Logo

बालगंधर्व आणि बेगम अख्तर

विद्वान समीक्षक, प्रतिभावान साहित्यकार, कलावंत मंडळी, ह्या अद्वितीय कलावंताच्या नुसत्या स्मरणाने कमालीची लीन झालेली इथे दिसतात. मोठ्या आनंदाने बालगंधर्वांचं ऋण मान्य करतात. कर्नाटकातले डॉ. शिवराम कारंथासारखे ज्ञानपीठपारितोषिक विजेते, चतुरस्त्र कलावंत, मान्यवर विचारवंत, समाजधुरीण, “अभिनय म्हणजे काय याची जाण आल्यानंतर मी ज्या नटांना पाहिलं त्यात बालगंधर्वांच्या तोडीचा अभिनय पुन्हा दिसला नाही” अशा शब्दांत नारायणरावांची थोरवी सांगतात- डॉ. शिवराम कारंथांनी नारायणरावांचं अभिनयातलं अद्वितीयत्व मान्य केलं आहे तर गोव्याचे मलबाराव सरदेसाई हे प्रसिद्ध तालशास्त्रज्ञ लयभास्कर खाप्रूमामा पर्वतकरांचे शिष्य. त्यांनी आपल्या गुरुचेच उद्गार दिले आहेत. ती “लय पाहावी गंधर्वांच्या गाण्यात.” सारे आयुष्य दीनानाथराव मंगेशकरांच्या बरोबर बलवंत नाटक मंडळीत काढलेले आज नव्वदीच्या घरात गेलेले परशराम सामंत सहजपणाने बालगंधर्वांच्या गाण्याचे मर्म सांगून जातात- “नारायणराव गाताना गाताहेत असं वाटायचं नाही. संगीतात बोलताहेत असं वाटायचं.” अभिजात-भारतीय संगीतातले ज्यांना ‘लास्ट ऑफ द रोमन्स’ म्हणावे असे पं. मल्लिकार्जुन मन्सूर आणि ख्याल गायकीतल्या श्रेष्ठ गायिका प‌द्मावती शाळिग्राम गोखले. दोघांनीही गौरवाने उल्लेख केला आहे तो बालगंधर्व आणि बेगम अख्तर यांचा. मल्लिकार्जुन म्हणतात … “जोपर्यंत लोकांना नादब्रह्माची ओढ आहे तोपर्यंत बालगंधर्व आणि त्यांच्यासारख्याच बेगम अख्तर या व्यक्ती अजरामर राहातील.” प‌द्मावतीबाई म्हणतात, की ‘आपण आदर्श ठेवले होते ते बालगंधर्व आणि बेगम अख्तर यांचे ! हे वाचून भारतीय संगीत शास्त्रातले दशग्रंथी विद्वान बुचकळ्यात पडतील. पं. मन्सूर किंवा प‌द्मावतीबाई यांच्यासारख्यांना बालगंधर्व आणि बेगम अख्तर यांच्या गाण्यात हे नाटकातलं पद, ही गझल असले भेद दिसत नाहीत. त्यांना मी मी म्हणणाऱ्या ख्यालगायकांतही न दिसणारं सुरलयीचं अलौकिक अद्वैत दिसतं. त्यांना त्यातलं निखळ गाणेपण दिसतं आणि ही श्रेष्ठ कलावंत माणसं त्या गाणेपणापुढे नम्र होतात.

