Logo

गंधर्व नावाचे कोडे

दुर्गा खोटे

बालगंधर्व नावाचं कोडं अद्याप सोडवतेय. त्र्याऐंशीच्या उंबरठ्यावर उभी आहे. पण हे कोडं काही सुटत नाही पहा. गंधर्वांची माझ्यावर इतकी मोहिनी का? नाही सांगता येणार. आजही कुणी त्यांचा उल्लेख केला, त्यांच्याविषयी कुठे काय वाचलं की मनात आठवणींचा महापूर दाटून येतो. वाटतं या क्षणाला गंधर्वांना मी पाहतेय ! त्यांच्याशी बोलतेय ! त्यांचं गाणं ऐकतेय…!

मी त्यांना ‘नारायणराव’ म्हणत असे. ते मला ‘बानूताई’ म्हणत. शेवटपर्यंत मला ‘अगं तुगं’ करीत. नारायणरावांबद्दल काय सांगू? त्यांच्याबद्दल मला अभिमान आहे, आपलेपणा आहे. प्रेम आहे, दुःख वाटते, राग आहे. माझ्यावर त्यांनी जणू साम्राज्यच केलं.

नारायणरावांना प्रथम स्टेजवर पाहिलं तेव्हा मी अवघी पाच वर्षांची होते. भामिनीचं काय अप्रतिम सोंग काढलं होतं त्यांनी ! नंतर पुढची दहा-बारा वर्षं गंधर्वांची सगळी नाटकं कित्येकदा पाहिली असतील त्याची गणतीच नाही. जसं जमेल तसं पपांबरोबर नाटकाला जायचं. एल्फिन्स्टन थिएटरातल्या त्या निसरड्या खुर्य्या सरकत सरकत आम्ही घसरून खाली यायचो. दोन्ही बाजू घट्ट धरून बसायचं. पण नाटक पाहायचं.

पुढे लाड कुटुंबाचा आणि नारायणरावांचा घरोबा वाढला. ते आमच्या कांदेवाडीच्या घरी नियमित येत. अनेकदा पंक्तीला बसत. माझ्या आईला ते आक्का म्हणत. आले की विचारत – “आक्का, आज माझ्यासाठी काय रांधणार?”

लाड मॅन्शनमध्ये, नेपियन सी रोडच्या घरी आणि एकदा या कफ परेडच्या ‘गुलिस्तान’वर सुद्धा नारायणराव येऊन गेलेत. खूप माया केली माझ्यावर.

दर ख्रिसमसला नारायणराव लाड कुटुंबाबरोबर लोणावळ्याला येत. आमच्या बरोबर राहत. आमच्या कुटुंबातलेच एक होऊन. नाताळच्या रात्री त्यांचं बंगल्यावर गाणं होई. माझा एकच हट्ट – ‘उगीच का कांता’ म्हणा, अन् नारायणरावही माझी ही मागणी दर खेपेला मान्य करीत.

नारायणरावांचं वागणं-बोलणं स्वच्छ अन् निर्मळ, लाड कुटुंबात ते कधी वेडंविद्रूप वागले-बोले नाहीत. स्त्री-भूमिका त्यांनी प्राण ओतून साकार केल्या. पण ते सगळं नाटकापुरतंच. फूटलाईट्सची मर्यादा, ती रेषा त्यांनी ओलांडली नाही. पेशा आणि त्यांचं व्यक्तिगत आयुष्य याची सरसकट सरमिसळ कधी झाली नाही. याला कारण नारायणरावच. त्यांचं भान कधी चुकत नसे. फारसं शिकले नव्हते. पण माणूस बहुश्रुत होता. अन् चौकसही. पप्पांना जगभरची ख्याली खुशाली अधूनमधून विचारीत राहायचे.

 साडीचा वेगळाच नूर

एकदा बरं का, माझ्यासाठी लुगडं घेऊन आले. आईला म्हणाले, “आक्का, आपली बानूताई आता मोठी झाली ना, आता ती लुगडी नेसणार, मी पहा लुगडं घेऊन आलो !’

