Logo

बालगंधर्व सांस्कृतिक साम्राज्याचा अधिपती

मित्र हो ! आज माझी मोठी पंचाईत आलेली आहे. कारण एखाद्या माणसाला जर सांगितल की, तू चांदण्यावर बोल तर तो कितीही मोठा कवि असला तरी त्याना चांदण्यावर एकदम काय बोलाव हे सुचणार नाही. समुद्रावर काय बोलावं हे सुचणार नाही. तीच अवस्था बालगंधर्वांवर बोलताना होते. ज्यानी महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक  साम्राज्य गाजवलं त्या सम्राटाबद्दल मुजरा करण्यापलिकडे काय बोलाव हे मला कळत नाही…. महाराष्ट्रामध्ये जर कुणी कुणाचं मित्र व्हायचं असेल तर काही कसोट्यांवर त्याला उतरावं लागतं. त्यातली पहिली कसोटी ही की, त्याची नितांत श्रद्धा शिवाजी महाराजांवर असावी लागते. त्याची तितकीच नितांत श्रद्धा बाळ गंगाधर टिळकांवर असावी लागते आणि तितकीच नितांत श्रद्धा  बालगंधर्वांवर असावी लागते. या त्रयींनी महाराष्ट्रावर शताकानु‌शतके अधिराज्य केलेलं आहे. एक शतक लोटलं तरी बालगंधर्वांवरील हा कार्यक्रम पाहताना कसं सगळ्यांना भरून आलं आहे हे आपण पाहिलं, मला स्वतःलाही भरून आलं. कारण बालगंधर्व म्हटलं की मंत्र उच्चारल्यासारखी अवस्था होते. आणि एका युगामध्येच आपण शिरतो. युगप्रवर्तक हा शब्द वापरून खूप झिजलेला आहे. परंतु युगप्रवर्तक असं खऱ्या अर्थानं ज्याना म्हणावं अशी माणसं यागातून क्वचितच होत असतात. बालगंधर्व नशिबानं त्याच्यातून झाले. अशा एका क्षेत्रामध्ये झाले की जेथे नुसती आनंदाची देवघेव होती. ही आनंदाची देवघेव त्यानी एवढ्या मोठ्या प्रमाणावर केली की, बालगंधर्व म्हटल्याबरोबर ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलंय त्यांना तर आनंदाचं काय भरतं येत असेल ते सांगता येत नाही. पण ज्यानी त्यांना पाहिलं नाही पण त्यांना ऐकलेलं आहे व त्यांना ऐकताना जर गाण्याची नजर असेल त्यांना बालगंधर्व हे केवढे मोठे होते याचा अंदाज आल्याशिवाय राहणार नाही. काही मुलं मला म्हणाली की तुम्ही नेहमी बालगंधर्व बालगंधर्व सारख म्हणत असता, असं त्यांच्यात काय मोठेपण होतं ? माझ्याकडे त्याचं उत्तर नाही. पण उपमेनंच त्यांना सांगायचं झालं तर मी त्यांना विचारीन, हे गुलाबाच फूल आहे याच्यात काय मोठेपण आहे? परंतु जर त्याचा शोध घेत गेलं तर आपल्याला असं दिसतं की, बालगंधर्वांनी रंगभूमीवर जो सर्वात मोठा विजय मिळवला तो एका विलक्षण भक्तीनं मिळवला. भक्ती हाच मुळी बालगंधर्वाच्या जीवनाचा स्थायीभाव आहे असंच मला वाटत. ते रंगभूमीकडे सुद्धा भक्तीनंच आले. मला तरी बालगंधर्वांनी सिधूचं काम करण्यापूर्वी समीक्षकांशी बाड्मयीन चर्चा वगैरे केली असेल असं वाटत नाही ! तशी ती त्यांनी केली नाही म्हणून त्यांची भूमिका इतकी चांगली झाली हा भाग सोडून द्या !!

