Logo

तो राजहंस एक...

लेखिका - मंजूषा आमडेकर

 ५. पुन्हा दुफळी

गैरसमज

बालगंधर्वांना छानछोकीनं रंगमंचावर वावरणं आवडायचं. प्रत्येक भूमिकेला साजेशी भरजरी वस्त्रं विकत घेऊन ती भूमिका रंगवण्यासाठी लागेल तो पैसा खर्च करायला ते मागेपुढे बघत नसत. त्यांच्या या खर्चिक वृत्तीवर गोविंदराव नाराज असत. एके ठिकाणी तर त्यांनी लिहूनही ठेवलं आहे की, ‘हौस करणं, त्याकरता हट्ट करणं आणि त्यांची हौस पुरवेल त्याच्या कक्षेत फिरत राहणं इतकंच बालगंधर्वांना माहीत आहे.’ त्यांच्या या नाराजीचा गैरफायदा घेऊन कुणीतरी अफवा पसरवून त्यांच्यात आणि बालगंधर्वांमध्ये गैरसमजही पसरवले. तिकडे बाळासाहेब पंडित बालगंधर्वांचा प्रत्येक शब्द झेलायला सदैव तयार असत. त्यांची तर इच्छाच होती की एकटे बालगंधर्वच कंपनीचे मालक व्हावेत. आणि लवकरच ते घडूनही आलं.

नागपुरच्या मुक्कामात गोविंदरावांचा आवाज जो बिघडला तो बिघडतच गेला. त्यांच्या जागी दत्तोपंत काम करायला लागले. त्यामुळे त्यांना जो जादाचा पगार द्यायला लागला त्याची झळ गोविंदरावांनी सोसावी असा गणपतरावांनी मुद्दा मांडला. गोविंदरावांनाही डॉक्टरांनी दोन महिने तरी सक्तीची विश्रांती सांगितली. याचा फायदा घेऊन बाळासाहेबांनी प्रचार सुरू केला की, ‘गोविंदराव नसले तरी नाटकं रंगतात. मग ते हवेतच कशाला?’

यावर बालगंधर्वांनी मौन बाळगलं. त्यामुळे गोविंदराव वैतागले. त्यांनी मुंबईला जाऊन 1915 च्या मे महिन्यात त्यागपत्र देऊन टाकले. त्यांच्या हिश्श्याचा मोबदला म्हणून त्यांना साडेसात हजार रुपये देण्यात यावेत असा निर्णय झाला. आणि मग त्यानंतर बालगंधर्वांना दहा आणे आणि बोडसांना सहा आणे हिस्सा द्यावा असंही ठरलं. थोडक्यात गंधर्व मंडळी स्थापन झाल्यापासून अल्पावधीतच त्यांच्यामध्ये फाटाफूट झाली.

बालगंधर्वांचे आजारपण

लवकरच काही कारणाने बालगंधर्वांना आजारपण आलं. त्यांना पोहायला खूप आवडायचं. संधी मिळाली की ते आपली ही हौस पुरवून घेत असत. नाशिकच्या मुक्कामात गंगेत पोहल्यावर ते जे आजारी पडले ते त्यांचा घसाच बसला. इतका की खेळ बंद पडले. मंडळीना आपला मुक्काम पुण्यात हलवावा लागला. बालगंधर्वांना विश्रांती घेणं भाग पडलं. गोविंदरावांच्या बाबतीत गणपतरावांनी मुद्दा काढला होता की बदली कलाकाराचे पैसे त्यांनी खर्च करावेत. पण या खेपेला ते काहीच बोलू शकले नाहीत. कारण बालगंधर्वांची भूमिका कुणीच करू शकत नव्हतं. टेंबे गेले तरी कंपनी चालू होती. पण बालगंधर्व गेले तर कंपनीचं काहीच खरं नाही हे गणपतराव ओळखून होते. त्यामुळे ते या खेपेला काही न बोलता मूग गिळून बसले होते.

बालगंधर्व किर्लोस्कर कंपनीतून बाहेर पडल्यावर गडकरी त्यांच्यावर नाराज झाले होते. पण काही काळानं त्यांचा तो राग ओसरला. त्यांनी आपलं ‘पुण्यप्रभाव’ हे नाटक गंधर्व मंडळींना वाचून दाखवलं. त्यांना ते आवडलं पण व्यवहारात न जमल्यामुळे ते नाटक किलोस्कर मंडळींकडे गेलं.

