काही दंतकथा : काही सत्यकथा
अरुण आठल्ये
गंधर्वचरित्र म्हणजे समुद्र आहे. गंधर्वांची छायाचित्रे, त्यांच्याबद्दलच्या जनश्रुती, ध्वनिमुदिते, छापून आलेली प्रत्येक ओळ ही या समुद्रात तळाशी दडलेल्या शिंपल्यातील मौक्तिकांसारखी आहेत.
संशोधनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून जी रत्ने हाती लागली त्यापैकी काही आपल्यापुढे ठेवीत आहे. केशव-नारायणाचे ‘संयुक्त मानापमाना’तील आजही गौरवाने दाखविले जाणारे चित्र पहा. आठ जुलै १९२१ रोजी ग्रैंटरोडवरील बालीवाला ग्रैंड थिएटरांत हा प्रयोग झाला. प्रयोग चालू असताना फ्लॅशफोटो घेण्याची सुर्धारणा त्याकाळी अस्तित्वात नव्हती. तेव्हा या एकमेव आणि अभूतपूर्व प्रसंगाची आठवण जनमानसात कायमची राहण्यासाठी चित्रकार पु.श्री. काळ्यांनी एक अभिनव युक्ती केली. त्यांनी केशवराव आणि बालगंधर्व यांचे त्या त्या भूमिकेतील दोन निरनिराळे फोटो कापून घेऊन नंतर ते आवश्यक तसे चिकटवले व पार्श्वभागी तंबूचा पडदा बेमालूमपणे रंगविला. वरील घटना पु.श्री. काळ्यांनीच श्री. भालचंद्र पेंढारकरांना एक गंमत म्हणून सांगितली होती.
स्त्रीपार्टी नटाची लोकांच्या दृष्टीने कलेची सर्वोच्च परीक्षा कोणती? तर खासगी जीवनातही स्त्रियांनी त्यांना ओळखू न शकणे ही. ‘बडोद्याला चिमणाबाई राणीसाहेबांकडे जाऊन ते बेमालूमपणे हळदीकुंकू घेऊन आले. गंधर्वांनी पानाला चुना लावताना तर्जनीऐवजी अंगठ्याचा वापर केला तेव्हा फक्त राणीसाहेबांनी त्यांना मनोमन ओळखले’ वगैरे हस्तिदंती चातुर्यकथा गुजराती व मराठी रसिकांत अजूनही प्रसृत आहेत. हा फुगा गंधर्वांनीच एकदा फोडला म्हणून बरे झाले. त्यांच्या उद्गारांची छापून आलेली चौकट शेजारी दिली आहे. गंधवांवर जे जे छापून आले ते ते सर्व अत्यंत भक्तिभावाने जतन करून ठेवणाऱ्या श्री. नारायणराव आवाडांच्या संग्रहातून हे कात्रण प्राप्त झाले आहे.
गंधर्व-गोहर संबंधातही असंख्य वावड्या आजमितीला उडत आहेत. त्यांच्या संबंधांचे नेमके स्वरूप काय होते? गंधर्वांच्या और्ध्वदेहिकाची धांदल का करण्यात आली? त्या भीतीमागील सत्य किती? प्रवाद किती ? चित्रात दाखविल्याप्रमाणे गंधर्वांचा गोहरशी नोंदणीपद्धतीने विवाह झाला होता. त्याला तीन साक्षीदार हजर होते. गंधर्वांनी स्वतः या ‘रजिस्ट्रारच्या दाखल्या’ची फोटो-कॉपी त्यांचे निःसीम चहाते गोपाळराव मेहेंदळे यांच्याकडे दिली होती. गोपाळरावांनी ती आपली सुविद्य कन्या सौ. अनुरोधा जोशी, नागपूर हिच्याजवळ एक सीलबंद पाकीट जपून ठेवण्यास दिले होते, त्यात ठेवली होती. हे सीलबंद पाकीट उघडले तेव्हा त्यात इतर गोष्टींबरोबर १४ जून १९५५ रोजी बालगंधर्वांनी गोहरबाईंना गंधर्व नाटक मंडळीच्या सामानाचे तसेच ‘स्वयंवर’, ‘द्रौपदी’ आणि ‘कान्होपात्रा’ या नाटकाच्या प्रयोगांच्या हक्काचे जे ‘बक्षीसपत्र’ केले त्याचा अस्सल दस्तऐवज होता. वरील दस्तऐवज सब-रजिस्ट्रारच्या मुंबईच्या ऑफिसांत १६ जानेवारी १९५६ रोजी ‘रजिष्टर’ झाला. या दस्तऐवजावर नोंदलेला तपशील काळजीपूर्वक पाहिल्यावर नंतरच्या काळात झालेले बरेचसे वाद निरर्थक ठरतात.