Logo

बालगंधर्वाच्या भूमिका

वा. य. गाडगीळ

झाले बहुत, होतील बहुत, परंतु या सम हा” हे वर्णन नाट्यक्षेत्रात खऱ्या अर्थाने एकाच व्यक्तीला लागू पडतं आणि ती व्यक्ती म्हणजे नटसमाट बालगंधर्व. मराठी रंगभूमीची स्थापना १८४३ साली झाली. तेव्हापासून आजपर्यंत काही हजार कलावंत या रंगभूमीवर आले. त्यातले अनेकजण गुणी होते. त्यांनी कित्येक भूमिका गाजविल्या कमी अधिक प्रमाणात लोकप्रियता मिळवली. रसिक महाराष्ट्रानं त्यांची कदर केली त्यांच्या गुणांना दाद दिली. पण यापैकी कुणाही कलावंताला बालगंधर्वाइतकं प्रेक्षकाचं प्रेम लाभलं नाही. ५० वर्षापूर्वी शिक्षित मराठी माणसाच्या घरात दोन फोटो हमखास दिसत. एक लोकमान्य टिळकांचा आणि दूसरा नटसम्राट बालगंधर्वांचा. टिळकांच्या देशभक्तीनं आणि त्यागानं महाराष्ट्र त्यांचा भक्त बनला होता. बालगंधर्वांच्या रूपानं, गायनानं आणि अभिनयानं मराठी रसिकतेला धुंद करून सोडलं होतं.

बालगंधर्वांनी जे अतुलनीय यश मिळवलं ते स्त्री-भूमिका करून, ही गोष्ट खास उल्लेखनीय. स्त्री-भूमिकात कोणत्याही स्त्रीला जे यश अद्याप मिळालेलं नाही, ते एका पुरुषाने मिळवावे, हा चमत्कारच म्हटला पाहिजे. हा चमत्कार का आणि कसा घडला, याचा विचार करू या.

आज नाटकात स्त्रियांची कामं स्त्रियाच करतात. पूर्वी तशी स्थिती नव्हती. चूल आणि मूल हे त्या काळात बाईचं कार्यक्षेत्र मानलं जाई. त्यामुळे नाटकांतून कामे करण्यासाठी स्त्रिया पुढे येत नसत. नाटकात स्त्रीपात्र असतच. म्हणून स्त्रीपात्रांची कामे पुरुषांना करावी लागत. गोरी गोमटी, सुंदर तरुण, गोंडस मुले स्त्री-भूमिका करण्यासाठी निवडली जात. म्हणजे एका दृष्टीने दुधाची तहान ताकावर भागविण्याचाच हा प्रकार होता.

१८८० साली सुशिक्षित मंडळींची किर्लोस्कर नाटक मंडळी जन्मास आली आणि तिने शाकुंतल, सौभद्र, रामराज्यवियोग, वीरतनय, शारदा वगैरे संगीत नाटके रंगभूमीवर आणली. या संस्थेत उत्तम गाणारे कलावंत होते. तिचे नाट्यप्रयोग दर्जेदार होत. लोकमान्य टिळकांसारख्या थोर नेत्याचा तिला पाठिंबा होता. या सर्व कारणांमुळे समाजात या संस्थेला प्रतिष्ठा प्राप्त झाली. जो नाटकधंदा हलक्या प्रतीचा मानला जात होता, त्याला समाजात मान्यता मिळाली, ती या किलोस्कर नाटक मंडळीमुळे.

किर्लोस्करमध्ये नायिकेच्या भूमिका भाऊराव कोल्हटकर करीत. ते अतिशय देखणे होते. त्यांचे गायन तेजस्वी असे. १९०१ साली त्यांचे अकस्मात निधन झाले आणि किलोस्कर नाटक मंडळींची स्थिती बिघडली. नवे चांगले गाणारे स्त्रीपात्र लाभल्याविना संस्थेची धडगत नाही, अशी चिन्हे स्पष्ट दिसू लागली. तिच्या सुदैवाने १९०५ साली नारायण श्रीपाद राजहंस हा अतिशय देखणा मुलगा तिला नायिकेची कामे करण्यासाठी मिळाला. हा मुलगा बालगंधर्व या नावाने ओळखला जाई. तो १० वर्षांचा असताना, १८९८ साली, लोकमान्य टिळकांनी त्याचे गाणं ऐकले. ते मिठ्ठास गाणे ऐकून लोकमान्य सहज म्हणाले, “हा बालगंधर्व फार सुरेख गातो”. तेव्हापासून नारायण राजहंस हा ‘बालगंधर्व या नावाने ओळखला जाऊ लागला.

