बालगंधर्वांचे संगीत
विनायकराव पटवर्धन
श्री. नारायणराव ऊर्फ बालगंधर्व यांच्या नाट्यसंगीताच्या गुणांतून दोष कसे काढावेत हेंच मोठे गूढ आहे. श्री. नारायणरावांनीं गेली २५ वर्षे गाण्यानें सर्व महाराष्ट्राला इतकें मोहून टाकलें आहे कीं, त्यांच्या संगीताला वाईट म्हणणेंच शक्य नाहीं. श्री. नारायणराव हे कांहीं फार गाणें शिकलेले नाहींत. ते संगीतविद्येचे भोक्ते आहेत. संगीताचार्य नसतांना त्यांनी महाराष्ट्रालाच नव्हे, तर सर्व हिंदुस्थानाला आपल्या संगीतानें वेड लावलें आहे. श्री. नारायराव हे जर गाणें शिकले असते तर ते नुसते गवई झाले असते; पण आज जो त्यांचा लौकिक झाला आहे इतका कधींच झाला नसता. त्यांच्या इतर नैसर्गिक गोष्टींचा फायदाही हिंदूस्थानाला मिळाला नसता. त्यांच्या शरीराचा नैसर्गिक बांधा, नैसर्गिक गोड आवाज वगैरे अनेक गोष्टींचा लाभ आज जो महाराष्ट्राला मिळत आहे, तो ते गवई म्हणून पुढे आले असते तर खास मिळाला नसता. त्यांच्या नाटकांतल्या भूमिकेनें पुरुषांना तर वेड लावलेंच आहे; पण स्त्रियांनासुद्धा त्यांनीं वेड लावले आहे, ही विलक्षण गोष्ट होय. त्यांच्या स्त्रीवेषांत काडीमात्र असभ्यपणा दिसत नाहीं. सभ्य स्त्रीवेष हे जनतेसमोर असा ठेवतात की, त्यांचें अनुकरणच करावेसें वाटतें. कांहीं कांहीं प्रसंगी श्री. नारायणराव यांचें अनुकरण करण्यांत स्त्रियांनीं औचित्यभंग केल्याचें दृष्टीला पडतें ही गोष्ट निराळी. थोडक्यांत लिहावयाचें म्हणजे श्री. नारायणराव हे महाराष्ट्रांत नटण्याच्या बाबतींत आदर्श होऊन बसले आहेत यांत संशय नाहीं. तसाच श्री. नारायणरावांचा नैसर्गिक आवाजसुद्धां इतका गोड आहे कीं, त्यांचें वर्णन कसें करावें हेंच कळत नाहीं. रंगभूमीवरील त्यांच्या यशाला मुख्य कारण म्हणजे त्यांच्या शरीराचा बांधा व नैसर्गिक आवाज हेच दोन मोठे गुण आहेत. रंगभूमीवर श्री. नारायणराव यांच्याइतका सुंदर नट स्त्रीनटांत झाला नाहीं असें म्हणावयास कांहीं हरकत नाहीं. त्यांची काम करण्याची शैली, त्यांचा आविर्भाव, त्यांचा सुंदरपणा, त्यांचा गोड आवाज या सर्व संदर गोष्टींचा समावेश एकाजवळच म्हणजे श्री. नारायणराव यांच्याजवळच असल्यानें. श्री. नारायणराव पुष्कळ वेळां खाजगी भाषणांत, जाहीर व्याख्यानांत “मी आतां म्हातारा झालों आहे” असें जरी सांगत असले, व एक वेळ श्री. नारायणराव म्हणतात ही गोष्ट कबूल केली, तरीसुद्धां आजकालच्या रंगभूमीवरच्या स्त्रीनटांत त्यांच्याइतका सुंदर स्त्रीनट अद्यापिसुद्धां दृष्टीस पडत नाहीं ही गोष्ट निर्विवाद आहे. यावरून हेंच सिद्ध होतें कीं, परमेश्वरानें त्यांना महाराष्ट्र रंगभूमीवर स्त्रीभूमिका करण्याकरितांच जन्माला घातलें यांत संशय नाहीं.
गाण्याचा मोहकपणा
श्री. नारायणराव यांचे संगीत गाणें समजणाऱ्याला किंवा न समजणाऱ्यालासुद्धां मोहून टाकणारे असें आहे. शस्त्रोक्त पद्धतीनें त्यांच्या गाण्याकडे पहाणा-याला त्यांचे गाणें शास्त्रोक्त नाहीं असें वाटेल; पण मोहक आहे हें कबूल करावें लागेल. श्री. नारायणराव हे गाऊं लागले म्हणजे असें वाटतें कीं, त्यांचें संगीत नेहमी सुरू असावें. नाटक पहाण्यास आपण आलों आहोत. हें प्रेक्षक अगदीं विसरून जातात इतकें आकर्षक त्यांचे गाणें आहे. कांहीं प्रसंग तर असें येतात कीं, श्री. नारायणरावांच्या गाण्याचें अनुकरण जर गवयानें केलें नाहीं तर तो गवई प्रेक्षकांना पसंतच पडत नाहीं. अशा सर्व तन्हेनें विचार केला असतां श्री. नारायणरावांच्या गाण्याचें मोहक स्वरूप लोकांना मोहून टाकतें; त्यामुळे प्रत्येक स्त्री-पुरुष त्यांच्या गाण्याचें अनुकरण करूं लागला आहे. त्या अनुकरणानें एक त-हेनें-संगीतविद्येच्या प्रचाराच्या दृष्टीनें विचार केला असतां श्री. नारायणरावांच्या गाण्याचें अनुकरण लहान मुली व मुलें करूं लागल्यानें एक प्रकारें गाण्याची प्राथमिक शिक्षणाची पद्धत नाहींशी होत चालली आहे. हें खेदानें म्हणावें लागतें. कोणत्याही गायनसमाजांत एखादा विद्यार्थी गाणें अगर पेटी शिकण्यास गेला तर त्याची पहिली उंडी श्री. नारायणरावांचीं पढ़ें शिकण्यावर पडते. विद्यार्थी म्हणेल त्याप्रमाणें शिकण्यास गेला तर त्याची श्री. नारायणरावांचीं पढ़ें शिकण्यावर पडते. विद्यार्थी म्हणेल त्याप्रमाणे शिकविलें नाहीं, तर विद्यार्थ्याच्या अभावी समाज बंद पडण्याचा संभव म्हाणून तो शिकण्यास येणारा विद्यार्थी सांगेल तीं पढ़ें शिकविण्यास समाजाचे चालक तयार होतात.
