
गंधर्वकालीन नेपथ्य
द.ग.गोडसे
‘गंधर्वकाल’ म्हणजे… बालगंधर्वांच्या व गंधर्व कंपनीच्या चढत्या उमेदीचा व वाढत्या वैभवाचा १९१३ ते १९३३ हा कालखंड !
मराठी रंगभूमीच्या इतिहासातील या कालखंडात बालगंधर्वांच्या ‘राजहंसी’ गाण्याने, त्यांच्या स्त्रीसुलभ वाटणाऱ्या सहज अभिनयाने मराठी रसिकांना अनेक वर्षे किती मोहिनी घातली होती. याबद्दल आजपर्यंत उदंड लिहिण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर या मोहिनीची जादू अशी लोकविलक्षण होती की, बालगंधर्वांचे रूप-स्वरूप, त्यांचा अभिनय व सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचे गाणे यांच्या प्रभावापुढे रंगमंचाचे अस्तित्वच नाहीसे होऊन रंगमंचावरील नाट्य-प्रसंग, रंगमंचावरील इतर नट, त्यांचा अभिनय, त्यांचे गाणे ह्यांना जसे महत्व उरत नसे, तसेच रंगमंचावरील नेपथ्यालाही तादृश महत्व रहात नसे. आज वाटते नेपथ्यविरहित केवळ काळ्या पडद्यावरही त्यावेळचे उमेदीचे बालगंधर्व त्यांच्या व्यक्तिविशिष्ठ अभिनयाने व विशेष म्हणजे त्यांच्या स्वरमधुर गाण्याने तेवढेच यशस्वी ठरले असते. बालगंधर्वांच्या नाटकांना नाट्यानुकूल, वास्तव नेपथ्याची तादृश गरजच नव्हती. ती स्वतः गंधर्वांना नव्हती तशी गंधर्व मंडळींच्या प्रेक्षकांनाही नव्हती. गरज असलीच तर ती बालगंधर्वांचे गाणे आणि अभिनय ह्यांना आणि – फक्त यांनाच- उठाव देणाऱ्या लखलखत्या मखराची होती. परिणामी बुद्धिपुरस्सर म्हणा अथवा अभावितपणे म्हणा.. गंधर्व कंपनीचे नेपथ्य हे रंगभूमीचे एक महत्त्वाचे अंग म्हणून नेहमीच दुर्लक्षित राहिले. बहुतांश ते मखरवजाच असायचे !
मराठी रंगभूमीच्या इतिहासातील एक योगायोग असा की गंधर्व कालखंडाच्या आधी श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या नाटकांपासून नाट्यरचनेच्या तंत्रात, पद्यांच्या चालीत, नाटकाच्या भाषाशैलीत किर्लोस्करी नाट्यतंत्राहून सर्वस्वी वेगळे असे क्रांतिकारक बदल होत होते. महत्वाचे बदल म्हणजे, नाटकांमध्ये नायकांपेक्षा नायिकेला सर्वाधिक प्राधान्य देण्याकडे नाटककारांनाही नाट्यदृष्ट्या महत्त्वाचे वाटत होते. श्री. कृ. कोल्हटकर, खाडिलकर, गडकरी यांची नायिकाप्रधान नाटके ध्यानात आणली तर हे स्पष्ट व्हावे. एकेकाळी मराठी गद्यरंगभूमी गाजविणारे नाटककार खाडिलकर गंधर्व कंपनी स्थापन झाल्यावर तिचे आधारस्तंभ होते. गंधर्व कंपनीकरिता त्यांनी लिहिलेली संगीतप्रधान नाटके बालगंधर्वांच्यामुळे नायिकाप्रधान व्हावी हे नाट्यलेखनाच्या दृष्टीने नसले तरी गंधर्वमंडळींच्या नाट्य-व्यवसायाच्या दृष्टीने स्वाभाविक होते तेवढेच आवश्यकही होते.
