ऑर्गनमधून उमटणारे शब्द
गोविंद पटवर्धन
मला आता नक्की तारीख आठवत नाही. पण शास्त्री हॉलमधील कार्यक्रमाच्या वेळी नारायणरावांची ऑर्गनवर साथ करण्याची पहिली संधी मला मिळाली. ती संधी देण्याचं औदार्य अनंतराव लिमये यांनी दाखवलं नसतं तर कठिणच होतं. ‘मी साथ करीत होतो’ हा शब्दप्रयोग माझ्याबाबतीत बरोबर आहे असं मला वाटत नाही. माझ्याकडून नारायणरावांच्या गाण्याची साथ होत असे हा वाक्यप्रयोग अधिक खरा. कारण माझं संगीताचं ज्ञान शास्त्रीय कसोटीवर उतरणारं नव्हतं. जे कानावर पडे ते ऑर्गनमधून उमटे. ही क्रिया कशी घडे ते मला आजही सांगता येणार नाही. घडले हे तर आता सर्वच जाणतात. नारायणरावांना माझी साथ आवडे याचा अप्रत्यक्ष पुरावा एके दिवशी अनपेक्षितरीत्या मजकडे चालून आला. नारायणराव मुंबईहून पुण्यास चालले होते आणि माझे मेहुणे (पत्नीचे बंधू) हे योगायोगानं नारायणरावांच्या समोरच्या सीटवर बसले होते. आपण कोण, गोविंद पटवर्धन यांच्याशी आपलं काही नातं आहे का वगैरेचा अजिबात पत्ता न लागू देता मेहुण्यांनी नारायणरावांना विचारलं, “अलिकडे गोविंद पटवर्धन यांना ऑर्गनच्या साथीसाठी घेता, कशी वाटते त्यांची साथ?” “काय सांगू मायबापा तो मुलगा खरोखर फार चांगली साथ करतो बरं”- नारायणराव. मेहुण्यांनी पत्राने हे बोलणं मला कळवलं तेव्हा अंगावर मूठभर मास चढल्यासारखं वाटलं मला. नारायणरावांची साथ करताना ऑर्गनमधून पदाचे शब्द उमटत आहेत असा भास श्रोत्यांना व्हावा आणि जणू नारायणरावांचेच शब्द ऑर्गनमधून अनुकरण करीत येत आहेत इतका तो सच्चा भास असावा असं मला वाटे. यामुळं नारायणरावांच्या शब्द उच्चारण्याकडे माझं फार लक्ष असे. गेल्या काही वर्षांत नारायणरावांची नाटकं तालमीच्यावेळी वाजवीत असता इतर नटी जे चुकीचे आघात करीत ते दुरुस्त करून घेतल्याखेरीज मला चैन पडत नसे. ‘सुखवी तुला, दुखवी मला’ हे ‘धनराशी दिसता मूढापाशी’ या पदातील शब्द नव्या जमान्यातील एक नटी जेव्हा ‘ज्ञानबा तुकाराम’च्या धर्तीवर म्हणू लागली तेव्हा ‘ऑर्गनऐवजी टाळ घ्या टाळ साथीला’ असं मी ओरडलो. नारायणरावांच्या गाण्याचं विडंबन होतं ते. नारायणरावांचा आवाज साफ असला की पांढरी चार हा त्यांचा स्वर असे. त्यांच्या आवाजाचं तानमान पाहून अनंतराव लिमये त्या दिवशीचा स्वर ठरवीत. काळी दोनही ठेवीत आणि काळी चारमध्ये मध्यम करीत. २०-२१ साली गंधर्वांनी कंपनीत ऑर्गन दाखल केला. ऑर्गनचे सूर आडवे बसविलेले असतात आणि कोदणात बसविल्यासारखे असल्याने ते पेटीपेक्षा अधिक मधुर. त्यात पुनः सारंगीची मिलावट. गंधर्वांचं मुळात स्वर्गीय असलेलं गाणं अधिक स्वर्गीय का बरं नाही होणार?
शब्दांकन – रामकृष्ण बाके