
मुक्तिभाव हा घ्या सेवा
दाजी भाटवडेकर
सूर-लय-ताल याचं ध्यान, संगीताचे कान आणि सौंदर्याविष्काराचे भान ज्या भाग्यवंताना लाभले आहे अशा कोणत्याही मानवाला नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व हा मराठी संगीत रंगभूमीवरील एक अजब चमत्कार वाटल्याशिवाय राहिला नाही. हिमालयासारखी ईश्वरनिर्मित अगर ताजमहालासारखी मानवनिर्मित आश्चर्ये आजमितीला भौतिक जगातील प्रत्यक्ष अस्तित्वामुळे पहाणाऱ्याला आपल्या अलौकिकत्वाची साक्ष पटवून देऊ शकतात. पण बालगंधर्वांच्या असामान्यत्वाची साक्ष देण्यासाठी मात्र आजमितीला त्यांची काही चित्रे, काही ध्वनिमुद्रिका आणि आमच्यासारख्या भक्तांनी उधळलेली पण अपरंपार वापरामुळे गुळगुळीत होऊन अर्थशून्य होत चाललेली शब्दसुमनेच उपलब्ध आहेत. चैतन्यविहीन चित्रांवरून अगर ध्वनिमुद्रिकेतील अशरीरिणी स्वरमय वाणीवरून ” बालगंधर्व” या विधात्याच्या अलौकिक सर्जनाच्या यथार्थ लावण्यमयतेची पूर्णतया साक्ष पटणे सर्वस्वी अशक्य आहे. असामान्य गुणवंतांचे दर्शन, श्रवण आणि स्मरण यामुळे निर्माण होणाऱ्या, थुईथुई नाचणाऱ्या प्रेमानंद लहरींची आस्वाद्यता, त्याने होणारा असीम आनंद, संतोष ही निखळ अनुभवाची बाब आहे. शब्दांचे ढीगच्या ढीग ओतल्याने कलागुणांची निसर्गरम्यता झगमगीत होण्याऐवजी गाडली मात्र जाईल.
सुमारे वयाच्या दहाव्या वर्षी-अपरिपक्व ‘अशा ऐन कोवळया वयातच छोट्या नारायणाने सादर केलेले संगीत ऐकून परमसंतोषाने लोकमान्य टिळक उद्गारले – ” अरे हा तर बालगंधर्व” तपस्वी लोकमान्यांच्या ऋषितुल्य वाणीने उच्चारलेली ती आशीर्वाद्योक्ती !! सामान्य माणसांना काय बोलावयाचे याचा नीट विचार करून, आशय व्यवस्थित प्रकट करणारी अर्थान्रोधी शब्दयोजना करावी लागते. पण पुण्यपावन तपस्वी ऋषींनी उच्चारलेला शब्दांच्या मागे आशयाला, अर्थाला अटळपणे, अगतिकपणे धावावे लागते. “लौकिकांना हि साधूनामर्थ वागनुवर्ततं । ऋषीणां पुनराद्यानां वाचमर्थोऽनुधावति ।” छोट्या नारायणाच्या यथार्थतेने गंधर्व पदवीला पोहोचविण्याकरिता गंधर्व गुणाढयतेला सुरेलपणा, नितांत श्रवणगीता, अवर्णनीय देखणेपणा, अवयवयांची बोलकी मोहकता इत्यादी गंधर्व गण वैशिष्ट्यांना त्यांच्या पार्थिव देहाचा आश्रय घ्यावाच लागला.
