलं होतं. बर्याच काळानं मिळालेला असा भरगोस प्रतिसाद बघून किर्लोस्कर नाटक मंडळीतील लोकांनाही भरून आलेलं होतं. प्रत्येकाच्या अंगात चैतन्य संचारलेलं होतं.
ती आली…तिनं पाहिलं…आणि तिनं जिंकलं…
आणि तो क्षण आलाच….ती आली…तिनं पाहिलं…आणि तिनं जिंकलं….अशी स्थिती होऊन गेली. शकुंतला म्हणून आपल्या पहिल्याच एंट्रीला नारायणानं आपल्या बालगंधर्व या पदवीला पुरेपूर न्याय दिला. त्याचे स्त्रीसुलभ हावभाव, नाजुकपणा, चालणं, बोलणं पाहून प्रेक्षक अक्षरश: वेडावले. भुंग्याला पाहून घाबरून शकुंतला सख्यांना हाका मारायला लागताच त्यानं असा काही लोभस अभिनय केला की प्रेक्षकांनी थिएटर डोक्यावर घेतलं. क्षणोक्षणी प्रयोग चढत्या श्रेणीने रंगतच गेला. शाहूमहाराज, देवलमास्तर, मुजुमदार वगैरे इतके खुष झाले होते की विचारता सोय नाही. सगळ्यांची मनोमन खात्री पटून गेली होती की, ‘आता मागे वळून बघणे नाही! किर्लोस्कर मंडळीचे भाग्य उदयाला आलेले आहे आणि यश, कीर्ती, पैसा, नावलौकिक…कश्शा कश्शाला ददात पडणार नाही. मरगळलेल्या किर्लोस्कर मंडळीला अखेरीस उर्जितावस्था प्राप्त झालेली आहे!’
आता नारायण बालगंधर्व होऊन गेला
यानंतर नारायण हा नारायण राहिलाच नाही. तो बालगंधर्व होऊन गेला आणि कायम तसाच जगला. यापुढे त्याचा उल्लेख ‘ते बालगंधर्व’ असाच करणं योग्य ठरेल. बालगंधर्वांनाही आता प्रचंड हुरूप आलेला होता. त्यांच्यात दुर्दम्य आत्मविश्वास निर्माण झालेला होता. देवलमास्तरांकडून आता सर्व काही शिकून घेण्याचा त्यांनी निश्चयच केला होता. पण नियतीच्या मनात वेगळेच काही चालू होते. ध्यानी मनी नसताना त्यांना देवलांचा वियोग सोसावा लागला. देवल शीघ्रकोपी होते. मुजुमदारांशी त्यांचे काहीतरी मतभेद झाले आणि देवल नाटक कंपनी सोडून निघून गेले. त्यामुळे ते गेल्यानंतर बालगंधर्वांना इतर भूमिका शिकवण्याचे काम चिंतोबा आणि बोडस यांना करावं लागलं. सौभद्रातील सुभद्रा, मृच्छकटिकातील वसंतसेना, मूकनायकातील सरोजिनी आणि गुप्तमंजूष नाटकातील नंदिनी या सर्व भूमिका आता बालगंधर्व करायला लागले. लोकांनी त्यांना या सर्व भूमिकांमध्ये मनापासून स्वीकारलं, नावाजलं, डोक्यावर घेतलं.
दत्तूमामांची नाराजी
खरं तर १९०५ साली आपल्या नाटक मंडळीचा रौप्यमहोत्सव साजरा करावा अशी मुजुमदारांची फार इच्छा होती. पण परिस्थितीपुढे काही चालेना. मात्र बालगंधर्वांच्या येण्यानं सगळं मळभ दूर गेलं. रातोरात मंडळीचा कायापालट झाला. या बदललेल्या नवीन परिस्थितीचा फायदा घेऊन मुजुमदारांनी पुण्यात रौप्यमहोत्सव साजरा करायचा घाट घातला. पुण्यात वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग ठेवायचं ठरलं. सुरुवात ‘गुप्तमंजूष’ नाटकानं होणार होती.
या दिवशी घडलेल्या एक अनपेक्षित घटनेने सर्वजणच चक्रावून गेले. प्रयोगाच्या आधी बालगंधर्वांचे दत्तूमामा त्यांना भेटायला आले. सर्वांशी सहजपणानं गोड बोलले. मग ‘नारायणाला घरी नेऊन पुन्हा आणून सोडतो,’ असं म्हणून निघाले. पण वाटेत त्यांच्या वागण्याबोलण्यावरून बालगंधर्वांना त्यांचा संशय आला. ते परत जातो, म्हणायला लागताच त्यांचं मनगट घट्ट धरून दत्तूमामा त्यांना जबरदस्तीनं घरी घेऊन गेले. घरी जाऊन त्यांनी बालगंधर्वांना दरडावून सांगितलं, ‘पुन्हा त्या नाटक मंडळीत पाऊल टाकशील तर याद राख.’
हा प्रकार इतका अनपेक्षित होता की पोरसावदा बालगंधर्व गोंधळूनच गेले. तिकडे शंकरराव मुजुमदारांनाही शंका आलेली होतीच. त्यामुळं त्यांनी एक माणूस त्यांच्या मागावर ठेवून बातमी काढून घेतली होती. नाटक मंडळीत एकच धावपळ उडाली. तातडीने मुजुमदार स्वत: सोबत जोगळेकरांना घेऊन दत्तूमामांकडे गेले. त्यांनी मोठ्या मिनतवार्या करून त्यांची कशीबशी समजूत घातली आणि मग ते बालगंधर्वांना घेऊन पुन्हा नाटक मंडळीत परतले. त्यानंतर मात्र बालगंधर्वांना कधीही कुठेही एकटं सोडायचं नाही ही सर्वांनी खूणगाठ बांधली. आणि पुढे तब्बल तेहतीस वर्षं ही प्रथा पाळली गेली
हुकमी एक्का
बालगंधर्वांचा लौकिक ऐकून पुण्यातले प्रेक्षकही त्यांना पहायला आतुर झालेले होते. त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोकांच्या मनातली उत्कंठा शिगेला पोचलेली होती. त्यामुळे गुप्तमंजूष मधल्या नंदिनीला बघताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत केलं.
