
सुरेलपणाची परिसीमा
सुधीर फडके
बालगंधर्व हा परमेश्वरानं पाठवलेला माणूस. खुद्द परमेश्वरालाही पुनः तसा घडवता येईल की नाही याची शंका वाटते. या ईश्वरी गाणं गाणाऱ्या माणसाची मी एकलव्यासारखी उपासना केली असा माझा नम्र दावा आहे. शास्त्रीय संगीत गोड असतं, श्रवणीय असतं, हे जनसामान्यांना पटवून देणाऱ्या हिराबाई. पण त्यांच्याही पूर्वी त्याची मोहिनी जनसामान्यांवर कोणी टाकली असेल तर ती बालगंधर्वांनी. हिराबाई व बालगंधर्व यांच्या गायनपद्धतीत खूप साम्य आहे असं मला पहिल्यापासून वाटत आलं आहे. त्यामुळं मी प्रथम हिराबाईंच्या गाण्याचा अभ्यास केला व त्याचा लाभ असा झाला की नंतर बालगंधर्वांचं गाणं आत्मसात करणं मला जास्त सोपं गेलं. गंमत अशी की दोन परस्परविरोधी गायन पद्धतीचा माझा अभ्यास एकाच वेळी चालू होता. गुरुवर्य पाध्येबुवांकडे त्यांचा विद्यालयाबाहेर घरी, दारी, रस्त्यातून जात असता वेड लागल्याप्रमाणं हिराबाईंच्या आणि गंधवांच्या गायनपद्धतीचा.
गंधर्वांची भजनं
बालगंधर्वांच्या ध्वनिमुद्रिकांवरून त्यांच्या गायन पद्धतीचा माझा सारा अभ्यास झाला असं नव्हे. लहानपणी मुंबईस रॉयल ऑपेरात मी त्यांचं ‘स्वयंवर’ नाटक पाह्यलं होतं. १९३४ साली गंधर्व कंपनी कोल्हापुरात आली असता ‘कान्होपात्रा’ बघितलं, ‘एकच प्याला’ बघितलं. १९३० पासून हिराबाईंच्या गाण्याचं वेड होतंच. आता कोल्हापुरात गंधर्वांची एकूण एक नाटकं मला पहावयास मिळणं अशक्यच होतं. पण कंपनी कोल्हापुरात होती तोपर्यंत दर गुरुवारी अंबाबाईच्या देवळात रामाच्या पारावर गंधर्वांची भजनं होत. अलोट गर्दी होई. ती भजनं मी कधी चुकविली नाहीत. १९३६च्या ऑक्टोबरपासून मी मुंबईत राहू लागलो. मुंबईतही नाना शंकरशेट यांच्या मंदिरात बालगंधर्व, लोंढे, वालावलकर ही मंडळी भजनास उभी रहात. हरिभाऊ देशपांडे ऑगर्नवर असायचे आणि साथीला पखावज. ही भजनं हेच माझे अभ्यासाचे पाठ असत. नारायणरावांच्या कितीतरी जागा अशावेळी बुद्धीवर रजिस्टर होऊन जात.
गंधर्वपद्धतीची संगीत रचना
मी ज्यावेळी एच्.एम्.व्ही. मध्ये संगीत दिग्दर्शक झालो तेव्हा ‘नंदलाला नाचरे’ व ‘विनवित शबरी रघुराया रे’ ही दोन गाणी हिराबाईंकडून आणि ‘सावळाच रंग तुझा’ व ‘गोकुळीचा राजा, माझा’ ही माणिक वर्माकडून गाववून ध्वनिमुद्रित केली. ही चारही गाणी खूप गाजली. ती शिकवितांनासुद्धा नारायणरावांची पद्धत गाणाऱ्यांच्या गळ्यातून उतरावी असा प्रयत्न असे. १९५० साली मी ‘विठ्ठलरखुमाई’ हा चित्रपट काढायचं ठरवलं. त्यात तुकारामाचं काम बालगंधर्वांनी करावं अशी माझी इच्छा होती. तो चित्रपट हा एक, संतमालिकेतला चित्रपटच होता. ज्ञानेश्वर, एकनाथ वगैरे. बालगंधर्वांचा मुक्काम नागपूरला श्रीमंत बाबुराव देशमुखांकडे होता. तेथील आकाशवाणीकेंद्राचे एक अधिकारी श्री. सीताकान्त लाड यांच्याकडे जाऊन नारायणरावांची भेट घेतली. करार झाला. त्यावेळी १२ हजार रुपयात बालगंधर्व मिळाले । आज नारायणरावांच्या वळणाच्या म्हणून ज्या चाली गाजताहेत ते अभंग म्हणजे, ‘शरण शरण नारायणा’, ‘वेद अनंत बोलिला’, ‘विष्णुमय जग’, ‘आम्ही जातो आमुच्या गावा’. हे अभंग नारायणरावांनाच गायचे होते. म्हणून नारायणरावांच्या पद्धतीला जास्त जवळ अशी संगीतरचना मी केली. मी नम्रपणे सांगू इच्छितो की त्या काळातील अन्य संगीत रचनाकारांपैकी गंधर्वपद्धतीला जवळ अशी रचना अन्य कोणी केली असती की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. पण या चित्रपटामुळं बालगंधर्वांशी अगदी जवळचे संबंध आले. इतके की एकदा तर माझ्याकडून थोडसं साहसचं झालं. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’ हा अभंग बसवून घेत असता मी त्यांना ‘रेम सा नि सासा’ ही जागा सांगत होतो आणि ते पुनःपुन्हा ‘रेम सा सा’ घेत होते. मी त्यांना दुरुस्त करण्याचा प्रयत्न स्वर उच्चारून केला. त्या महान आत्म्यानं काय म्हणावं? ते म्हणाले, ‘सुधीरराव, ती सरगम बिरगम नाही हो कळत मला !’ मी दिड्यूढ झालो ! त्यांना खरंच सरगम कळत नव्हती की त्यांनी उगीचच अज्ञान दाखविलं? खरंच त्यांना कळत नसेल तर ते परमेश्वरच होते असं म्हटलं पाहिजे.