माझे आजोबा कै. डॉ. सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर यांचे शुभहस्ते गंधर्व संगीत नाटक मंडळीचे उद्घाटन झाले आणि माझ्या सुदैवाने सन १९३३-३४ चे सुमारास म्हणजे वयाच्या १२-१३ व्या वर्षी मी शाळकरी असतानाच उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्यास बुधवार पेठेत तपकीर गल्लींतील किबे-भोपटकर या मात्ल गृही ” मामाच्या चिरेबंदी वाड्यात” असतानाच तपकीर गल्लीच्या तोंडाशी नानावाड्या शेजारील किर्लोस्कर नाट्यगृहातच बालगंधर्वांचे या नटरंग सम्प्रटाचे संगीत रंगभूमीवरील झालेले प्रथम दर्शनच माझ्या अंतःकरणात, स्मृतिपटलावर चिरेबंदी संस्कारालेख उमटवून गेले. स्वयंवर नाटकांतील रुक्मिणीचे स्वयंवर रुक्मी आणि शिशपाल यांच्या आतताई दांडगाईमुळे मोडले व एक दोन संवादानंतर एक पद गाऊन कृष्ण आत गेला. पिरोजी रंगांची लखलखणारी लफ्फेदार शाल नेसलेली, भाल प्रदेशावर बागडणारी बिंदी, कानात डुलणारी कर्णभूषणे, कंठांत रुळणारी मौक्तक माळा अशी हिऱ्यामोत्यांच्या दागिन्यांनी सजलेली सुवर्णकांतीची पुतळी, हातात स्वयंवरमाला घेऊन रंगमंचावर ललित पदन्यास करीत वावरणारी रुक्मीणी-बालगंधर्व “नरवर कृष्णासमान घेतले जन्मा भाग्य उदेले” हे पद आळवीत त्या यदुकुल श्रेष्ठाबद्दलची आपली निष्ठायुक्त, भक्तियुक्त प्रीती प्रकट करताना मी पाहिले आणि आनंदातिरेकाने गुदमरून, घुसमटून गेलो. इतक्यात पद संपले आणि गारांचा छतावर वर्षाव व्हावा तसा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि वन्स मोअरच्या आरोळयांनी थिएटर दुमदुमून गेले. काय होतय हे कळायच्या आतच रुक्मिणी-बालगंधर्व पुन्हा स्टेजवर आली. दुसऱ्यांदा पद संपल्यावर पुन्हा टाळ्या आणि वन्स मोअरच्या गर्जना. मला स्मरते त्याप्रमाणे १०-११ वेळा ही सर्व पुनरावृत्ती पाहून मी स्तिमित, चकित झालो. अरसिक, तर्ककर्कश, रुक्षवृत्तीला न पटणारी ही पुनरावृत्ती. पण प्रत्यक्ष अनुभवल्याक्षणी मात्र ती सहज, क्रमप्राप्त, अत्यंत इष्ट वाटली. इतकेच नव्हे तर अलौकिक कलाविष्काराचा परिणाम असाच व्हावयाचा-नव्हे नव्हे असाच झाला पाहिजे हे पटले आणि मनावर ठाम ठसले. संगीत नाटकांत त्या वन्समोअरबद्दल बोटे मोडणाऱ्या अरसिकांबद्दल एवढेच म्हणावेसे वाटते की अरसिकेषु कवित्वनिवेदम् । शिरसि मा लिख मा लिख मा लिख ।।
रंगभूमीवरील अभिनयाविष्कारांतील नैपुण्य अनन्यसाधारण, लोकविलक्षण ठरण्यास मुख्यत्वे करून तीन गोष्टी कारणीभूत होत असतात, असे मी मानतो. अभिनयाविष्काराला ज्या तीन कसोट्या पार करणे आवश्यक असते त्या म्हणजे दर्शनमूल्य, श्रवणमूल्य आणि स्मरणमूल्य. अभिनेत्याचे दर्शन, त्याची हालचाल, वावरणं, हावभाव, फार काय नुसते एके ठिकाणी निश्चल उभे ठाकणेसुद्धा मोहक, प्रेक्षकांच्या नेत्रांना निववणारं आणि चित्तवृत्ती प्रसन्न करणारं आकर्षक असं असलं पाहिजे. अभिनेत्याचे रंगभूमीवरील