वास्तविक ही सर्व ख्यातिप्राप्त कलावंत मंडळी. सुरलयीच्या दुनियेत राहणारी – टाकदोटीशी फारशी सलगी करणारी नव्हेत. पण एखादा अलौकिक कलाकार मर्मबंधातली ठेव होऊन बसला की त्याच्या बोलण्यातला आणि लेखनातला शब्द कसा मोगऱ्यासारखा फुलून येतो पहा. मनात रुजलेले अनुभव त्यांना बोलके करतात. त्यासाठी साहित्यसाधनेची वगैरे गरज नसते. नटवर्य जयाराम शिलेदारांनी नारायणरावांच्या बरोबर नाटकात काम करतंवेळचा एक अनुभव सांगितला आहे. सौभद्रात अर्जुनाची भूमिका करणारे नारायणराव एका पदात वरच्या भेंड्यावर स्थिरावले. आणि शिलेदार म्हणतात, “मला गंधर्वाच्या चेहऱ्याच्या जागी फक्त तेजस्वी वलय दिसू लागले. त्या वलयात वाजूचे शंकरराव सतराईफ दिसेनात. मी त्या वलयालाच वंदन केलं.” आज आपल्या गाण्याने जागतिक कीर्ती प्राप्त केलेले भीमसेन जोशी. एखादा सुत्रात बांधावे तसे बालगंधर्वांच्या गाण्याचे लक्षण सांगून गेले आहेत. “जसे बोलतं असतं तसे गातं असतं – प्रेमाने.” एखच्या सहा-सात शब्दात ते जे सांगून गेले त्याच्यावर तासाभराचा निरूपण होऊ शकेल.

हिराबाई बडोदेकरांचे तर बालगंधर्व हे नाट्यगानगुरुच. त्यांनी नाटकात एकदा कामे केलेली. आज वयाची ऐंशी वर्ष ओलांडलेल्या हिराबाईना स्मरण होते ते केवळ नारायणरावाच्या गाण्याचं नव्हे तर ‘खाणं’ हाही त्याच्या प्रेमाचा विषय होता, त्याचं. तसा तो हिराबाईंच्याही प्रेमाचाच नव्हे तर कोंशल्याचा विषय. हिराबाई त्याच्या त्या खाण्याच्या आवडीचे स्मरण करताना सांगतात, ‘कुठल्याही जिन्स कस करावा याव्दल नारायणराव खूप छान सांगतं. अगदी गाण्यातली जागा समजावून द्यावी इतक्या मनःपूर्वक.” हिराबाईंची ही आठवण वाचतांना गायकहिरा म्हणुन भारतभर गौरविल्या गेलेल्या हिराबाई घरगुती चौघाई होऊन गृहिणीच्या भूमिकेत रंगलेल्या आणि आपल्या स्वरामृताच्या मोहिनीने लाखो लोकांना तहानभूक विसरायला लावणारे बालगंधर्व साधे नाना होऊन पाककलेतल्या खूबी त्यांना समजावून सांगण्याच्या भूमिकेशी तन्मय झाले, हे देवदुर्लभ दर्शन आपल्याला घडावं हा हेच होते असे मला वाटले.

त्या अंकातल्या संवादात बालगंधर्वांची आणि आपली अनेक स्वरभेट भेट होते. आणि ते अधिक आपले वाटतात. कादंबऱ्य, निबंधांसारख्या चार वाक्य साधीकरण करणारं नारायणराव दिसताच, महमद हुसेन खासांहब एकदम आपल्या बालपणात शिरतात आणि म्हणतात, “सुरांआधी सरगममध्ये इंद्रायचा नारायणरावांनी मला प्रथम शिकवलं.” गंधर्व नाटक मंडळीतील नटवर्य माधवराव बालवलकरांच्या सहस्रात वर्षां मुलगा फुफ्फुसात तापाने फणफणत होता. डॉक्टर इलाजाला यश येत नव्हते. कंपनीचा मुक्काम हळवला होता. तिथल्या सिद्धार्थ महाराजांच्या पायावर मुलाला घाल असं बालगंधर्वांनी मातृस्नंह सलला दिला. बालगंधर्व नाटक कंपनीचे मालक एखाद्या भूमिकेत वावरले नाहीत – शिडीच्या माणसाच्या त्या कुटुंबाचे ते कुटुंबप्रमुख या नात्याने प्रापंचिक अडचणी सोडवित. आजारी पुरुषोत्तमाला घेउन स्वतः सिद्धारूढांच्या मठात गेले. त्यांनी अंगारा दिला , कर्मधर्म संयोगाने ताप उतरला . ही सारी सश्रद्ध माणसं. महाराजांचे उपकार कसे फेडायचे ? बालगंधर्वानी फक्त सिद्धारूढ स्वामी आणि त्यांच्या माठातले शिष्य ह्यांच्यापुढे , इतर प्रेक्षकाना आत न घेता “द्रौपदी” नाटकाचा विनामूल्य प्रयोग केला. त्यावेळी स्वामींच्या समवेत काढलेली तसवीर वाळवलकरच्या घरात आजही आहे. आज उत्तम हार्मोनियमवादक म्हणून ख्याती मिळवलेल्या पुरुषत्तोम वाळवलकरांनी ह्या प्रसंगाचे स्मरण करून नारायणाच्या अंत:करणातला हा वात्साल्याचा कोपरा उजळून दाखवला आहे 

