Logo

कलेचे शैशव

वसंत शांताराम देसाई

‘एकच प्याला’ नाटक रंगभूमीवर नुकतेच अवतीर्ण झाले होते. पंधरा पंधरा दिवस अगोदर तिकीटविक्री बंद असे. बालगंधर्वांची ओळख म्हणूनच मी पहिल्या प्रयोगाला हजर राहूं शकलो. त्या प्रयोगाच्या आठवणीबरोबरच आमच्या नाट्यकलेच्या ऐन उत्कर्षाच्या त्या दिवसांची आठवण होते आणि न कळत डोळ्यांत अश्रू उभे राहतात ! एकच प्याला नाटकाने सदैव आनंदितांना देखील अश्रूची आठवण करून दिली होती ! भामिनी-रुक्मिणीच्या लडिवाळ लवाजम्यांत बालगंधर्वांना पाहण्याची चटक लागलेल्या नाट्यरसिकांना, बालगंधर्वांनी त्या दिवशी चकित केले. “चंद्र चवधिचा। रामाच्या ग बागेमधे। चाफा नवतिचा।।” हे रोमांचकारी भावगीत सुरू होतांच, सबंध नाटकगृहांत मृत्युकालीन शांतता नांदू लागली ! मुलाला मृत्यूची वाट दाखवायला उद्युक्त झालेला सुधाकर रंगभूमीवर आला. त्या क्षणी प्रेक्षकांच्या हृदयाची क्रियादेखील क्षणमात्र बंद पडली असेल ! माझ्या शेजारी बसलेल्या एका मुसलमान प्रेक्षकाला ते दृश्य असह्य झाले. ‘मृच्छकटिक’, ‘मानापमान’ वगैरे नाटके पाहून तोदेखील बालगंधर्वांचा भक्त बनला होता. आणि ‘एकच प्याल्या’चे तिकीट काढतांना देखील एखादा ‘माषुकका मामला’ बघायला मिळेल अशी त्याची अपेक्षा होती. ‘अब तो सब हो चुका’ असे उद्‌गार काढून तो उठला आणि रंगमंदिराबाहेर डोळे पुशीत पुशीत चालता झाला. दुसऱ्या दिवशी चौपाटीवर एक भाटिया श्रीयुत गणपतराव बोडसांना भेटला. तो म्हणाला, ‘गणपतराव, हे सांसारिक नाटक तुम्ही काढलं – गंधर्वाला दळताना बघून आमचं काळीज तर समदं फाटून गेलं !’

रंगभूमीवरील आपल्या हौसेने त्यांनी वेषभूषेची नवोनवी दालने स्त्री-प्रेक्षकांसमोर मांडली आणि कित्येक वर्षे मुंबई-पुण्याकडील ललनांच्या वेषभूषेचे ते सूत्रधार झाले. “बालगंधर्व अमक्या नाटकात नेसले होते तसला शालू आम्हांला तयार करू द्या.” अशा मागण्या मोठमोठ्या सरदार-संस्थानिकांच्या राणीवशातून बालगंधर्वांच्या शालूवाल्याकडे जाऊं लांगल्या. मुंबईच्या शालूवाल्याकडे त्यांनी विवक्षित प्रकारच्या शालूची मागणी केली, की तो तसला शालू तयार करण्याची कामगिरी आपल्या बनारसच्या कारागिराकडे सोपवीत असे. मुंबई दुकानातून मागविल्या जाणाऱ्या त्या नवोनव वस्त्रामुळे आश्चर्य वाटून “उभ्या हिंदुस्थानांतून आमच्याकडे अशा प्रकारची मागणी येत नाही. असे शालू तयार करणारा हा राजा तुमच्या मुंबईत आहे तरी कोण?” अशी पृच्छा त्या बनारसी कारागिरांनी केली. त्यावर ही सर्व मागणी “हमारे गंधर्व महाराज की है” असा जबाब मिळताच, “गंधर्व महाराजांचे” नाव बनारसी कारागिरांत सर्वतोमुखी झाले !

त्यांच्या स्वर्गीय संगीतावर नजर टाकली तर असे हमखास म्हणतां येईल की, त्यांनी रंगभूमीवर जी चाल गायली, त्या गोडव्याने तीच चाल मोठमोठ्या गवयांना रंगभूमीवर अगर रंगभूमीबाहेर गाणे शक्य झाले नाही. गाण्यांतील स्वर्गीय स्वरमाधुरीला रागाच्या ‘सच्चेपणाची’ जोड नसली तरी ‘स्वरांचा सच्चेपणा’ निर्विवाद ! त्याचे वर्णन करीत असताना एकदा श्री. शंकरराव सरनाईक मला म्हणाले “करिन यदुमनी सदना” या पदांत “रुचिर सदन”चे जे स्वर ऑर्गनमधून निघतात, तेच हुबेहूब स्वर बालगंधर्वांच्या गळ्यांतून निघत असतात.