फायद्याची लोकप्रियता पण…
अशा परिस्थितीत खाडिलकरांच्या सर्वस्वी नायिकाप्रधान नाटकांतील बालगंधर्वांच्या गाण्याला आणि अभिनयाला नेपथ्याऐवजी मखराचीच आवश्यकता अधिक होती. ह्या मखरातील उत्सवमूर्ती म्हणजे एकमेव बालगंधर्व ! त्यांची वेशभूषा, त्यांचे गाणे ह्यांनाच नाट्यप्रयोगात महत्त्व ! परिणामी गंधर्वांची नाटकांतील. वेशभूषा आणि त्यांच्या गाण्याची साथ करणारे संगीत वादक ह्यांनाच अधिक महत्व मिळाले. गंधर्वकालात गंधर्व मंडळींच्या नाट्य- प्रयोगांतून दिसणारे बालगंधर्वांच्या वेशभूषेचे विविध प्रकार आठवले आणि कादरबक्ष, अहमदजान तिरखवाँ, ऑर्गनवादक कांबळे यांसारखे गंधर्वांनी संभाळलेले श्रेष्ठ संगीत वादक पाहिले की, गंधर्व कंपनीच्या नाट्यप्रयोगात कोणत्या गोष्टींना महत्त्व देण्यात येत असे हे स्पष्ट व्हावे ! रंगभूमीवरील बालगंधर्वांसारखी केशभूषा व वेशभूषा करून त्यांच्या सारखेच चालण्याचा व बोलण्याचा प्रयत्न करून ‘डिट्टो गंधर्व’ होऊ पहाणाऱ्या पुण्या-मुंबईच्या सुखवस्तू समाजातील उच्चभ्रू महिला आठवल्या आणि गंधर्वांचेच अनुकरण करून नाट्यपदे आळवणारे स्त्री पुरुष गायक आठवले की, गंधर्वांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्या काळात किती सर्वदूर होता हे कळते.
प्रेक्षकांच्या दृष्टीने गंधर्वांची ही लोकप्रियता भूषणावह होती आणि व्यावहारिक हिशोबाने तर ती फायद्याचीही ठरत होती, पण नाट्यव्यवसायाला व्यवहारी हिशोबाचे अर्थपूर्ण परिमाण असणे आवश्यक असले तरी तेच त्याचे एकमेव परिमाण नसते. किंबहुना नाट्यव्यवसायाला असलेले गुणात्मकतेचे अगोचर पण महत्वाचे परिमाण एवढे मोठे असल्याचे स्पष्ट जाणवते की, नाट्यव्यावसायिकांनी केवळ व्यवहारावर व लोकप्रियतेवर दृष्टी ठेवून गुणात्मकतेच्या परिमाणाकडे डोळेझाक केल्यास अथवा त्याबद्दल उदासीन राहिल्यास एरव्ही लोकप्रियता व यशस्वी वाटणारा नाट्य व्यवसाय नाट्य कलेच्या चित्रगुप्ताच्या हिशोबी मात्र अप्रगत, अचल अयशस्वीच ठरतो. या दृष्टीनेही गंधर्व आणि गंधर्व कंपनी यांच्या नाट्यसेवेचे मोजमाप गंधर्व काळातील इतर नाट्य व्यावसायिकांच्या तुलनेने घ्यायला हवे ! गंधर्व काळातील काही मातब्बर मोजक्या व्यावसायिकांची नाट्यव्यवसायाबद्दलची जागरूक निष्ठा पाहिली, ही निष्ठा जपण्याकरता त्यांनी केलेले यशस्वी-अयशस्वी प्रयत्न ध्यानात घेतले तर, बालगंधर्व, गंधर्व कंपनी व त्यांचे इतर समकालीन नाट्यव्यवसायी यांत नाट्यकलेबद्दल निष्ठापूर्वक आस्था असलेले कोण होते, रंगभूमीला कटाक्षाने प्रगत, गतिशील ठेवणारे कोण होते याची कल्पना येऊ शकते.
नाट्यकलेची प्रगत गतिशीलता हा विषय फार मोठ्या व्याप्तीचा आहे. एवढी सर्वांगीण समीक्षा या लेखात अभिप्रेत नाही. नेपथ्य हे नाट्यकलेचे एक अंग म्हणून या अंगाचाच विचार प्रस्तुत लेखात करावयाचा आहे आणि हा विचार सुद्धा गंधर्व काळातील गंधर्व कंपनी व समकालीन इतर नाट्यव्यवसायी यांच्या पुरताच मर्यादित ठेवणे भाग आहे.