या सर्वांला कारण श्री. नारायणराव यांच्या गाण्याचा मोहकपणाच आहे हें निर्विवाद सत्य होय. श्री. नारायणराव यांच्या गाण्यामुळे न समजणाऱ्याला सुद्धां आनंद होतो; तर मग संगीतज्ञास आनंद कां होणार नाहीं ? जरी ते गातांना रागशद्धता सांभाळत नसले तरीपण त्यांचें गाणें कर्णकटु खास वाटत नाहीं. श्री. नारायणराव रंगभूमीवर गातांना प्रसंगोचित रसाचा परिपोष होईल अशा त-हेनेच गातात. एखादा गंभीर प्रसंग आहे. त्यांत गाण्यासाठी एखाद्या गंभीर रसाच्या रागाची योजना केली असतांना त्यांत गुंबरी, गज्जल पद्धतीला जमणारे राग ते त्या रागांत कधींच मिश्र करणार नाहींत. उदाहरणादाखल विद्याहरण नाटकांतलाच प्रसंग घेता येईल. तिस-या अंकांत शक्रचार्य ध्यानस्थ बसला असाता त्या ठिकाणीं ‘आतां राग देई मना’ हें पद बागेश्री रागांत म्हणतात, व जर त्या पदाला वन्समोअर झाला तर बागेश्री रागाइतकाच गंभीर राग मालकंस या रागांत तें पद पन्हा म्हणतात. त्या ठिकाणीं जर पहाडी पिल, भैरवी रागासारखे राग मिश्र केले तर चालणारच नाहीं. तिथें कांहीं तिथे काही गाण्याची विद्वत्ता दाखविण्याचा प्रसंग खास नाहीं. त्या ठिकाणीं जर वर लिहिल्याप्रमाणें राग मिश्र करून गाण्याच्या बैठकीप्रमाणें गाणें सुरू केलें तर अगदी अप्रयोजकच होईल. श्री. नारायणराव या सर्व गोष्टींचा विचार करून रंगभूमीवर काम करतात. त्यामुळे त्यांच्या कामाचा उठाव सवं दृष्टींनी उच्चच होतो. त्यांच्या गाण्यामध्ये थिल्लरपणा सुळींच नसल्यानें त्यांचें गाणेंसुद्धां वेषाप्रमाणें भारदस्त असेंच वाटतें.
गाण्यांतले नैसर्गिक गुण
श्री. नारायणराव यांना आवाजाची नैसर्गिक देणगी विशेष आहे. ते रंगभूमीवर गातांना कधीं बेसूर झाले, असें आठवत सुद्धां नाहीं. गातांना आतां पुढें वेसूर होणार असें ऐकणाऱ्याला वाटतें; पण चुकूनसुद्धां बेसूर होत नाहींत. आवाजाचा गोडवा तर विशेषच आहे. स्त्रियांचा आवाज नैसर्गिक गोड असतोच; पण श्री. नारायणराव यांचा आवाज त्या आवाजापेक्षां निराळा असन तितकाच गोड, तितकाच नाजुक, तितकाच फिरण्यांत हलका असा कांहीं सर्वांपेक्षा विशेष त्यांच्या आवाजांत आहे असें वाटतें. त्याचा प्रत्यक्ष परिणाम त्यांचें गाणें ऐकतांना अनुभवास येतोच त्यांच्या गाण्यांतला तानेचा स्वच्छपणासुद्धां असाच आहे. तान घेतांना द्रुतगतीनें ती घेतली तरी तिचा स्वच्छपणा मुळींच कमी होत नाहीं. तान इतरांच्याप्रमाणें द्रुतगतीनें गेली असें वाटतें खरं; पण ती इतरांइतकी द्रुतगति जात नाहीं. द्रुतगतीनें तान जात नाहीं याला एकच कारण, व तें म्हणजे तानेचा स्वच्छपणा कमी होईल या भीतीनेंच ते लवकर तान घेण्याच्या भानगडींत पडतच नाहींत. इतर मंडळी तान स्वच्छ आली नाहीं तरी चालेल; पण फार लवकर तान घेतली यांतच त्यांना मोठें भूषण वाटते असतें. तथापि रंगभूमीच्या दृष्टीनें अथवा गाण्याच्या बैठकीच्या दृष्टीनें सुद्धां गाण्यामध्यें स्वच्छपणा असणें फार अगत्याचें आहे. अस्वच्छ ताना, चोरटा आवाज लावणें, पुरुष असून स्त्रियांच्याप्रमाणें नाजुक गाणें अशा प्रकारचें संगीत नव्या गवयांना हल्ली फार आवडं लागलें आहे. मर्दानी गाणें हल्लीं लोकांना अगदी आवडेनासें झालें आहे. आवाज मोठा असला व ताना बोलतांना स्वच्छपणानें घेतल्या तर प्रेक्षकांची ओरड ऐकू येते. स्वच्छपणा हल्ली गाण्याच्या बैठकीतसुद्धा कमी झाला आहे. फार द्रुतगतीनें जाऊन तानांवर ताना मारल्या तरच तें गाणें लोकांना पसंत पडतें. विलंबीत गाणें हल्ली लुप्त होत चाललें आहेः यालासुद्धां पुष्कळ अंशी रंगभूमीवरील संगीतच कारण होऊ शकेल. गाण्याच्या बैठकींत थोडा वेळ विलंबीत गाणें ऐकून घेतील; पण पुढें नाटकांतल्या आवडत्या पदांवरच धाड पडते. असें जरी असलें तरी गवयानें आपलें श्रेष्ठत्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करणें म्हणजे गाण्यांत स्वच्छपणा आणणें फार जरूर आहे. हा स्वच्छपणा तैसर्गिकच श्री. नारायणराव यांच्या संगीतांत आहे. नैसर्गिक गोड आवाज तानेचा स्वच्छपणा, स्पष्ट शब्दोच्चार हे सर्व गुण श्री. नारायणरावांच्याजवळ आहेत.