रंगी रंगलेले

बालगंधर्वांच्या हयातीत ‘रत्नाकर’ मासिकाने एक सर्वांगसुंदर असा ‘बालगंधर्व’ विशेषांक काढला होता. नाटक आणि संगीत क्षेत्रातले थोर जाणकारांनी बालगंधर्वांचे मोठेपण दाखवून देणारे लेख त्यात लिहिले होते. हा अंक अनुप्रप्त होता. त्याचं पुनर्मुद्रण झालं नाही. बालगंधर्व जन्मशताब्दीसाठी प्रसंगी तितक्याच मनःपूर्वकतेने ‘महाराष्ट्र टाइम्स’ विशेषांक काढला असे ज्याला संपादक गोविंदराव तळवलकर, अरुण आचरेकर आणि मी गणपतीच्या कृपेने बसलो असताना मनात आले तसे प्रथम आठवलं ती सीताकांतने पांडुर भुजंग गिरवून झाल्यावर प्रथम “गंधर्व नाटक मंडळी” हे शब्द लिहिले असतील. एखाद्या उपास्य देवताच्या मूर्तीसरखे बालगंधर्व त्याच्या मनी मांस होऊन बसले होते. शालेय वयामध्ये त्याच्या लोभस गंधर्वाच्या नाटकाचे भरजरी वैभव पाहिले होते. कानांनी कादंबऱ्यांची सारी, कोषाच्या काळकयांचा ऑर्गन, आणि अहमदनगर, तिरखवाडा तबला ह्याच्याच सुरेलते एकसंध झालेली किती गाणी ऐकली आहेत त्याचा हिशेब नाही. इतकच नव्हे तर समोरच्या शेकडो श्रोत्यांना तासन्तास एका जागी खिळवून ठेवणारी ही चित्रातल्या अप्सरेसारखी दिसणारी बाई – पुरुष होऊन आपल्या वडलांशी घरी येऊन गप्पागोष्टी करताना पाहिले आहे. आपल्याला सीता SS अशी मायेने हाक मारून खेळवणारी ती व्यक्ती घरात शिरल्याक्षणी घरात कसं दिवाळी आल्यासारखं वातावरण होतं ह्याचा त्याने अनुभवही घेतलेला आहे. सीताकान्तचे वडील गणपतराव लाड हे त्या काळातले मुंबईतले प्रसिद्ध पोर्ट्रेट पेंटर. ह्या अंकावरचं बालगंधर्वांचं चित्र मूळ त्यांच्याच हातचं. सीताकान्तचं आयुष्य आकाशवाणीच्या सेवेत गेलं. माडगूळकरांच्या गीतरामायणाची मूळ कल्पना सीताकान्ताची. बालपण भटवाडीतल्या लक्ष्मीबागेशेजारी गेले. लक्ष्मीबाग हे एकेकाळचे मुंबईतलं संगीताचं तीर्थस्थान. सीताकान्तने आयुष्यभर असंख्य गायकवादक चांगल्या जाणकारीने ऐकले. पण राम रंगी रंगावे तसे माझ्या ह्या बालमित्राचे मन एकदा जे बालगंधर्व रंगी रंगले तो रंग आजही कणभर फिका व्हायला तयार नाही. तितकाच सतेज आहे. शरीर सत्तरीत शिरते आहे. व्याधींशी झगडते आहे तरीही निवृत्तीच्या काळातला एकमेव आनंद म्हणजे बालगंधर्वांच्या ध्वनिमुद्रिका ऐकणे – दुसरा कोणी बालगंधर्व प्रेमी भेटला की त्याला ऐकवणे, बालगंधर्वांच्या भूमिका असलेली खाडिलकरांची नाटके पुन्हापुन्हा वाचणे, गडकऱ्यांच्या एकच प्याल्यातल्या भाषासौदर्यात हरवून जाणं आणि मनाने गंधर्व नाटक मंडळीच्या युगात जगणे हाच. आमचे शिल्पकार फडके असेच होते. भास्करबुवा आणि बालगंधर्व यांच्या स्मरणातच जगत होते. ते शरीरानेच काय ते धारला होते. पण मनाने वीसएकवीस सालच्या गंधर्वयुगात मुंबईतल्या थिएटरात चाललेले गंधर्वांचे नाटक मिटल्या डोळ्यांनी पाहात बसलेले असत. नाटककार वसंत शान्ताराम देसाई ह्याच रंगी रंगलेले. असल्या नमुन्याची वेड लागलेली माणसं दुर्मिळ आणि हे भाग्याचं वेड लावणारी कलावंत मंडळी त्याहूनही दुर्मिळ. सीताकान्ताने तर ह्या अंकासाठी लेख लिहिताना एकदम आपल्या बालपणात सुरकांडी मारून तळाची रत्नं वर आणावी तशा बालगंधर्वांच्या दुर्मिळ चित्रांचा आणि पत्रांचा आपला संग्रह त्याने वापरु दिला आहे.