देवल मास्तरांकडून अभिनयाचे धडे

प्रख्यात नाटककार आणि उत्तम अभिनयशिक्षक गोविंदराव देवल यांनी बालगंधर्वांना अभिनयाचे धडे दिले. स्त्री-भूमिकेत उभे कसे रहावे, चालावे कसे, हातवारे कसे करावेत, बोलावे कसे हे सारे देवल मास्तरांनी बालगंधर्वांना शिकविले. अभिनयात कृत्रिमता दिसू नये, या गोष्टीवर देवलांचा कटाक्ष असे. नाटकातले गाणे रसानुकूलच असायला हवे, हा त्यांचा आग्रह असे. देवलांकडून उत्तम तालीम मिळाल्यानंतर, बालगंधर्व रंगभूमीवर प्रथम उभे राहिले. मिरज मुक्कामी, संगीत शाकुंतल या नाटकात. ज्यांना लोकमान्य टिळकांनी बालगंधर्व ही पदवी दिली आहे, ते नारायणराव राजहंस शकुंतलेची भूमिका करतील, अशी या प्रयोगाची जाहिरात करण्यात आली होती. किर्लोस्कर नाटक मंडळीची नवी नायिका पाहाण्यासाठी पुणे, कोल्हापूर, बेळगाव आदी गावांतले रसिक मुद्दाम मिरजेस गेले होते. आजच्या भाषेत बोलायचे म्हणजे त्या प्रयोगाला हाऊस फुल्ल गर्दी जमली होती.

शकुंतला म्हणून बालगंधर्वांनी रंगभूमीवर पदार्पण करताच टाळयांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत प्रेक्षकांनी केले. ही शकुंतला अतिशय सुंदर आणि लोभसवाणी दिसली. मुख्य म्हणजे त्या सौंदर्यात शालीनता होती. शकुंतलेची पदे वालगंधर्वांनी चांगली रंगविली आणि कामही व्यवस्थित केले. बालगंधर्वांची ती पहिलीच भूमिका पाहून रसिकांना जाणवले की एक लखलखीत तेजस्वी तारकाच रंगभूमीवर अवतरली आहे. शाकुंतल नंतर शारदा, मूकनायक, सौभद्र, गुप्तमंजुष, मतिविकार या नाटकातल्या नायिकेच्या भूमिका बालगंधर्वांनी केल्या. मुंबईत बालगंधर्वांच्या सुभद्रेचे विशेष कौतुक झाले. सुभद्रेची असहाय्य आणि निरागसता त्यांच्या अभिनयातून मोहकपणे प्रगट होई. बलसागर तुम्ही वीर शिरोमणी, वद जाऊ कुणाला शरण, किती किती सांग तुला, अरसिक किती हा शेला, पांड़ नपती जनक जया वगैरेची सभद्रेची पदे ने बहारदारपणे गात, त्यांच्या गायनाभिनयामळे जुने सौभद्र नाटक एखाद्या नव्या नाटकाप्रमाणे गर्दी खेचत राही.

बालगंधर्वांची कामे पाहून नाटककार काकासाहेब खाडिलकर यांना संगीत नाटक लिहिण्याची स्फूर्ती मिळाली त्यांनी लिहिलेले संगीत मानापमान १९११ साली रंगभूमीवर आले आणि बालगंधर्वाच्या गायनाभिनयाला एक आगळी झळाली प्राप्त झाली.

मानापमानची नायिका भामिनी ही रूपगर्विता आहे. स्वतःच्या श्रीमंतीचा तिला मोठा अभिमान. गरीब धैर्यधराशी लग्न करायला ती मोठ्या तोऱ्यात नकार देते. पण पढे धैर्यधराच्या पराक्रमावर ती लब्ध होते. आपल्या सखीशी-कुसमावतीशी बोलताना भामिनी आपले धैर्यधरावरील प्रेम बोलून दाखविते. “नाही मी बोलत नाथा” हे शृंगारसूचक पद म्हणताना “विनयवती मी कांता” असे बजावल्याविना ती रहात नाही. या बजावण्यात तिची मर्यादशीलता स्पष्ट होते. तिसऱ्या अंकातल्या भामिनी- कुसुमावतीचा प्रवेश आणि चौथ्या अंकातील धैर्यधर आणि भामिनी यांचा प्रवेश हे लेखनदृष्ट्या बहारदार असलेले प्रवेश बालगंधर्व आपल्या अभिनयाने अतिशय खुलवायचे. ते पहायला प्रेक्षक पुन्हा पुन्हा गर्दी करायचे.

