Logo

श्री. नारायणरावांचे संगीत

गीताची आवड प्रत्येक प्राणिमात्रास आहे कारण नादब्रह्माच्या आनंदात मनुष्यप्राणीच काय पण पशुपक्षीदेखील इतके लुब्ध व तल्लीन होतात कीं, त्या वेळेपुरते तरी ते ऐहिक सुखदुःख विसरून स्वर्गीय आनंदात निमग्न होतात. या कलेला मेहनतीबरोबर नैसर्गिक देणगीची अत्यंत आवश्यकता आहे. ती पुष्कळांना नसल्याने या कलेमध्ये प्रवीण व सर्वांगसुंदर गुणीजन फारच थोडे निर्माण होतात. गळयाचे अर्थात् आवाजाचे धर्म अनेक आहेत. मेहनतीने तयार केलेल्या गळ्यातून गाण्याची करामत किंवा कामगत वाटेल तशी करतां यईल. पण ती कामगत करण्यास जितके श्रम पडतील त्यापेक्षां गोड व हलक्या गळ्याला फार कमी श्रम पडतील.

श्री. बालगंधर्व हे अशा स्वाभाविक गोड गळ्याचे संगीत नट आहेत. त्यांच्या गाण्यामधील विशेष गुण म्हणजे सुरेल आवाज, गाण्यांतील संथपणा, स्वच्छ दाणेदार तान, व तालांतील व्यवस्थितपणा हे होत सारांश, गाणें जमविण्यास जे गुण प्रामुख्याने लागतात ते त्यांचेमध्ये असल्याने त्यांना श्रोतृसमाज केव्हांही आपलासा करता येतो. ते कंपनीत सुमारे अठराव्या वर्षी दाखल झाले. त्या वेळेपासून तों मानापमान’ नाटक रंगभूमीवर येईपर्यंत त्यांच्या गाण्यांत विविधता नसुन तें बरेचसे एकांगीपणाचेंच होते. नंतर मानमापमान’ नाटकापासुन गाण्याच्या नवीन चालीचे व त्याबाबतींत चाली बसवून देण्याचे गाण्याचे शिक्षण परमपूज्य गुरु भास्करबुवा बखले यांनी देण्यास सुरुवात केल्यामु‌ळे श्री बालगंधर्वांच्या गाण्यांत प्रगती होऊ लागली व ते रागदारींतील कांही पदे व्यवस्थितपणे म्हणू लागले या कामी श्री गोविंदराव टेंबे यांनींही ‘मानापमान’ नाटकांत चाली दिल्यामुळे त्यानाही बरेचसे श्रेय आहे व ह्यांचाही फायदा श्री. बालगंधर्वांना बराच झाला. तेव्हापासून ती आवड इतकी वाढली की, पुढे जीं नाटके रंगभूमीवर आली त्यांतील  पदांच्या चालींकरितां गुरु बुवासाहेबांना बोलावून आणून त्यांच्याकडून निरनिराळया रागदारीतील चाली घेऊन त्या मोठ्या हौसेने बसवावयाच्या असा क्रम सुरू झाला. त्यामुळे त्यांचे गाणे बऱ्याच प्रमाणांत पद्धतशीर झालें.

श्री, बालगंधर्व हे किर्लोस्कर मंडळींत आल्यापासून व मुख्य नायिकेची भूमिका करू लागल्यापासून त्याच्या जोडीस नायकाची भूमिका करणारे असे निदान दहाबारा नट आजपर्यंत होऊन गेले कै. नानासाहेब जोगळेकर हे पहिले नायक (Hero) होत. संगीत नट म्हटला म्हणजे त्याला गोड व सुरेल गळयाची आवश्यकता आहे. त्याला शास्त्रोक्त गाणें अवगत असले पाहिजे. संगीतशास्त्र न शिकलेल्या नटाच्या हातून नाटकांतील गायकी पदांची अवहेलनाच होते. श्री. जोगळेकरांना सुरेल व चढ़या आवाजाची उत्तम देणगी होती व त्याचे गाण्याचे शास्त्रीय अध्ययनही बरेच आले झाले. ते बीनही उत्तम वाजवीत. त्यामुळे आलाप करणे व सुरासुराने गाणें हें त्यांचे वैशिष्ट्य होते, कै. जोगळेकरांजवळ ज्यांचा अभाव होता अशा गायनातील मुख्य गोष्टी म्हणजे स्वच्छ तान, मुरक्या वगैरे. श्री. गंधर्वांजवळ या गोष्टी भरपूर असल्यामु‌ळे त्यांनी कै. जोगळेकरांनाही काही वेळ मागे टाकले. यानंतर श्री. गोविंदराव टेंबे यांना गुरू बुवांनी कंपनीत जावयास मागितले व त्यांची के जोगळेकरांच्या जागी नेमणूक झाली त्या जागेकरता आणखी दोन नट म्हणजे रा. कृष्णराव गोरे व नानबा लेले हेही त्या वेळेस नांवाजलेल्या गायकांपैकीच होते. श्री. गोविंदराव टेंबे यांच्यामध्ये समजून गाणे म्हणणे, तानेची तयारी, हिंदोस्तानी ढंग वगैरे गोष्टी विशेष असल्यामुळे काहीं पदें ते फारच चांगली म्हणत, मानापमान, मूकनायक, विद्याहरण वगैरे नाटकांतून त्यांनी त्या बाबतींत बरेचसे यश संपादन केलें. विशेषतः मानापमान’ व ‘विद्याहरण’ नाटकातून काही चाली त्यांच्याच असल्यामु‌ळे ती पदें विशेष चांगली होत.

