Logo

तो राजहंस एक...

लेखिका - मंजूषा आमडेकर

४. गंधर्व नाटक मंडळीची स्थापना

नोटीस दिली

एव्हाना टेंबे आणि बोडस यांची एक ठाम धारणा झालेली होती की, कंपनीवर कर्ज आहे तोपर्यंत व्यवसायाची हमी नाही, आपल्या कलागुणांची बूजही राखली जात नाही आणि संस्थेची मालकी कलावंताकडे जात नाही तोपर्यंत आपला उत्कर्ष देखील होणार नाही. बालगंधर्वांचं हित लक्षात घेता खाडिलकर आणि पंडित यांचीही अशीच खात्री पटलेली होती. थोडक्यात दोन पक्ष निर्माण झाले होते. एकात बोडस, टेंबे, दादा लाडू, पुरोहित वगैरे मंडळी होती तर दुसरीकडे मुजुमदार आणि ते तयार करत असलेल्या दुसर्‍या संचाचा पक्ष तयार झालेला होता. त्यातच बालगंधर्वांच्या नवीन शालूची हौस मुजुमदारांनी पूर्ण न केल्यानं ते आपोआपच टेंबेंच्या पक्षाकडे ओढले गेले होते. बालगंधर्वांकडे दुर्लक्ष केल्यास ते मंडळीत टिकणार नाहीत असा इशाराही खाडिलकर आणि पंडितांनी दिलेला होता. तरीही मुजुमदारांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

आता परिस्थिती चिघळतच चालली होती. अशातच 19 जून 1913 रोजी गोविंदराव टेंबे, गणपतराव बोडस आणि बालगंधर्वांनी मुजुमदारांना ‘कंपनी सोडत असल्याची’ नोटीस दिली. विद्याहरण नाटक रंगभूमीवर आल्याच्या वीस दिवसातच हा प्रकार घडला. ही बातमी हां हां म्हणता सगळीकडे वणव्यासारखी पसरली. त्या काळी किर्लोस्कर नाटक मंडळीला केसरी इतकंच महत्व होतं. स्वत: लोकमान्यांनी नाट्यकलेचं महत्व जाणलेलं असल्यानं त्यांचाही या नाटकमंडळीला वरदहस्त होता. या कंपनीत बालगंधर्वच राहिले नाहीत तर कंपनी रसातळाला जाईल या धास्तीनं त्यांच्यात समेट घडवून आणायचे जोरकस प्रयत्न सुरू झाले. राम गणेश गडकरी पण जोडण्याची शिकस्त करत होते. या प्रयत्नांना यश येऊन बालगंधर्व माघारी फिरले तर टेंबे आणि बोडस यांची पत राहणार नव्हती. अशा स्थितीत गुजराती मंडळात जायचं, पण किर्लोस्कर मंडळीत रहायचं नाही असा बोडसांनी निश्‍चय केलेला होता.

‘देवा, आता जमणार नाही,’ या उत्तरावर बालगंधर्व कायम राहिल्यामुळे बोडसांवर तशी वेळ आली नाही. बालगंधर्व जमणार नाही, एवढंच सांगायचे, पण का, त्यावर काहीच बोलायचे नाहीत. त्यांचा खाडिलकर आणि पंडितांवर विश्‍वास होता. ते आपलं अहित करणार नाहीत, अशी त्यांची श्रद्धा होती. बालगंधर्वांच्या आईनेही त्यांना किर्लोस्कर नाटक मंडळी सोडायची परवानगी दिली.

अखेरीस मुजुमदारांनी ही सगळी परिस्थिती छ. शाहू महाराजांच्या कानावर घातली. त्यांनी ताबडतोब बालगंधर्वांना कोल्हापूरला बोलावून घेतलं. पण बालगंधर्व आपली बाजू नीट मांडू शकणार नाहीत असं वाटल्यानं गणपतरावही त्यांच्या सोबत गेले. सर्व काही सविस्तर शांतपणे ऐकून घेतल्यावर छ. शाहू महाराजांनाही त्यांचं म्हणणं पटलं.

एकीकडे हे सगळं घडत असताना जास्तीत जास्त पैसा कमवण्यासाठी मुजुमदार धडाधडतच होते. सौभद्र, मानापमान आणि विद्याहरण वगैरे नाटकांचे प्रयोग लावत होते. हा संच तुटला तर आपल्याला ही नाटकं पुन्हा बघायला मिळणार नाहीत या धास्तीनं प्रेक्षकही तुडुंब गर्दी करत होते. बरं, प्रेक्षकांनाच मायबाप मानणारे कलाकारही मन लावूनच काम करत होते.

