
सर्वांगी सुंदर
मल्लिकार्जुन मन्सूर
गंधर्वांची कंपनी नेहमी हुबळीला यायची. त्यावेळी मी लहान होतो. असेन फार तर वीसबावीस वर्षांचा. आम्ही दोस्त मंडळी त्यांची नाटकं बघायला जात असू. बघायला म्हणजे काय हो? नाटक बघायचं निमित्त करून आम्ही त्यांची पदं ऐकायला जात होतो. त्यांच्या स्टेजवर स्वरांचा भरणा भरपूर. विंगेत एकएक ऑर्गन. पुढे मोठा ऑर्गन. त्याच्या दोन्ही बाजूला दोन सारंग्या. तबल्यावर तिरखवाँ. त्यामुळे संपूर्ण थिएटर कसे सुरमय होऊन जात असे. नारायणरावांचे गाणे म्हणजे ईश्वरी देणेच होते. कोणाला चांगला गळा असतो. कोणाला नुसतीच बुद्धी असते. तर कोणाच्या गायकीत सहजता असते. पण नारायणरावांत या तिघांचाही ‘सर्वांगी सुंदर’ असा अपूर्व संगम झाला होता. ‘पुनश्च’ घेऊन अर्धा अर्धा ताससुद्धा ते एक पद गायचे. ते ऐकताना आम्हाला असं वाटायचं की भर उन्हाळ्यात आम्ही स्वरांच्या थंडगार शॉवरबाथखाली बसलो आहोत. त्या गळ्यात यत्किंचितही दोष नव्हता. गळ्याचा मोड अप्रतिम. त्यामुळे त्यांच्या गायकीतल्या हरकती अगदी पेळूतून सूत कातल्या इतक्या विनासायास येत. गातांना ते इतके तल्लीन होऊन जात की हा गृहस्थ आत्मानंदासाठी गात आहे हे समोरील प्रेक्षकाला लगेच कळून येई. पडद्यापुढं जरी गंधर्व गात असले तरी त्यांच्या पाठीमागे त्यांचे गान-गुरू भास्करबुवा बखले यांची मूर्ती फिरते आहे असं वाटे. कारण नाट्यगायन कसं असावं याची संपूर्ण तालीमच भास्करबुवांनी त्यांना दिली होती. भास्करबुवा स्वतः किर्लोस्कर कंपनीत गायक नट असल्यामुळे स्टेजच्या अंगानं कसं गायचं हे त्यांना बरोबर माहीत होतं. त्यांनी अस्सल चिजा, रागरागिण्या यांत बांधलेली नितांत सुंदर पदं नारायणरावांना अशी काही बसवून दिली होती की गाणं न कळणाऱ्यालासुद्धा अगदी मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटावं.
कलावंताला जात नसते
त्याकाळी सगळ्याच संगीत नाटकांची संपूर्ण पुस्तकं जरी निघत नसली तरी पद्यावळी निघत. त्यांत पदाच्या रागाचं नांव, ताल, चाल ही दिलेली असे. अशा या नाटकांतील पदांमुळेच शास्त्रीय संगीताची तोंडओळख आणि प्रसार चोहीकडे झाला. भूप राग कसा असतो – तर ‘सुजन कसा मन चोरी’त नारायणराव गातात तसा – हे सामान्यातल्या सामान्य माणसाला कळू लागलं. त्यावेळी हुबळीतल्या सर्वच लोकांना मराठी कुठं समजत होतं? पण गंधर्व कंपनीच्या नाटकांना लोक अशी गर्दी करीत की विचारता सोय नाही. मराठी बरोबर न समजणारे कानडी प्रेक्षक ‘मानापमान’ संपताना आपापसात म्हणत, “माना आयतु. अपमाना आयतु. आदरे मानप्पा बरलिल्ला.” म्हणजे “मान झाला. अपमान झाला. तरीपण (शेवटपर्यन्त) मानप्पा नाही आला.” म्हणजे लोक हे गंधर्वांच्या शब्दांसाठी नाही तर सुरांसाठी जात असत. जातिवंत अभिनय कळायला त्यांना भाषा येणं आवश्यक वाटत नव्हतं. ज्यावेळी पहिल्या रांगेचा दर तीन रुपये आणि पिटाचा चार आणे होता त्यावेळी नारायणराव तीन तीन हजारांचं बुकिंग हुबळीतल्या गणेशपेठ थिएटर