श्री बालगंधर्वांना त्यांच्या गायनकौशल्याचा चांगला उपयोग करून घेतां आला. रा. कृष्णराव गोरे हे आवाजाच्या बाबतीत नांवाजलेले नट खरे, पण त्यांच्या गाण्यांत खुला आवाज व एकेरी तानफेंक याशिवाय काही नसल्यामु‌ळे बालगंधर्वांवर विशेष परिणाम झाला नाही. बाकीच्या नायकांसंबंधात रा. बालगंधर्व यांच्याच गाण्याची छाप हीरोवर पडली आहे असे दिसून येते याच सुमारास प्रसिद्धीस आलेले संगीत नट व ललितकलादर्श संगीत मंडळीचे माजी मालक कै. केशवराव भोसले यांनाही नारायणरावांचे जोडीला ‘ मानापमान ‘ व ‘सौभद्र’ या नाटकांत नायकाची भूमिका करण्याचा सुयोग आला होता. कै. केशवराव हे मोठ्या हिय्याचे व स्वतःच्या कर्तबगारीनें पुढे आलेले नट होते. त्यांच्या आवाजाला फारशी गोडी नव्हती: व त्यांच्या गाण्यात सहजताही नव्हती. पण अत्यंत मेहनतीनें त्यांनी आपल्या आवाजांत इतका कणखरपणा आणला होता कीं, थिएटरमध्यें अगर मजलसीत त्याच्या आवाजाची छाप पडून त्याचे गाणे कांहीं काळ तरी श्रोतृसमाजाच्या कानांत घुमत असे. त्यांच्या तानांमध्येही वरीच चमत्कृती असल्यामुळे श्रोत्यांना थरारल्यासारखे वाटत असे. महत्त्वाकांक्षा हा गुण त्यांच्यामध्ये विशेष असल्यामुळे अमुक एक गोष्ट करावयाची. अमुक एक पद जोरकस गाऊन’ वन्स मोअर’ मिळवायचा. अमक्याशीं गाण्यांत स्पर्धा करावयाची असा जर त्यांनी निश्चय केला तर जिवाचे रान करून तो ते तडीस नेत. बालगंधर्वांच्याबरोबर आपण काम करावें, ही त्यांची फार दिवसांपासूनची इच्छा होती. पण तसा योग एरवीं जुळून यावयास कांहींच कारण नव्हतें, अखेर हा योग १९२१ मालीं टिळक स्वराज्य फंडाच्या निमित्ताने जुळवून आला.

संयुक्त प्रयोगाला ‘मानापमान नाटकच कां घेतलें, हा एक प्रश्न साहजिकच आमच्या मंडळींत निघाला होता. हे नाटक जरी सर्वांगसुंदर असले तरी या नाटकांत गाण्याच्या दृष्टीने भामिनीपेक्षां धैर्यधरालाच जास्त महत्त्व आहे. धैर्यधराच्या भूमिकेला मूळ चालीच उत्तम व नवीन आहेत. भामिनीच्या पदांच्या चाली ग्रामोफोन रेकॉर्डमधून प्रसिद्ध असून त्या गोहरजान, मलकाजान, जोहरबाई यांसारख्या अधिकारी गायिकांकडून लोकप्रिय केलेल्या आहेत. शिवाय या ‘मानापमान’ नाटकापासनच रंगभूमीवरील संगीताला सुंदर व चटकदार वळण मिळाल्यामुळे तीं पदें लोकांच्या तोंडी बसली. धैर्यधराचीं पदें बरीच कर्नाटकी चालींचीं असून काही तर अस्सल हिंदुस्थानी चालीची आहेत मूळ कर्नाटकी चालीच काही रेकॉर्डस आहेत. पण महाराष्ट्रात भाषेच्या अनोळखीपणामुळे त्या ठाऊक असणं अशक्य! तो एक नवीनपणा व हिंदुस्थानी चालीच्या रेकॉर्डसही नसल्यामुळे (माझ्या अजून ऐकिवात नाही) दोन्ही तऱ्हेच्या पदांनी नटलेला धैर्यधर भामिनीपेक्षा जास्त उठावदार आहे के केशवरावांच्या जोरकस व तडफदार गळयातून निघून ती पदे अत्यंत परिणामकारक होत असत.