त्यांना ती सिधू दिसल्याबरोबर वाचता वाचताच ते सिंधूमय झाले आणि सिंधूमयता त्यांनी आपल्यापुढे ठेवली. आणि ती ठेवताना सुद्धा कुणाला तरी ती पटावी न पटावी अशा दृष्टीनं ठेवली नाही. त्यांना काही दुसरं करताच आलं नसतं. काही सिद्ध करण्यासाठी बालगंधर्वांनी काहीही रंगभूमीवर केलेलं नाही. ते वावरले आणि असं म्हटलंय ना की, जयांच्या भक्तिमाजी नीति जी आली दिसे. म्हणून त्यांच्या रंगभू‌मीच्या भक्तीमध्ये आम्हाला उत्तम गायन दिसलं, उत्तम अभिनय दिसला आणि तो दिसावा म्हणून निसर्गानं जे रूप देऊन पाठवलं होतं त्या रूपाचाही आनंद आम्हाला बघता बघता मिळाला. अशा प्रकारचा एक चमत्कार मराठी सांस्कृतिक जीवनात घडला म्हणायला हरकत नाही. असे अधिराज्य गाजवणारे नट खरोखरच युगातून क्वचित येतात. लोकप्रियता खूप मिळते, खूप पॉप्युलर होतात माणसं परंतु त्याला सुद्धा एक प्रकारची Quality of popularity म्हटलेलं आहे. एक स्तर असतो लोकप्रियतेचा. अनेक गोष्टी लोकप्रिय असतात. त्या लोकप्रियतेला काही अर्थ नसतो. ज्या लोकप्रियतेतून त्या माणसाला लोकप्रिय म्हटल्यामुळे अन् ती लोकप्रियता आपल्याला कळल्यामुळे आपल्याला धन्यता वाटते ती लोकप्रियता महत्वाची असते. जो आनंद आपण चारचौघांमध्ये आनंदानं सांगू शकतो तो खरा आनंद. एखादी वाह्य्यात गोष्टी ऐकल्यानंतर आपण खिदकिळून हसतो सुद्धा परंतु ती पुन्हा चारचौघात जाऊन सांगावी अशी काही इच्छा आपल्या मनात येत नाही. कारण दुसऱ्या क्षणाला आपण हसल्याबद्दल आपली आपल्यालाच लाज वाटत असते. हा भाग निराळा. परंतु अशा प्रकारचं काहीतरी घडत असतं की , जो अनुभव किती सांगू न् किती नको असं आपल्याला होतं. अशा प्रकारचा अनुभव जसा शिवाजी महाराजांच्या चरित्रातून मिळतो, बाळ गंगाधर टिळकांच्या चरित्रातून मिळतो तसाच अनुभव, आनंद बालगंधर्व या विषयानं आपल्याला दिला आहे. गंधर्वांविषयी बोलायला सुरूवात केल्यानंतर थांबायची गरज वाटत नाही. आणि तो जर आपल्यासारखाच बालगंधर्व भक्त असला तर विठ्ठलाच्या भक्तिमध्ये रंगलेले जसे दोन वारकरी असावेत तसं तिथे समय, काळ, घड्याळ याला काही अर्थच राहिलेला नसतो. इतक्या वेळा बोलले तरीसुद्धा अजून जे बोलायचे आहे ते बोलून झालेच नाही असं ज्या माणसांबद्दल वाटतं त्यात बालगंधर्व आहेत. त्यांची सगळ्यात मोठी मोहिनी गाण्याची आहे यात शंका नाही. त्यांच्या गाण्याचं कित्येक जण अॅनॅलिसिस करायला बसले आणि ‘नेति नेति’ म्हणूनच थांबले. आपल्याला…. काही लोकांना कल्पना असेल की, गाण्याचे कुठलेही नियम, कायदे, शास्त्र यातलं या माणसाला काहीही माहित नव्हतं. मला आठवतो एक प्रसंग. कोल्हापूरला कॉन्फरन्समध्ये ते गात होते. कुणीतरी चिट्ठी पाठवली की ‘रूपक ‘मधलं काही तरी म्हणा. पण तेथे चाललं होतं निराळ्या ठेक्याचं गाणं. अशा चिठ्ठ्या पाठवणाऱ्यांना आपण काही विरस वगैरे करतोय याची भावनाच नसते. त्याने पाठवून दिली चिठ्ठी. आता चिठ्ठी वाचायला तेथे…. म्हणजे बालगंधर्वांच्या डाव्याबाजूला तिरखवां साहेब बसलेले, ते म्हणजे काय ज्ञानदेवच ! कारण बोटांचा उपयोग तबल्याखेरीज कशासाठी तरी करायचा असतो हे त्यांना माहितच नव्हतं. त्यांना काही लिहिता येतच नव्हतं ! सही कशीही करायचे. एकदा कुणीतरी त्यांना म्हणाले की खाँ साहेब सहीविही करा. ते म्हणाले ‘किस लिये ?’ तर तो म्हणाला ‘दस्तखत करना अच्छा है.” क्यूं अच्छा है ? ‘ खाँ साहेब दुनिया बोले दस्तखत करती है. त्यावर खाँ साहेब म्हणाले हां बेटा दनिया दस्तखत करती है लेकिन तबला अकेला अहमदजान तिरखवाँही बजाता है ! यात एक दोन मिनिटे गेली. नारायणरावांनी चिट्ठी वाचली. खाँ साहेब म्हणाले काय आहे ? रूपक मधलं काही ऐकायचं आहे त्याला. मला माहित आहे की, त्या माणसाला ‘मम सुखाची ठेव देवा’ ऐकायचं होतं. आणि त्यांनी जी सुरूवात केली होती ती ‘यदुमानी सदनाला ! त्याचा ठेका निराळा आहे.

हे आपल्यापैकी बहुतेकांना माहितच आहे. आता खाँ साहेब काय विद्वानच होते. ते म्हणाले ‘अरे इसीकोही रूपक बना दो. ‘ यदुमानी सदना’ त्यानंतर चुटक्यांनी हिशोब केला आणि ‘ यदुमानी सदना’ रूपकमध्ये गायले. हा चमत्कार आहे. त्यानंतर जगन्नाथ बुवांसारख्या माणसानं जाऊन त्यांचे पाय धरले… म्हणाले काय केलं तुम्ही हे! जर गणिती माणसाला किंवा शास्त्राच्या माणसाला विचारलं असतं तर तो हडबडलाच असता. अहो १६ मात्रांचा हिशेब कुठे आणि ७ मात्रांचा हिशेब कुठे ? आपलं कितीही गणित कच्च असलं तरी ७ आणि १६ चा भागाकार होत नाही एवढं लक्षात यायला काहीच हरकत नाही. जिथे माझ्या लक्षात आलं तेथे आपल्याला लक्षात यायला काय हरकत आहे ? पण तो त्यांनी तेथल्या तेथे करून दाखवला. चाल बदलली नाही काही नाही. आणि तसंच्या तसं ‘यदुमनी सदना’ सादर केलं. ‘ यदुमनी सदना’ बरोबर खाँ साहेबांनी सुद्धा ‘रूपक’ काय वाजवलं म्हणून सांगू तुम्हाला ? हे ज्यावेळी होतं त्यावेळी मला वाटतं येतानाच गळ्यातून सूर घेऊनच यावं लागतं. मी तसा काही देवभक्त वगैरे नाहीये. पण काही काही ठिकाणी हे का घडलं हे आपल्याला कळत नाही आणि आपण आवाक् होऊन जातो. या माणसाला हे कळलं. कुठे ? यांना बिहाग, भिमपलास, बागेश्री अशा रितीने भास्करबुवांनी सांगितलं नाही… असं नारायण गायचं, तसं गायला सुरूवात केली. आणि जे गायले ती बागेश्री झाली, जे गायले तो भिमपलास झाला. जे गायले तो पहाडी झाला. आणि असे गायले की त्यावरती त्यांनी स्वतःचा शिक्का निर्माण केला. म्हणजे भिमपलास सर्व दुनिया गात होती. पण बालगंधर्वांनी भिमपलास गायला सुरू केल्यावर तीच मराठी स्त्री बालगंधर्वांच्या वेषात जशी निराळी दिसायला लागली, तसा तोच भिमपलास बालगंधर्वांच्या गळ्यातून निराळा दिसायला लागला.

