अविस्मरणीय षोडशी
मामा पेंडसे
१९४४ साली मुंबईत मरीन ड्राईव्हवर जो शतसांवत्सरिक नाट्य महोत्सव झाला. त्यावेळी, मी बालगंधर्वांना ‘शारदा’ नाटकात इंदिराकाकूंच्या भूमिकेत बघितलं. लगेच दुसऱ्या रात्री ‘सौभद्र’ नाटकात अर्जुनाच्या भूमिकेत बघितलं. गंधर्वांच्या गाण्याचा अथवा अभिनयाचा ठसा मनावर उठावा अशा त्या भूमिकाच नव्हत्या. गंधर्वांची लक्षात राहील अशी भूमिका मी त्याच वर्षी नाशिकला जो शतसांवत्सरिक महोत्सव झाला त्यावेळी ‘संशयकल्लोळ’ नाटकात रेवतीच्या रूपात पाहिली. गंधर्वांचं वय त्यावेळी छपन्न ! विनायकबुवा पटवर्धन आश्विनशेट, गणपतराव बोडस फाल्गुनराव, सदुभाऊ रानडे कृत्तिका, भांडारकर भादव्या, सगळी नामवंत पात्रे होती. पहिल्या अंकात आश्विनशेट ‘कर हा करी धरिला शुभांगी’ असं म्हणून पतिपत्नीचं किंवा त्यासारखं नातं निश्चित झाल्यानं खुषीत असतो. रेवती ‘सत्यनारायणाचं’ त्याला कळवून जायला निघते. यावेळी उतावळेपणानं आश्विनशेट म्हणतो, ‘आता यावर एक गोडसा…” आणि याक्षणी ५६ वर्षं वयाची रेवती एखाद्या षोडशी प्रमाणं जो अभिनय करते तो एवढा विलक्षण असतो की मी तो आयुष्यात विसरू शकलो नाही. कोवळ्या प्रेमिकाचा उतावळेपणा धोरणी स्त्रिया कसा निःशेष करतात याचं ते अविस्मरणीय प्रात्यक्षिक होतं. अनेक स्त्रियांनी किंवा पुरुष नटांनीही केलेल्या रेवतीच्या भूमिका मी पाहिल्या आहेत. पण बालगंधर्वांनी अभिनयाची जी जागा दाखविली ती कुणातही मला आढळली नाही.. अगदी नैसर्गिक लाडिकपणा. त्यांच्या गाण्याबद्दल प्रश्नच नाही युगायुगात होऊन जाणारा त्यांच्यासारखा एखादाच, त्यांचे शब्दोच्चार कौतुकास्पद मांनले जातात पण माझ्या मते बोडसांचे उच्चारण गंधर्वांहून सरस होते. पण महान माणूस यात शंका नाही. गुण मोठे आणि… पण नको.
शब्दांकन – रामकृष्ण बाक्रे