सांस्कृतिक संदर्भ

साहित्य-संगीताच्या स्मृतिपथावरून फेरफटका करून यायची इच्छा अनावर होणारे कृ.द. ऊर्फ भाऊसाहेब दीक्षित. नारायणरावांचा सहवास लाभलेल्या भाग्यवन्तांपैकी हे एक. संगीतावर
लिहिण्याचा अधिकार असूनही त्या अधिकाराचा आपल्या लिखाणाला जरासुद्धा दर्प येऊ न देण्याचा
लोभस संयम पाळणारे भाऊसाहेब ह्या उत्सवात आहेत. अशोक रानड्यांसारखे ज्ञानमार्गी संगीत
समीक्षक आहेत. त्यांनाही बालगंधर्वांच्या गायनातल्या टिकाऊपणाचं सादृश्य हालाची सप्तशती, जयदेवाची अष्टपदी, कबीरी भजन, सदारंगाचा ख्याल अशा चिरंतन कृतीशी आढळते. अशोक रानडे हे काही केवळ भक्तिभावाने लिहिणारे लेखक नव्हेत. भावनेला शास्त्रकाट्याच्या कसोटीचा आग्रह धरणारे नुसते समीक्षक नव्हेत, तर चांगले गायक. त्यांनाही बालगंधर्वांचे गायन जयदेवाच्या अष्टपदी सारख्या चिरंजीव कलाकृती इतकंच चिरंजीवित्वाचे गुण लाभलेले आहे असं वाटतं. तीच विचारसरणी चित्रकार गोडसे यांच्यासारख्या बुद्धिनिष्ठ चिकित्सक समीक्षकाची. त्यांना बालगंधर्वांची रंगसज्जा ‘मखरा’सारखी वाटते. मखरात देवांच्या उत्सवमूर्ती नांदतात. बालगंधर्वांचं नाटक हा सण-उत्सव यासारखाच प्रसंग असायचा. बालगंधर्वांच्या नाटकात नेपथ्य हे कोंदणासारखं असे. समोर हिरा लखलखत असताना कोंदणाकडे कोण पाहाणार? गोडश्यांनी ते मार्मिकपणाने जाणलेले आहे.