पाहत राहावं असं लुगडं, इरकली अन् त्याला जरीचा पदर, अन् अंगभर जरच जर. मी आजवर इतक्या साड्या पाहिल्या, पेहेरल्या. लाड अन् खोटें कुटुंबांत तर साड्यांचा पाऊसच. पण अद्याप असं लुगडं पाहिलं नाही. इरकलीला जरीचा पदर मी नाही पाहिला. काय पोत ! बांधणी काय सुरेख ! जड आहे पातळ, इट इज फुल ऑफ गोल्ड, पण कसं मऊ आहे। सत्तर वर्षे होऊन गेली, पण जरासुद्धा हललं नाहीये बघा. मी प्राणापलिकडे जपून ठेवलंय आजतागायत. ‘खडाष्टक’, ‘संशयकल्लोळ’ अन ‘भाऊबंदकी’त मी असंख्य वेळा ही इरकली नेसली आहे. काही वेगळाच नूर आहे या साडीचा !

गंधर्वांना स्टेजवर पाहिलं की डोळ्यांचं पारणं फिटून जाई. नखशिखान्त सुंदर दिसत. अप्रतिम सुन्दर. ही वॉज अ ब्युटीफुल वुमन अॅण्ड अ हॅण्डसम मॅन. आता हा हिशोब तुम्हाला जुळवता येतो का पहा. बाईने कसं वागावं-बोलावं याचा मापदंड म्हणजे नारायणराव. द्रौपदी कशी असेल, सिंधू, रेवती, शारदा साक्षात अवतरल्या तर त्या सगळ्या कशा दिसतील असतील? गंधर्वांसारख्या. बस एकच उत्तर.

पुढे, तेवीस साली माझं लग्न झालं. लग्नात नारायणरावांनी मला नाकातली चूक भेट दिली. अन् मिस्टर खोट्यांना हिऱ्याची आंगठी !

खोट्यांच्या घरात सिनेमा-नाटकांना मज्जाव होता. साधी नारायणरावांची तबकडीही ऐकण्याचं सुख नव्हतं. कधीकाळी माहेरी आले लाड मॅन्शनमध्ये की जात असे अधूनमधून नाटकांना पपांबरोबर.

पण आस्तेआस्ते नारायणरावांच्या वृत्तीत बदल होऊ लागला. हा बदल पपांना लाड कुटुंबियांना जाणवू लागला. पुष्कळ नवे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. यशही नारायणरावांच्या डोक्यात भिनत होतं. पपा म्हणायचे “नारायणराव, खर्च आवरा.” ते म्हणायचे, “साहेब, हा डोलारा असाच चालणार. गंधर्व कंपनीची इतकी पुण्याई गाठीशी आहे की काळजी कशाला पाहिजे?”

नारायणराव मुळाचेच तसे हट्टी. निग्रही. त्यात नव्या गोतावळ्यातला कुणी त्यांना सल्ला देत नसे. ते कुणाचंही ऐकेनात. आपल्या गळ्यावर त्यांची भिस्त. जोवर आपण गातो आहोत तोवर कंपनीला मरण नाही असं त्यांना वाटे. पण अभिनयाचं काय ? वय वाढत होतं. त्यानुरुप भूमिका ते करीत नसत. शरीर थुलथुलीत, थोराड, अन रेवतीच्या अवखळ भूमिकेत येत. सोंग म्हातारं झालं होतं. अभिनय रेंगाळू लागला. सगळ्या कंपनीला खीळच बसली. नारायणराव आपली ही परवड सांभाळू शकले नाहीत याची खंत काळजाला चरे पाडते.