गंधर्व मंडळी सोडल्यावर गोविंदरावांनी आपली ‘शिवराज मंडळी’ सुरू केली. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणार्‍या दादा लाडू, राजाराम बापू पुरोहित, पांडोबा क्षीरसागर, बळवंतराव पेठे, गोविंदराव मुळगावकर  हे सर्व लोक गंधर्व मंडळी सोडून गेले. पाठोपाठ आणखीही काही कलाकार सोडून जायला निघाले. मग बोडसांना पेठकर, पंढरपूरकर, देवधर आणि रानड्यांकडून तीन वर्षांचा करार करून घ्यावा लागला. या सगळ्याच आश्‍चर्यकारक घटना म्हणाव्या लागतील. कारण गंधर्व मंडळीत राहिल्यास भरपूर पगार, स्थैर्य आणि लोकप्रियता मिळणार होती. तरीही लोक नाखुश होते. कारण बालगंधर्व म्हणायला मालक होते. पण सगळा व्यवहार गणपतराव आणि बाळासाहेबांच्या ताब्यात होता. त्यांची कडक शिस्त न मानवून लोक सोडून जायला लागले होते.

पुढे बडोद्याच्या मुक्कामात बालगंधर्वांना प्लुरसीच्या विकाराने पुन्हा आजारपण आलं. खेळ बंद पडले. जास्त दिवस खेळ बंद ठेवून पण चालणार नव्हतं. नाहीतर कंपनी कशी चालणार होती? त्यामुळे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नावाच्या नटाला बालगंधर्वांच्या भूमिकांसाठी तयार करण्यात आलं. ‘संत सखू’ नाटकामुळे हा मुलगा चांगलाच लोकप्रिय झालेला होता. तो खूपच हुशार होता त्यामुळे भास्करबुवांचा लाडका होऊन बसलेला होता. त्यानं बडोद्याच्या मुक्कामात शारदेची भूमिका केली.

देवलही गेले

पुढे बालगंधर्व बरे झाले आणि कंपनीनं पुणे आणि बेळगावचे प्रयोग घेतले. पण तेवढ्यात देवल आजारी पडले आणि ते मिरजेला निघून गेले. त्यांच्या सूचनांप्रमाणे गणपतरावांनी ‘संशयकल्लोळ’ नाटकाच्या तालमींची जबाबदारी घेतली. नाटक बसलं. पहिला प्रयोग हुबळीला करायचं ठरलं. पण ते नाटक रंगमंचावर येण्यापूर्वीच देवलांनी अखेरचा श्‍वास घेतला. देवलांचे हे नाटक खूपच लोकप्रिय झाल्यानं त्यांनी ‘वत्सलाहरण’ नाटक लिहायचं ठरवलं होतं. पण मृत्यूदेवतेनं त्यांना तशी संधीच दिली नाही.

देवलांनी लिहिलेली ‘मृच्छकटिक’ आणि ‘झुंझारराव’ ही नाटकं जरी रुपांतरित असली तरी त्यांना स्वतंत्र नाटकांचा दर्जा मिळावा इतकी अप्रतिम सुंदर झालेली होती. फार काय, ‘संशयकल्लोळ’ हे नाटक इंग्रजी नाटकावर बेतलेले असूनही देवलांनी त्याचं रुपांतर इतकं बेमालूम केलेलं होतं की तेच मूळ नाटक असावं की काय असंच वाटत होतं. या नाटकात त्यांनी वास्तव आणि रसिकता यांचा जबरदस्त मिलाफ साधला होता. ते उत्तम नाटककार तर होतेच, पण उत्कृष्ट नाट्यशिक्षकही होते. सहज अभिनयावर त्यांचा जास्त भर होता.

संशयकल्लोळ

संशयकल्लोळचे प्रयोग बालगंधर्व आणि केशवराव भोसले दोघांनीही केले आणि दोघांचीही नाटकं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली. स्पर्धा असली तरी ती निकोप होती. मात्र गंधर्व मंडळींना नवीन साथीदारांना तयार करावं लागत होतं. कारण बरीचशी मंडळी गोविंदरावांसोबत निघून गेलेली होती. तबल्यावर राजण्णा रबकवी आणि हार्मोनियमवर गुंडोपंत वालावलकर रुजू झाले. नोव्हेंबर १९१६ पासून नवीन संचासह गंधर्व मंडळीनी संशयकल्लोळचे नियमित प्रयोग सुरु केले होते. असं म्हणतात की तेव्हा या नाटकावर जो काही रंग चढला तो पुन्हा कधी उतरलाच नाही. या नाटकाला ‘मराठीतील सर्वात्कृष्ट विनोदी नाटक’ असा मान मिळालेला होता. हा मान त्या काळी कुणालाही हिरावून घेता आला नव्हता.