गाण्यांतली पुनरुक्ति
श्री. नारायणरावांच्या गाण्यांत पुष्कळ पुनरुक्ति होते असा प्रेक्षकांचा त्यांच्यावर एक आरोप आहे. पण हा आरोप सुद्धा श्री. नारायणराव यांनीं आपल्या गाण्याच्या रसानें व गद्याच्या भावानेनें फोल ठरविला आहे. श्री. नारायणराव एखाद्या पदांतली कोणती ओळ पुनः पुन्हा म्हटली तर चालेल हें शोधून काढण्यांत फार तरबेज आहेत. असें पालुपद शोधून काढून तें निरनिराळ्या स्वरांच्या वेलबुट्टीनें रंगविल्यानें विशेषच खुलून दिसतें व त्यामुळे भावनेंचें जे वातावरण तयार होतें त्याचा भेद चांगल्या चांगल्या मर्मज्ञ प्रेक्षकांना, गवयांना अथवा सामान्य प्रेक्षकांनासुद्धां लागणें अशक्य आहे. पदांतील एखाद्या कडव्याची पुनरुक्ति एखादे वेळीं इतकी होते. की, त्या कडव्याचा कंटाळा आल्याशिवाय रहात नाहीं. “‘ नाहीं मी बोलत नाथा’ हें कडवें आज शंभरदां नाटकांत म्हटलें,” असे आरोप केलेले प्रेक्षकांतून ऐकावयास मिळतात. कडव्याच्या पुनरुक्तीने पद बरेंच लांबलें जातें ही प्रेक्षकांची तक्रार एका दृष्टीनें अगदीं बरोबर आहे असें वाटतें. पद बरेंच लांबल्यानें नाटकांतला रस कमी होतो, गाण्याची बैठक चालली आहे असे नाटक पहावयास येणाऱ्यांना वाटणें अगदीं साहजिकच आहे. माझ्यासारख्या संगीताभ्यासी लेखकाला एक वेळ कंटाळा वाटणार नाहीं ; पण इतर प्रेक्षकांची स्थिती वर लिहिल्याप्रमाणेंच होणार यांत संशय नाहीं. स्वयंवर, एकच प्याला सारखी लोकप्रिय नाटकें., सहा साडे सहा तासपर्यंत चालतात. त्यामुळें नाटक संपण्यास रात्री १०-१० वाजतात. नाटकाला होणारा उशीर व त्यामुळे प्रेक्षकांना होणारा त्रास श्री. नारायणरावांच्या गाण्यामुळेंचं होतो. गाणे ऐकत असतां उठवत तर नाहींच; पण पुढील सर्व कार्यक्रम त्या नाटकामुळे बिघडतात म्हणून कांही रसिक मंडळींनीं श्री. नारायणरावांना विनंती करतांना लेखकानें प्रत्यक्ष ऐकलें आहे. “तुमच्या नाटकाला फार उशीर होतो, नाटकामधून उठूनही जाववत नाहीं. तेव्हां नाटकांच्या वेळींच जर तिथल्यातिथें प्रेक्षकांची भोजनाची व्यवस्था होईल व खुर्चा काढून तिथंच गाद्या-गिरद्यांची जर व्यवस्था केली तर ताटकळत बसून जो त्रास होतो तो तरी होणार नाही !” असेंही चेष्टेनें व प्रेमानें कित्येक सद्गृहस्थ मंडळी श्री. नारायणराव यांचे बरोबर बोलतांना प्रस्तुत लेखकानें ऐकलें आहे. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते कीं, प्रेक्षकांचें श्री. नारायणरावांच्यावर फारच प्रेम आहे; व म्हणूनच अशा प्रेमळ विनंत्या करण्याचें प्रेक्षक धाडस करत. श्री. नारायणरावसुद्धां प्रेक्षकांची सेवा इतकी चांगली करतात कीं, प्रक्षकांनादेखील असें वाटतें की, वस्स्, आमचे पैसे वसूल झाले. कुचराई कशी करावी हैं मुळीं श्री. नारायणरावांना ठाऊकच नाहीं. पुनरुक्ति श्री. नारायणरावांनीं कितीही केली तरी इतर पुनरुक्ती करणाऱ्या नटांची प्रेक्षक मुळींच गय करीत नाहीत. तसा प्रसंग श्री. नारायणरावांच्यावर कधींच आला नाहीं; असें अभिमानपूर्वक सांगण्यास कांहीं हरकत नाहीं. श्री. नारायणरावांचा आवाज फार बसलेल्या परिस्थितींत सुद्धां कसून काम करण्यांत त्यांच्याकडून कधींच कुचराई झाली नसल्यानें प्रेक्षक त्यांच्या आवाज बसण्याकडे दुर्लक्ष करतात. ही त्यांनीं जबरदस्त पुण्याई मिळविली असल्यानें त्यांच्या कामाबद्दल अथवा पुनरुक्तीबद्दल प्रेक्षकांनीं किती जरी निंदा केली तरी वर्तमानपत्रांतून अगर त्यांच्याजवळ टीका करण्याचें धाडस होत नाहीं. यांचें कारण त्यांची रंगभूमीवरील निरपेक्ष सेवा. श्री. नारायणराव यांचें अनुकरण इतर नटही करूं लागले आहेत. अनुकरण चांगल्याचेंच करावें, यांत संशय नाहीं. पण किती अनुकरण केलेलें आपणास शोभेल हा ज्याचा त्यानें विचार करावयास पाहिजे: कांहीं नटांनीं त्यांचें पदांतील कडव्यांची पुनरूक्ती करण्याचें मात्र उचललेंले आहे. पुनरुक्ती केलेली श्री. नारायणराव यांनाच शोभेल; इतरांनीं जर कडव्यांची पुनरूक्ती केली तर फारच कंटाळा येतो. इतकेंच नव्हें तर रसहीन, भावनारहित व नुसत्या गाण्याच्या बैठकीप्रमाणें रंगभूमीवर गाणारे नट रंग भूमीवर न येतील तर फार बरें होईल असें प्रेक्षकांना वाटत असतें. पुनरुक्ती करूनही कंटाळा येऊ न देण्याची पुण्याई श्री. नारायणराव यांनींच मिळविली आहे. इतरांना ती पुण्याई मिळणारही नाहीं, हैं लक्षांत ठेवूनच इतर नटांनीं रंगभूमीवर गावे हेंच श्रेयस्कर आहे.
