
मुक्तिभाव हा घ्या सेवा (मुक्ति का भाव लें, सेवा करें।)
दाजी भाटवडेकर
सूर-लय-ताल याचं ध्यान, संगीताचे कान आणि सौंदर्याविष्काराचे भान ज्या भाग्यवंताना लाभले आहे अशा कोणत्याही मानवाला नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व हा मराठी संगीत रंगभूमीवरील एक अजब चमत्कार वाटल्याशिवाय राहिला नाही. हिमालयासारखी ईश्वरनिर्मित अगर ताजमहालासारखी मानवनिर्मित आश्चर्ये आजमितीला भौतिक जगातील प्रत्यक्ष अस्तित्वामुळे पहाणाऱ्याला आपल्या अलौकिकत्वाची साक्ष पटवून देऊ शकतात. पण बालगंधर्वांच्या असामान्यत्वाची साक्ष देण्यासाठी मात्र आजमितीला त्यांची काही चित्रे, काही ध्वनिमुद्रिका आणि आमच्यासारख्या भक्तांनी उधळलेली पण अपरंपार वापरामुळे गुळगुळीत होऊन अर्थशून्य होत चाललेली शब्दसुमनेच उपलब्ध आहेत. चैतन्यविहीन चित्रांवरून अगर ध्वनिमुद्रिकेतील अशरीरिणी स्वरमय वाणीवरून ” बालगंधर्व” या विधात्याच्या अलौकिक सर्जनाच्या यथार्थ लावण्यमयतेची पूर्णतया साक्ष पटणे सर्वस्वी अशक्य आहे. असामान्य गुणवंतांचे दर्शन, श्रवण आणि स्मरण यामुळे निर्माण होणाऱ्या, थुईथुई नाचणाऱ्या प्रेमानंद लहरींची आस्वाद्यता, त्याने होणारा असीम आनंद, संतोष ही निखळ अनुभवाची बाब आहे. शब्दांचे ढीगच्या ढीग ओतल्याने कलागुणांची निसर्गरम्यता झगमगीत होण्याऐवजी गाडली मात्र जाईल.