तसं बघायला गेलं तर संशयकल्लोळ हे नाटक काही अगदीच नवकोरं नव्हतं. १९८३ साली रंगभूमीवर आलेलं फाल्गुनराव नाटक पुन्हा नव्यानं सादर करायची योजना आखली गेली होती. त्यावर संगीताचा साज चढवावा आणि नवीन संच घेऊन ते नव्या रुपात पुन्हा रंगमंचावर आणावे अशी देवलांनी सूचना केलेली होती. तेच फाल्गुनराव नाटक ‘संशयकल्लोळ’ नावानं रंगमंचावर अवतरलेलं होतं. यात बालगंधर्व रेवतीची भूमिका करत तर गणपतराव बोडस फाल्गुनरावांची. हे एकमेव असं नाटक होतं की ज्यातून बोडसांना वजा केल्यास नाटकाला उणेपणा आला असता. त्यांच्याविना हे नाटक पार पडूच शकत नव्हतं इतक्या ताकदीनं ते ती भूमिका वठवत.

१९०६ ते १९१६ या दहाअकरा वर्षांच्या कालावधीत बालगंधर्वांनी जेवढ्या म्हणून भूमिका केल्या त्यात सामाजिक म्हणता येतील अशा दोनच होत्या. पहिली होती ‘संगीत शारदेतील’ शारदेची तर दुसरी ‘मतिविकार’ मधील सरस्वतीची. या गंभीर भूमिकांच्या पार्श्‍वभूमीवर संशयकल्लोळमधील त्यांची ‘रेवती’ची भूमिका फारच खेळकर होती. हास्य आणि श्रृंगार या दोन रसांचा यात विलक्षण मिलाफ होता. ही गोवेकरणीची भूमिका निभावताना त्यांनी जो काही त्यात जीव ओतला त्याला तोडच नव्हती. थोडक्यात मसाला जुनाच असलेलं हे नाटक पूर्णपणे नवीन रुपात आलं आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं होतं.

स्वयंवर

यानंतर आलं ‘स्वयंवर’. स्वयंवर नाटकाचा पहिला प्रयोग 10 डिसेंबर 1916 रोजी मुंबईच्या रंगभूमीवर झाला. यात बोडसांनी कृष्णाची आणि बालगंधर्वांनी रुक्मिणीची भूमिका केलेली होती. हे ही नाटक अत्यंत लोकप्रिय झालं. पण या नाटकाचं वैशिष्ट्य असं की, खाडिलकरांनी रुक्मिणीचं पात्र विशेष महत्व देऊन लिहिलेलं असल्यानं केवळ स्वत:च्या हिमतीवर संपूर्ण नाटक खुलवण्याची कला बालगंधर्वांना याच वेळी गवसली. भामिनी आणि देवयानी प्रमाणेच ही पण भूमिका श्रृंगार रसप्रधान असूनही तिला एक वेगळी छटा आहे. यात रुक्मिणी आपल्या परिवाराचा, सुखाचा त्याग करून श्रीकृष्णासोबत जात असल्यानं या भूमिकेला एक वेगळा पैलू प्राप्त झालेला होता. भास्करबुवांनी पदांच्या चाली जास्त लालित्यपूर्ण बांधलेल्या होत्या. बालगंधर्वांनी त्या अशा काही समरसून गायल्या की या नाटकामुळे त्यांना अमराठी चाहतेसुद्धा मिळायला लागले होते. गुजराती आणि मुलतानी लोकही गर्दी करायला लागल्यामुळे ‘स्वयंवर’ म्हणजे अमाप पैसा असं समीकरणच होऊन गेलेलं होतं.