किंवा मल्लिकार्जुन रंगमंडपात घेत असत. दूरदूरचे लोक आठ आठ दिवस आधी तारेनं रिझर्वेशन्स करीत. बहुसंख्य लोक बैलगाड्या जोडून नाटकाला येत. नारायणरावांच्यामुळे आम जनतेत गाण्याची आवड पैदा झाली हे सत्य कोणाला नाकारून चालणार नाही. स्वतःचा चार-पाच तासपर्यन्त तरी का होईना, संपूर्णपणे विसर पडू शकेल असं नाटक-गायन ही काय चीज आहे ते नारायणरावांनी सिद्ध करून दाखविलं. एक गंमत सांगतो. हुबळीत रविवारी दुपारी नारायणराव ‘एकच प्याला’चा हातखंडा प्रयोग लावीत असत. त्यात त्यांची सिंधूची अविस्मरणीय भूमिका असे. पण शेवटी सिंधू मरते. तेव्हा बुधवारी रात्री ‘मानापमाना’त भामिनीच्या रूपाने किंवा ‘संशय कल्लोळा’त रेवतीच्या रूपाने गंधर्व पुनः जिवंत झालेले बघूनच भाबडे लोक आपापल्या गावी परत जात असत. इतकी त्यांची नारायणरावांवर अपूर्व भक्ती होती. गंधर्व सगळ्यांचे होते. ‘सारेगम’ महाराष्ट्रात निराळा आणि कर्नाटकात निराळा असं थोडंच असतं? कलाकाराला जात नसते. त्यानं फक्त सगळ्यांसाठी गात रहायचं असतं.
नादब्रह्माची ओढ असेपर्यंत
मंजीखाँसाहेबांच्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसांत बडोद्याला एक म्यूझिक सर्कल स्थापन झालं होतं. फत्तेसिंगमहाराजांनी त्याचं उद्घाटन केलं. तिथं माझं गाणं नुकतंच संपलं होतं. इतक्यांत हॉलमध्ये नारायणरावांना खुर्चीतून आणण्यांत आलं. त्यांना चालण्याचा त्रास नुकताच सुरू झाला होता. मी दिसताच मला मिठी मारून ‘आपले मंजीखाँसाहेब गेले हो’ म्हणत ते लहान मुलासारखे ओक्साबोक्शी रडू लागले. भास्करबुवांनी मंजीखाँसाहेबांचा गंडा ‘बांधला होता आणि अल्लादियाखाँसाहेबांचे तर मंजीखाँ सुपुत्र. नारायणरावांच्या भावनांचा हा नैसर्गिक आणि पारदर्शी उद्रेक पाहून तेथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच गलबलून आले. नारायणरावांनी मला पुनः गायला लावले. तासदीड तास गायल्यानंतर नारायणरावांच्या चेहऱ्यावर पूर्ण समाधान झळकले. नारायणराव आमच्याच घरातले असं वाटायला आणखी एक कारण होतं. माझे बंधू बसवराज यांनी ‘विश्वदर्शन नाटक कंपनी’ काढली होती. त्यात ते हीरोचं काम करीत. त्यांच्याकडे कर्नाटक गोहर हिरॉईन होती. गोहरची नारायणरावांवर तेव्हा अती भक्ती होती. त्यांच्या फोटोची त्या पूजा करीत असत. ती त्यांच्या गाण्याचीही सहीसही कॉपी करी. कानडीत त्यांच्या रेकॉर्डसूही निघाल्या होत्या. त्यांच्याप्रमाणेच कर्नाटक-गंधर्व गंगाधरप्पा हेही नारायणराव आणि केशवराव भोसले यांची डिट्टो नक्कल करीत असत. पण शेवटी नक्कल ती नक्कल. तिला बावनकशी अस्सलाची प्रतिष्ठा कशी लाभणार? नारायणराव म्हणजे एकटे नारायणराव. परत तसा कोणी दुसरा होणार नाही. काळ अनंत आहे. पृथ्वी विपुल आहे. आवडीनिवडीच्या चाळण्याही खूप आहेत, होतील. तुम्ही-आम्ही कालौघात नामशेष होऊ पण जोपर्यन्त लोकांना नादब्रह्माची ओढ आहे तोपर्यन्त बालगंधर्व आणि त्यांच्यासारख्याच बेगम अख्तर या व्यक्ती अजरामर राहतील.