स्त्री-भूमिकांसाठीच जणू जन्म

मानापमान नाटकाचे संगीत त्या अगोदरच्या नाटकातील संगीताहून भिन्न होते. त्यातील नयने लाजवीत, खरा तो प्रेमा, मी अधना, नाही मी बोलत वगैरे पदे बालगंधर्व लाडिकपणे आळवीत. ३० वर्षांहून अधिक काळ भामिनीची भूमिका केल्यानंतर वृद्धापकाळी बालगंधर्व धैर्यधराची भूमिका करू लागले. धैर्यधराची शांत रसातील त्यांची पदे मोठी श्रवणीय होत. त्यांच्या कोणत्याही पुरुष भूमिकेला तसे यश मिळाले नाही. स्त्री-भूमिकांसाठीच जणू त्यांचा जन्म होता. 

खाडिलकरांच्या विद्याहरणमध्ये बालगंधर्व नायिका देवयानी हिची भूमिका करीत. आपले वडील शुक्राचार्य आणि त्यांचा दैत्य सांप्रदाय यांचा देवयानीला विलक्षण अभिमान. शुक्राचार्यांची संजीवनी विद्या हस्तगत करण्यासाठी आलेल्या कचाविषयी देवयानीच्या मनात प्रेमभावना जागृत होते. बाबांची आज्ञा मोडणारी देवयानी कचदेवांना तरी कशी आवडेल, असा प्रश्न विचारणारी देवयानी प्रेक्षकांना एक वेगळाच आनंद देऊन जाई. कारण त्या काळात प्रेमासाठी आईबाप, घरदार आणि सर्वस्व यांच्यावर तिलांजली द्यावी, ही वृत्ती समाजात नव्हती. देवयानीची प्रेमाबाबत निराशा होते आणि कचाला भाऊ मानण्याची पाळी तिच्यावर येते. देवयानीची विविध वैशिष्ट्ये बालगंधर्व अप्रतिमपणे प्रगट करीत. प्रेमभावना व्यक्त करणारी मधुमधा तव गिरा, मधुकर वनवन फिरत करी गुंजारबाला सारखी पदे ते विलक्षण खुलवीत. देवयानीचा मनोभंग दाखविणारी त्यांची पदे आता रांग देई, लग्न होईना ही पदे साऱ्या नाट्यगृहात उदासीनतेची छाया निर्माण करीत.

संशयकल्लोळ हे विनोदप्रधान सामाजिक संगीत नाटक बालगंधवांनी आपल्या गंधर्व नाटक मंडलीतर्फे १९१६ साली रंगभूमीवर आणले आणि त्यात नायिका रेवती हिची भमिका केली. संशयकल्लोळ पूर्वी शारदा आणि मतिविकार या दोनच सामाजिक नाटकांतून त्यांनी नायिकेच्या भूमिका केल्या होत्या. शारदेच्या भमिकेत प्राधान्य होते शोकरसाला. मतिविकारामधील त्यांची भूमिका वैशिष्ट्यहीन होती. रेवतीची भमिका अभिनयाला भरपूर वाव देणारी आहे. हास्य आणि शंगार या रसांचे विलोभनीय दर्शन बालगंधर्व या भमिकेत घडवीत. रेवती ही गणिका आहे. तिचा नखरेलपणा बालगंधर्व मोहक स्वरूपात दाखवीत. पण त्यांची रेवती छछोरं वाटत नसे, हे विशेष. मी मानी आहे. संशयी आहे, असे रेवती स्वतःच अश्विनशेटला सांगते. रेवतीच्या स्वभावातल्या या छटा बालगंधर्वांच्या खेळकर अभिनयात दिसत. साम्य तिळही नच, संशय का मनी आला, मजवरी तयांचे प्रेम खरे या रेवतीच्या पदांना ते स्वरालंकारांनी नटवून कमालीची रंजक बनवीत.