म्हणजे तो वेष केल्यानंतर कित्येक मराठी रामभाऊंना आपली सीतामाई इतकी चांगली दिसत होती का असं जसं आश्चर्य वाटेल तसेच हा भिमपलास इतका सुंदर होऊ शकतो का ? असा प्रश्न त्यावेळी ‘मी’ ‘मी’ म्हणणाऱ्या गाणाऱ्यांना पडला होता. आपल्याला ती प्रसिद्ध गोष्ट माहिती आहे की, शुद्ध निषाद भिमपलासाला लावल्याबरोबर खुद्द अल्लादिया खाँ साहेबांनी दाद दिली की, “नारायण बेटा क्या बात है !” अहो इतरांनी तर खुनाची शिक्षा दिली असती हा अपस्वर लावल्याबद्दल ! तरीही कुणीतरी जाऊन खाँ साहेबांना विचारलं की, खाँ साहेबा त्याने तर शुद्ध निषाद लावलाय. तुम्ही दाद कशी दिली ?” अरे त्याच्यासारखा तू लावून दाखव तुला पण दाद देईन.’ कोण निषाद लावतो हा प्रश्न आहे. आज बालगंधर्वांची गीतं गाताना सगळ्यांना ऐकतो. पष्कळच ऐकतो. परंतु बालगंधर्वांच त्याच्यातलं तत्त्व जे काही आहे हे त्यांच्या मनात शिरलंय असे फार थोडे लोक दिसतील. बालगंधर्वांच्या गायकी बद्दल मला तर असं म्हणावसं वाटतं की, आमच्या भारतीय संगीतामध्ये चार बान्या आहेत. डागोर बानी, त्याच्यानंतर गौडी बानी, नंतर खंडहार बानी, नवहार बानी अशा प्रकारच्या चार बानी म्हणजे styles, चार स्कूल्स आहेत. मला तर असं वाटतं की, अनेक वर्षानंतर एक नवी बानी त्याच्यात घातली पाहिजे व ती म्हणजे बालगंधर्व बानी, त्यांचा ‘यमन’ आणि आतापर्यंतच्या गळ्यातून आलेला यमन यांच्यामध्ये काय कठे फरक असतो आणि काय त्याच्यात सौंदर्य निर्माण होतं हे खरोखरच सांगणं शक्य नाही. याचं कारण असं की, गाणं सुरू… मला तर खात्री आहे की, भास्करबुवा त्यांना तालीम देताना या स्वराचा प्राण कुठे आहे हे त्याच्या बरोबर लक्षात येत असे. त्याच्या शिवाय त्यांनी ते केलेलं नाहीये. साध्या साध्या चाली.

आत्ताच आपण पाहिलं की, ‘कशी या त्यजू पदाला’ ची original चाल आहे ‘दिल बेकरार तूने ! ‘दिल बेकरार तूने ऐकलं आणि त्यानंतर तुम्ही’ कशि या त्यजू पदाला’ ऐकलं तर हिशोबानं पाहिलं तर जवळ जवळ तेच स्वर आहेत. पण गंधर्वांच्या गळ्यातून आल्याबरोबर त्याची किमयाच निराळी, दुनियाच निराळी झाली. आणि हे ज्यांना कळलं नाही त्यांनी त्यांच्या तानांची इमिटेशन उत्तम केली, त्यांची नक्कल उत्तम केली. नक्कल करणं हा सामान्य माणसानं असामान्य माणसाला दिलेला मुजरा असतो, याच्यात काही शंका नाही. परंतु नक्कल करताना त्याचा प्राण कुठे आहे हे लक्षात यायला पाहिजे. आता ‘नरवर कृष्णा समान’ परवा मी कुणाचं तरी ऐकत होतो. काय ऐकत होतो विचारू नका. कारण त्यानंतर बातम्या होत्या म्हणून मी ते चालू ठेवलं होतं. तर ‘ नरवर कृष्णा समान’ माझ्या एकदम डोळ्यापुढे उभं राहिलं की, ‘नरवर कृष्णा समान’ हा पुकारा काय जात असे त्या थिएटरमध्ये आणि मला अजूनही आठवतंय, सांगताना आठवतंय की, असे महम्मद हुसेन खाँ साहेब इथे आलेले आहेत. त्यांचे तीर्थरूप येथे बसलेले आहेत. तिरखवाँ साहेब बसलेले आहेत, मधे ऑर्गनवर केशवराव कांबळे बसलेले आहेत आणि ‘नरवर कृष्णा समान ‘वरचा षड्ज् लागला आणि सारंगीचा झमझमा झाला की तुम्हाला सांगतो की, कृष्णासारखा कुणी नाही असं सांगणारी स्वरांची पताका वर आलेली आहे, असं वाटलं. हे तेज जे त्या स्वरांमध्ये होतं हे नुसतं ‘नरवर कृष्णा समान’ एवढं उंच आवाजात किंचाळून कसं काय येणार आहे ? आणि त्याच्यात तिहाई करत होती ती मुलगी. खरोखर सांगतो तुम्हाला की, माझी जन्मशताब्दी तुम्ही साजरी करू नका. असं जाहीर मी सांगणार आहे. अर्थात माझ्यात गाण्याचा भाग नसल्यामुळे त्याची काही चिंता नाहीये. परंतु ‘नरवर कृष्णास’ ‘नरवर कृष्णास’… ‘नरवर कृष्णास-मान ?’ म्हणजे ‘नरवर’ ही कृष्णास घातलेली शिवी आहे असं वाटावं. असं चाललं होतं. गुण लक्षात आला नाही, कशासाठी ते केलं हे लक्षात आलं नाही की हा असा घोटाळा होतो.

‘मी मी’ म्हणणाऱ्या, ज्याना संगीतातलं काहीही कळत नाही. अशा लोकांनी बालगंधर्व दळण घालत होते असं लिहिलंय. त्यांच्यात अहिताग्नि राजवाडे सुद्धा आहेत. ते गंधर्वांवर का एवढी आग पाखडत होते हे मला कळलेलं नाही. ते म्हणाले ‘दळण घालत होते ! अहो, दळण काय घालत होते ? प्रत्येक वेळी तेच ते पुन्हा येत होतं त्यावेळी लयीतल्या कणातला असा एक कण स्पर्शून जात होता की, तो पहिल्यांदा नव्हता, जो दुसऱ्यांदा होता. पुन्हा तो तिसऱ्यांदा नवा होता. चौथ्यांदा नवा होता. हे कळत होतं म्हणून तिरखवाँ सारखा मनुष्य वेडा होऊन वाजवत होता. संगीताच्या, बालगंधर्वांच्या परिणामामु‌ळे काही लोकांना रंगभूमीची भयंकर चिंता वाटायला लागली होती. हे काय नाटक आहे का ? वगैरे. एका समीक्षकानं लिहिलं होतं की, गंधर्वाचं ‘एकच प्याला’ मधलं गाणं सुरू झालं कशी या त्यजू पदाला’ म्हणताना तिचा बाप स्वस्थ उभा होता. तो अभिनय वगैरे न करता खांबासारखा उभा होता. मला त्या समीक्षकाची दया आली. मी मनात म्हटलं की, तुझी कुणाकुणाला म्हणून दया यावी ? बालगंधर्व तेथे जिवाचं रान करून ‘कशी या त्यजू पदाला’ विचारताहेत. सिंधू विचारते आहे आणि तू सिंधूच्या बापाकडे बघत बसला ? म्हणजे एकदा आमच्या एका सरकारांना आमचे एक प्रोड्यूसर ‘श्यामसुंदर’ सिनेमा दाखवायला घेऊन गेले. दूसरे दिवशी सरकाराना विचारलं, कसं काय पिक्चर वाटलं ? झ्याक् आहे.. झ्याक् आहे. सिनेमा चांगला आहे. पण त्यातला तो बैल कुणाचा व्हता रे?’ म्हणजे त्यांनी तो कृष्णावरचा सगळा चित्रपट पाहिल्यावर त्याला फक्त गोकुळातला एक बैल आवडला. जसा त्यां समीक्षकाला फक्त सिंधूचा बाप दिसला. हे समीक्षक! म्हणजे संगीत नाटक बघावं कसं याचं शास्त्र शिकवायची गरज पडते. याचं कारण आहे प्रेक्षकाला ती पडली नाही. कारण ते समीक्षा करायला गेले नव्हते. तर ते आनंद घ्यायला गेले होते. ज्या भक्ती भावानं बालगंधर्व रंगभूमीवर आले त्याच भक्तीभावानं प्रेक्षक सुद्धा त्या थिएटरमध्ये आले. असा हा अत्यंत दुर्मिळ योग, बालगंधर्वांच्या नाटकाला जाणं हा एक उत्सव होता.