सुप्रसिद्ध पेटीवादक गोविंदराव टेंबे यांनी त्यांना पहिल्यांदाच पाहिलं आणि ऐकलं होतं. त्यांना शास्त्रीय दृष्ट्या बालगंधर्वांच्या गाण्यात काही नवखेपणाचे दोष दिसले. पण बालगंधर्वांनी आपल्या मोहक अदाकारीनं आणि गोड गाण्यानं असं काही त्यावर बेमालूम पांघरूण घातलं की त्यांचं कौतुक केल्यावाचून गोविंदरावांना राहवलं नाही. पोरसावदा बालगंधर्वांनी त्या वेळच्या तरुणाईला वेड लावलं. मोठ्या प्रमाणात तरुण प्रेक्षकवर्ग नाटकांना गर्दी करायला लागला. जुन्या नटांपेक्षा त्यांच्या स्त्रीपात्रांमध्ये नवीन खेळकरपणा जास्त होता. तो तरुणांना आकर्षित करायला लागला. आणि ज्या नारायणाची, ‘फुटक्या काठाचं मडकं,’ म्हणून संभावना केली गेली होती, तोच मुलगा आता बालगंधर्व बनून किर्लोस्कर नाटक मंडळींचा हुकमी एक्का होऊन बसला होता. अभागीपणाची अवकळा आलेल्या नाटक मंडळीचा भाग्यतारा बनून आकाशात चमकायला लागला होता.
उगिच का कांता, सुलभ मनी गणा न भूपसुता गाणी लोकांच्या ओठांवर बसली. ‘होय संसार’ हे गाणं मूळचं रामकली रागात बांधलेलं होतं. पण एका प्रयोगात बालगंधर्वांनी ते बागेश्री रागात गायला सुरुवात करताच प्रेक्षक सरसावून बसले. ते गाणं लोकांना इतकं आवडलं की जोरकस टाळी पडली आणि प्रेक्षकात जणू काही नवचैतन्याची वीज चमकली.
आत्मविश्वास आला
बालगंधर्वांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चाललेली असली तरी सुरुवातीला ते अगदीच नवखेपणानं बिचकून वागत असत. त्यांचा एकंदर अवतार गबाळेपणाचाच असायचा. चेहर्यावर काहीसा भोळसरपणा आणि बावळटपणाची झाक दिसायची. ते इतरांना घाबरूनच वागायचे. एरवी अंघोळ केल्यानंतर गुरुचरित्र किंवा शिवलीलामृत वाचायची त्यांना सवय होती. पण कंपनीत सोवळं ओवळं पाळलं जाणार नाही आणि पाप लागेल या भयापोटी त्यांनी ते वाचन करायचं सोडूनच दिलेलं होतं. त्यांचं नाटकात काम करणं नातेवाईकांना पसंत पडलेलं नसल्यानं आपल्याला त्यांच्या प्रेमापासून अंतरावं लागणार आहे या जणिवेनं ते गलबलून जायचे. डोळ्यातून धारा वहायच्या.
शाकुंतलच्या पहिल्या प्रयोगाच्या वेळचा त्यांचा अभिनय आणि दोन वर्षांच्या नंतरचा अभिनय यात जमीन आसमानाचं अंतर पडलेलं होतं. त्यांचा पूर्वीचा बुजरेपणा जाऊन आता त्या जागी आत्मविश्वास आणि सरावलेपण, सफाईदारपणा आलेला होता. आता त्यांच्या प्रत्येक गाण्याला वन्समोअर पडायला लागला होता. जसजसा त्यांचा अनुभव समृद्ध होत गेला तसतशा त्यांच्या भूमिकाही खुलत गेल्या. 1910 मध्ये ‘प्रेमशोधन’ नावाचं नाटक रंगभूमीवर आलं. या नाटकापासून बालगंधर्वांच्या भूमिकांना एक वेगळीच उंची प्राप्त झाली. शिवाय आणखी एक बदल या नाटकापासून करण्यात आला होता. तबलापेटी वाजवणारे वादक विंगेत बसण्याची प्रथा बदलली. त्याऐवजी ते प्रेक्षकांच्या पुढे बसायला लागले. हा बदल बहुधा बालगंधर्वांच्या कानातील दोषामुळे करण्यात आला असावा. डॉ व्हेल यांच्या उपचारांमुळे त्यांच्यात पुष्कळ सुधारणा जरी झालेली असली तरी त्यांच्यातील तो दोष पूर्णपणे निघून गेला नव्हता. त्यामुळे त्यांना विंगेतून साथीचे स्वर नीट ऐकायला येत नसत. वाद्यांचे स्थलांतर त्यांना सहाय्यक झाले. सुंदर रूप, गोड गळा, भावपूर्ण चेहरा अशा सगळ्या गोष्टींची बालगंधर्वांना उपजतच देणगी लाभलेली असूनही अभिनय कला संपादन करून घेण्यासाठी त्यांनी पाच वर्षं मेहनत केली. एकप्रकारे त्यांची ती तपश्चर्याच होती. त्यांनी ती झोकून देऊन केली.