अखेरीस नोटीशीच्या कालावधीतील शेवटचा दिवस उजाडला. तात्यासाहेब केळकरांनी शेवटचा प्रयत्न करून पहायचं ठरवलं. त्यांनी मुजुमदारांना पेन्शन घ्यायला सांगितलं. पण मुजुमदारांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला.

गंधर्व नाटक मंडळी

१९ जुलै १९१३ पासून बालगंधर्व आणि त्यांचे समविचारी लोक सेवेतून मुक्त होणार होते. पण पुढे काय, त्याची व्यवस्था आधीच करून ठेवण्यात आलेली होती. ५ जुलै १९१३ रोजी नारळ फोडण्यात आला आणि नवीन नाट्यसंस्थेचा जन्म झाला. या नाटक मंडळीला काय नाव द्यावं यावर लोकांनी मतं व्यक्त केली होती. पण अखेरीस खाडिलकरांनी सुचवलेले ‘गंधर्व नाटक मंडळी’ हेच नाव पक्कं झालं. या कंपनीचा मालकी हक्क बालगंधर्व, गोविंदराव टेंबे आणि गणपतराव बोडस या तिघात विभागून गेला.

गंधर्व नाटक मंडळीचा श्रीगणेशा झाला त्या दिवशी बळवंतराव पेठे नावाच्या एका जुन्या नटानं आमंत्रितांचं स्वागत करण्यासाठी एक छोटं भाषण केलं होतं. ते कळल्यावर मुजुमदार त्यांची खिल्ली उडवत उपहासानं म्हणाले, ‘दुर्योधन जन्मला तेव्हा गाढव ओरडलं होतं बरं…’ पण मनोमन ते समजून चुकले होते की बालगंधर्वांच्या जाण्यानं किर्लोस्कर मंडळीचं भाग्यही रुसून दूर निघून गेलेलं होतं. नाटकाला आलेले प्रेक्षक जिकडे तिकडे थुंकून घाण करतात म्हणून, ‘येथे थुंकू नये’ अशा पाट्या रंगार्‍याकडून रंगवून घेतलेल्या होत्या. रंगारी मुजुमदारांना त्या कुठे लावायच्या असं विचारायला आल्यावर ते उद्वेगानं म्हणाले होते की, ‘आता माझ्याच तोंडावर लाव. कारण बालगंधर्व गेल्यामुळे प्रेक्षक छी:थूच करणार आहेत.’

झाल्या विभाजनानं सर्वजणच ओशाळलेले होते. मुजुमदारांना तर प्रेक्षकांना तोंड कसं द्यायचं हा प्रश्‍न पडतच होता. पण बालगंधर्व, टेंबे, बोडसांनाही रस्त्यातून फिरायचीही लाज वाटत होती. गडकरी किर्लोस्करमध्येच थांबलेले असले तरी गणपतरावांनी त्यांना विचारून बघितलं होतं की, ‘मास्तर, आमच्यासाठी एखादं नाटक लिहाल ना?’

त्यावर गडकरींनी ताडकन उत्तर दिलं होतं की, ‘ते कालत्रयी शक्य नाही!’

गंधर्व नाटक मंडळींनी देवलांना आमंत्रित करून तालीम मास्तर म्हणून त्यांची नेमणूक केली. किर्लोस्कर मंडळी सोडून गंधर्वांकडे येताना मुदपाकखान्यात काम करणार्‍या कृष्णाप्पा जोशींनी किर्लोस्करांच्या पूजेतील बाणसुद्धा चुपचाप उचलून आणलेला होता. पेणचे इनामदार वियायक शिवराम ऊर्फ बाबासाहेब धारकर हे खरं तर किर्लोस्कर मंडळीचे जुने चाहते. पण त्यांचाही बालगंधर्वांकडे ओढा होता. त्यामुळे पंडितांनी त्यांच्याकडून गंधर्व मंडळीसाठी पहिले भांडवल मिळवले. त्यांनीही त्या काळी सात हजार रुपये उपलब्ध करून दिले. मग कपडालत्ता, दागदागिना, इत्यादी साहित्य खरेदी करायला सुरुवात झाली. दर्शनी पडद्यावर राधाकृष्णाचे तैलचित्र असावे असं सर्वानुमते ठरलं. हे चित्र ख्यातनाम गायिका केसरबाई केरकर यांच्या दिवाणखान्यात लावलेलं होतं. त्यावरूनच रघुवीर पेंटर यांनी गंधर्व मंडळीसाठी पहिला दर्शनी पडदा तयार केला.