मी तुम्हाला अजूनही सांगतो. पुण्यातल्या लोकांना आठवत असेल की, कंपनीचा मुक्काम येणार म्हटल्यावर कुठल्या तरी महाराजांची स्वारीच येणार अशा प्रकारचं वातावरण दोन-तीन महिने असायचं. मुंबईला आम्हाला आठवतं की, ऑपेरा हाऊसमध्ये बालगंधर्वांची नाटके आहेत म्हटल्यावर आम्ही कारण नसताना त्या रस्त्यानं जात-येत होतो. कुठतरी गणपतराव बोडस दिसतील, कुठं तरी बालगंधर्व दिसतील, कुठंतरी मास्तर कृष्णराव मेकअप करताना दिसतील वगैरे. आणि आश्चर्य असं की, त्या काळातील मध्यमवर्गीय रसिक, संगीत नाटकांची आवड असणारे पुष्कळ लोक होते. त्यांनी आपल्या कुळाचा कुळाचार असावा अशा श्रद्धेनं, आपली ऐपत असो नसो आपल्या सगळ्या कुटुंबाला ते बालगंधर्वाचं नाटक दाखवत असत. हे दुसरं कुणाच्याही बाबतीत घडलंय असं मला वाटत नाही. आपल्या मुलांना बालगंधर्वांचं नाटक दाखवणं म्हणजे दरवर्षी जसं कोकणात जाऊन आपल्या देवाला नवस करणं हा जसा कुळाचार आहे तसंच वर्षातून बालगंधर्व मुंबईला आले, पुण्याला आले किंवा जेथे जायचं तेथे गेले तर त्यांचं नाटक सगळ्या कुटुंबाला दाखवणं हे कुळाचारासारखंच ते मानत होते. हे कुठल्याही कलावंताला मिळालेलं यश असेल असं मला वाटत नाही. इतके ते सगळीकडे व्यापून रहावे स्थिर, चर अशा प्रकारे सांस्कृतिक जीवनात व्यापून राहिलेले होते.

