माझे नाना
नलिनी वाबळे
नाना। माझे प्रेमळ पिताजी. उभ्या महाराष्ट्रासाठी ते ‘नटसम्राट बालगंधर्व’ असले तरी माझ्यासाठी ते नानाच होते. नाना माझे वडील आहेत या अभिमानाची बिरुदावली बाळगूनच मी जीवन जगले.
रंगभूमीवरचा हा सम्राट घरी प्रेमळ पित्याची भूमिका पार पाडीत असे. आम्हा मुलांवर त्यांचा फार जीव. कमला माझी मोठी बहीण. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी. ताई शांत तर मी खोडकर. एके दिवशी मी अशीच तिची खोडी काढली. तिला मारलं. ताईचं रडणं ऐकून नाना बाहेर आले. म्हणाले, “सरोजा, कमला तुझी मोठी बहीण. तिला का मारलंस? तिच्या पाय पड.” नानांचा राग इतकाच. त्यानंतर मात्र मी पुन्हा कधी ताईची खोडी काढली नाही. भरजरी राजवस्त्रे लेवून, अलंकारांनी नटून थटून अत्तराच्या सुगंधाची बरसात करीत रंगभूमीवर प्रवेश करणारा हा सम्राट घरात मात्र अत्यंत साधा पायजमा नि हाफशर्ट घालायचा. वैयक्तिक आयुष्यात त्यांनी कधी अत्तर वापरलं नाही.
दृष्ट काढायची वेळ
लहान मुलं त्यांना फार आवडायची. माझा मोठा मुलगा चंद्रशेखर त्यांचा लाडका होता. माझे पती विलायतेला गेले तेव्हा मी चंदासह माहेरी मुक्कामाला आले. ‘आता रोज नाटक बघायला मिळणार, गाणं शिकायला मिळणार’ या विचारानं मी अगदी आनंदात होते. पण माहेरी येताच नानांनी मला बजावलं, ‘सरोजा, बाप्पा ! मी तुला घरी गाणं शिकवीन पण नाटक मात्र आठवड्यातून एकदाच पाहायला यायचं. चंदाकडे जरासुद्धा दुर्लक्ष करायचं नाही.’ मी निमूटपणे मान डोलावली. ठरल्याप्रमाणे आठवड्यातून एकदाच नाटक पाहायला जायचे. संध्याकाळ झाली की विंगमधून निरोप यायचा, “घरी जा. बाळाची दृष्ट काढायची वेळ झाली’. ‘स्वयंवर’ नाटकात कोकिळेची एक आठ वर्षाच्या लहान मुलीची भूमिका आहे. लहानपणी मी ती भूमिका करीत असे. ‘अति आनंद फुलवी कलिका’ हे गाणं नानांच्या सह म्हणत असे. नानांना आणि प्रेक्षकांना माझं ते छोटं काम फार आवडायचं. तेवढीच नानांच्या नाटकांत काम करायला मिळालेली संधी. मंगळागौरीच्या वेळी मात्र मी माझी नाटकात काम करायची हौस पुरी करून घेतली. आम्हा मुलींच्या ‘काय हा थाट । राजा काय करील या पेक्षा?’ केव्हा केव्हा काकांना वाटायचं, एखादा खास पदार्थ करून मालकांच्या पानात वाढावा. पण नानांना हा नाटकाचा सारा थाट नाना जातीने लक्ष घालून करून पंक्तिप्रपंच मान्य नसे. ते म्हणायचे, ‘साऱ्यांच्या पानात द्यायचे. नाटक पाहून कौतुकही करायचे. व्यवस्थितपणावर नानांचा कटाक्ष असे. स्वतःचे अंथरूण ते स्वतः काढून ठेवीत. बाहेरगावी जाताना आपले कपडे स्वतःच्या हाताने इस्तरीसारख्या घड्या करून ते बॅगेत भरीत. नोकरावर ते कधीच विसंबून राहात नसत. नाही म्हणायला आंघोळीच्यावेळी मात्र त्यांना लक्ष्मण लागायचा. पुरुषभर उंचीचं तांब्याचं