नाटकं करण्याची परवानगी

इतर आजूबाजूची सगळी जय्यत तयारी चालू असली तरी मुख्य नाटकाचं काय, हा प्रश्‍न अजून अधांतरीच होता. लोकांचं बालगंधर्वांवर कितीही प्रेम असलं तरी चांगली कथावस्तू आणि उत्तम नाट्यगीतं असलेलं नाटकच तयार नव्हतं. देवलांची शारदा, मृच्छकटिक वगैरे नाटकं बालगंधर्वांच्या अंगात भिनलेली होती. मग स्वत: बालगंधर्वांनी कोल्हटकरांची भेट घेतली. त्यांच्या कडून गुप्तमंजुष, मतिविकार, मूकनायक आणि प्रेमशोधन नाटकं करण्याची परवानगी मिळवली. तशीही अण्णासाहेबांनी त्यांची नाटकं इतरांनी करण्यावर कधीच आपत्ती दर्शवलेली नव्हती. ते तर उघडपणे म्हणायचे की, ‘शेत लावलेलं आहे, कुणीही चरावं.’

परंतू अण्णासाहेबांच्या वारसदारांकडून मुजुमदारांनी सगळे हक्क घेतले आणि अण्णासाहेबांच्या नाटकांना हातही न लावण्याची नोटीसच गंधर्व मंडळीना धाडली. मानापमान आणि विद्याहरण नाटकांच्या पैशाबाबत मुजुमदार-खाडिलकर वाद चालूच होता. पण त्याचा निकाल लागून दोन्ही नाटकं करण्याचा सामान्य हक्क गंधर्व मंडळीना मिळाला आणि नाटकाविषयीचे बरेच प्रश्‍न मार्गी लागले.

व्ही. शांताराम

खाडिलकरांनी तातडीनं कोणतंही नाटक लिहायला नकार दिला. गडकर्‍यांनी तर पाठच फिरवलेली होती. त्यामुळे बालगंधर्वांनी देवलांशी बोलणं केलं. त्यांनी ‘फाल्गुनराव’ हे जुनंच नाटक नवीन साज चढवून रंगमंचावर आणण्याचा सल्ला दिला. दत्तोपंत पेठकर, दादा लाडू, राजारामबापू हे ही किर्लोस्कर सोडून गंधर्व मंडळीकडे आलेले होते. गोड गळा लाभलेले जगन्नाथबुवा पंढरपूरकर हे पर्वती संस्थानात नोकरी करत होते. पण भास्करबुवा बखलेंच्या सूचनेवरून त्यांनी ती नोकरी सोडली आणि ते गंधर्व मंडळीत प्रवेश करते झाले. दादा लाडू यांनीही मोठ्या उत्साहानं गोवा, कोल्हापूर वगैरे गावं फिरून चांगली देखणी मुलं गोळा केली. त्यातला गोविंदा मुळगावकर हा मुलगा तर फारच देखणा होता. कोल्हापूरच्या राजारामबापू वणकुद्रे यांचा मुलगा शांताराम कंपनीत आला आणि त्यानंच पुढे व्ही. शांताराम या नावानं चित्रपट सृष्टीत इतिहास घडवला. पण नाट्यक्षेत्रात न रमल्यामुळे त्यानं वर्षभरातच कंपनी सोडली.

राजघराण्याचा पाठिंबा आणि आश्रय

बालगंधर्वांना उंची वस्त्रप्रावरणं खूप आवडायची. त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा किंवा हौसेचा विषयच होता तो. पण टेंब्यांनी अतिशय चातुर्यानं बिनखर्चात हा प्रश्‍न सोडवला. बडोद्याचे सरदार वाघोजीराव शिर्के हे अतिशय रसिक आणि उदार होते. त्यांच्या कन्या सौ सुमतीबाई पवारही स्वभावानं पित्यासमानच होत्या. कोल्हापूरच्या छ. शाहूमहाराजांच्या कन्या अक्कासाहेबही नाटकांच्या चाहत्या होत्या. त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी टेंब्यांनी चक्क कोल्हापूर, बडोदा फेरफटका मारून पंधरावीस उंची शालू मिळवले. कितीतरी जरीकाठी लुगडीसुद्धा मिळवली. त्या कपड्यांची चातुर्यानं अशी काही जाहीरात केली की ती वस्त्रं पहायलाही लोक यायला लागले. सुरुवातच राजघराण्यातील वस्त्रांनी झाल्यामुळे मुळातच हौशी असलेल्या बालगंधर्वांच्या पुढे अपेक्षा वाढल्या.