बालगंधर्व येणार हाच मुळी आत्ता दिवाळी येणार म्हटल्याबरोबर डोळयापुढे जसं दिसतं तसं दिसायचं. आणि हे जे गाणं आहे ते काही कारणानी झालेलं गाणं होतं. ते रंगभूमीवरचं गाणं होतं. आणि ते रंगभूमीवरचं गाणं गाताना ती रूक्मीणी गाते आहे, ती सिंधू गाते आहे, ती द्रौपदी गाते आहे, देवयानी गाते आहे याचा विसर बालगंधर्वांनी कधीही पडू दिला नाही. आपल्याला सणकन् तान जाते आहे म्हटल्याबरोवर त्यांनी कधी तानबाजी केली नाही. ‘मधुकर वनवना’ सारखं गाणं असेल त्याला जेवढं झेपेल तेवढे करायचे व त्यातून सौंदर्य प्रकट करायचे. लोक असं म्हणतात की, बारा बारा वन्समोअर झाले. तास तास गाणं झालं हे खरं नाहीये. ही अतिशयोक्ती आहे. तुम्हाला सांगतो. वन्समोअर झाल्याबरोबर एकदा ती पहिली ओळ म्हणायची लोकांसाठी आणि पुढला संवाद सुरू करायचा असंच होतं. त्यांनी कधीही तारतम्य सोडलं नाही. आणि त्यामुळे लोकांना हे गाणे, हा अभिनय, हे शब्द, हे उच्चार हे एकच. म्हणजे यापुढे ज्याना बालगंधर्व गायकी गायची असेल त्याने पहिल्यांदा न्याहाळून पाहिलं पाहिजे, याच्यातला कुढल्या सुराला या पर्टिक्युलर एका चालीमध्ये ‘मर्म बंधाची ठेव’ म्हणावी अशी कुठल्या सुरात आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि ती लक्षात बालगंधर्वांच्या रेकॉर्डस घेताना झाली तर बालगंधर्वांच्या गायकीतला एक भाग तुम्हाला कळला असं होईल. पुढे लयीचा भाग आहे. आणि त्याला जोडून जो तो स्वरात घोळलेला शब्द आहे तो त्या क्षणाला गाण्यामध्ये आहे. आता उदाहरणार्थ ‘दहती बहु मना’ सारखी रेकॉर्ड आहे. तो वरचा षड्ज् लागला म्हणजे तेथे दुसरं तिसरं काही करता येत नाही. तो तेथे लागलाच पाहिजे. ‘टकमक पाही’ म्हणताना ‘टकमक पाही’ असं सरळ सारे न म्हणता ‘टकमकss’ पंचम कचकन् असा लावल्याबरोबर त्यानं त्या रागाला निराळं स्वरूप प्राप्त होतं. असं प्रत्येक रागात त्यांनी केलं आहे. तुम्हाला सांगतो ‘देवा धरिले चरण’ म्हणताना ‘चंssरssणss’ असे तीन याच्यात टाकलेले आहेत त्यांनी शब्द. त्या लयीचा हिशोब करता करता नाकात नऊ येतात. ‘सुजन कसा मन चोरी’ सगळे जण गातात पण नारायणराव जेथून उठलेले आहेत ती जागा सापडणं मुश्कील आहे ! आणि म्हणूनच ते असामान्य आहेत. त्याची नक्कल होऊ शकत नाही. त्या गायकीचा आपण अभ्यास करू शकतो. ती गायकी फार मोठी आहे. साधीसुधी गायकी नाहीये. भास्करबुवा बखल्यांसारख्यांनी त्यांना दाखवून दिलेलं आहे आणि त्या गायकीमध्ये यानी आपला साज चढवलेला आहे. असं ते मिश्रण आहे. ते केल्याशिवाय नुसतं पाठ झालेलं गाणं जर कुणी म्हणायला लागलं तर ती नक्कल होईल. बऱ्यापैकी नक्कल होईल. मला मात्र एका गोष्टीचा आनंद वाटतो की, बालगंधर्वांचं युग हे संपलंय असं पुष्कळ लोक बोलत असत. काय संपलंय त्यातलं मला काही कळत नाही. कदाचित नाटकाची पद्धत वेगळी झाली असेल परंतु गाणं जे आहे ते आज तितकंच चिरंजीव आहे. ज्यावेळेला तरूण मुलं बालगंधर्वांच्या रेकॉर्डस ऐकून त्याप्रमाणे आपल्याला गायला यावं म्हणून मेहनत करताना दिसतात त्यावेळेला पुन्हा एकदा वाटलं की या गाण्याला मरण नाहीये. कारण हे इतकं असामान्य आहे की, त्याला मरणच शक्य नाही. शेक्सपीअरला जसं मरण नाही. त्यांच्या कॅरेक्टर्सना मरण नाही. तसंच शकुंतलेला मरण नाही. तसंच या गीतांना नाही. त्याचं कारण आहे की, ही गीतं ज्या घराण्यातून आलेली आहेत त्या अभिजात घराण्याना मरण नाही. प्रश्न एवढाच आहे की, ते संदर, ललित, चांगलं असं करून त्याला असुंदराचा कुठेही स्पर्श होणार नाही याची खबरदारी घेऊन ते गायलं गेलं पाहिजे. केवळ इफेक्ट्ससाठी गाता कामा नये. आणि इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, बालगंधर्वांनी कधीही परिणाम करण्यासाठी अमुक एक केलं अस कधीही झालेलं नाही. मी ही दोनच माणसं पाहिली की काहीही सिद्ध करण्यासाठी ती गायली नाहीत. गायला बसली आणि गायला सुरूवात केली. एक म्हणजे बालगंधर्व स्वतः आणि दुसरी म्हणजे बेगम अख्तर. यांना काहीही सिद्ध करायचं नव्हतं. आपली नोटेशन पद्धती सिद्ध करायची नव्हती. तानबाजी सिद्ध करायची नव्हती. खटके, मुरक्या काही नाही. जे त्याला साजेसं दिसत होतं तसे गात होते. जसं एखादं लहान मूल आपण सुंदर दिसावं म्हणून काही करत नाही. ते जे करतं तेच सुंदर दिसतं तसं बालगंधर्वांनी ज्या ज्या गोष्टी संगीतात केल्या त्या सुंदरच ठरल्या. याच्या मागे कारण आहे की, ते कठली तरी एक मोठी देणगी घेऊन आलेले असले पाहिजेत. याचं कारण आहे की, मला स्वतःला ते अॅनालिसिस (विश्लेषण) करता येत नाही. म्हणून ते देणगी घेऊन आले असं मी म्हणतो. ज्याला असं विश्लेषण करता येईल तो खरोखरच धन्य आहे असं मी मानेन अशा या माणसाचा उत्सव आपण साजरा करतो आहोत.

शंभरावा वाढदिवस साजरा करतो आहोत, मला एकदम आठवण झाली की, आज मंगळवार आहे व अशाच एका मंगळवारी सायंकाळी या पुणे शहरातच ६ वाजून दोन मिनिटानी शंभर-एक वर्षांपूर्वी बालगंधर्वांच्या ‘जन्म झाला होता. त्या जन्माच्या वेळेला कुणाला कल्पनाही नसेल की, एक अलौकिक पुरुष येथे जन्माला आलेला आहे. अलौकिकच. सगळ्या बाबतीत अलौकिक असा पुरुष. त्यांचं सगळं जीवन अलौकिक. त्यांनी जे जे केलं ते अशा एका निष्ठेनं केल. निष्ठा ही एक दुर्मिळ वस्तु आहे. बालगंधगंनी पैसे वगैरे उधळले अशा प्रकारे आरोप काही लोकांनी केले होते. काही उधळले नाहीत. आपल्या आराध्य देवतेसाठी खर्च केलेले हे पैसे असतात. रंगभूमीसारख्या. याला उधळण म्हणत नाही. पूजा केली त्यांनी. आणि त्या पूजेच्या भावानं ने रंगभूमीवर आले. आणि माणसं काय’ गोळा केलीत ! गंधर्व कंपनीतील माणसं बघणं हा सद्धा गमतीचा भाग असायचा. गंधर्व कंपनी आली म्हणजे काहीतरी राजाचा लवाजमा आला असं असायचं. अहो त्या काळातले नट आपल्या नावापुढे बी.ए.एम्.ए. अशा पदव्या लिहायचे. गंधर्व कंपनीतील नट आपल्याप्‌ढे गं. ना. मं. अशी पदठी लिहायचे म्हणजे गंधर्व नाटक मंडळी. गंधर्व कंपनीत असणं याच गोष्टीला काही किंमत होती. ती उगाचच आलेली नव्हती. जो जो म्हणून प्रेक्षक नाटकाला गेला की काहीतरी उत्तम दर्जाचं आपण काहीतरी पहातो आहोत असं त्याला वाटे, जीवनाला या माणसानं काहीतरी मोठं दान दिलेलं आहे याची भावना या प्रेक्षकाला राहिली. त्यांनी जो मराठी श्रोता निर्माण केला तो अभिजाताची आवड ठेवणारा श्रोता त्यांनी निर्माण केला. व त्यांना मिळालेल्या नाटककारांच्या कृपेनेही तो तयार झाला. त्या दोघांचाही त्यात वाटा आहे नाटक हे तसे पाहिले तर एका माणसाची किमया नसतेच पण त्यातला एक मनुष्य असा असावा लागतो की त्याशिवाय नाटक उभंही राहात नाही. या दोन्हीही गोष्टी खऱ्या आहेत. अशा प्रकारची ज्या माणसान किमया घडवून आणली त्या माणसाचा आपण शतसांवत्सरिक उत्सव साजरा करतो आहोत. मला इतकी गंमत वाटली की गेल्या सहा महिन्यामध्ये हा उत्सव इतक्या उत्स्फूर्ततेनं सगळे साजरा करताहेत. सगळ्यानाच काही बालगंधर्व गायकीप्रमाणे गाता येतं असं नाही. पण आपल्या परीनं प्रयत्न चाललेला आहे. कुठल्याही सरकारी नियमानुसार हे चाललेलं नाहीये. लोकांनी आपल्या आवडीनं हे केलेलं आहे. असा मान मिळणं हेच केवढं भाग्याचं. हा मान बालगंधर्वांना आयुष्यभर मिळाला. शेवटच्या काळात ते अपंगावस्थेत होते. त्यांच्यावर निसर्गानंच आघात केला त्याला कोण काय करणार ? परंतु त्याही अवस्थेमध्ये ते ज्यावेळी बोलू शकत असत. त्यावेळी मी त्यांना भेटायला गेलो होतो. मला फार मजा वाटली. असे. बसले होते. क्षीण झालेले होते. आणि म्हणाले – काय कल्पना आहे माहिती आहे का ? एक अशा प्रकारची नाटक कंपनी काढायची की ज्यांचं स्वतःचं सगळं असेल. मोठी इमारत असेल. तेथे प्रत्येक खोलीमध्ये तबले, पेटया आहेत. गाण्याची मेहनत चाललेली आहे, तालमीचे हॉल्स आहेत. म्हणजे परदेशात हल्ली कन्झर्वेटची आयडिया आहे. म्हणजे ड्रामा, म्युझिकची. ती तो मनुष्य मनात घेऊन बसला होता. ‘आता मी जरा बरा झालो की, त्याच्यासाठी धडपड करणार ! म्हणजे शेवटपर्यंत डोळयापुढे तो पडदा वर गेलेला आहे, धुपाचा वास येतो आहे. ऑर्गन सुरू झालेला आहे आणि ‘ नमन नटवरा ‘ची नांदी सुरू झालेली आहे. हे स्वप्न ते शेवटच्या क्षणापर्यंत पहात बसले होते. अशासारखी निष्ठा ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. ती निष्ठा त्यांना लाभली. हे त्यांचं सगळ्यात मोठं भाग्य म्हणायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीपेक्षा माणसाला असं काही स्वभावतःच लाभावं हाच एक दैवयोग असतो. तुम्ही काय करताहात या प्रश्नाचं उत्तर सगळ्यानाच देता येतं असं नाहीये. बालगंधर्वांना विचारलं असतं तुम्ही काय करताहात तर त्यांनी सांगितलं असतं की, देवा मी आनंद देतो. ‘आनंदे भरीन तिन्ही लोके’ असं जे ज्ञानेश्वरांनी म्हटलंय ते नारायणराव बालगंधर्वांनी एका निराळ्या रंगमंचावर खरं करून दाखवलं. ‘अवघाचि संसार सुखाचा करीन’ अवघाचि संसार म्हणजे तुमचा आमचा संसार त्यांनी सुखाचा केला. आनंदाचा केला.