रंगभूमीवरचें गाणें सोपें असावें
रंगभूमीवरचें गाणें अगदीं सोपें असावें असा श्री. नारायाणरावांचा मोठा कटाक्ष आहे. राग व तालसद्धां सोपा असावा असें त्यांचें मत आहे. नाटकांतलें संगीत हा नाटकांतला कांहीं मुख्य भाग खास नाहीं. गद्य भागानें जो रस अथवा जी भावना उत्पन्न होते त्याला संगीताची जोड दिल्यानें तो रस व ती भावना पुष्ट होते, व त्यामुळे गद्यभाग रंगभूमीवर उत्तम वठला गेला तरी संगीतानें जो परिणाम मनावर बिंबून जातो तो गद्यानें खास होत नाहीं, ही गोष्ट निर्विवाद आहे, पण संगीत नाटक जरी असलें तरी गद्य भागालाच महत्त्व जास्त आहे. संगीताला केव्हांही प्राधान्य मिळणार नाहीं. संगीत हैं केव्हाही दुय्यमच असणार. संगीताचा दुसरा नंबर ठरल्यावर चाल व ताल दोन्ही मोहक असून सोपी असावीं. चाल गोड असावी. म्हणजे काम करतांना गाण्याचे वेळीं तालाकडे व स्वराकडे फार लक्ष न देतां सहज गातां यावें व अशी सोपी चाल असल्यावर नाटकांतल्या चालू रसाकडे व भावनेकडे लक्ष देण्यास नटाला फारच सोपे जातें. चाली कठीण व ताल कठीण असें जमल्यावर नाटकांत रसोत्पत्ती करणें फार कठीण पडतें, ही गोष्ट अगदीं खरी आहे. तेव्हां श्री. नारायणराव यांचा सोपी चाल व सोपा ताल असावा असा जो कटाक्ष आहे तो अगदी खरा आहे. श्री. नारायणराव तर तालाबद्दलसुद्धां अशीच खबरदारी घेतात. कुठें तरी आड मात्रेवरून जर पद सुरू असेल, तर ते कधींही ते पसंत करीत नाहींत. समेपासून अथवा कालांतून सुरू असलेली चाल ते पसंत करतात. कोणत्याही त-हेनें रंगभूमीवर गातांना स्वराचा व तालाचा त्रास न होता जितकें गातां येईल तेंच खरें रंगभूमीचें गाणें. नाटकांतील रसाच्या दृष्टीनें श्री. नारायणराव यांचें हें म्हणणें अगदी बरोबर आहे. अशा त-हेचा त्यांचा विचार त्यांना आजपर्यंत जो अनुभव आला त्या अनुभवावरूनच त्यांनीं ठरविला; तो केव्हाही योग्यच आहे यांत संशय नाही. रंगभूमीकरितां असें सोपे गाणें गाण्याची सवय झाल्यावर गाण्याची बैठक रंगभूमीवर होणें शक्य नाहीं. रंगभूमीवरचें गाणें रंगविणें हेंच एक ध्येय ठरल्यावर, संगीताचा उठाव वर लिहिल्याप्रमाणें करावयाचा हें ठरल्यावर, रंगभूमीशिवाय इतर वेळचे श्री. नारायणराव यांचें गाणें इतकेसें यशस्वी होत नाहीं. प्रेक्षक कुतूहलाने श्री. नारायणराव यांच्या गाण्याचे जलसे ऐकावयास जातात. पण वर लिहिल्याप्रमाणेंच प्रेक्षक बोललेलें ऐकू येते. श्री. नारायणराव यांनीं रंगभूमीवरच गावे, जलशांत वगैरे गाऊं नये, असेंच सर्वतोमुखीं ऐकावयास मिळतें. गाण्याच्या जलशांतसुद्धां लोक नाटकांतलींच पढ़ें म्हणावयास सांगतात. पण रंगभूमीवर तीं पढ़ें जितकी चांगली रंगतात तितकीं बैठकींत रंगत नाहीनः या सर्व गोष्टींचा विचार केला असतां, श्री. नारायणराव रंगभूमीवर सेनापतीप्रमाणें आपल्या तेजानें चमकतात; पण गाण्याच्या बैठकींत मुळीच चमकत नाहींत. बैठकीतल्या गाण्यांतले योद्धे रंगभूमीवर त्यांच्यापुढे फिकें पडतात असा’ सर्वत्र अनुभव आहे. रंगभूमीवरील त्यांचें गाणें अगदीं सोपें वाटत असल्याने प्रत्येकाच्या घरी त्यांचें पद म्हणण्याची अथवा वाजविण्याची प्रवृत्ती दिसून येते. यालासुद्धां कारण त्यांचे सोपें गाणेंच होय. ऐकणाऱ्या प्रेक्षकांना त्यांचें गाणें स्वच्छ व सोपे असे ऐकावयास मिळते. पण जेव्हा ते गाणे प्रत्यक्ष कुणी गाऊं लागतो तेव्हां ते सोपें आहे का कठीण आहे हें नंतर कळतें. श्री. नारायणराव यांचे गाणें फार सोपें नाही व फार कठीणही नाहीं. अत्यंत मधुर मात्र आहे. त्यामुळे सोपे गाणे आहे असें वाटून इतर नक्कल करावयास लागतात. पण ती नक्कल होत नसून. दुसरेंच कांहीं तरी विचित्र होत असतें. कांहीं कांहीं मंडळींनीं मात्र त्यांच्या सोप्या गाण्यांची नक्कल केलेली ऐकण्यास मिळते.