व्यापार न्याहाळताना प्रेक्षकांची चित्तवृत्ती इतकी तल्लीन झाली पाहिजे की निसर्गतःच होणारी डोळयांच्या पात्यांची उघडझाप किवा श्वासोच्छवासाकरतां होणारी शरीराची हालचाल या गोष्टींचा सुद्धा अडथळा असहय वाटावा. “एकला नयनाला विषय तो” झाला पाहिजे आणि दर्शन सुख-समाधी कोणत्याही निमित्ताने भंग पावू नये अशी तळमळ रसिक प्रेक्षकाला लागली पाहिजे. “सात्त्विक”, “आंगिक ‘ आणि “आहार्य” अभिनयनैपुण्याची ही परमावधी समजावी. हे झाले दर्शनमूल्य. तसेच नटाच्या मुखातून बाहेर पडणारा शब्द सर्व इष्ट उच्चारण कौशल्य आणि आवश्यक स्वारालंकार यांनी सजून अशा पद्धतीने प्रेक्षकांच्या कानावर पडावा, श्रुतिपंथात अवतीर्ण व्हावा की श्रवणशक्तीवर श्रोतेंद्रियावर कसलाही अनैसर्गिक, अनावश्यक ताण न पडता तो शब्द कानानी अलगद झेलला जावा आणि तरीही संवादांतील अपेक्षित रसास्वादाचा परिणामकारक प्रत्यय यावा. हाच वाचिक अभिनयाचा उत्कर्षीबदू. बालगंधर्वांचे लोकोतरत्व हे की दर्शनमूल्य आणि श्रवणमूल्य या दोहोंचे संतुलन त्यांनी इतक्या कुशलतेने सांभाळले की रसोत्कटतेत चिंब भिजविलेले त्यांचे उत्कर्षबिंदू मायबाप प्रेक्षकांसमोर पेश करताना त्यातील तालाने (लयकारीने Rhythm) केसभर सरकू नये आणि तोलाने (Balance) रतिभर ढळू नये. दर्शनमूल्य आणि श्रवणमूल्य यापैकी कोणत्याही एकाने दुसऱ्यावर स्वार होऊन, मात करून त्याला गारद करावे असा बालगंधर्वांचा आविष्कार कधीच एकांगी नव्हता.
स्वयंवर नाटकांतील पहिल्या दोन अंकातील नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकरांनी रुक्मिणीच्या तोंडी घातलेली कृष्णवर्णनपर पदे बालगंधर्वांचे दर्शनमूल्य या दृष्टिकोनांतून अभ्यासिली तर एका निराळ्याच मजेदार अनुभूतीवर प्रकाशझोत टाकतात. वास्तविक श्रीकृष्णाची अलौकिक, दैवी रुपसंपदा, लावण्यरुपडे आणि रुक्मिणीच्या मनावर होणारी त्यांची प्रतिक्रिया यांचे शब्दांकन ही पदे करतात. “मम आत्मा गमला हा”, “, “सुजन कसा मनचोरी ग”, “एकला नयनाला विषय तो झाला” आणि “रुपवळी तो नरशार्दुल साचा” या पदांतील शब्द योजनेचा बारकाईने पुनःपुनः वेध घेता मला तर राहून राहून असे भासते की या पदांनी स्वयंवरांतील नाट्यप्रसंगात जरी श्रीकृष्णाच्या लावण्याचे वर्णन अभिप्रेत असले तरी प्रत्यक्षात मात्र रुक्मिणी, भामिनी, सुभद्रा, मेनका इत्यादी आपण निर्माण केलेल्या विविध नायिकांच्या भूमिकांतून विहार करणाऱ्या बालगंधर्वांचे दर्शनमूल्य चितारण्यासाठीच जणू अनाहूतपणे, अटळपणे सदर पदांवर वर्णनात्मक शब्दयोजना नाट्याचार्यांच्या लेखणीतून अवतरली असावी. गरती लावण्याचा खानदानी आविष्कार करणाऱ्या बालगंधर्वांच्या स्त्री भूमिकांतील प्रत्येक किंवा चित्रांकित प्रतिमा न्याहाळण्यास किंवा पुरुषवेषांतील त्यांचं मोहक, गोंडस, बाळसेदार रुपडं पाहिल्यास वरील कल्पना मनात रूढ होत जाते. श्रीकृष्णाच्या रूपयौवनाचे