बालगंधर्वांच्या पदानंतर सुरांचा तोच जिव्हाळा घेऊन मराठी घराघरात गेलेली आणि त्याच प्रेमाने गायली गेलेली गाणी माडगूळकरांनी लिहिलेली आणि सुधीर फडक्यांनी स्वरबद्ध केलेली. माडगूळकरांनी आपला गीतसंग्रह किर्लोस्कर-देवल यांच्या गानप्रतिभेच्या चरणी अर्पण केला आहे आणि सुधीर फडक्यांनी आपल्या संगीत रचनेच्या बाबतीत बालगंधर्व-मास्तर कृष्णराव ह्यांना गुरुस्थानी लेखलेलं आहे. अशी ही परिचित सुरांची लेणी त्यायलेली आणि महऱ्हाठी शब्दकळेने सजलेली गाणी मराठी माणसाच्या कानी आल्याबरोबर जन्मोजन्मीची ओळख पटल्यासारखी ती गाणी घरोघर स्वीकारली गेली. सुरांना सुद्धा वर्षानुवर्षाचे सांस्कृतिक संदर्भ असतात. मराठी अभंगाला पतियाळा घराण्याच्या वक्रसुरावलींची चाल दिली तर ते अभंगगायन देवळात चाललेले नसून एखाद्या हमीदाबाईच्या कोठीत चालले आहे असेच वाटेल. सुधीर फडक्यांनी बालगंधर्वांचे ऋण अंतःकरणापासून मान्य केलेले आहे.

ह्या अंकातल्या सर्व लेखातला अंतरीचा उमाळा फार प्रत्ययकारी आहे. मग तो लेख डांग्यांसारख्या व्यासंगी क्रांतिकारकाचा असो की संपूर्ण सश्रद्ध लालजी देसाईंचा असो. प्रत्येकाच्या अंतःकरणाला घडलेला बालगंधर्वांच्या कलेचा स्पर्श त्यातून जाणवतो.

अरुण आठल्ये

हया अंकाच्या तयारीसाठी जिवाचं रान करून कोनाकोपऱ्यात अनवधानाने पडून राहिलेल्या बालगंधर्वांच्या तसबिरी हुडकून काढणे, कानडी, •तामीळ, तेलगू, गुजराती भाषेत आलेले त्यांच्यावरचे लेख जमवणे, त्या प्रांतातली आज हयात असलेली त्यांची चाहती माणसं शोधून काढून त्यांना लिहिते बोलते करणे, शेकडो मैलांचा प्रवास करून बालगंधर्वांच्या लोकप्रियतेचा मागोवा घेणे, हे काम केले अरुण आठल्ये यांनी. गेले काही महिने अरुण अहोरात्र एकच ध्यास घेऊन बसला होता. तो म्हणजे बालगंधर्व, ह्या अंकासाठी उपयुक्त अशा अनेक गोष्टींची जुळणी करायला, जीर्ण झालेले जुन्या नियतकालिकांतले लेख जमवायला, त्याने ओळखीचे आणि अनोळखी असे शेकडो दरवाजे खटखटवले. भीडभाड न ठेवता ह्या अंकासाठी लेखांची, चित्रांची, पत्रांची, वस्तूंची भिक्षांदेहि केली. ह्या अंकाच्या निर्मितीत त्याचा वाटा फार मोठा. एरवी फार मोठ्या हुद्यावर असलेला अरुण ह्या अंकाच्या उभारणीसाठी गणेशोत्सवाच्या मांडवातल्या ‘व्हालटेर ‘सारखा तहानभूक विसरून राबला