सगळ्या जागा गंधर्वाच्या
पंचवीस-तीस वर्षांपूर्वी नारायणरावांचं गाणं जसं मी दाखवू शकत होतो तसं आज दाखवू शकत नाही. ‘सुवासिनी’ चित्रपटात ‘येणार नाथ आता’ हे पद आशाबाई गायल्यात. गंधर्व ज्या पद्धतीनं जागा घेतील तशाच आशाबाईंकडून घेतल्या जाव्यात असे प्रयत्न मी केले आणि आशाबाईंनी त्या प्रयत्नांचं सोनं केलं. तीच गोष्ट गीतरामायणातील ‘मज सांग अवस्था दूता रघुनाथाची’ या पदाची. माणिक वर्मा ते गायल्यात. सगळ्या जागा गंधर्वांच्या. एकलव्याची आराधना मी सुरू केली. त्या वयात बालगंधर्वांच्या गाण्याचं शब्दात वर्णन करण्याची माझी क्षमता नव्हती. ‘ते छान आहे, कानाला गोड लागतं’ एवढंच त्यावेळी वाटायचं. आता वाटतं की बालगंधर्व तन्मयतेनं गात होते. गाताना त्यांचे शब्दोच्चार स्वच्छ आणि मधुर असत. स्वच्छ शब्दोच्चार आणि मधुर व स्वच्छ शब्दोच्चार करणारे अपवादात्मक. या अपवादात्मक व्यक्तींत बालगंधर्व सर्वश्रेष्ठ । असेच दुसरे अपवादात्मक गायक होते कुंदनलाल सैगल. पण ते बंगालमधले. बालगंधर्व म्हणजे सुरेलपणाची परिसीमा. ते अधिक सुरेल की ऑर्गन अधिक सुरेल हे सांगता येणार नाही. लयीचं भान गंधर्वांची तान म्हणजे जणू मोत्याची लडी. एकेक मोती सफाईदारपणे आणि डौलात गुंफला जाऊन ती दाणेदार तान लड बने. चार किंवा आठ मात्रांच्या तालात प्रत्येक गवयी गातो. पण त्या आठ मात्रात प्रत्येक पावमात्रेला, अर्ध्यामात्रेला लय असते याचं भान गंधर्वांना होतं. आठ मात्रात येणारे पदातील शब्द आणि त्या शब्दातील अक्षरं, काही अर्ध्या तर काही पावणेदोन मात्रात अर्थानुकूलता ढळू न देता उच्च्चार होतो. त्या स्वरांनाही लय असते. ती लयही ढळू न देणं हे सर्व बालगंधर्व सांभाळीत अवधानपूर्वक सांभाळीत. स्वरांमधील लय आणि शब्दांमधील विशिष्ट लय जर सांभाळली नाही तर त्या स्वरमाध्यमातून उच्चारल्या जाणाऱ्या शब्दांचा जो परिणाम होणं आवश्यक असतं तो होत नाही. ही जाणीव जन्मतःच त्यांच्या बुद्धीत परमेश्वरानं घातली असावी आणि हे सर्व समजूनच ते गात असत असंच मला वाटतं. त्यांना जे समजत होतं त्याची परिसीमा त्यांनी गाठली होती. बालगंधर्वांची गाणी अनेक गायक गायिका उत्तम तन्हेनं गातात. पण बालगंधर्व कुणाला समजले आहेत असं मला वाटत नाही. अगदी या क्षणापर्यंत वाटत नाही. त्यांची गायकी छोट्या गंधर्वांना नव्वद टक्के समजली आहे पण ते फक्त स्वरांमध्ये गंधर्वांची जास्तीत जास्त आठवण करून देतात. माणिक वर्मा याही बालगंधर्वांची आठवण करून देतात. पण त्यांच्या गाण्याच्या मुळाशी कोणी गेलेला नाही. ध्वनिमुद्रिका पाठ करून गाणारे सगळेच आहेत. म्हणूनच युगानुयुगातून क्वचितच होणारा माणूस म्हणजे बालगंधर्व.