जगायला सौंदर्याचे परिमाण जे कमी आहे असं वाटत होतं तर ते त्यांनी आणून दिलं. मराठी जीवनामध्ये मला तर असं वाटतं की, श्रृंगार नावाची गोष्ट ही पंत काव्यातून वाचल्यामुळे काही लोकांना कळली असेल परंतु त्याचं सुबक दर्शन घडलं ते बालगंधर्वांमुळे. उगीचच लोक नाही म्हणाले की, मला गंधर्वांसारखी बायको पाहिजे. सून पाहिजे वगैरे. उगाचच नाही म्हणाले. असलं काही तरी असू शकतं हेच त्यांना माहित नव्हतं. कळकट्ट अशा प्रकारचा आपला संसार असायचा. त्या संसारामध्ये इतकी सुंदर सुबकता या माणसानं आणली आणि ती सुबकता आणताना त्याच्यामध्ये छिचोरपणाचा स्पर्श झाला नाही, पण तसं कोण चांगलं वागत होतं रंगमंचावर तर रूक्मिणी चांगलं वागत होती, द्रौपदी चांगलं वागत होती, सावित्री चांगलं वागत होती. ‘मानापमान ‘मधली भामिनी चांगल वागत होती. अशा प्रकारचे आदर्श दिसत होते डोळयांपुढे. अभिनयाच्या बाबतीत तर काय सांगावं ? अभिनय त्यांनी निराळेपणाने केलाय असं मला वाटतच नाही. आणि त्यांनी सबंध त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा अभिनय केल्यामुळे त्यांच्या सारखा अभिनय दुसऱ्या कोणी केला तर तो आपल्याला बघवत नाही. असामान्य गोष्टीचं मी मघाशी सांगितल्याप्रमाणे हीच गोष्ट असते की त्याला सुधारणेही शक्य नाही व ती कुउदाहरण होऊ शकत नाही. ती जेथल्या तेथेच असते. ताजमहाल म्हटला की त्यात तुम्हाला सुधारणा करता येऊ शकत नाही. तो आहे तेथेच आहे. तसंच बालगंधर्वांचं. बालगंधर्वांचा अभिनय म्हणजे बालगंधर्वांचाच अभिनय. त्याच्यातलं तत्त्व मात्र घेऊन त्याच्यावर तुम्हाला विचार करता येईल. बालगंधर्व काही काही प्रसंग काय सुंदर करायचे म्हणून तुम्हाला सांगतो. ‘एकच प्याला ‘मध्ये ‘सिंधू मी दारू सोडली’ म्हटल्यानंतर झालेला आनंद आहेना तो मूर्तिमंत आनंदाचे चित्र म्हणजे काय असं कुणी जर विचारलं तर तो क्षण. उद्या जर मला कुणी विचारलं ‘ आनंद ‘ म्हणजे काय ते सांगा तर दारू सोडायची झाली तर, झणी टाक उड्या वगैरे गाणी यायची. ‘प्रभु अजि गमला’ गाणं यायचं काय सुंदर त्यावेळचा अभिनय. हाच खरा आनंद, त्यांचं दिसणं जितकं चांगलं होतं. त्यांचा अभिनय जितका चांगला होता तितकंच त्यांचं ऐकणंही चांगलं होतं. listening हे अभिनयात महत्त्वाचं आहे. मला आठवतं की दुसरं पात्र बोलायला लागलं की ते अगदी जीवाचा काव करून ऐकावं तसं ऐकत असत. एक क्षण असा सुटा गेलेला नाही. कारण मला पुष्कळ नटवर्य माहित आहेत की, दुसऱ्या पात्राचं भाषण सुरू झालं की आता मी सुखान मरतो’ म्हटल्यासारख बाजूला बसत व आपलं भाषण आलं की पुन्हा जागे होत. हा मनुष्य दुसऱ्यांचं इतकं ऐकायचा, त्यांनी जिवाचा कसा कान केला त्याची प्रतीक्रिया आपल्याला कळायची. एकेक शब्द टाकला म्हणजे असं वाटत…. ‘ मन मोहिनी कृष्ण सखा रमेला ‘तेथे. ‘कृष्ण’ शब्द असा पडायचा की काय सांगू तुम्हाला. की तो कृष्ण सबंध शरीरामध्ये भिनलेला आहे असा साक्षात्कार व्हायचा. प्रत्येक ठिकाणी असं झालेलं आहे. खाडिलकरांचे शब्द गोड करणं ही सुद्धा फार कठीण गोष्ट होती. ‘ ठरला जणु मत्सर राजा ‘ हे गाण्यामध्ये म्हणायचं म्हणजे काही सोपं काम नव्हतं. आणि पुन्हा ते गोड करून म्हणायचं. ‘ ठरला जणु मत्सर राजा ‘ सुद्धा त्यांनी गोड करून म्हटलं. तिरखवाँ साहेब एकदा मला म्हणाले होते, ‘देखो ये गाने में मच्छर कैसा आया ?’ मी म्हटलं ‘खाँ साहब गाने में मच्छर आया तो बालगंधर्व से पूछिये’ नाही नाही म्हणाले ‘महाराज को कैसे पूछेंगे ? हमको अचरज होता है कि गाने में मच्छर क्यूं आता है.’ ‘तो मत्सर राजा’ शब्द सुद्धा गोड असावा असं वाटल. खाडिलकरांच्या शब्दांना त्यांनी गोडवा आणून दिला. परत तो खोट्यारितीनं, तो गोड करायचा म्हणून नाही आणून दिला. नाहीतर अलिकडे लडिवाळपणा सुद्धा, त्याची भीती वाटायला लागली आहे. तो लडिवाळपणा भावगीतांमध्ये येताना हुंदका आल्यासारखं वगैरे. असं त्यांनी काही केलं नव्हतं. प्रेम वगैरे म्हटल्यावर अंगावर रोमांच उभे रहावे असलंही त्यांनी काही केलेलं नव्हतं. जे होतं ते साधं, सरळ असं होतं. त्यामुळेच तो भक्तिरस त्यांच्या श्रृंगाराच्या भक्तीतही दिसला. कारुण्याच्या भक्तीतही दिसला आणि शेवटी भक्तीरसाच्या भक्तीत तर काही विचारूच नका.