त्या काळी सर्व नाट्यसंस्था या लोकाश्रयावरच चालायच्या. गंधर्व मंडळीलाही असा आश्रय भरभरून मिळाला. स्वत: श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी बालगंधर्वांवरील लोभापायी त्यांना आश्रय द्यायचं ठरवलं. दुसरीकडे त्यांच्या औदार्याचा ओघ केशवराव भोसले यांच्या कंपनीकडे वळावा यासाठी दामोदर यंदे यांनी बरीच खटपट करून पाहिली. पण गायकवाडांचे कारभारी शिरगावकर यांनी दोन्ही कंपन्यांची नाटकं पाहिली. आणि त्यानंतर गंधर्व मंडळीची शिफारस केली. बालगंधर्वांसाठी हा आश्रय नसून पुरस्कार होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. महाराज बोलावतील तेव्हा गंधर्व मंडळीनी बडोद्याला जाऊन महाराजांसाठी तीन ते पाच खेळ करावेत आणि पाच हजार रुपये मोबदला घ्यावा असं ठरलं. ज्या वर्षी बोलावणं येणार नाही त्या वर्षी हे पैसे किंवा वर्षासन मिळणार नाही अशी बोली ठरली. पण बालगंधर्वांना त्यांच्या एका खेळाकरता प्रेक्षकांकडून हजारभर रुपये एरवीच मिळत असल्याने त्यांनी ही अट मान्य केली. हा आश्रय मिळावा म्हणून गंधर्व मंडळीनी ना कुणाचा अनुनय केला ना चालून आलेलं भाग्य नाकारलं.

वेळोवेळी मार्गदर्शन मिळत रहावं म्हणून गंधर्व मंडळीसाठी पंचांची एक समिती नेमण्यात आली. त्यात न.चिं.केळकर, दत्तात्रय लक्ष्मण वैद्य, श्रीमंत सरदार आबासाहेब विंचुरकर, विनायक शिवराम धारकर आणि कृष्णाजी परशुराम पंडित यांचा समावेश होता.

बालगंधर्व हे एकमेव मालक असावेत असा खाडिलकर आणि पंडितांचा आग्रह होता. पण स्वत: बालगंधर्वांचं काहीच म्हणणं नव्हतं. मग यावरही पंचांनींच निर्णय दिला. बालगंधर्व सात आणे, टेंबे पाच आणे आणि बोडस साडेतीन आणे, अशी भागीदारी असावी असं ठरवलं गेलं. ते त्या तिघांनीही मान्य केलं. यातून अर्धा आणा उरत होता. तो धर्मादाय कारणांसाठी राखीव ठेवण्यात आला. असा सोळा आण्यांचा हिशोब निश्‍चित झाला. पूर्वी सोळा आणे मिळून एक रुपया होत असे.

बालगंधर्वांना सर्वात मोठा वाटा जावा याबद्दल कुणालाच काही आक्षेप नव्हता. कारण त्यांची योग्यता सर्वांनीच मान्य केलेली होती. फार काय, टेंबे स्वत:च म्हणत की, ‘बालगंधर्व आमचं सौभाग्य आहेत. ते आमचं सुदर्शन चक्र देखील आहेत.’ गंधर्वांचा चेहरा आकर्षक बोलका तर होताच, पण त्यांचं स्वर्गीय गायन, या त्यांच्यातील अभिजात, असामान्य गुणानं त्यांना सर्वांच्या गळ्यातील ताईत बनवून टाकलं होतं. त्यामुळेच विरोधक त्यांच्यापुढे फार काळ तग धरत नसत. त्यांच्यामुळेच नवीन कंपनीला नवीन हितचिंतक, प्रेक्षक, सल्लागार, आश्रयदाते मिळाले होते.

थोडक्यात सांगायचं तर एक कंपनी उभी करण्याच्या दृष्टीनं जे जे करावं लागतं ते सर्व बाजूंनी भक्कम तटबंदीसारखं निर्माण केलं गेलं. आता फक्त नाटक प्रत्यक्ष रंगमंचावर यायचंच काय ते बाकी होतं. आणि ती तारीख लवकरच घोषित करण्यात आली.