प्रगत तरी नाट्यानुकूल
फक्त नेपथ्याच्याच दृष्टीने आज विचार केला… तर अफाट लोकप्रियता व सांपत्तिक यश मिळवूनही… गंधर्व कंपनी… त्यावेळच्या इतर नामवंत कंपन्यांच्या तुलनेने, नेपथ्याच्याबाबतीत सर्वस्वी उदासीन होती असे स्पष्ट जाणवते ! गंधर्व कंपनीच्या नेपथ्याच्या कल्पनाच वेगळ्या होत्या असेही समर्थन करता येणार नाही. कारण रंगमंचावरचे नेपथ्य ही एक सहेतुक, योजनाबद्ध निर्मिती असते आणि ही निर्मिती सर्वस्वी नाट्यधर्मी असणेच अभिप्रेत असते. यात वेगळेपणा असू शकतो तो ‘प्रकाराचा’, ‘जाती’चा नव्हे ! म्हणूनच कोणतीही केवळ उत्सवी सजावट अथवा झगमगीत मखर हे नेपथ्य होऊ शकत नाही. गंधर्व काळातच समकालीन पारशी गुजराती कंपन्यांचे तथाकथित नेपथ्य, खऱ्या अर्थाने नेपथ्य नसे तर रंगमंचावर झगमगाणारे एक ‘मखर’, असे समकालीन मराठी नाट्यसमीक्षकांनीही नमूद करून ठेवले आहे. ह्या झगमगाटाची मोहिनी काही मराठी नाट् व्यावसायिकांवरही त्यावेळी पडताना आढळली. यालाही त्यावेळचे काही निष्ठावंत नाट्य व्यावसायिक अपवाद असल्याचे दिसतात. ह्या निष्ठावंतांच्या नेपथ्य प्रयत्नांचा मागोवा घेऊन गंधर्व काळातच नेपथ्यविषयक सूक्ष्म जाणीव प्रगत व विकसनशील ठेवण्याचे जाणीव पूर्वक प्रयत्न गंधर्व कंपनीपेक्षा इतर काही कंपन्याच कसे करीत होत्या, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे.
या संदर्भात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा तो ‘ललितकलादर्श मंडळी’, तिचे सूत्रधार श्री. केशवरावभोसले, श्री. बापूराव पेंढारकर, ‘शिवराज’ नाटकः कंपनीचे श्री. गोविंदराव टेबे आणि ‘भारत’ कंपनीचे श्री. य. ना. उर्फ आप्पा टिपणीस यांचा
केशवराव भोसले, बापूराव पेंढारकर व गोविंदराव टेंबे हे तिघेही संगीततज्ञ तर होतेच पण दोन नाटक कंपन्यांचे सूत्रधार-मालकही होते. एवढेच नव्हे तर तिघेही त्यांच्या संगीताकरिता लोकप्रियही होते. पण नाट्य फुलविण्यास आवश्यक असणाऱ्या नेपथ्य वगैरे रंगभूमीच्या इतर अंगाबद्दलही ते संगीताइतकेच जागरूक असल्याचे जाणवते. विशेष म्हणजे नेपथ्याबद्दल ते नुसतेच जागरूक नव्हते तर नेपथ्य प्रगत आणि गतिशील कसे होईल याचाही ते कसोशीने विचार करीत होते असेही त्यांच्या प्रयत्नांवरून स्पष्ट होते. हे ध्यानात घेता नाट्याचे एक महत्वाचे अंग म्हणून ते त्यांच्या नाटकांचे नेपथ्य दरवेळी प्रगत तरीही नाट्यानुकूल करण्याचे प्रयत्न कसे करीत होते हे बघणे उद्बोधक ठरावे !
