Logo

राजहंसाची गाण्यातील अपूर्वता

कुमार गंधर्व

इतरांपेक्षा वेगळं असं नारायणरावांच्या गाण्यात काय होतं? आपल्या गाण्यात इतरांहून वेगळं असं काय आहे, त्याची गुणवत्ता काय आहे यावर खुद्द नारायणरावांनीदेखील विचार केला असावा असं मला वाटत नाही. तसा तो केला असता आणि आपली ‘वेपन्स’ वापरली असती तर इतर गायकांचं कठिण झालं असतं असं माझं स्पष्ट मत आहे. आपल्या कडील श्रोते देखील अमुक एका कलावंताचं गाणं आपल्याला का आवडलं यावर स्वतः विचार करीत नाहीत. कुणाच्या तरी माध्यमाव्दारा करतात. ‘अमक्यातमक्या कलावंताबद्दल हा असं म्हणतो, तो तसं म्हणतो’ असं भाडोत्री विचाराचं ओझं डोक्यावर घेऊन ते मैफल ऐकायला जातात असंही माझं अनुभवान्ती बनलेलं मत आहे. हे असं इतरांच्या ओंजळीनं अमृत पिणं योग्य आहे का? बालगंधर्वांच्या गायकीचा पगडा लोकमनावर इतका का याचा विचार प्रत्येक सुजाण श्रोत्यानं करायला हवा असं मला वाटतं. तर मग मला भावलेलं नारायणरावांच्या गायकीचं वेगळेपण कोणतं? नारायणराव राजहंसाच्या गाण्यातील अपूर्णता ही होती की, आवाजाच्या कलेच्या दुनियेत आवाज (आघात) न करता प्रत्येक गोष्ट करीत आपलं गाणं फुलासारखं श्रोत्यांपुढं ठेवीत. संपूर्ण अनाघाती ! समेवर येतानाही अनाघातीच. कलापक्व झालेलं झाडाचं पान हवेत तरंगत तरंगत धरणीवर यावं तसे येत. याहूनही आणखी एक चमत्कार ते करीत. तोही उदाहरणानंच सांगितला पाहिजे. वरून एखादी वस्तू आघातानं खाली पडली तर धूळ उठते हे आपण पाहतोच. नारायणराव अनाघातानं समेवर येत तेव्हा काहीही न पडता देखील ‘धूळ’ उठे ! श्रोत्यांमध्ये ‘चैन’ का निर्माण होणार नाही अशा चमत्कारपूर्ण धुळीमुळं ? हे सर्व लक्षात घेतलं म्हणजे त्यांच्या गाण्यात ‘आ’काराला ते विशेष महत्त्व का देत असत आणि अकार, इकार, एकार यांच्याशी त्यांची सलगी का नसे याचा उलगडा होईल. ‘आकार’ अनाघाताला अगदी सोयीचा.

जोहार मायबाप

नारायणरावांची एक सहज योगायोगानं घडून आलेली दीड तासाची मैफल ध्वनिफितीवर उतरविण्याची संधी मला लाभली होती. होळीचा दिवस होता तो- गाण्याचा आनंद घेण्यासाठीच आम्ही सर्वजण इंदूरला बंडूभय्या चौगुले यांच्या घरी जमलो होतो. दातेसाहेब, पी.एल्., रामभाऊ गुळवणी, मी, बंडूभय्या असे सर्वजण. त्या दिवशी नारायणराव आणि गोहरबाई इंदुरात होती. त्यांना आमच्या मैफलीचा वास लागला. बंडूभय्यांनी बिऱ्हाडाची जागा नुकतीच बदलली होती आणि ही गोष्ट मात्र नारायणरावांना मुळीच ठाऊक नव्हती. तो नवा पत्ता शोधून काढण्यात त्यांचा फार वेळ गेला. ती दोघेजण जिना चढून आली तेव्हा मी भैरवी सुरू करण्याच्या विचारात होतो. नारायणराव जिना चढून दमले होते. माडीत प्रवेश करताच दरवाजापाशी एक बाकडं होतं त्यावर ते टेकले. आम्हा सर्वांच्या चेहऱ्यांवर त्यांच्या आगमनानं स्मितरेषा उमटल्या. त्यांच्याकडून काही ऐकायला मिळावं ही अपेक्षा तर होतीच. दातेसाहेबांनी अपेक्षा बोलून दाखविली. नारायणरावांनी मुळीच आढेवेढे घेतले नाहीत. तंबोरे सफेद चारमध्ये लागलेले आहेत हे त्यांनी ऐकलेलंच होतं. पखवाज, तबला, बंडूभय्या हार्मोनियमवर, सगळा सरंजाम आपल्याला जसा हवा तसा जुळलेला आहे हे बघितल्यावर आढेवेढे घेण्याचं कारण तरी काय? त्या सरंजामात नारायणरावांना ठाऊक नसलेली पण आम्हा सर्वांच्या कौतुकाचा विषय बनलेली एक वस्तू होती. ती म्हणजे आर्.सी.ए.चं नंबर दोनचं रेकॉर्डिंग मशिन ! त्यावेळी देशात टेपरेकॉर्डर्सचा आताच्यासारखा सुळसुळाट झालेला नव्हता. त्यामुळं आम्हालाही त्या ‘पुशबटन’ मशीनचं कौतुक होतं.

अपूर्वता

नारायणराव त्या बैठकीत दीड एक तास प्रसन्न मनानं गायले. आवाज साथ देता नव्हता पण आम्हा मंडळींना, आनंद घेत घेत ऐकण्याजोगं त्यात बरंच होतं. आज मी जेव्हा त्या बैठकीचा विचार करतो तेव्हा ते ध्वनिमुद्रण पुसून टाकायला नको होतं अस वाटतं. पण त्यावेळी विचार वेगळा होता. पुनः कधीतरी नारायणरावांचं चांगल्या आवाजातलं ध्वनिमुद्रण करता येईल. आजचं पुसून टाकणंच योग्य, असं त्यावेळी वाटलं. म्हणून अगदी शेवटचा ९ मिनिटांचा एक सुंदर ‘पीस’ बाजूला काढून बाकीच सगळं ध्वनिमुद्रण मी पुसून टाकलं. हा शेवटचा ‘पीस’ होता ‘जोहार मायबाप जोहार” या अभंगाचा. निकोप आवाजातला. दोन धैवतावर स्वार झालेला. नारायणरावांच वेगळेपण सर्वांगांनी प्रकाशित करणारा. आतातर मी तो ‘फोर ट्रॅकवर’ पुनर्मुदित करून घेतलाय्. नारायणरावांच्या गायकीबद्दल कोणी अस्थानी वाचाळपणा केला तर त्यांना मी तेवढा एकच ‘पीस’ ऐकवून गप्प करतो. नारायणरावांच्या चहात्यांनी उत्सुकता दर्शविली तर त्यांनाही ऐकवतो. दरवेळी ऐकताना माझाही आनंद शतगुणित होता असतो त्यामुळं. कारण त्या थोर कलावंताचं आजारपण कल्पनेतही नव्हतं तेव्हा झालेल ध्वनिमुद्रण आहे ते.

Scroll to Top