गाजलेली नाटके : स्वयंवर व एकच प्याला

बालगंधर्वांची सर्वाधिक गाजलेली नाटके म्हणजे स्वयंवर आणि एकच प्याला. स्वयंवरमधील रूक्मिणीच्या भूमिकेत ते राजकन्येची ऊंची वस्त्रे परिधान करीत. उलट एकच प्यालामध्ये सिंधूच्या भूमिकेत त्यांना फाटकी लुगडी नेसावी लागत. प्रत्येक भूमिकेतील आपली वेशभूषा ते अत्यंत टापटिपीने करीत. शालू आणि लुगडी इतकी चापूनचोपून सुंदर नेसत की स्त्रियांनी तो आदर्श समोर ठेवावा. आपली रंगभूषा ते फार काळजीपूर्वक करीत.

संशयकल्लोळनंतर अवघ्या दीड महिन्यात स्वयंवर रंगभूमीवर आले. या दोन नाटकांतल्या बालगंधर्वांच्या भूमिका भिन्न वातावरणातल्या आणि भिन्न स्वरूपाच्या होत्या. ती भिन्नता अचुक दाखवून बालगंधर्वांनी या दोन्ही भूमिका गाजविल्या. कृष्णाला प्रत्यक्ष पाहण्यापूर्वीच त्याच्यावर अनुरक्त झालेली रूक्मिणी ” दादा ते आले ना”, म्हणत रंगभूमीवर प्रवेश करते. बालगंधर्वांचे हे पदार्पण नि या वाक्याचे उच्चारण इतके बहारदार होई की त्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडावेत. रूक्मिणीचे कृष्णावरील असीम प्रेम प्रगट करीत. ही एन्ट्री, हे वाक्य आणि हा अभिनय मराठी नाट्यसृष्टीत अतुलनीय ठरला.

या नाटकाच्या अंकात रूक्मिणी आपल्या आईजवळ कृष्णाचे गुणगान करते. ते करतेवेळी कृष्णाविषयीचा जिव्हाळा आणि भक्ती बालगंधर्व मोठ्या तल्लीनतेने प्रगट करीत. तेवढ्यात रूक्मी येतो नि स्वयंवराचा मंडप जळणार-विदर्भ देशाची अब्रू धुळीला मिळणार, असे घोषित करतो. रूक्मिणी त्याला चार्थ्याने आणि धैर्याने उत्तर देते. त्या प्रवेशात गंधर्वांचे संभाषणचार्य प्रकर्षाने व्यक्त होई. त्यांच्या हालचालीही नजर वेधून घेत. लग्नमंडप जळणार नाही, हे जेव्हा भीष्मक महाराज सांगतात तेव्हा “बाबा, हे खरं ना”, असे विचारीत रूक्मिणी आनंदाने त्यांच्या गळयात हात टाकत असे. त्यावेळी आनंदाची प्रभा बालगंधर्वांच्या मुद्रेवर पसरत असे आणि तिचं प्रसन्न प्रतिबिब प्रेक्षकांच्या मुद्रेवर उमटे.

पुढे स्वयंवराच्या मंडपात जेव्हा युद्ध होण्याचा प्रसंग येतो, तेव्हा ” दादा, खडग मागं घे”, हे रूक्मिणी काहीशा कडकपणेच रूक्मीला बजावते अन् निमिषार्धात “महाराज, खडग मागं घ्या”, म्हणून कृष्णाला विनवते. यावेळी बोलण्यात एकदम किती फरक बालगंधर्व करीत. “या हतभागी रूक्मिणीचे स्वयंवर मोडलं – स्वेच्छेने वर पसंत करण्याचा अधिकार तिनं सोडून दिला आहे” असे सद्गदीत उद्गार जेव्हा बालगंधर्वांच्या मुखातून निघत, तेव्हा त्याचा विलक्षण परिणाम होत असे.

स्वयंवर नाटकात विविध भावना व्यक्त करणारी अनेक स्वगतं रूक्मिणीच्या तोंडी आहेत. रसोत्कट उच्चार आणि यथोचित अभिनय करून बालगंधर्व ती स्वगतं मोठ्या तल्लीनतेनं उच्चारीत. वाक्याचा ताल आणि तोल सांभाळण्याचे असामान्य कसब त्यांच्या अंगी होतं. त्यांच्या बोलण्याच्या ढंगामुळे बोजड वाक्यंही सोपी वाटत.