केशवराव स्वतःच्या भूमिकांचा आणि इतरांच्या भूमिकांचा जेवढा नाट्याच्या संदर्भात विचार करीत तेवढाच नाट्य फुलवून रसोत्कर्ष साधण्यास उपयुक्त ठरणाऱ्या नाट्यसंगीताचा आणि नाट्य नेपथ्याचाही सूक्ष्म विचार करीत. आणि नाट्यगायन, नाट्यसंगीत व नाट्यनेपथ्य दर नव्या नाटकातून कसे प्रगतीशील राहील याची काळजी घेत. अनेक गायनतपस्वींकडून शास्त्रोक्त संगीताची तालीम घेऊनही, केशवरावांनी आपले नाट्यगायन रसपरिपोष होण्यापुरतेच संयमी ठेवले होते,. नाट्य गायनाची संगीत मैफल होऊ दिली नाही असे समकालीन नाट्य समीक्षकही सांगतात.
केशवरावानंतर त्यांचा नाट्यधर्मी संयम पेंढारकरांनीही पाळला.
केशवरावांचे वेगळे वळण
केशवराव व पेंढारकर यांची हीच नाट्यधर्मी दृष्टी. नाटकाच्या नेपथ्याबाबतही असावी असे ललितकला- दर्शच्या वेगळ्या नेपथ्यावरून जाणवते. गंधर्व कंपनीच्या वैभवशाली काळातलीच ही वेगळी दृष्टी आहे. हे आवर्जुन ध्यानात घ्यायला हवे । म्हणून रंगमंचावरील नेपथ्याकरता त्या दोघांनी घेतलेले परिश्रम बघणे आवश्यक आहे.
केशवराव भोसल्यांच्या कारकीर्दीत नाटकाची पार्श्वभूमी… त्यावेळच्या व्यावसायिक प्रथेनुसार रुळांच्या पडद्यावरच रंगविलेली असली तरी समकालीन पारशी गुजराथी कंपन्यांसारखे हे पडदे ‘भडक’ असणार नाहीत याबद्दल केशवराव कटाक्षाने जागरूक असावेत असे ललितकलादर्शचे जुने पडदे, पहाताना जाणवायचे. शोध घेतल्यावर कळले की केशवरावांनी हे पडदे श्री. बाबुराव पेंटर व त्यांचे बंधू आनंदराव मिस्त्री या निष्णात चित्रकारांकडून मुद्दाम रंगवून घेतले होते. यात केशवरावांची नाट्यानुकूल सूक्ष्म सौष्ठव दृष्टीच प्रतीत होते. विशेष म्हणजे ह्या दोन्हीही चित्रकारांनी त्यावेळी रंगविलेल्या पडद्यात समकालीन मराठी कंपन्यांच्या पडद्यांवर आढळणारा पारशी, गुजराती कंपन्यांतील पडद्यांचा डोळ्यात खुपणारा व रंगमंचावरची पात्रे अक्षरश: खाऊन टाकणारा, भडकपणा तर नसायचा न उलट त्यांचे चित्रण एवढे हळुवार तरीही हृद्य-मनोहर त असायचे की ते पहाताच अभिजात फ्रेंच निसर्ग ले चित्रणाच्या धुंद शैलीची जाणकार प्रेक्षकांना आठवण व्हावी. रंगमंचावरचे नेपथ्य स्पष्ट असूनही किती से मर्यादशील असावे, विशेष म्हणजे ते रंगमंचाच्या परस्पेक्टिव मध्येच असावे याची नेमकी जाण म केशवरावांप्रमाणेच या कलावंत बंधनाहीं होती हे उघड आहे. रंगभूमीवरील नेपथ्याच्या दृष्टीने या जाणकारांचा हृदयंगम सहयोग त्यावेळी जेवढा नाविन्यपूर्ण होता तेवढाच मराठी रंगभूमीच्या नेपथ्याला प्रगतीशील ठरविणाराही होता. यात वाद नाही. केशवरावांचे वैशिष्ट्य हे की केवळ व्यावसायिक लोकांवर अवलंबून न रहाता इतर क्षेत्रांतील समानधर्मी कलावंत नेमके शोधून, त्यांच्या सहकार्याने त्यांनी केवळ ललितकलादर्शचेच नेपथ्य विदग्ध आणि प्रगत केले नाही तर मराठी रंगभूमीवरील नेपथ्यालाच एक नवे वेगळेपण, संयमशील वळण लावले. केशवरावानंतर गंधर्व कंपनीप्रमाणेच इतर कंपन्यांनीही बाबूराव पेंटर व आनंदराव मिस्त्री यांच्याकडून अनेक पडदे रंगवून घेतलेले आढळले तरी अग्रपूजेचा मान केशवराव भोसले यांनाच द्यायला हवा हे निश्चित !