गोविंदराव ज्याला ‘शौकी वर्ग’ म्हणत तो मुंबईतील गुजराती धनिक लोकांचा वर्ग होता. तो बालगंधर्वांवर अशी काही भक्ती करायला लागला की स्वत:च्या गुजराती भाषेतली नाटकंदेखील बघेनासा झाला. फार काय, दस्तुरखुद्द अल्लादिया खांसाहेब सुद्धा बालगंधर्वांच्या नाटकांना हजेरी लावायला लागले. संपूर्ण जन्मभर आराधना करूनही जो स्वर त्यांना लावता येत नसे तो बालगंधर्वांना लीलया लावताना पाहून ते सद्गदित होत असत. जेमतेम एका महिन्याच्या कालावधीत बालगंधर्वांनी संशयकल्लोळ आणि स्वयंवर या नाटकातील वेगवेगळा बाज असलेल्या भूमिका बेमालूम वठवून अशी काही बहार उडवून दिलेली होती की त्यांचा आता फार मोठा दबदबाच तयार व्हायला लागलेला होता. 1916 सालापर्यंत लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल कौतुक होतं; पण आता त्या कौतुकाची जागा आदरयुक्त भक्तीनं घेतली होती. आता लोक त्यांचं काम कसं झालं याविषयी बोलेनासे झाले होते कारण आता बालगंधर्व करतील तोच अभिनय आणि तेच गाणं असा मापदंडच होऊन गेलेला होता. त्यांच्याविषयी श्रद्धाभाव निर्माण झालेला होता.

ठळक घटनांची मालिका

या संपूर्ण कालावधीत काही चांगल्यावाईट घटना पाठोपाठ घडत गेल्या. किर्लोस्कर मंडळीतून बाहेर पडल्यावर गंधर्व मंडळीची स्थापना झाली, जोगळेकर वारले, बालगंधर्व प्रसिद्धीच्या शिखरावर गेले, मग गोविंदराव टेंबे आणि इतर चांगले चांगले कलाकार सोडून गेले, संशयकल्लोळ आणि स्वयंवर नाटकांमुळे बालगंधर्व लोकांचं श्रद्धास्थान बनले आणि 1917 साली दत्तोपंत पेठकरही वारले. त्यांच्या जागी पंढरपुरकरांची योजना करण्यात आली. पण ते रुबाबदार असले तरी सौंदर्य, भव्यता आणि तरल चेहर्‍याची उणीव भासतच होती. त्यांना नायक म्हणून तयार करताना गणपतराव बोडसांची दमछाक झाली.

एकच प्याला

देवल आणि खाडिलकरांची स्वयंवर आणि संशयकल्लोळ ही दोन्ही नाटकं जरी उत्तम चालत असली तरी रुचिपालट म्हणून नवं काहीतरी रंगमंचावर आणायची आता गंधर्व मंडळीला निकड वाटत होती. गडकर्‍यांची प्रेमसंन्यास आणि पुण्यप्रभाव ही नाटकं गाजतच होती त्यामुळे त्यांच्याकडून काहीतरी लिहून घ्यावं असा गंधर्व मंडळीत विचार चालू झाला होता. मुंबईचा मुक्काम झाल्यावर मंडळी बडोद्याला गेली. तिथला ठरलेला सगळा कार्यक्रम आटोपल्यावर ते सर्वजण पुण्याला आले. गडकरी तिथे वरचेवर येत असत. एव्हाना आता त्यांच्या मनातला रागही मावळलेला होता. गणपतराव आणि बालगंधर्वांनी त्यांच्याशी नवीन नाटकासंबंधी बोलणी सुरू केली. गडकरी म्हणाले, ‘नारायणराव, मी तुम्हाला नाटक देईन, पण माझ्या नाटकात तुम्हाला फाटकं लुगडं नेसून वावरावं लागेल. ते तुम्हाला कबूल आहे का?’

बालगंधर्वांचा उंची वस्त्रं आणि दागदागिन्यांचा शौक सर्वांना चांगलाच परिचित होता. त्यामुळे ते होकार देणारच नाहीत असा गडकर्‍यांचा अंदाज होता. पण बालगंधर्व पडले जातिवंत नट. त्यातून गडकर्‍यांच्या लेखनावर त्यांची नितांत श्रद्धा होती. त्यामुळे ते एक क्षणही न गमावता म्हणाले की, ‘अहो, फाटकं लुगडंच काय, पण गोणपाठ नेसूनही मी काम करायला तयार आहे. पण तुमचं नाटक आम्हाला मिळालं पाहिजे.’

आणि मग याच बैठकीत गडकर्‍यांनी बालगंधर्वांसाठी ‘एकच प्याला’ लिहायचा संकल्प केला!