वर्णन करणारी पदे रचताना अनेक वर्षांच्या रंगभूमीवरील आणि बाहेर घडलेल्या बालगंधर्वांच्या गाढ परिचयामुळे स्वतःच्या मनावर अटळपणे उमटलेल्या बालगंधर्वांच्या दर्शनमूल्याच्या आलेखाने कळत-नकळत नाट्याचार्यांच्या प्रतिभेला साथ दिली असल्यास नवल ते काय ? बालगंधर्वांच्या स्त्री भूमिकेतील अप्रतिम देखणेपण आणि त्यांचं अजोड अभिनय सामर्थ्य यांचा नाट्याचार्यांना घडलेला साक्षात्कारच वरील पदात त्यांचेकडून शब्दबद्ध केला गेला आहे असे मानण्यास प्रत्यवाय असू नये. विरोधकांनी किंवा स्पर्धा करू इच्छिणाऱ्या कलावंतांनीही शत्रुभाव विसरून मानाचा मुजरा करावा असं खानदानी गरती लावण्य आणि नेत्रपल्लवीच्या दृष्टिक्षेपाने साधलेल्या संभाषणाच्या माध्यमातून सिद्ध केलेली समर्थ अभिनयाभिव्यक्ती या दोन अमोघ शस्त्रांनी “खळा देखी मग भूल फेकी, नयन भाषण मनास जिकी, क्षणी विनाशित रिपुभाव मनिचा (स्वभाव रिपुचा)” अशी बघणाऱ्याची अवस्था बालगंधर्वांच्या भूमिकांनी होत असे. बालगंधर्वांच्या स्त्री भूमिकांतील लावण्य दर्शनाचा आवर्जून नोंद घेण्याचा एक विशेष म्हणजे त्यामुळे कामोद्दीपनासारख्या अश्लाघ्य प्रवृत्ती काडीमात्रही जागृत होत नसत. ” आम्हा बायकांच सौंदर्य जर पुरुषांना दुष्ट करू लागलं तर आम्हा बायकांना सुंदर म्हणण्यापेक्षा कुरुपच म्हटले पाहिजे. सौंदर्य ते खरं-त्या नंदकुमाराचं सौंदर्य ते खरं सौंदर्य. त्यांना पाहिले म्हंणजे मनातला वैरभावच नाहीसा होतो आणि जगात कोणी दुष्ट म्हणून आहेत याची आठवणच राहात नाही. असं दर्शन घडल्यावर कोणाच्या हातातली शस्त्र गळून पडणार नाहीत ? त्यांचा आवाज ऐकल्यावर कोणाची मान त्यांच्यापुढे लवल्याशिवाय राहील? त्यांनी प्रेमाने आणि प्रसन्न मुद्रेने पाहिल्यावर त्यांच्याच सहवासात सर्वकाळ घालवावा असे कोणाला वाटणार नाही ? शत्रूना मित्र करणारं, तसलं खरं सौंदर्य त्याचं” हे रुक्मिणीच्या तोंडी घातलेले भाषण बालगंधर्वांच्याच दर्शनमूल्याचं सार्थ वर्णन आहे असं त्यांना रंगभूमीवर वावरताना प्रत्यक्ष पाहिलेल्या कोणत्या रसिकाला वाटणार नाही ? तसेच स्वयंवर नाटकाच्या चवथ्या अंकात “जिच्या गाण्याने मोहित होऊन गायी सभोवार जमतात ती नवरी मुलगी श्रीकृष्णाची पट्टराणी होणार असे राधेने कृष्णाला सांगितले” हे गोपाळरावांच्या तोंडी नाट्याचार्यांनी घातलेलं वाक्यही बालगंधर्वांच्या श्रवणमूल्याचे संदर्भात फार मोठा आशय आणि त्या बाबतीतला नाट्याचार्यांचा अनुभव आणि अभिप्रायही सांगून जाते. दर्शनमूल्य आणि श्रवणमूल्य या दोहोंच्या सिद्धीमुळेच बालगंधर्व संगीत मराठी रंगभूमीचे चिरंतन लेणे ठरले आणि सहजच “स्मरणमूल्य” या लोकोत्तरत्वासाठी आवश्यक असणाऱ्या तिसऱ्या घटकाचे धनी झाले-स्मृतिरुपाने, कीर्तिरुपाने ते चिरंजीव झाले. या तीनही मूल्यांनी वरमाला घातलेला गद्य आणि मराठी रंगभूमीवरील सम्राट म्हणजे कै. नानासाहेब फाटक.