नाट्यानुकूल संयम
केशवररावांच्या निधनानंतर पेंढारकरांनीही पु. श्री. काळ्यांसारख्या कल्पक चित्रकाराच्या साहाय्याने ललित कलेच्या नेपथ्याची प्रगतीशील वाटचाल चालूच ठेवली आणि मराठी रंगमंचावर आधुनिक बॉक्ससेट उभारण्याचे धाडस करून मराठी नेपथ्याला आणखी एक नवे परिमाण प्राप्त करून दिले. ललितकलादर्शचे प्रारंभीचे नेपथ्य बाबूराव पेंटर, आनंदराव मेस्त्री यांच्या चित्रण शैलीमुळे कल्पनारम्य समजले तर पु. श्री. काळे यांचे नेपथ्य अधिक वास्तववादी ठरते. आज वाटते, त्यावेळच्या मराठी अभिरुचीची ती आवश्यक गरज होती. त्या वेळचे नाट्यलेखनही कल्पनारम्य पौराणिक, ऐतिहासिक काळाकडून वर्तमान वास्तवाचा अधिक शोध घेत होती. किंबहुना नाट्यलेखनाची ती गरज होती. ललितकलादर्शच्या सुविद्य सुजाण चालकांनी ह्या गरजेची दखल घेतली तशी ललितकलादर्शच्या नेपथ्यानेही तत्परतेनेच घेतली. पु.श्री. काळ्यांचे वास्तववादी नेपथ्य हे या तत्परतेचे फलित होते. ‘सत्तेचे गुलाम’ या नाटकांतील मुंबईच्या प्रिन्सेस स्ट्रीटचा, ‘अशोक स्टोअर्स’ या परिचित पाटीसकट सही सही चित्रित करण्यात आलेला देखावा, नाटकाची नायिका नलिनी गोखले हिच्या दिवाणखान्याचा बॉक्स सेट, हेरंबरावांचे देवघर आणि नाटकाचा नायक वैकुंठ याच्या चेंबूर येथील शेताचे दृश्य, शेतावरील झोपडी, एवढेचे नव्हे तर शेतावरील राखणदार कुत्र्यासकट सारी दृष्ये मराठी रंगभूमीवर प्रथमच दिसून प्रेक्षकांना वास्तव नेपथ्याचे हे दर्शन एक वेगळाच आनंद देत होते व त्यांच्या उत्स्फूर्त टाळ्या मिळवीत होते. पुढे ललितकलादर्शच्या ‘श्री’ नाटकात ह्या वास्तवप्रियतेची मजल – रंगमंचावर घोड्यांच्या रेसचा प्रत्यक्ष घेतलेला चित्रपट दाखविण्यापर्यंत गेली. ललितकलादर्शच्या नाटकांतील श्री. काळ्यांच्या अनेक दृश्यांना गाण्यासारखीच प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त ‘टाळी’ मिळायची ! ‘पडद्याला टाळी’ हे काळ्यांच्या नेपथ्याचे नंतर वैशिष्ठ्यच झाले. पण काळ्यांच्या नेपथ्याचे वेगळे आणि महत्वाचे वैशिष्ठ्य हे की पडद्याला टाळी मिळते म्हणून त्यांचे नेपथ्य गाण्याला वन्समोअर घेणाऱ्या नटाप्रमाणे, रंगमंचावरील आपली पार्श्वभूमीची जागा विसरून कधीही प्रेक्षकांच्या अंगावर येत नसे अथवा रंगमंचावर आपले अवडंबरही माजवीत नसे. नाट्यधर्मी रंगमंचावर अभिनय, संगीत आणि नेपथ्य यांच्या भूमिका व जागा ठरलेल्या असतात. यापैकी कोणीही आपली पायरी सोडून वागले तर नाट्यप्रयोगालाच गालबोट लागते. किर्लोस्कर मंडळी, स्वदेश हितचिंतक मंडळी यांचे हे नाट्यबीद होते. ललितकलादर्शनेही हाच वसा घेतला होता. म्हणूनच ललितकलादर्शची ही तीन्ही अंगे नाट्यानुकूल मर्यादा संभाळून वागत. काळ्यांच्या नेपथ्याने आपली ”नाट्यधर्मी’ संयमाची पायरी अखेरपर्यंत कधीही सोडली नाही. हे जसे काळ्यांच्या नेपथ्याचे श्रेय तसेच ललितकलादर्शच्या कल्पक प्रायोगिकतेचे अभिमानास्पद वैशिष्ठ्य मानले पाहिजे.