पण त्यांच्याकडून नाटक मिळण्यात किती दिवस जातील याचा काहीही नेम नव्हता. शिवाय त्यांची लहर फिरून त्यांच्या मनातला जुना राग उफाळून आला तर काय करायचं, ही पण धास्ती होतीच. त्यामुळे गंधर्व मंडळीनी तोपर्यंत दुसरं एखादं नाटक तयार करायचं ठरवलं. त्यानुसार श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं ‘सहचारिणी’ हे नाटक मिळवण्यात आलं. हे दोन बायकांच्या नवर्‍यावर बेतलेलं विनोदी नाटक होतं. मात्र या नाटकाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. खरं सांगायचं तर हे नाटक सपशेल पडलंच. 

दरम्यान, आता गडकर्‍यांकडून आपल्याला नवीन नाटक मिळणार या आनंदात बालगंधर्व आपल्या नेहमीच्या भूमिका जास्तच समरसून वठवण्यात गुंग होते. पण बाळासाहेब पंडितांच्या मनात नाटकांच्या जोडीला काही नवीन व्यवसाय करायचेही घोळत होतं. लष्कराला उपयोगी पडणार्‍या काही वस्तू निर्माण करण्याचं कंत्राट ग्वाल्हेरला मिळण्याची शक्यता होती म्हणून त्यांनी तिकडचा दौरा आखला. इथल्या राजाश्रयामुळे नवीन नाटकांना पाठिंबा मिळण्याची संधी मिळू शकेल अशा कल्पनेनं बालगंधर्व आणि गणपतरावांनीही विरोध केला नाही. 

1918 च्या जुलै महिन्यात गंधर्व मंडळी पुण्यात डेरेदाखल झाली. मंडळीचा वर्धापनदिन दर वर्षी पुण्यातच साजरा केला जात असे. त्यामुळे पावसाळाभर मंडळी पुण्यातच तळ ठोकून असत. पुणे मुंबई प्रांताची पावसाळी राजधानी होती. त्यामुळे या काळात गव्हर्नरही पुण्यात रहात असत. पुण्याला विद्येचं माहेरघर किंवा विद्यार्थ्यांचं शहर मानलं जायचं. त्यामुळे इथले विद्यार्थी, मूळ रहिवासी, रेससाठी आलेले धनिक शौकीन, सरदार, संस्थानिक असा विविध प्रकारचा प्रेक्षकवर्ग गंधर्व मंडळीना सहज उपलब्ध होत असे.

लवकरच ‘एकच प्याला’चे हस्तलिखित गंधर्व मंडळीच्या हातात पडले. तालमी सुरु झाल्या. सुधाकरची भूमिका बोडस करणार होते तर सिंधूची बालगंधर्व. पंढरपूरकर, अभ्यंकर, देवधर, रानडे हेही इतर भूमिका वठवणार होते. यातली शरदची भूमिका मास्टर कृष्णरावांच्या पदरात पडली. या खेपेला बालगंधर्वांनी आपल्या तोंडची पदं रचताना पुण्यातील सुप्रसिद्ध गायिका सुंदराबाई जाधव यांची मदत घेतली. बाकीच्या चाली पंढरपूरकर आणि कृष्णरावांनी जमवून घेतल्या.

या नाटकाचा पहिला प्रयोग 1919 च्या फेब्रुवारी महिन्यात बडोद्याच्या महाराजांच्या समक्ष सादर करायचा बेत ठरला होता. पण गडकरी स्वत:च क्षयरोगानं आजारी पडले. मग त्यांनीच सुचवल्याप्रमाणे सुरुवातीची पदं विठ्ठल सीतारामांकडून करून घ्यायची ठरली. बरं वाटल्यावर गडकरी नव्यानं पदं लिहून देणार होते, पण तसा योगच जुळून आला नाही. कारण नाटक रंगभूमीवर येण्यापूर्वीच गडकरींनी 23 जानेवारी 1919 रोजी दुनियेचा निरोप घेतला.

पण ठरल्याप्रमाणे बडोद्याला या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. पण तिथला सगळा थाट दरबारी असायचा. प्रेक्षकांनी विवक्षित पोषाख घालून नाटकाला आलं पाहिजे असा नियम होता. महाराजांनी विजेचं बटण दाबलं तर पदाला वन्समोअर आहे असं समजलं जायचं. ते नाटक महाराजांना इतकं आवडलं की त्यांनी दरवर्षी जी रक्कम ठरवलेली होती त्यापेक्षा दोन हजार रुपये अधिक दिले.