नाटघाचार्य खाडिलकरांनी मानापमान नाटकात चौथ्या अंकात धैर्यधराच्या तोंडी पुढील संवाद घातला आहे- “सर्व रस प्रेमाच्या प्रभावळीतले मणी असून एकट्या प्रेमाचे तेज खुलविण्याकरिता ते प्रेमाच्या सभोवती घुटमळत असतात…. सर्व विकारांच्या सर्व विचारांच्या, सर्व उद्योगांच्या, सर्व हालचालींच्या बुडाशी प्रेम असते. किंबहुना प्रेम नाही तर जगात काहीच नाही”. या संभाषणाच्या शेवटी रुपाने धैर्यधराचे “प्रेम भावे जीव जगि या नटला” हे प्रसिद्ध पद आहे. त्या पदात नाटयाचार्य सांगतात – ” नसती भिन्न रस हे, शृंगार राज्य नवदल त्याला.” असे जरी असले तरी रुक्मिणी, ‘भामिनी, मेनका या शृंगारप्रधान नायिकांच्या रती (प्रेम) या भावाभिनिवेशाची अभिव्यक्ती, कान्होपात्रा, मीराबाई या शांतरस प्रधान नायिकांच्या भक्तिभावाभिनिवेशाचा आविष्कार आणि तद्वतच सिंधु, सुभद्रा या करुणप्रधान नायिकांच्या व्याक्ळभावाभिनिवेशाचे सादरीकरण या तिहींच्या बालगंधर्वांनी साधलेल्या परिणामकारकतेत तसूभर देखील फरक नसे. त्याचप्रमाणे मानापमानामध्ये बनमाला म्हणून अचानक छापा घालणाऱ्या चोरांशी लढताना बालगंधर्वांच्या चपल पदन्यासानी घेतलेले पवित्रे एकाद्या वीरांगनेलाही लाजवितील असे पडत असत आणि त्यांनी केलेली लखलखत्या तलवारीच्या पात्याची आडवी उभी फेक वीररसाचे इंद्रधनुष्यच, दृष्टीपुढे क्षणमात्र उभे करीत. आत्म्याचे यथार्थत्वाने असणे म्हणजेच प्रभूचे दिसणे असे ज्ञानोबारायानी म्हटल्यांवर स्मरते. त्याच चालीवर सार्थपणे म्हणावेसे वाटते की “बालगंधर्वांचे केवळ असणे म्हणजेच रुक्मिणी, भामिनी, सिंधू, सुभद्रा इत्यादींचे दिसणे.”
बालगंधर्वांच्या संगीताभिनयगुणांवर समर्थपणे प्रकाशझोत टाकणारी ही दपिशिखा म्हणजे स्वयंवर नाटक. या नाटकाच्या चवथ्या अंकाच्या दुसऱ्या प्रवेशातील (सन १९५९ च्या नवव्या आवृत्तीच्या पृष्ठ ८३, ८४, ८५ व ८६) रुक्मिणीच्या स्वप्नरंजनात्मक प्रदीर्घ स्वगतात बालगंधर्व आम्हा प्रेक्षकांना “अरुपदर्शन ” आणि “अशब्दसंभाषण” या उच्च कोटीतल्या अभिनयग्णांचे सहज दर्शन घडवीत असत. प्रत्यक्ष नायक (प्रियकर) उपस्थित नसताना केवळ कल्पनेने त्याची मूर्ती, अस्तित्व साकार करून त्याच्याशी शब्दांच्या आणि क्वचित प्रसंगी केवळ अविर्भाव/हावभाव/कटाक्ष यांच्या साहधाने शृंगारभावना अथवा मनीचे हितगुज व्यक्त करणे याला अरुपदर्शन आणि अशब्द संभाषण ही संज्ञा देण्यात येते. या भावाविष्काराची अत्यंत हृद्य आणि चित्ताकर्षक परिणती म्हणजे बालगंधर्वांनी गायिकेला ” नृपकन्या तव जाया ” ही भैरवी आणि “वैरी मांरायाला” या पदाने आळविलेला मालकंस. श्रीज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील ६८ व्या ओवीत अन्य संदर्भात उच्चारिलेल्या ज्ञानोबारायांच्या समर्थ वाणीनेच जणू बालगंधर्वांच्या अभिनय सामर्थ्याचे प्रतिरुप केलेले मार्मिक बाचकाच्या नजरेतून सुटणार नाही. तरी संबंधित
ओवी अशी-
“हे शब्देविण संवादिजे। इंद्रियां नेणतां भोगिजे ।
बोलाआदि झोंबिजे । प्रमेयासी
.