लाड पुरवण्यासाठी
नाविन्याचे वेड ललितकलादर्शला आरंभापासूनच होते. पण या वेडाला ‘ध्यास’ म्हणणे अधिक समर्पक ठरावे. नाविन्याच्या ध्यासापायी ललितकलादर्शचे कल्पक चालक खर्च करण्यासही तयार असत. पण हा ध्यास नेहमी रंगभूमीच्या संदर्भातच असे, कोणा एकाच्याच व्यक्तिगत आवडीनिवडीचा नसे, अथवा केवळ एक ‘चूस’ म्हणूनही नसे हे प्रस्तुत विषयात ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. गंधर्व कंपनीच्या संदर्भात काही सुरस गोष्टी मोठ्या कवतुकाने सांगण्यात येत व अजूनही येतात. “ऐशी रुपये जोडीची पादत्राणे, वीस हजार रुपयांचे खऱ्या कलाबतूचे गालिचे, हजार पाचशे रुपयांचा चांदीचा किरीट, सोन्याचे गिलिट केलेले दागिने, हजार दोन हजारांचे भरजरी शालू आणि पैठण्या, नाट्यप्रयोग चालू असताना आपले ‘सोग’ कसे दिसते हे समजावे म्हणून दोन्ही बाजूच्या प्रत्येक विंगमध्ये ठेवलेले मोठमोठे आरसे, पॅरिसहून मागविण्यात आलेले केसांचे, दाढीमिशांचे टोप (विग्ज), प्रेक्षागृहात सर्वत्र मारण्यात येणारे अत्तरांचे फवारे वगैरे वगैरे !!” आज ह्या कथा आठवल्या अथवा ऐकल्या की प्रश्न पडतो हे सारे नेमके कशाकरता होते? रंगभूमीकरता या गोष्टींची तादृश आवश्यकता नव्हती. नेपथ्याचाही तो भाग नव्हता तर रंगभूमीला मखर ठरवून ते सजविण्याचा हा प्रयत्न होता आणि मखरातील उत्सव मूर्तीच्या व्यक्तिगत आवडीनिवडी आणि भाबडे लाड पुरविण्याकरताच त्या होत्या ! गंधर्व काळातलेच नाट्यव्यवसायी श्री. गोविंदराव टेंबे म्हणतात- “नाटक कंपनी नेपथ्याच्या दृष्टीने फार थोड्या भांडवलात उभी करता यावी अशी माझी प्रथमपासूनच कल्पना होती आणि शिवराज कंपनीत ती मी अमलात आणू शकलो. काटकसर केली म्हणून काही कपड्यांची, वाद्यांची किंवा कसलीही कमतरता अथवा दैन्य दिसू दिले नाही. नाटक ही संस्थाच मुळी नकली. त्यात अस्सल वस्तूंचे प्रयोजन काय, असे वाटे. अभिनय देखील अस्सल वाटला तरी तो अभिनयच ! आणि रंगभूमी पुरतीच त्याची प्रतिष्ठा ! मग अशा नकली व्यवसायाकरता निष्कारण खरी व बहुमोल उपकरणे वापरण्याने खऱ्या कलेचा गौरव होत नाही आणि पैशाचा व्यय मात्र होतो व नाट्यव्यवसाय हा हत्तीचे कलेवर होऊन बसतो.” (माझा जीवनविहार) टेब्यांच्या शिवराज कंपनीप्रमाणेच ललितकला दर्शनेही हा पांढरा हत्ती पाळण्याचा निरर्थक महागडा व नाट्य-निषिद्ध व्यवसाय केला नाही.