पिंप पाण्यानं भरून ठेवायचा. कळशी एवढ्या कासंडीनं त्यांच्या डोक्यावर पाणी ओतायचा. सगळं पिंप रिकामं व्हायचं तेव्हा नानांची आंघोळ संपायची. गंधर्व नाटक मंडळी म्हणजे एक भलं मोठं कुटुंबच होतं. त्या कुटुंबाचे कर्तेकरविते होते माझे वडील. कंपनीत सर्वांना समान वागणूक मिळायची. तिथं लहान, मोठा, श्रीमंत, गरीब असा कुठलाच भेदभाव नव्हता. लोक घरदार विसरून कंपनीत, नानांच्या प्रेमळ छत्राखाली राहायला मिळालं यांत धन्यता मानायचे. काका सहस्त्रबुद्धे स्वयंपाक फार चांगला करीत असत. १२॥ ला पंगत बसायची. नाना पंचा नेसून पंगतीत यायचे. एकदा तात्यासाहेब मिरजकर संस्थानिक भोजनाला आले होते. रांगोळी, उदबत्त्या, निरनिराळी पक्वान्नं हे सारं पाहून तात्यासाहेब म्हणाले, तेच माझ्या पानात’. काका मग सगळ्यांसाठी तो पदार्थ करायचे तेव्हांच नाना त्या पदार्थाला हात लावत. नानांना ७५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा सार्वजनिक समारंभ आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र मंडळात कार्यक्रम होता. मोठा समुदाय जमला होता. हार-तुरे, भेटवस्तू यांचा ढिगारा पडला होता. लोकांचा उत्साह ओसंडत होता. तोच एका व्यक्तीनं लोकमान्य टिळकांचा पुतळा नानांना भेट म्हणून दिला. नानांनी पुतळा हातात घेतला आणि त्यांना गहिवरून आलं. त्यांच्याजवळ बसलेली मी त्या अश्रूची साक्षीदार होते.
पित्याची माया
अमृतमहोत्सवाच्यावेळी भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, इंदिराबाई खाडिलकर यांनी आपली हजेरी लावली. मलाही माझ्या भावना व्यक्त करायच्या होत्या. मी गाण्यासाठी नानांची परवानगी मागितली. नानांनी मला परवानगी दिली. गाणं ऐकायला उत्सुक असा प्रचंड जनसमुदाय होता. नानानं वाटलं, आता ही घाबरणार. हिला गाण्यातले शब्द आठवतील की नाही कोण जाणे? मी ‘सौभद’ मधलं ‘अरसिक किती हा शेला’ हे गाणं म्हणायला सुरुवात केली. तल्लीन होऊन मी गात होते आणि माझे पिताजी, माझे गुरु लेकीची फजिती होऊ नये म्हणून गाण्यातले पुढचे शब्द हळूच मला सांगत होते. आयुष्यात कधीतरी विसरता येईल का ही पित्याची माया। असे माझे वडील. रसिक प्रेक्षक त्यांचे अन्नदाते. जनता व जनार्दनाची सेवा हेच त्यांचं जीवन, रंगभूमीचा सेवक म्हणविण्यात त्यांनी स्वतःला धन्य मानलं. आपल्या स्वर्गीय गाण्यानं रसिकांचे कान तृप्त केले. अभिनयानं अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं. अत्तराचे सडे शिंपून रंगभूमीची पूजा करणारे जगावेगळे कलाकार माझे वडील होते, या गोष्टीचा मला फार फार अभिमान आहे. माझ्या वडिलांचं गाणं अखेरच्या क्षणापर्यंत मला त्यांच्याच तन्मयतेनं गाता यावं हीच माझी मनापासूनची इच्छा आणि हीच माझी त्यांना वाहिलेली आदरांजली !