रंगभूमीवरती अत्यंत मनावरती परिणाम करणारे प्रसंग कुठले म्हणून मला कुणी विचारलं तर मी सांगेन….’ कान्होपात्रा’ मी बघत होतो आणि कान्होपात्रा शेवटी त्या विठ्ठलाच्या चरणी शरण जाते. आणि तेथेच मरते असा प्रसंग आहे. ते विठ्ठलाचं देऊळ सुद्धा काय सुंदर उभं केलं होतं ! पंढरपूरच्या देवळासारखाच नमुना केला होता. ही खरोखरच त्यावेळची त्यांची जिद्द होती – मी पंढरपूर रंगमंचावर उभं करीन त्याप्रमाणे त्यानी पंढरपूर उभं केलं होतं. आणि विठ्ठलाच्या चरणी कान्होपात्रा लीन झाली त्यावेळी आम्ही सर्व हबकलोच. म्हणजे काष्ठयवत् ते आलेले होते – त्या क्षणी. आणि ते पाहून काष्ठयवत् आपण झालो. हे लोकांना कळावं म्हणून याच्याकरता कुठला अभिनय, ते चेहेरे बिहारे काही नाही. ते लीन झाले. ते लीन झाले म्हणजे कसे तर पाण्यात जसा रंग मिसळावा तसे ते विठ्ठलाच्या तेथे गेले आणि विलीन झाले असच feeling त्यांनी संगळ्यांना दिलं. त्या क्षणापर्यंत मला माहित आहे ‘गीताबाई आपल्या नशिबी गोकुळच्या गोठणी ओस पडल्या’ बरोबर हे एक वाक्य तुम्हाला सांगतो सबंध नाटकाची जी ट्रॅजेडी आहे ती या एका वाक्यानं लोकांचं अंतःकरण चिरत जाते. एका नुसत्या पुकारानं, गाण्यातला शब्द न शब्द हा दोन सारंग्या, दोन ऑर्गन आणि तिरखवाँचा तबला या साथीच्या दमदारपणामध्ये आम्हाला पिटापर्यंत ऐकू यायचा. कारण आमचा मुक्काम तेथेच असायचा. त्याच्याशिवाय आम्हाला दुसरं तिकिटच घेणं संभवत नव्हतं. पण तेथे सुद्धा आम्ही राजासारखे वसलेलो ऐकतो आहोत याचा आनंद होता. तर तो तेथपर्यंत पोचणारा आवाज, ती फेक परत त्यांना त्या फेकेमध्ये काही कष्ट झालेले आहेत, आरडा ओरडा आहे असं नाही. दुसरा कुणी ‘नरवर कृष्णासमान’ ओरडलं असतं तर कृष्णाच्या घराला आगबीग लागली की काय असं वाटलं असतं. असं काही नव्हतं. पुकारा होता परंतु त्यातल्या संगीताला, त्यातल्या लयीला, त्यातल्या सौंदर्याला क्षणभर सोडून कुठं नव्हता. ही किमया त्यां माणसानं कशी काय साधली हे खरोखरच कळणं शक्य नाही. ती त्यांच्या ऐन उमेदीत ज्यानी पाहिली त्यातली काही मंडळी आज येथे उपस्थित आहेत. त्यांच्यापुढे बोलणं म्हणजे एक प्रकारची गुस्ताखी आहे. उर्दू भाषेत सांगायचं झालं तर, पण काही इलाज नाहीये. मी सुद्धा येथे जो उभा राहिलो आहे तो अत्यंत मोकळ्या मनानं. कारण माझीही भूमिका भक्ताचीच आहे. ‘भक्तिभावं हा घ्या सेवा’ हे त्यांनी म्हणायच्या ऐवजी आम्हीच म्हणत असू. नानांनी गायला सुरूवात केल्यानंतर आमच्या मनोमन ‘जोहार माय बाप जोहार” हा त्यानाच जायचा. मला आठवतंय इथेच उपाशी विठोबाच्या देवळात नाना बसले होते. भजन, म्हणत होते. खूप रंगात भजन आलं होतं. ‘जोहार मायबाप ‘च असावं. भिमसेन माझ्या शेजारीच बसले होते. ते म्हणाले, ‘पी.एल्. यांचं हे भजन, हे गाणं ऐकलं ना की, वाटतं घरी जावं आणि आपल्या तंबोऱ्याच्या भोपळ्याची भाजी करावी’ आणि हे काही मुद्दाम म्हणाले नव्हते. खरोखरच आम्हाला तसं वाटत होतं. अहो काय ठेका चालला होता म्हणून सांगू? त्या दिवशीची आणखी एक मजा मला आठवते. कितीतरी आहेत अशा. त्या दिवशी बाबालाल तबल्याला होते. आणि ‘मधु मधुरा तंव’ सुरू झालं. आणि ‘ मधु मधुरा ‘ला त्यांचा एक विशिष्ट त-हेचा पंजाबी ठेका होता तो बाबालालला येत नव्हता. तो त्यांना पाहिजे होता. अनंता लिमये होता ऑर्गनवर. ते गात होते, तालात येत होते. पण वजन येत नव्हतं.