राग, ताल व साथीचा आनंद
श्री. नारायणराव गातांना रागाचें वातावरण कायम ठेवण्याचा कसोशीनें प्रयत्न करीत असतात. त्याचबरोबर तालाच्या बाबतीतही असेंचं आहे. आपल्या कंपनीत तालीम सुरू असतांना श्री. नारायणराव प्रत्येक नटाला हेंच सांगतात कीं, पदांतील प्रत्येक कडवें सरळ तालांत यावें. त्यांत गातांना एखादी तान, मुरकी किंवा मिड जर घ्यावयाची असेल तरीसुद्धां ते कडवें तालांत येण्याबद्दल त्यांचा कटाक्ष असतो. गाण्याच्या बैठकीत, जसें चिजेचें तोंड म्हणतांना एकदां कसेंतरी चिजेच्या तोंडावर येऊन तालांत पडावयाचें तसें रंगभूमीवर चालणार नाही. असें तें नेहमी सांगत असतात. प्रत्येक कडवें स्वरबद्ध, तालबद्ध व भावनापूर्ण असेंच यावयास पाहिजे ही खरी गोष्ट आहे. पण हल्लींच्या गायकांना रस व भावना ही काय चीज आहे हें समजतच नाही. अथवा कुणी समजावून दिलें तरी समजून घेण्याची त्यांची इच्छाच नाहीं. गायक असें म्हणतो कीं, पदाचा अर्थ, भावना व रस आम्हांला कशाकरितां पाहिजेत ? नुसती गाण्याची तयारी, तानांची तयारी व वांकडीतिकडी स्वरांची कसरत झाली म्हणजे झालें. पदाचा अर्थ वगैरे गोष्टी आमच्या गाण्यांत लागत नाहींत व आम्हांला त्यांची जरूरीही नाही. श्री. गोविंदराव टेंबे यांनी “गायिका गोहरजान” या लेखांत यासंबंधी बराच विचार केला आहे. त्यांत त्यांनींसुद्धा गोहरजानचें वर्णन करतांना हेंच सांगितलें आहे. गोहरजानच्या प्रत्येक गाण्याच्या पदांत, चिजेंत, तानेंत, गझलमध्यें भावना असल्यामुळेच त्यांचे गाणे फार मोहक व मनाला चटका लागणारें असें व्हावयाचे. तर हा विचार हल्लींच्या गायकांनीं करावयास नको का ? पद कोणत्याही भाषेतलें असो. त्या पदांत अर्थ पाहिजे व त्या पदाचा अर्थ भावनेने व रसानें प्रेक्षकांच्या मनावर गायकानें विबविण्याचा प्रयत्न करावयास पाहिजे. गायक गातांना जर डोळे मिटून गाऊं लागला तर तो प्रेक्षकांच्यावर काय परिणाम करू शकणार ?
नाटकांमध्ये तेवढी भावना असावी आणि गाण्यांत भावना नसली तर चालेल का ? तर भावनाहीन गायक झाल्यानें प्रेक्षकही त्याच त-हेचे होऊ लागले आहेत. पद नाटकांतलें असो अथवा कोणतेही असो. मराठी असो नाहींतर हिदी असो, भावना ही अवश्य पाहिजे ती जर नसेल तर तें गाणें फोल आहे ही अगदी सत्य गोष्ट आहे. श्री टेंबे यांनी गायिका गोहरजानचे वर्णन करतांना वर लिहिल्याप्रमाणेंच लिहिले आहे. व त्याप्रमाणे (श्री. टेंबे यांनी लिहिल्याप्रमाणे) खरोखरच हल्लींचे गायक जर भावनापूर्ण गाऊं लागतील तर खरोखरच संगीत विद्या हल्लींपेक्षां जास्त श्रेष्ठपदाला चढल्याशिवाय खास रहाणार नाहीं, संगीतविद्येची अवनति नाहीशी होईल व संगीतविद्येच्या माझ्यासारख्या अभ्यासूलासुद्धा नवीन तन्हेनें संगीतविद्येचें ज्ञान झाल्याशिवाय रहाणार नाहीं. भावनापूर्ण गाण्याचा परिणाम प्रेक्षकांवर फारच होतो; पण असे समजणारे प्रेक्षक फारच थोडे पहावयास मिळतात. तानेची सरबत्तीच प्रेक्षकांना फार पसंत पडते ! त्यापुढे गाण्यांतली भावना नाहींशी झाली तरी चालेल, पण तानतयारीचें गाणें पाहिजे. अशा त-हेचा प्रकार हल्लीं रंगभूमीवर झपाट्यानें वाढत चालला आहे; पण श्री. नारायणराव यांनीं आपल्या रंगभूमीवर तसा प्रसंग आजपर्यंत आणू येऊं दिला नाहीं हें त्यांना भूषणास्पद आहे यांत संशय नाहीं. त्यांनी राग व ताल यांचा संबंध कसा ठेवला आहे हें वर लिहिलेंच आहे. त्याचप्रमाणे सारंगीचीसुद्धा साथ नाटकाला फार आकर्षक अशी झाली आहे. सारंगीसारख्या अत्यंत गोड वाद्याला समाजानें आपणांतून हाकलून काढलें होते; पण त्या वाद्यांचें श्रेष्ठत्व श्री. नारायणरावांनीं पुन्हा मूळपदावर आणून ठेवले आहे. सारंगी व ऑर्गन हीं वाद्यांची जोड फारच मध्र आहे. ऑर्गनचा आवाज फार गोड व गंभीर आहे. हार्मोनियम फार कठोर वाटतो; पण साथीला बाजाच्या पेटीपेक्षां ऑर्गनची साथ भरदार वाटतें. ऑर्गनमध्यें एक प्रकारचा नुसता गंभीरपणा आहे. गाणाऱ्याला तो गंभीर फार पोषक होतो, पण ऑर्गनमध्यें जी जव्हारी पाहिजे ती त्यांत नाहीं. ती जव्हारी सारंगींत आहे. सारंगीच्या खालच्या तारांतून निरनिराळे नाद उत्पन्न होऊन जे स्वरांचें आंदोलन उत्पन्न होतें तें ऐकण्याला फारच गोड लागतें. ऑर्गन व सारंगी यांचा एकजीव इतक्या उत्तम त-हेने होतो कीं, त्याचें शब्दांत वर्णन करतां येत नाहीं. अशा दोन गोड वाद्यांची साथ श्री. नारायणराव यांनीं गंधर्व कंपनीच्या रंगभूमीला जोडली ही एक त्यांच्या प्रेक्षकांना मोहून टाकणाऱ्या गोष्टींपैकीं महत्त्वाची गोष्ट आहे. अशा गोड वाद्यांची साथ श्री. नारायणराव यांच्या आवाजाला इतकी जमून जाते कीं, सारंगी-ऑर्गन व श्री. नारायाणराव हीं एकच होऊन गात आहेत असा भास होतो. सारंगींतले विद्वान कादरबक्षखां हे तर श्री. नारायणराव यांची साथ इतकी बेमालूम करतात की, सारंगी निराळी वाजते आहे असें वाट्च देत नाहीत. दोघांना खुलविणारे एक गृहस्थ तबलावादनपटु मे. अहमदजान ऊर्फ तिरकवाखांसाहेब हेही त्या साथींत आनंदाची भर अतिशय घालतात. तबला, सारंगी व ऑर्गन हीं तिन्हीं वायें गाण्याबरोबर सुरू झाली म्हणजे ऐकणारावा मोहिनीच पडते असा अनुभव आहे. अशा कलावान माणसांची साथ श्री. नारायणराव यांनीं आपल्या कंपनीकरितां ठेवल्यानें गंधर्व कंपनीच्या वैभवांत आणखी भरच पडत आहे यांत संशय नाहीं. अशा त-हेचा साथीचा आनंद इतरत्र कोणत्याही नाटक मंडळींत ऐकावयास मिळत नाहीं. त्यामुळे साथीच्या बाबतींतसुद्धा श्री. नारायणराव यांनीं आपल्या कंपनीचें श्रेष्ठत्व प्रेक्षकांना चांगलें पटविलें आहे.