मखमाली पडदा आणि यांत्रिक घंटा
नाविन्याच्या ध्यासापायी ललितकलादर्शचे चालक नेपथ्याशी प्रत्यक्ष संबंध नसलेल्या गोष्टींवर खर्च करीत असत हे खरे. परिणामी हा खर्च मराठी रंगभूमी प्रगत आणि शिस्तशीर होण्यास कारणीभूत झाला असे आज स्पष्ट होते. केशवराव भोसल्यांच्या काळात नाटक कंपन्यांचा दर्शनी पडदा रुळाचा असे व त्यावर एखादे पौराणिक चित्र रंगविलेले असे. केशवरावांनी ही व्यवस्था बदलून दर्शनी पडदा (ड्रॉप) म्हणून त्या काळच्या मानाने महागडा वाटणारा मखमालीचा एकरंगी पडदा लावला. नंतर इतर कंपन्यांनी त्याचे अनुकरण केलेले आढळले तरी रंगमंचावर पहिला मखमाली ड्रॉप आणला केशवराव भोसल्यांनीच । तसेच प्रस्तुत लेखकाच्या माहितीप्रमाणे नाटक कंपनीची पूर्वप्रसिद्ध घंटा बदलून, तिच्याऐवजी विजेच्या यांत्रिक घंटेची योजना केली ती केशवरावांनी आणि विजेच्या घंटेबरोबरच नाट्य प्रयोग ठरलेल्यावेळीच सुरू करण्याची काटेकोर शिस्त ललित कलेच्या नाट्यप्रयोगांना लावली ती सुद्धा केशवरावांनीच. ह्या प्रत्यक्ष नाट्यप्रयोगाशी संबंध नसलेल्या गोष्टी वाटल्या तरी मराठी रंगभूमीच्या व्यावसायिक दृष्टीने त्या महत्त्वाच्या ठरतात हे नाकारता येणार नाही.
आप्पांची कामगिरी
थोड्या फार फरकाने गंधर्व काळातील नेपथ्याच्या संदर्भात आवर्जून उल्लेख करावा अशी आणखी एक व्यक्ती म्हणजे श्री. यशवंत नारायण ऊर्फ आप्पा टिपणीस । लॉर्ड सिडनहॅम ह्या इंग्रज गव्हर्नरने मराठी रंगभूमीवरून घालवून दिलेल्या छत्रपती शिवाजीची त्याच्या साज-सुरतसह पुन्हा प्रस्थापना करणारे आप्पा टिपणीस । आज मराठी रंगभूमीवर दिसणारे शिवाजीचे अंगरखा, जिरेटोपाचे सोंग ही आप्पांच्या संशोधक दृष्टीची निर्मिती आहे हे कदाचित अनेक शिवशाहीरांना माहीत नसण्याची शक्यता आहे. आप्पा नुसतेच कल्पक, संशोधक नव्हते तर ऐतिहासिक नाटकांच्या ‘यथातथ्य’ नेपथ्याच्या संदर्भात क्रियाशील नेपथ्यकार होते. दुर्दैवाने त्यांची नेपथ्यविषयक महत्वाची कामगिरी विसरली गेली असली तरी नेपथ्याच्याच संदर्भात लिहिण्यात आलेल्या लेखात आप्पांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे कर्तव्य ठरते । ‘बहुरूपी’ या ग्रंथात श्री. चिंतामणराव कोल्हटकर सांगतात की नाटकासाठी करावे लागणारे पडदे, विंगा, झालरी, फ्लॅटस्-त्यांच्या लांबी, रुंदी, उंचीची मापे यांची नेमकी कल्पना तसेच कपंडे वगैरे सामान, अगदी सुतळीच्या तोड्यापासून कांब कसे करायचे याचे पद्धतशीर ज्ञान आप्पांना होते. “रंगभूमीच्या सर्वांगीण तंत्राची आणि मंत्राची जाणकारी असणारी माणसे या व्यवसायात आप्पांखेरीज फारच थोडी असतील” – इति कोल्हटकर. आप्पा स्वतः पेंटिंग करीत नसत. पण पडद्यावरचे दृश्य कसे दिसले पाहिजे हे ते पेंटरला त्याच्या भाषेत समजावून देत. दृश्याच्या बाबतीत