सामर्थ्य टिकवून आहे

एक गोष्ट लिहावीशी वाटते. हा अंक म्हणजे बालगंधर्वांच्या शंभराव्या जन्मदिनाप्रीत्यर्थ ‘भक्तिभाव हा घ्या सेवा’ ह्या भावनेने त्यांना ‘अर्पण केलेला उपहार आहे. बालगंधर्व ह्या विषयावरचा हा शोधनिबंध नव्हे. हा वाढदिवस आहे याचं भान ठेवून तयार केलेला हाअंक आहे. बालगंधर्वांच्या ऐन उमेदीच्या काळातही त्यांच्यावर कठोर टीका करणारे लोक होते. अपसमज पसरवणारे होते. खुद्द आहिताग्नी राजवाडे बालगंधर्वावर वेळी अवेळी आग पाखडताना दिसतात. त्यांना ‘बालगंधर्व’ हे बिरुद लोकमान्यांनी दिलेलं नाही, ज्ञानप्रकाशकारांनी दिले असे एक विधान त्यांनी ठोकून दिले आहे. पुणे आकाशवाणीसाठी भाऊसाहेब दीक्षित आणि भवानराव पंडित यांनी बालगंधर्वांची एक दीर्घ मुलाखत घेतली होती त्यात खुद्द बालगंधर्वांनी त्यांना लोकमान्यांनी बालगंधर्व म्हटल्याची हकीगत सांगितली आहे. ती टेप उपलब्ध आहे. आहिताग्नी बालगंधर्वांवर इतके का जळत होते ते एक अग्निदेवच ज़ाणे. याचा अर्थ स्वतः बालगंधर्व काही संपूर्णपणाने निर्दोष होते असा नव्हे. तसं कोणीही नसतं. त्यांच्या हातून चुका घडल्या असतील. उतार वयात आणि बोलपटांमुळे सारा नाटकधंदा मृत्युपंथाला लागल्याच्या काळात पुन्हा एकदा गंधर्व नाटक मंडळी उभी राहावी म्हणून गोहरबाईंना आपल्या स्त्रीभूमिका करण्यासाठी रंगमंचावर आणण्यापासून ते त्यांच्याशी लग्न करून सर्वस्वी त्यांच्या आधीन जाण्यापर्यंतच्या ज्या चुका केल्या त्यामागे काहीही करून नाटकं चालू राहावीत ही त्यांची जिद्द होती. नाटकं उभी करण्याच्या सद्भावनेने ते एक धूत खेळले. त्यात फासे उलटे पडले. त्या जिद्दीपायी टाकलेली सगळी पावलं चुकीची ठरली. त्यातच दोन्ही पायातलं त्राण गेलं आणि अपंग झाले. काही स्वतःच्या चुकीच्या निर्णयातून तर काही नियतीच्या कठोर आघातातून निर्माण झालेले विपरीत परिस्थितीचे आघात सहन करीत आयुष्यातले अखेरचे पर्व त्यांना काढावे लागले. जन्मशताब्दिसारख्या त्यांच्या गुणस्मरणाच्या प्रसंगी बालगंधर्वांच्या जीवनातल्या त्या अभागी अध्यायाला ह्या अंकात स्थान दिलेले नाही. त्यांच्या हयातीत त्या काळात त्यांच्यावर खूप चिखलफेक झालेली आहे. ती त्यांनी सहन केलेली आहे. वाटीभर दुधाला पारखी झालेली सिंधू आपल्या उपाशी बाळाला झोपवताना म्हणत असे, “आपल्या नशिबी गोकुळच्या गोठणी ओस पडल्या, बरं बाळ, ओस पडल्या.” बालगंधर्वांच्या अखेरच्या दिवसातही त्यांच्या नशिबी त्यांच्या नाटकांनी, गार्थ्यांनी, अभिनयानी आणि प्रेक्षकांनी नांदतं गाजतं ठेवलेलं अवघं गोकुळच ओस पडलेलं पाहाणं आलं होतं. ते गोकुळ विपरीत कालौघात वाहून गेलं होतं. आता ती मखमली पडद्या पलीकडली ऑर्गन, सारंगी, तबल्याच्या सुरांची जुळवणी ऐकू येत नव्हती, धूपाचा गंध नव्हता. सभागृहातल्या प्रेक्षकांचा तो त्या गंधाबरोबर शिरणारा उत्साहवर्धक गलबला कानी पडत नव्हता, रंगपटातल्या दोरीवर भरजरी शालू टांगलेले दिसत नव्हते. सगळं कसं ओकं ओकं भकास वाटत होतं. सिंधू नाही, सुभद्रा नाही, -रुक्मिणी नाही, द्रौपदी, मेनका, सावित्री, मीरा कोणीही नाही तर मग आपण उरलोय तरी कोण म्हणून? ह्या प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हतं. आपण जराजर्जर झालो तर एखाद्या गुणी कलावती युवतीने तरी ह्या भूमिकातून दिसावं ही तळमळ होती. पण तशी गायनाला अभिनयाची आणि देखणेपणाची जोड असलेली अभिनेत्री मिळत नव्हती. त्यामुळे पायालाच नव्हे तर मनालाही पांगळेपण आलेलं होतं. ह्यातून मरणाशिवाय सुटका नव्हती. आसपास सर्व तन्हेच्या दारिद्याशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. दरिद्री माणसाकडे मित्र फिरकत नाहीत. पण इथे साक्षात् मृत्यूही फिरकत नव्हता. शेवटी तो आला, पण शेवटल्या श्वासासाठी तब्बल शंभर दिवस बेशुद्ध अवस्थेत घटका मोजत ठेवल्यानंतर आला. त्या प्रसंगींच्या सगळ्याच घटनांचं स्मरण यातनादायक आहे. पण त्यांच्या ध्वनिमुद्रिकातून कानी पडणारी सुरांची एखादी फेकही ज्या स्वप्नभूमीचे ते अनभिषिक्त सम्राट होते त्या राज्यात आपल्याला एक क्षणात परीच्या पंखावर बसवून नेल्यासारखे अलगद घेऊन जाण्याचे सामर्थ्य टिकवून आहे.