त्यानंतर हे नाटक घेऊन गंधर्व मंडळी मुंबईत आली. गडकर्‍यांच्या आधीच्या प्रेमसंन्यास आणि पुण्यप्रभाव नाटकांनी रसिक प्रेक्षकांना वेड लावलेलं असल्यामुळे ते त्यांचं नवीन नाटक बघायला उत्सुक होते. त्यातून गडकर्‍यांचं निधन झाल्यानं स्वाभाविकच प्रेक्षकांचा नाटकाकडे बघण्याचा सहानुभूतीचा दृष्टीकोन होता. परंतू, नाटक म्हणजे करमणूक असं समीकरण मनात घेऊन आलेल्या प्रेक्षकांना या नवीन सामाजिक आशय असलेल्या नाटकाचं प्रथम दर्शन हादरवून सोडणारं ठरलं. यापूर्वी संगीत शारदा आणि कीचकवध नाटकानं खळबळ माजवलेली होती. पण या नाटकानं समाज आंतर्बाह्य ढवळून निघाला. दारू पिण्याच्या व्यसनानं काय होतं हे सर्वांनाच माहीत होतं; पण कुटुंबाची इतकी दाणादाण उडते हे पाहून लोक हादरले होते. एरवी विनोदी भूमिका करणार्‍या गणपतरावांना इतकी करुण भूमिका करताना पाहून प्रेक्षक थक्क झाले होते. इतरही सर्वांच्याच भूमिका अप्रतिम वठलेल्या होत्या. पण प्रेक्षक खर्‍या अर्थानं आतून हलले ते बालगंधर्वांची सिंधू बघून. गडकर्‍यांनी सिंधूचं पात्र फारच विलक्षण रंगवलेलं होतं. पण एरवी उंची भरजरी शालू शेले आणि दागदागिने घालून दिमाखात वावरणार्‍या, सुंदर दिसणार्‍या बालगंधर्वांना फाटक्या लुगड्यात अप्रतिम अभिनय करताना पाहून लोकांचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्‍वास बसेना. स्वत: बालगंधर्वही या भूमिकेचं वजन समजून होते. त्यामुळे त्यांनी आपले संवाद, उच्चार, शब्दफेक, हालचाल वगैरे सर्व गोष्टींवर विशेष मेहनत घेतलेली होती. माहेश्‍वरी साडी नेसून ते ‘मानस का बधिरावे’ म्हणत रंगमंचावर आले की ताबडतोब प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेत असत. ‘चंद्र चवथीचा’ आणि ‘बघु नको’ ही पदं ते गायला लागताच प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे रहात. मातृत्व आणि कारुण्य यांचं ते मूर्तीमंत रूप वाटत असत.

आजवर बालगंधर्वांनी रंगवलेल्या भूमिका शृंगाररसप्रधान होत्या. रंगमंचावर लखलखाट, ऐश्‍वर्य दाखवणार्‍या होत्या. पण इथे तर दारिद्ˆयाची अवकळा पसरलेली असायची. पण त्याला सिंधूच्या तेजस्वी वागण्यानं, तिच्या तपश्‍चर्येनं त्या अवकळेवरही तेज चढायचं. अक्षरश: तिच्यासोबत ढसाढसा रडण्यासाठी वर्षानुवर्षे प्रेक्षक या नाटकाला यायचे. हसण्यापेक्षा रडण्यातला आनंद त्यांना जास्त हृदयंगम वाटत होता. बालगंधर्वांच्या फाटक्या लुगड्याला महावस्त्राची झळाळी आलेली होती. तात्पुरती म्हणून गुर्जरांनी केलेली पदं कायमस्वरुपी गाजत राहिली.

इथे, या नाटकाच्या टप्प्यावर बालगंधर्वांच्या अभिनयाला जणू काही पूर्णत्व आलं होतं. संपूर्ण परिपक्वतेचं दर्शन त्यांच्यामध्ये घडत होतं. पण त्यांच्या प्रत्येक यशाला एका काळ्या सावलीचा शापच मिळाला होता जणू काही. मानापमानच्या पहिल्याच प्रयोगाला मुलीचा मृत्यू, पाठोपाठ जोगळेकरांचा मृत्यू आणि कधी नव्हे ती गडकरी-बालगंधर्व युती जुळून आली असता त्यांच्या पहिल्याच नाटकाआधी गडकर्‍यांचा मृत्यू… बालगंधर्वांच्या असामान्य यशाला लागलेली काजळीच होती ही सगळी.

Scroll to Top