गाण्यातली जी मंडळी आहेत त्यांना हे कळेल की चार मात्रांचा केरवा असला तरी प्रत्येक केरव्याचं वजन निराळं असतं. ते आलं नाही की गडबड व्हायला लागते. काही वेळानं थांबले आणि अनंताला म्हणाले अनंता बाप्पा त्यांना सांग. आपल्या कंपनीतला ठेका काय आहे तो त्यांना सांग. त्या ठेक्याचं नावसुद्धा माहित नव्हतं त्यांना. मग अनंतानं बाबालालच्या कानात ठेका कुठला आहे त्याचं नाव सांगितलं. तो ठेका बाबालालने वाजवायला सुरुवात केल्यावर ‘मधु मधुरा’ पुन्हा सुरू झालं. पण त्यावेळेला जो दुसरा ठेका होता त्यावेळेला सुद्धा ते ‘मधु मधुरा’ मधुर नव्हतं असं काहीसुद्धा झालेलं नव्हतं. असं फक्त त्यानाच वाटत होतं की हे असं नाही असं असलं पाहिजे. असा काहीतरी हा चमत्कार होता आणि हा चमत्कारच म्हणायला पाहिजे, कारण कुणालाही कॉलेजमध्ये, मराठी एम.एल.ला संत वाड्मय विषय न घेता जर तुकाराम इतके अभंग लिहू शकतो. तर कुठेही न शिकता किंवा शिकल्याचा भास न दाखवता जो मनुष्य गाऊ शकतो याला चमत्काराशिवाय दुसरं काय म्हणायचं ? आणि हा चमत्कार मी तरुणांना हेच सांगणार आहे की तुम्ही त्या डिस्क आहेत ना त्याची क्वालिटी आता चांगली नाही. त्या काळात यंत्र सामुग्री चांगली नव्हती. तुम्हाला कल्पना नसेल, असं कर्ण्यामध्ये तोंड घालून गावं लागत असे. आणि तो रेकॉर्डिस्ट होता तो परदेशी, इंग्रज असायचा.

त्याला बालगंधर्व गातात काय अथवा सुंदराबाई गातात काय, पोवाडा गातो काय, अमुक गातो काय याची पर्वा नसायची. तो घड्याळाकडे बघत बसायचा. तीन मिनिटं झाली की कचक् बंद करून टाकलं. कुठे बंद करतो काय करतो त्याला त्याची काही परवा नसायची. तशा परिस्थितीत हे गायलेलं असताना. तशा परिस्थितीतही इतकी सुंदर मांडलेली आहेत गाणी की तुम्ही असं करा. काळजीपूर्वक ती गाणी लयीला कुठं उठतात, कशी जातात, कुठल्या सुराला महत्व देतात, कुठल्या रागाला. बागेश्री गाताना संपूर्ण बागेश्री कसा दिसतो. भिमपलास गाताना भिमपलासच कसा दिसतो. दुसरा रागच कसा वाटत नाही. उदबत्ती जशी पेटवल्याबरोबर सुगंध देते तसं पहिल्या ‘मा’ बरोबर जरासं हलले की तो रागच कसा दरवळायला लागतो ही किमया काय आहे हे तुम्ही पाहिलंत की तुम्हाला खरोखर सांगतो की, त्या जुन्या ध्वनिमुद्रिकांमध्ये सुद्धा प्रचंड आनंदाचा ठेवा साठवलेला आहे असं दिसेल. हे सगळं धन सुदैवानं ते नीटपणाने पहा. त्याप्रमाणे अभ्यास करा. बालगंधर्व जन्मशताब्दी साजरी करण्याचा, दुसरी शताब्दी साजरी करण्याचा अधिकार याच्यामुळेच तुम्हाला प्राप्त होणार आहे. केवळ शंभर वर्षे झालीत याला काही अर्थ नाही. शंभर वर्ष ते टिकून राहिलेलं आहे. शंभर वर्षे ते जिवंत राहिलेलं आहे. आजही इतक्या विपरित परिस्थितीत, निराळया परिस्थितीत आपल्याला ते आनंद देत आहे. मघाशी मी खाली बसलो असताना कुणाशी तरी बोलत होतो आणि मधु मधुराची रेकॉर्ड लागली. त्या माणसाच्या बोलण्याकडं माझं लक्षच राहिलं नाही. गाण, असं तुम्हाला खेचून घेतं ज्याप्रमाणे एखाद्या सक्शनपंप वगैरे म्हणतात तो जसा खेचन घेतो तसं गाणं आणि ते गाणं पुन्हा सहज फुललेलं, निसर्गानं एखादा बगीचा फुलवावा तसं फुललेल गाणं परंतु तितकं ते निसर्गानं दिलेलं आहे हे इमिटेशन न करता त्याच्यामागे एक मोठी परंपरा, एक मोठा विचार दडलेला आहे हे विसरू नका. ते जर तुम्ही पाहिलत तर आपण एका मोठ्या आनंदाचे धनी झालो आहोत असं तुम्हाला वाटेल. असा या धन्याचा आज आपण आनंद देणाऱ्या धन्याचा आपण जन्मोत्सव साजरा करतो आहोत. अजुन काही दिवस साजरा होणार आहे. अनेकांनी केलेला आहे. त्यांच्याबद्दल एका आपल्यासारख्या गंधर्व भक्तांनी कृतज्ञ राहिलं पाहिजे.

Scroll to Top