एकविसाव्या शतकातही

त्या सामर्थ्यापुढे आदराने लवण्यासाठीच ह्या खास अंकाचा हा प्रपंच हे. शताब्दीचे वर्ष केवळ जुन्याच नहे तर नव्या पिढीतले गायकही गंधर्वांनी चिरंजीव केलेल्या नाटकांच्या प्रयोगांनी रंगवणार आहेत. गंधर्वगीतांनी स्वरमय करणार आहेत. हा विशेषांकही त्याच सोहळ्यातला एक सहभाग आहे. असाच सोहळा आणखी शंभर वर्षांनीही होईल. कारण असल्या अलौकिक सुरांना निसर्गतःच चिरंजीवित्व लाभलेले असतं. शेकडो वर्षांपूर्वीचे भूप, बिहाग, भैरव, भैरवी ह्यासारखे राग आणि रागिण्या आज १९८७ सालातही अंतःकरणापासून सुरलयीत एकरूप होऊन गायले गेले तर क्षणापूर्वी उमललेल्या फुलाइतके ताजे वाटतात. गंधर्वांचं गायन हे त्याच तोलाचं स्वरपुष्प. हा देश एकविसाव्या शतकात गेल्यावर काय पराक्रम करायचे ते करीलच, पण एकविसाव्या शतकातल्या २६ जून २०८७ ह्या दिवशी कुणीतरी बालगंधर्वांचं स्मरण जागवीत गात असेल – ‘सुजन कसा मन चोरी’. कुठल्या तरी रंगमंदिरात शंभर वर्षांनंतरच्या सर्वस्वी निराळ्या  प्रेक्षकांपुढे एखादी सिंधू अंतःकरणाला पीळ पाडणारं  गाणं गात असेल- ‘बघु नको मजकडे केविलवाणा राजसबाळा’ आणि दीडशे वर्षांपूर्वीच्या प्रेक्षकांचे हातरुमाल जंसे अश्रूनी भिजले होते तसेच त्या द्विशताब्दीच्या उत्सवाला जमलेल्या प्रेक्षकांचेही भिजतील. नवी शतकं नवी तांत्रिक साधनं आणतील. त्यात खूप बदल घडेल. पण माणसांची सहृदयता आणि रसिकता कॅलेंडरवरच्या सनांच्या बदलत्या आकड्यांनी बदलत नसते. अशाच एका, असंख्य रसिक मनावर वर्षानुवर्षेराज्य करणाऱ्या सम्राटाचा हा जन्म शताब्दी महोत्सव. हा अंक म्हणजे त्या सम्राटाची दुर्मिळ चित्रांनी आणि वाक्पुष्पांनी सजवलेली पालखी. त्या पालखीचा एक भोई होण्याचा मान मला मिळाला हे माझे भाग्य. त्याबद्दल मनाला वाटणारी धन्यता शब्दांनी व्यक्त करण्यापलिकडे आहे. अशावेळी वाटतं की बालगंधर्वांची प्रत्येक बाबतीतली उत्कटता आणि त्यांच्या गळ्यातला तो अत्यंत आर्जवी दिव्यस्वर एखाद्या अज्ञात शक्तीच्या कृपेने एक क्षण मला लाभला असता तर त्या सुरात आणि त्या उत्कटतेने मी खुद्द बालगंधर्वांनाच मुजरा करीत म्हणालो असतो- “जोहार मायबाप जोहार…”

Scroll to Top