‘माझे कर्ज मलाच फेडू दे’
रंगभूमीवर पदार्पण केल्याच्या काळापासून सर्वांगी अनुकूलतेमुळे अंकूरत गेलेल्या दांडग्या आत्म- विश्वासातून वाढलेला इच्छिताचा ध्यास आणि त्यापोटी हट्ट ह्यांची पूर्तता झाल्याशिवाय बालगंधर्वांना स्वस्थता लाभत नसे. अन्नदात्या प्रेक्षकांना प्रसन्न ठेवणाऱ्या निर्माण करण्याच्या ध्यासाने त्यांनी लाखोंची कर्जे काढली. बालगंधर्वावर प्रेम करीत राहणे आणि संकटकाली त्यांना हात देण्यासाठी धावून जाणे हा महाराष्ट्राच्या रसिकतेने आपला धर्म मानला आणि रसिकांची निष्ठापूर्वक सेवा हा आपला धर्म मानून त्यांच्या सुखापुढे आपली वैयक्तिक दुःखे बालगंधर्वांनी तुच्छ लेखली. नाटक संपून पडदा पडताच अंगावरील वेषभूषेतच स्टेजवर गुडघे व डोके टेकून “अन्नदाते मायबा-प” म्हणत प्रेक्षकांच्या दिशेने नमस्कार घालण्याचा बालगंधर्वांचा नेम कधीही चुकला नाही! भारत सेवक समाजाच्या पुढाकाराने स्नेहीमंडळींनी दोन लाख रुपयांची थैली कर्ज फेडीसाठी देऊ केली असता ती नाकारताना बालगंधर्व म्हणाले होते, “माझ्या चुकांमुळे झालेले कर्ज अन्नदात्यापुढे कष्ट करून माझे मलाच फेडले पाहिजे !’
सर्वस्वाने तयार केलेली ‘सिंधू’
बालगंधर्व स्वतःसंबंधी कधी बोलत नसत, कर्तृत्वासंबंधी बोलणे दूरच. टीकांची दखल घेत, वाचाळता नाही. गणपतराव बोडस अभिमानाने बोलत, मित्रवर्य गडकऱ्यांनी सुधाकराच्या भूमिकेला अधिक उठाव दिला असल्याचे वारंवार सांगत. पुण्यप्रभावातील वसुंधरा-वृंदावन सामना गडकऱ्यांच्या अटींमुळे हुकला ही जाणीव त्यांच्या मनांत सतत जागती. सहसा मानवणार नाहीत अशाही अटींचे आव्हान स्वीकारून बालगंधर्वांनी ‘एकच प्याला’चे हस्तलिखित काबीज केले आणि सिंधू सर्वस्वाने तयार केली. बोडसांच्या प्रसिद्धीला अधिक उठाव देण्यासाठी, ‘एकच प्याल्या’त उभ्या राहिलेल्या सुधाकराचे एक छायाचित्रही प्रसंगी जाहिरातीत वापरण्याच्या सूचना दिल्या.
आणि – “हे काय भलतंच, आपलं नावानंच हाका मारीत सुटायचं,” असे म्हणून सुधाकरावरील लटका राग प्रगट करीत प्रवेशणाऱ्या सिंधूपासून तो “भरल्या हाती हळदीकुंकवानं आपल्या मांडीवर मरण यावं याहून आणखी कोणतं भाग्य हवं मला?” असे म्हणत प्राण सोडणाऱ्या सिंधूपर्यंतचा ‘एकच प्याला’ बालगंधर्वांनी निर्माण केलेल्या उदात्त करुण रसानेच काठोकाठ भरतो. झपाट्याने बदलत जाणाऱ्या जीवनाशी बालगंधर्व असे एकजीव की. इतर पात्रे देवतास्वरूप सिंधूपुढे निस्तेज होऊन प्रेक्षकांची सहानुभूती सिंधूवर केंदित होते. “चंद्र चवधिचा, रामाच्या ग बागेमध्ये चाफा नवतिचा” व “स्वस्थ कसा तू? ऊठ गड्या, ऊठ गड्या, झणि टाक उड्या” या सिंधूच्या ओळी प्रेक्षकांना वत्सल रसात न्हावू घालतात तर “बघु नको मजकडे केविलवाणा राजसबाळा” या पदातील ‘राजसबाळा’ हा एकच शब्द विविध आर्तरवांनी बालगंधर्व असा ओलावून टाकतात की प्रेक्षकांच्या डोळ्यांतून खळखळा पाणी यावे !