सौदर्य आणि हालचाल

सुरेल संगीत, तालबद्धता आणि रंगभूमीची सजावट याप्रमाणेच त्यांचा अभिनय आणि त्यांच्या मोहक चेहऱ्यावरील पावित्र्य या गोष्टींचा सहृदय (आणि ‘सहृदय’ हा शब्द मी मुद्दाम वापरतो) रसिकाला विसर पडेलसे मला वाटत नाही. बालगंधर्वांच्या सौदर्यांत मोहकपणा होता, पण छचोरपणा नव्हता. आणि त्यामुळे वसंतसेना आणि रेवतीसारख्या भोगांगनांचे काम करतांना देखील त्यांच्या पिढीजात पेशापेक्षां त्यांच्या उदात्त स्वभावधर्माचा आविष्कारच रंगभूमीवर प्रामुख्याने पाहावयाला सापडत असे. बालगंधर्वांच्या या सौंदर्यगुणाबद्दल बोलतांना माझे एक रसिक मित्र म्हणाले “बालगंधर्वांचे सौदर्य इतके सोज्ज्वल आहे की, त्यांना रंगभूमीवर पाहिले की, वृद्धांना आपली मुलगी अशी असावी असावी असे वाटते, तर तरुणांना वाटते की, आपली सहचारिणी अशी असावी !”त्या अभिजात सौदर्याची खरी खुलावट करुणरसांत दिसत असे !’दया छाया घे निवारुनियां’ हे पद म्हणतांना त्यांच्या चेहऱ्यावर जो करुणभाव प्रकट होत असे, तो पाहून एखाद्या पाषाण हृदयी निर्दय कलिपुरुषालादेखील सिंधूची दया आली असती, मग सहृदय प्रेक्षकांच्या खिशांतले हातरुमाल स्थानभ्रष्ट व्हावेत यांत नवल ते कोणते ?

बालगंधर्वांच्या संगीताप्रमाणेच त्यांची रंगभूमीवरील हालचालदेखील अगदी लयबद्ध ! ‘कशि या त्यजूं पदाला’ हे पद म्हणत अखेर एकएक पाऊल टाकीत ते ज्या वेळी सुधाकराच्या पायांजवळ जाऊन बसत, किंवा ‘मज जन्म देई माता’ या पदानंतर ज्या वेळी ते एकपाऊल मागे सरकून गीतेच्या पायांवर मस्तक ठेवीत त्या वेळी सौंदर्य आणि नेटकेपणा हे गुण रंगभूमीवर प्रत्यक्ष अवतरले आहेत की काय असा भास होत असे ! ‘सखये अनसुये। थांब की ग बाई।।’ या पदाच्या वेळचा त्यांचा भाव पाहिला म्हणजे, मदनबाणांनी विद्ध झाल्यामुळे दीन बनलेल्या तरुण पण निष्पाप शकुंतलेने आपल्या सखीची आर्जवे आणखी वेगळ्या रीतीने केली असतील असे मुळी वाटतच नसे !

बालगंधर्व म्हणजे गंधर्व नाटक मंडळी हे कोष्टक इतके उघड होते कीं, त्याची जाणीव स्वतः बालगंधर्वांना नसावी हे संभवनीय नव्हते. आपण आपले काम चोख केले की नाटक रंगलेच पाहिजे हा आत्मविश्वास त्यांना असे. एकदां पुण्याला मानापमान नाटकाच्या दिवशी किर्लोस्कर थिएटर चिक्कार भरले होते. पण ऐन वेळी श्री. गणपतराव बोडस आपल्या कामाला अपरिहार्य अडचणीमुळे येऊ शकले नाहीतं. आणि लक्ष्मीधराची भूमिका एका दुय्यम दर्जाच्या नटाला करावी लागली. या फेरबदलामुळे रसिक जरा बिचकतील असे सर्वांसच वाटले. नाटकांची नांदी चालू असता श्री. विनायकराव पटवर्धन म्हणाले “आज नाटक रंगणार नाही.” जवळच उभे असलेले बालगंधर्व आपल्या नेहमीच्या रिवाजास अनुसरून म्हणाले, “काय प्रभु करील ते खरं !’ नाटक सुरू झाले आणि रंगत ही चालले ! दुसऱ्या अंकांत धैर्यधरभामिनीचा प्रवेश चालू असताना बालगंधर्व हलकेच म्हणाले “विनायकराव, नाटक रंगत आहे ना?”

रसिक रंगमंदिरांत दाटी करायचे ते बालगंधर्वांची ‘कला’ पाहण्याकरितां ! बँकेतील त्यांची शिल्लक अजमावण्याकरिता नव्हे ! दारिद्यपीडित सुहासिनीचे सौंदर्य ज्याप्रमाणे अधिकच मनोवेधक वाटते, त्याचप्रमाणे कर्जाच्या ओझ्याखाली वावरणारी बालगंधर्वांची कला रसिकांना अधिक आकर्षक वाटली असेल. बोलपटांचा मारा, कर्जाचे ओझे आणि स्वतःच्या शरिरावर डोकावू लागणाऱ्या वृद्धावस्थेच्या छाया, या त्रिदोषांमुळे बालगंधर्वांचा आत्मविश्वास नाहीसा होण्याच्या बेतात आला होता. ‘देवा, मी आता म्हातारा झालो’ असे उद्‌गार त्यांच्या तोंडून ऐकू येऊ लागले. पण ‘अहो, रुक्मिणी रुक्मिणी म्हणतात ना? ती मीच ! मीच कृष्णांची पट्टराणी !’ या उद्‌गारांच्या उच्चारांतील ‘कला’ जोपर्यंत ‘शैशवांतच’ आहे, तोवर रुक्मिणीच्या शरिराचा कल वृद्धावस्थेकडे झुकूं लागला आहे याचा विचार रसिकांनी तरी का म्हणून करावा? वृद्धत्वीं निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे’ या केशवसुतांच्या वचनानुसार, वृद्धपणीदेखील बालगंधर्वांच्या कलेचे ‘शैशव’ कायम आहे.

Scroll to Top