मराठी रंगभूमीवर प्रथम आप्पांनी सुधारणा घडवून आणली वास्तवता आणली असे म्हणावे लागेल. पर्वती, शनिवारवाडा. त्यातील गणेश महाल, ओंकारेश्वर अशी आप्पांच्या कलापूर्णतेची साक्ष देणारी कितीतरी दृष्ये महाराष्ट्र मंडळींच्या नाटकांतून प्रेक्षकांनी पाहिली असतील. किर्लोस्करांच्या ‘मानापमान’मधील तंबूची उभारणी आप्पांनीच करून दिली. तोच तंबूचा साचा अद्यापही रूढ आहे.” “जी गोष्ट दृष्यांची तीच गोष्ट पोषाखाचीही. मराठेशाहीच्या सुरवारी, अंगरखे हे आप्पा स्वतः धंदेवाईक शिंप्यालाही कापून देत. ब्राह्मणी, रजपुती, मराठेशाही, पेशवेशाही असे अंगरख्यांचे फरक प्रथम आप्पांनी भाऊबंदकीसाठी तयार केले. त्याचप्रमाणे मराठेशाहीचे व पेशवाईतील अलंकार, ऐतिहासिक वर्णनाप्रमाणे त्यांनीच प्रथम तयार करून घेतले. नाना फडणविसांचे पागोटे व शिवाजीचा जिरेटोप ही आप्पांच्या शोधक बुद्धीने रंगभूमीला दिलेली शिरोभूषणे आहेत..” “मेकअप करण्याकरता पूर्वी सफेदा, हिंगूळ, पिवडी वगैरे साधेच रंग पाण्यात कालवून वापरीत. ग्रीजपेंट लावण्याची पाश्चात्य रंगपटातली प्रथा माहीत झाल्यावर आप्पांनी व्हॅसलिनमधले रंग तयार करण्यास सुरुवात केली. नटाने तोंडाला लावण्याच्या रंगाचे पहिले संशोधक आप्पा टिपणीस व भागवत हेच होते. पुढे सर्व नाटक मंडळ्यांतून याच रंगाचा वापर होऊ लागला.” केशवराव भोसल्यांची ललितकलादर्श, गोविंदराव टेब्यांची शिवराज मंडळी व बालगंधर्वांची गंधर्व नाटक मंडळी. या तिन्हीही नाटक मंडळ्यांशी आप्पांचा संबंध नाटककार म्हणून आला असला तरी नेपथ्यकार आप्पांचा फायदा घेतला ललितकलादर्श व शिवराज मंडळी यांनीच ! मराठी रंगभूमीचा एक जाणकार नेपथ्यकारच लेखक आहे. हे या दोन्ही नाटकांतील नेपथ्याने व वेशभूषेतील यथातथ्यतेवरून स्पष्ट व्हायचे!!! गंधर्वकालीन नेपथ्याचा येथवर स्थूलमानाने आणि थोड्याफार स्वैर मनाने विचार केल्यावर गंधर्वकाल गाजविणाऱ्या गंधर्व कंपनीच्या संदर्भात काही प्रश्न, काही शंका मनात येतात. गंधर्व कंपनीच्या संगीत नाटकांच्या यशात रंगमंचावरील नेपथ्याचा सहभाग किती असायचा? गंधर्व कंपनीच्या नाटकांतील नेपथ्य आणि वेशभूषा नेपथ्यशास्त्रानुसार किती समर्पक, सापेक्ष व नाट्यधर्मी असे? नव्या नाटकागणिक कंपनीच्या नेपथ्यात कल्पकता, प्रगतीशीलता, योजकता वगैरे वैशिष्ठ्ये आढळायची काय? गंधर्व काळातच काही नामवंत नाटक मंडळ्या नेपथ्याच्या नाविन्याबद्दल, प्रगततेबद्दल आस्था दाखवीत, व ती प्रत्यक्षात मूर्त करण्याचा प्रयत्न करीत. याकरता आवश्यक तो खर्चही करीत. या प्रयत्नांची दखल गंधर्व कंपनीने किती घेतली? आणि तसे प्रयत्नशील होण्याचा किती प्रयत्न केला? वगैरे वगैरे वगैरे. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरिता विस्तृत संशोधनाची आवश्यकता आहे.