महाराष्ट्राचे वाल्मिकी कविवर्य माडगुळकर आपल्या अमर काव्यात म्हणतात – ” असा बालगंधर्व आता न होणे” खरोखरच त्यांची अशी निराशावादी धारणा होती का ? सळसळणाऱ्या सर्जनशील प्रतिभावंतांची नवनवोन्मेष शालिनी काव्यप्रज्ञा निराशेच्या तिमिरात रूतून दिङ्मूढ होणे शक्य आहे का ? काव्यपंक्तीच्या शेवटी मनांतून प्रश्नचिन्ह किवा उद्गारचिन्ह स्फुरले असता गफलतीने पूर्णविराम पडला असेल का ? असा बालगंधर्व भविष्यकाळात निर्माण होणे का अशक्य व्हावे ? या लोक विलक्षण शिल्पनिर्मितीची पुनरावृत्ती करण्याची उर्मी विश्वकर्त्याच्या मनी का दाटू नये ? असाच कविवर्याना अंतर्यामी भावलेला आशय असावा असे मला तरी वाटते आणि “यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृज्यम्यहम । या भगवद्गीतेची आठवण येते. संगीत विरोधी असुरांनी वेळोवेळी घातलेल्या घाल्यामुळे संगीत रंगभूमीरूपी धर्माला संगीत नाट्यधर्माला सद्यःस्थितीत आलेली ग्लानी पाहून ती निवारण्याकरिता आत्मसर्जन करण्यास प्रतिज्ञाबद्ध असलेली चित्शक्ती, या जन्मशताब्दी समारोहातून स्फूर्ती, प्रेरणा घेणारा एकादा सूर-ताल लयींशी लीलया खेळणारा अभिनयसम्राट, संगीत-मराठी रंगभूमीचा तारणहार जन्माला घालणारच नाही याची तरी ग्वाही कुणी द्यावी ? एखादा परमेश्वरी प्रसादाचा अंकुर संगीत-मराठी रंगभूमीच्या वृक्षाला एव्हाना फुटून बहरण्याच्या वाटेवर असेलही. कारण सर्वसामान्यपणे मृत्यू हा जीवनरूपी वाक्याचा पूर्णविराम जरी असला तरी लोकोत्तर प्रतिभावंतांच्या बाबतीत मृत्यू हा त्यांच्या यशोदिडीचा (यशोगाथा) श्रीगणेशा आणि सदृश निर्मितीचा प्रभातकाळही होऊ शकतो.
बालगंधर्वांच्या नाट्यगाननिपुणकलेच्या स्मृती म्हणजे ” मम सुखाची ठेव” त्यांच्या स्वरांसाठी, लयकारीसाठी, अभिनय दर्शनासाठी “बहु भुकेला झालो” म्हणून “तुमच्या उष्ट्यासाठी आलो” अशा समयी बालगंधर्वांच्या एकाच वेळी सुखावणाऱ्या आणि विव्हळ करणाऱ्या स्मृतींना अभिवादन करताना मनाच्या गाभाऱ्यात उमटतात -” जोहार मायबाप जोहार”
भक्तिभाव हा घ्या सेवा “