फाटक्या वस्त्रांनी केलेला राजवस्त्रांचा पराभव पहाण्यासाठी गडकरी थांबले नाहीत. त्यांच्या असामान्य प्रतिभेने सुधाकर विलक्षण सामर्थ्याने रंगवला आणि बोडसांनी तशाच ताकदीने तो उभा केला हे निर्विवाद, पण नाटक पाहून परतणाऱ्या प्रेक्षकांच्या मनात कित्येक दिवस कारुण्यमूर्ती सिंधूशिवाय दुसऱ्या कोणत्याही विषयाला जागाच राहात नाही ।
त्यांचे आवडते राग व रस
श्री. नारायणराव बहतेक सर्व राग गातात. त्यांतल्या त्यांत त्यांचे आवडते राग ते जास्त चांगले गातात. भूप, बिहाग, बागेश्री, तिलककामोद, भैरवी, जोगी, कालिंगडा, जंगला, पिल्, भीमपलास, काफी, पहाडी, वगैरे राग त्यांचे फार आवडते आहेत. वर लिहिलेल्या रागाशिवाय इतर रागसुद्धां ते चांगले गातात; पण वर लिहिलेले राग ते जास्त सफाईनें व बेछुट गातात. भूप, बिहाग, बागेश्री, तिलककामोद, भीमपलास, वगैरे शृंगारिक राग गातांना श्री. नारायणराव इतके मोहक गातात कीं, त्याचें वर्णन करावें तितकें थोडेच आहे. शृंगाररस म्हणजे श्री. नारायणरावांचा आत्माच आहे. सात्त्विक शृंगार हासुद्धां श्री. नारायणरावांचा नैसर्गिक गुण आहे. त्या गुणाला पोषक असें शृंगारिक गाणें हें त्या सात्त्विक शृंगाराला जास्तच खुलवून टाकतें. त्याचप्रमाणें करुणरस हासुद्धां त्यांचा हातखंडाच आहे. कालिगडा, जोगी, हे राग करुणरसाच्या प्रसंगांत श्री. नारायणराव इतके परिणामकारक गातात कीं, त्याचा परिणाम प्रेक्षकांच्या मनावर कित्येक दिवस कायम राहतो. श्री. नारायणराव शृंगार किवा करुणरस नाटकांत संगीताच्या दृष्टीनें इतका रंगवितात कीं, शृंगाराची किवा करुणरसाची प्रत्येक्ष मूर्तीच रंगभूमीवर अवतरली आहे असें श्रोत्यांस वाटतें. अशा प्रकाराने शृंगार किवा करुणरस हल्लींच्या संगीत मंडळींत तरी गाण्याच्या दृष्टीनें वठविलेला प्रस्तुत लेखकाच्या पाहण्यांत नाही. श्री. नारायणराव हे त्यांचे आवडते राग, व रागांना जमणारे रस यांचा पूर्ण विचार करूनच गातात असा सर्वत्र अनुभव आहे. नवीन होतकरू संगीत नटांनी राग व रस यांचे एकिकरण कसें करावयास पाहिजे याचें शिक्षण घ्यावयाचें असल्यास श्री. नारायणराव यांच्या रंगभूमीवरील कामाचाच प्रत्येक्ष अभ्यास केला पाहिजे. श्री. नारायणराव काम करीत असतांना वर लिहिल्याप्रमाणे त्या त्या रागांत व रसांत कसे तादात्म्य पावतात हे सर्वांना ठाऊक आहे. तेव्हां त्यांची निरनिराळया रसांची कामे पाहून वर लिहिलेल्या गोष्टींची प्रचिती जरूर पहावी.
रंगभूमीवरचें संगीत शास्त्रीय नसावें का ?
श्री. नारायणराव यांच्या संगीतासंबंधानें थोडक्यात मीं माझ्या अल्पमतीप्रमाणें लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. श्री. नारायणराव यांच्या रंगभूमीवरील संगीतासंबंधी लिहिण्याची माझी योग्यता नाहीं. माझ्यापेक्षां संगीतश्रेष्ठांनी जर त्यांच्या संगीताच्या गुणदोषांचें विवेचन केलें असतें तर योग्य झालें असतें. मी संगीत विद्येचा अभ्यासक असल्यानें कोणत्याही त-हेने संगीतविद्येचे श्रेष्ठत्व कायम रहावें हीच लेखकाची इच्छा आहे. यांत श्री. नारायणराव यांच्या गुणगौरवाबरोबर इतर संगीत तज्ज्ञांनासुद्धां आपल्या गाण्यांत सुधारणा करण्याकडे लक्ष देण्याबद्दल माझी सविनय विनंती आहे. रंगभूमीवरचे संगीत पूर्ण शास्त्रीय नसले तरी चालेल. एखाद्या रागात दुसऱ्या रागाचे मिश्रण करणें रंगभूमीवर खपते असें म्हणणारा एक पक्ष आहे असे म्हणणें चुकीचे आहे असे पूर्ण विचारांती माझें मत झालें आहे. हैं माझें मत चुकीचें ठरण्याचा संभव आहे. पण माझे विचार वाचकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी करीत आहे. त्याचा वाचकांनी जरूर विचार करावा अशी विनंती आहे. नाटकांच्या प्रसंगानुरूपच संगीत नाटकात चाली घातल्या जातात. मग जी चाल प्रसंगनुरूप घातली त्याचा राग ठरलेला असतो. मग जो राग ठरला त्या रागांत दुसऱ्या रागाचे मिश्रण करण्याचें कारण काय ? उदाहरणाकरितां स्वयंवर नाटकांतलें ‘मम सुखाची ठेव देवा’ हेंच पद घेतलें तरी चालेल. हें पद सुरू करण्याच्या अगोदर रूक्मिणीला तिचा बाप सांगून जातो की, ‘महालक्ष्मीचें घटका दोन घटका पूजन-मनन कर’. या वाक्याच्या अर्थावरून पाहतां हें पद पूर्ण भक्तिरसाचे आहे. भक्तिरसाला योग्य असा हा राग तिलकामोद आहे. चालही तितकीच गंभीर आणि भक्तीरसाला