एकतानता पूर्वीसारखीच

नारायणरावांना रंगमंचावर मी अखेरचं पाहिलं ते ‘एकच प्याला’मध्ये. तब्येत हडकली होती. साहित्य संघातले लोक म्हणाले- बाई, तुम्ही प्रयोग बघून या. नाहीतर तुम्हाला चुटपुट लागून राहील. मलाही पटलं. परळच्या सेंट जॉर्ज हॉलवर प्रयोग होता. मी गेले. मध्यंतरात आत निरोप पाठवला – म्हणावं, दुर्गाबाई आलीये. नारायणरावांनी परत निरोप धाडला – ‘म्हणावं, बानूताईला यायला संमती लागत नाही. विंगेत ये.’

मी आत गेले. नारायणराव बाकड्यावर बसले होते. मी म्हणाले- नारायणराव, मी आल्ये, तर ते म्हणाले – हो, कळलं मला, बानूताई, पण आत सरळ आली नाहीस ना. निरोप कसले धाडतेस ?

सिंधूचं जुनेरं नेसू नेसले होते. ठिगळबंद, हातात निऱ्यांचा सोगा. एवढ्यात त्यांची ‘एण्ट्री’ आली. नारायणराव लगबगीने उठले. पदर ठाकठीक केला. अन् सिंधू झाले. साक्षात करुणामयी सिंधू, शरीर थकलं होतं. पाय लटपटत होते. पण भूमिकेशी तद्रूप होण्याची एकाग्रता, एकतानता, पूर्वीसारखीच. तसूभरही फरक नाही. गळ्यातला सूर बराचसा कात, पण गोडी तशीच. चिरमधुर. मी विंगेतून नारायणरावांना पाहात होते. भरल्या डोळ्याने.

नंतर एकदा ‘गुलिस्तान’वर आले. बरोबर गोहरबाई होत्या. नारायणरावांना अडचण होती. गोहरबाईंचं घर सोडवायचं होतं. या समोरच्या व्हिक्टोरियन कोचावर बसले होते. म्हणाले- ‘बानूताई, बाबाचं घर सोडवायचंय. मदत हवी’, मी म्हटलं, ‘तुम्हाला जेवढी मदत पाहिजे तेवढी देण्याची ऐपत नाही माझी, नारायणराव’. तर म्हणाले ‘बराय. तुझी मर्जी !’ अन् गेले. मी बाल्कनीतनं पाहात राहिले.

मनात विचार आला की या माणसाने माझं बालपण उजळून काढलं. छोटी बानूताई लाड गंधर्व कंपनीच्या झगमगाटात न्हाऊन निघाली. मला वाटे की गंधर्व म्हणजे अमोलिक वस्तू आहे. एकदम दुसऱ्या जगातली. लहानग्या मुलीचं टिकलीएवढं जग. या जगाच्या सगळ्या वाटा नारायणरावांनी सोन्याने मढवून टाकल्या. मन त्यांच्या सुरामागे लागून राहायचं. या माणसाचा यशोदायी वैभवकाल मी जवळून पाहिला. अन् याचा अस्तकालही, नारायणरावांनी मला असं सर्वरूपेण भारून टाकावं या मागचं कारण मला समजत नाही.

नारायणरावांचं एक रूप माझ्या आठवणीत चिरकाल दरवळत राहील. लहानपणी मी पपांबरोबर एल्फिन्स्टनवर जात असे. पडदा पडला की आम्ही आत. नारायणराव असतील त्या ड्रेपरीज ड्रॉपला प्रणाम करायचे. जणू काय समाधीच लागायची त्यांची. तटस्थ डोळे मिटलेले. डोकं ड्रॉपला, खाली वाकलेले. कितीतरी वेळ. रंगदेवतेची आणि नारायणरावांची ही निःशब्द गळाभेट मी पाहात असे. नारायणराव रंगदेवतेशी काय बोलत असतील असा प्रश्न पडायचा. अद्याप हे कोडं सुटलं नाहीये. सुटणार नाही.

शब्दांकन – अंबरीश मिश्र

Scroll to Top