स्वयंवर नाटकात बालगंधर्वांचा अभिनय आणि त्यांचे संगीत जणू एकरुप झाले होते. मिळालेल्या भूमिकेचे मर्म समजून ते आपल्या बुद्धीने तिच्यावर जणू नवा प्रकाश टाकत. भारदस्त खानदानी संगीतावर आधारलेली रूक्मिणीची पदे बालगंधर्व इतक्या झोकात म्हणत की सारे प्रेक्षागार गायनांत तल्लीन होई. हे नाटक कधी संपूच नये, अशी भावना निर्माण होई.

“कशी या त्यजू पदाला” नेहमी वन्स मोअर

बालगंधर्वांच्या अभिनयाचे गौरीशंकर शिखर म्हणजे त्यांची सिंधूची भूमिका. एकच प्याल्यातली सिंधू म्हणजे एका दारूड्याने भिकेला लावलेली सामान्य बायको नव्हे. सुधाकर तिचं वर्णन दिव्य तपस्विनी या शब्दांत करतो. बालगंधर्वांची सिंधू पाहताना ते वर्णन निखालस खरे आहे, हे जाणवत असे. सिंधूची अनन्यसाधारण पतिनिष्ठा अत्यंत वाजवी आहे, हे बालगंधर्वांचे काम पाहताना जाणवत असे. “एकच प्याला “तील बालगंधर्वांची सिधूची भूमिका मी अनेक वेळा पाहिली होती. ती पुन्हाः पुन्हा पहावी, असं मला सदैव वाटत असे. आईचं बाळाविषयीचं प्रेम व्यक्त करायला त्यांना फक्त या नाटकातच संधी मिळाली, घास घेरे तान्हया बाळा, बघू नको मजकडे यासारखी सिधूची स्त्रीगीतं ते अतिशय भावनेनं म्हणत. कशी या त्यजू पदाला, सत्य वदे वचनाला इत्यादी सिंधूच्या पदांना ते हमखास वन्स मोअर घेत. वन्स मोअर मिळवणं ही गोष्ट सामान्यतः अवघडच. पण बालगंधर्वांना कोणत्याही नाटकातल्या काही पदांना वन्स मोअर हे मिळायचेच. वन्स मोअर मिळवणे ही गोष्ट त्यांच्या दृष्टीने अगदीच सोपी होती.

एकच प्यालानंतर बालगंधर्वांनी द्रौपदी, आशानिराशा, नंदकुमार, विधिलिखित, सावित्री, कान्होपात्रा आणि अमृतसिद्धी ही नवी नाटके रंगभूमीवर आणली. यातले एकही नाटक मानापमान, स्वयंवर, एकच प्याल्याच्या तोडीचे नव्हते. या नाटकात बालगंधर्व आपल्या भूमिका मनोभावे करीत त्यांची पदे रंगतदार होत, हे खरे. अभिनयाच्या काही जागाही ते सुरेख दाखवीत. पण मूळ नाटकच दर्जेदार नसले, तर बिचारा कलावंत तरी काय करणार ?

तरुणपणी बालगंधर्व स्त्रीवेषात अतिशय सुंदर दिसत. त्यांचं दर्शन उतारवयातही सौंदर्याचा भास क्वचित निर्माण करी. कारण ते ज्या तद्रुपतेनं कामं करीत, ती तद्रुपता सुंदर होती. ती त्यांच्या वयाचा विसर पाडायला लावी. बालगंधर्वांचे दात सुंदर होते. त्यांचं हसणं मोहक वाटे. त्यांच्या मुद्रेवर सात्विक भाव होता. भूमिकेच्या आचार-विचाराशी ते एकरूप होऊन जात. त्यामुळे त्यांचा अभिनय आणि गाणं स्वाभाविक वाटे. स्वरांशी त्यांनी कधी दंगामस्ती केली नाही. गाताना ते स्वरांना कुरवाळत. गाणं म्हणतांना अभिनयाकडे त्यांचे कधी दुर्लक्ष होत नसे. सौंदर्य, अभिनय आणि गायन त्या तिन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये एकवटल्यामुळे ते एकमेव आणि अद्वितीय ठरले. असा स्त्री पात्री नायक नट दुसरा झाला नाही.

Copyright © 2025 Balgandharva

Designed & Developed By Hans Technologies 

Scroll to Top