गंधर्व मंडळीचा पहिला नाट्यप्रयोग

३ सप्टेंबर १९१३ रोजी मुंबईच्या एलफिस्टन थिएटरमध्ये गंधर्व नाटक मंडळीनी ‘मूकनायक’ नाटकाचा पहिला प्रयोग जाहीर केला. नाटकासाठी शुभ दिवस आणि शुभ मुहूर्त निश्‍चित करण्यात आला होता. मुंबईच्या माधवदासांनी १०५ रुपयांची पहिली तिकिटं विकत घेतली. नाट्यगृहात प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झालेली होती. सर भालचंद्र भाटवडेकर यांनी संस्थेचं उद्घाटन केलं. नाट्यप्रेमी विनायक त्रिलोकेकर यांनी सुरुवातीचं भाषण केलं. त्यानंतर सव्वा नऊ वाजता नाटक सुरू झालं. ते नाटक असं काही रंगलं की किर्लोस्कर मंडळी सोडल्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात बालगंधर्वांविषयी कोणतीही अढी नाही हे स्पष्टपणे दिसून आलं. त्यानंतर शापसंभ्रम आणि मानापमानही अशीच रंगली. मृच्छकटिक तर प्रेक्षकांच्या फारच पसंतीला पडलं. पतीपत्नी जोडीनं नाटकं पहायला गर्दी करायला लागली होती.

याच वर्षी ‘राक्षसी महत्वाकांक्षा’ या केशवराव भोसलेंच्या नाटकाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि केशवराव नि बालगंधर्व यांच्या पर्वाचा बरोबरीनंच प्रवास सुरू झाला. सुरुवात मुंबईत झाल्यानंतर पुढील दोन वर्षांत गंधर्व मंडळीनी अनेक ठिकाणी कितीतरी प्रयोग केले. पुणे, जळगाव, बडोदा, इंदौर, नागपूर, औरंगाबाद, उमरावती, यवतमाळ असे गावोगावी प्रयोग करत करत मंडळी नाशिकला पोचली. इंदौरच्या मुक्कामात त्यांना एक चांगली बातमी कळली. अण्णासाहेबांच्या शाकुंतल, सौभद्र आणि रामराज्यवियोग या नाटकांना रंगमंचावर आणण्याची गंधर्व नाटक मंडळीला परवानगी मिळाली होती. याच दरम्यान केशवराव देवधर आणि सदाशिवराव रानडे नावाचे स्त्रीभूमिका करणारे सुंदर नटही गंधर्व मंडळीला मिळाले. आणि बघता बघता गंधर्व मंडळीची लोकप्रियता कळसाला गेली.

बालगंधर्वांचं रुप, अभिनय, गायन तर लोकांनी डोक्यावर घेतलंच होतं; पण त्याचबरोबबर त्यांची वेषभूषा आणि केशभूषा त्या काळच्या आधुनिक स्त्रियांना भुरळ घालायला लागल्या होत्या. बायका त्यांचं अनुकरण करायला लागल्या होत्या. दादा लाडू उत्तम फोटोग्राफी करत असत. त्यांनी त्याकरता डी लॅडेक्स असं एक टोपणनावही घेतलं होतं. ते बालगंधर्वांच्या वेगवेगळ्या रंगरुपातील, वेषभूषा, केशभूषा, भूमिकांमधील फोटो काढून विक्रीला ठेवत असत. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळायचा. इतका की प्रत्येक नाटकाला दादा लाडूंना फोटोविक्रीतून पंधरावीस रुपये सहज मिळत असत. इतकंच नव्हते तर त्या काळी श्रीमंत घराण्यातील मुलांना बालगंधर्वांप्रमाणेच स्त्रीवेषात सजून स्वत:चे फोटो काढून घ्यायची हौस निर्माण झाली होती. मग त्यांना सजवण्यापासून ते फोटो काढण्यापर्यंत लाडूंनाच सर्व काही करावं लागायचं. मग ते स्वाभाविकच त्याबद्दल चांगली लठ्ठ फी घेत असत.

तिकडे १९११ साली भास्करबुवा बखले यांनी पुण्यात ‘भारत गायन समाज’ नावाची संस्था स्थापन केली आणि संगीताचं शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला. बखले आता नाटक कंपनीत काम करत नसले तरी स्वत: बालगंधर्व आणि टेंबेंना त्यांच्याबद्दल नितांत आदर होता. त्यामुळे गंधर्व मंडळी पुण्यात आली की एका प्रयोगाचं उत्पन्न ‘भारत गायन समाज’ला मदत म्हणून देत असत. तसा पायंडाच पडून गेला होता. त्रिंबकराव साठे केवळ  एकच वर्ष कंपनीची व्यवस्था बघणार होते. त्यामुळे वर्ष संपताच त्यांच्या जागी पंडितांची नेमणूक झाली. पण ते समितीतही होते. दोन्ही जबाबदार्‍या एकच व्यक्ती घेऊ शकणार नसल्यानं ते तिथून बाहेर पडले आणि त्यांच्या जागी सॉलिसिटर पी. एस. लाड यांची नेमणूक झाली. याच लाडांची मुलगी पुढे दुर्गाबाई खोटे या नावानं सुप्रसिद्ध सिनेतारका झाली.

Scroll to Top