योग्य आहे. अशा प्रसंगी तिलककामोद शुद्ध शास्त्रपद्धतीनें त्याचे वर्जावर्ज संभाळून जर गाईला जाईल तर कोणत्याही तन्हेनें तिथें रस बिघ्डत नाही. मग अशा प्रसंगाला राग शुद्ध न ठेवतां कसें तरी मिश्रण चालेल असें मला वाटत नाही. हें पद श्री. नारायणराव उत्तम तन्हेनें पूर्वी गात असत व हल्लीसुद्धां गातात; पण इतर कंपनींची नाटकें पहाताना वाटेल तो राग वाटेल त्या रागांत मिश्र कलेला ऐकावयास मिळतो. तिलककामोदासारखा गंभीर व शांत राग, पण अशा रागांत भैरवी, पहाडी, वगैरे विनाकारण मिश्र केलेले राग प्रत्यक्ष लेखकानें ऐकले आहेत. खरोखर पहातां प्रसंगाला योग्य चाल असतांना तिथें जर असा थिल्लरपणा केला तर संगीतविद्येची हानीच होणार ! असा रागांत राग मिश्र करण्याचा सपाटा सारखा ऐकावयास मिळू लागला तर असें वाटतें की, एक वेळ नाटकांत संगीत नसले तरी चालेल; पण हा प्रसंग नको. कारण नसता राग मिश्र करण्यास सुरुवात केल्यावर गद्याचे अभिमानी संगीताची थट्टा करतात असा अनुभव आहे. संगीतानें जर नाटकाची रसहानि होत असेल तर नाटकांत संगीत नसलेलेंच बरें, असें लोकांचें मत ऐकावयास मिळतें. संगीत नसलेलेंच बरें, असें लोकांचें मत ऐकावयास मिळतें. संगीत शास्त्रशुद्ध, सरळ व थोडें असें असेल तर त्या संगीताचा नाटकाला उपयोग होईल नाहीं तर होणार नाहीं. गद्याला संगीत पोषक होईल तरच त्याचा उपयोग. जसे गद्यांत वीर, करुण, गंभीर, श्रृंगार वगैरे नवरस आहेत त्याचप्रमाणें संगीतशास्त्रकारांनी सद्धां नवरसाचे राग शोधन ठेवलेले आहेत. मग त्या त्या रसाचे राग योग्य ठिकाणी घालन ज्या स्वरामळे जो रस उत्पन्न होतो तो रस. संगीत नटांनी किवा गायकांनी शास्त्रीय पद्धत न सोडता ते स्वर उत्तम तन्हेने लावन उत्पन्न करावयास पाहिजे हल्ली पुष्कळ नाटकातन वाटेल तो राग वाटेल त्या ठिकाणी घातलेला पहावयास मिळतो अशा त-हेनें संगीताचा जर दरुपयोग होऊ लागला तर संगीत नटाला किवा गायकाला प्रेक्षकांनीं नांवे कां ठेवू नयेत ? प्रस्तुत लेखकाची पक्की खात्री आहे कीं, अशा त-हेनें जर शास्त्रशुद्ध पद्धतीनें राग गाइला जाईल तर त्यांत दुसरे राग मिश्र करण्याचा प्रसंगच येणार नाहीं. दुसरें नाटकांतल्या वेळेप्रमाणे जर रागांची मांडणी करण्याचा प्रघात यापुढे पडेल तर फारच चांगलें होईल असें मला वाटतें.
थोडक्यांत सिहावलोकन
श्री. नारायणराव यांच्या संगीतासंबंधानें जितकें लिहावे तितकें थोडेच आहे. गेल्या पंचवीस वर्षांत त्यांनीं संगीतविद्येचें जें साधन केलें त्याचें आज प्रत्यक्ष फळ श्री. नारायणराव उपभोगीत आहेत. त्यांचे ठिकाणी संगीत विद्येसंबंधानें जो आदर आहे व गेलीं पंचवीस वर्षे संगीत विद्येची जी सेवा त्यांनी केली आहे. त्या सेवेमुळे त्यांची लोकप्रियता इतकी वाढली आहे कीं, श्री. नारायणराव आबालवृद्धांचे अत्यंत आवडते झाले आहेत. त्यांच्या इतर गुणांची चिकित्सा मी केलेली नाही. या लेखांत फक्त संगीतासंबंधीच मी विचार केला आहे. श्री. नारायणराव नटसम्राट होण्यास अवश्य तो नैसर्गिक गुणांचा साठा परमेश्वरी कृपेने त्यांस भरपूर लाभला आहे, त्यांचा आवाज, शरीरयष्टि व स्वरूप यांमुळे महाराष्ट्र रंगभूमीच उच्चपणा शिखराला पोचला आहे. संगीतासंबंधी जो विचार मी वाचकांच्यासमोर मांडला आहे, त्याचा योग्य विचार इतर नटांनींसुद्धा जरूर करावा. श्री. नारायणरावांच्या सारखे नैसर्गिक गुण जरी इतर नटांच्या जवळ नसले तरी प्रयत्न करून ते गुण मिळविण्याची खटपट त्यांनी करावयास पाहिजे. सर्वच कांही नैसर्गिक गोष्टींवर अवलंबून असतें असें नाहीं. नैसर्गिक गुणी मंडळींनासुद्धां खटपट ही करावी लागतेच. माझ्या लिहिण्याचा दुरुपयोग खास होणार नाहीं हें जाणूनच मी लिहिण्याचे धाडस केले आहे. प्रस्तुत लेखकाला लिहिण्याची फारशी संवय नसल्यानें कांहीं चुकाही झाल्या असतील नव्हे आहेत; पण श्री. अप्पासाहेव गोखले यांनीं लेख लिहिण्यास भाग पाडले आहे, म्हणून हें लिहिण्याचें कार्य थोड्या अंशाने पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी हेंच लिहिावयाचें कीं, श्री. नारायणरावांसारखे इतर नटांचे सुद्धां गुणगौरवपर अंक काढण्याचे प्रसंग यापुढे नेहमी येऊन महाराष्ट्र रंगभूमीचा श्रेष्ठपणा उत्तरोत्तर असाच वाढत जावो हीच श्रीरामप्रभूजवळ प्रार्थना करून हा लेख संपवितो.