या प्रकाराच्या गाण्यामुळे त्याचे धैर्यधराचे काम फारच नावाजलेले होते. अर्थात त्यांनी तेच नाटक लावावे असा आग्रह धरणें स्वाभाविक होते भूमिकांचे महत्व व पदांची योग्य वाटणी या दृष्टीने ‘विद्याहरण’ नाटक लावले तर जास्त चांगले होईल अशीही पुष्कळ लोकांची कल्पना होती पण या विचाराला मूर्त स्वरूप न येता मानापमान ‘च कायम होऊन त्याचा प्रयोग जाहीर झाला नाटकाच्या वेळी ऑर्गन वाजविण्यासाठी रा. पेंढरकर यांची योजना झाली होती केशवरावाची साथ करण्याचा प्रसंग त्यांना बरेच वेळा येत असल्यामुळे केशवरावांना ती साथ फार हितावह झाली. श्री. बालगंधर्वांना नेहमीची साथीदार मंडली नसल्यामुळे बरेच चुकल्याचुकल्यासारखे वाटले. त्यांची नेहमीची साथीची मंडळी असती तर त्याचीं पदें आली त्यापेक्षा जास्त रंगली असती. त्यानंतर ‘सौभद्र’ नाटक ठरलें. त्यांत बालगंधर्वांना त्यांना पाहिजे होती तशी साथ मिळाली. अर्जुनाच्या पदापेक्षा सुभद्रेची पदें जास्त गाण्यासारखी असून बालगंधर्वांच्या गळ्यालाही ती फार चढली असल्यामुळे त्यानीं या नाटकांत ‘मानापमाना’ तला वचपा भरून काढला. कै. केशवरावांनी या नाट्यप्रयोगसमयी बालगंधर्वांच्यासंबंधी गौरवपर उद्गार काढले. सुभद्रेची दुसऱ्या अंकातील पदें  बालगंधर्व रंगभुमीवर गाऊन दाखवीत होते त्या वेळी केशवरावच प्रस्तुत लेखकाजवळ येऊन म्हणाले. ” नारायणराव म्हणजे स्वरांची ज्योत आहे. ” मानापमानां ‘तील भामिनी म्हणजे सौभद्रांतील अर्जुन व ‘सौभद्रातील’ सुभद्रा म्हणजे ‘मानापमान ‘तील धैर्यधर अशी दोघांही नटांची स्थिति झाली. दोघेही आपापल्या परीनें उत्तम नट होतें. दोघांची एकमेकांशी तुलना करता येणे शक्य नाहीं.

अलीकडे दहा बारा वर्षा पूर्वीची पायपेटी जाऊन त्या जागी ऑर्गनची साथ सुरू झाली. याला कारण श्री. बालगंधर्वच होत. ऑर्गनवरील साथ तंबोऱ्यावरील गाण्याइतकी कठीण नाहीं; पण ऑर्गनवर गाणारा जास्त सुरेल असावा लागतो. पेटीच्या धडाक्यांत गाणें जसें खपून जाईल तसें ऑर्गनमध्ये जाणार नाहीं. या विशेष गोष्टीमुळे अजून इतर कंपन्यांतून सर्रास ऑर्गनची साथ दृष्टीस पडत नाहीं. ऑर्गनच्या साथीवर गाणारा एकादे वेळेस पेटीवर व्यवस्थित गाऊं शकेल, त्याचा सुरेलपणा ढळणार नाही, पण नेहमीं पेटीवर गाणाराला ऑर्गनवर गातांना चुकल्यासारखें वाटून काहीं तरी कानाशीं कुणकुण चालली आहे असा भास होईल. शिवाय ज्यांचे आवाज सुरेल पण बारीक आहेत त्यांच्याही ऑर्गनच्या साथीमुळे थिएटरसारख्या ठिकाणी आवाज उत्तम ऐकू येतो. दुसरी गोष्ट पेटीच्या आवाजाचा भास व गोंगाट, पुढील दोनतीन रांगांतील प्रेक्षकांना जास्त भासतो. पण ऑर्गनच्या साथीची अशी स्थिति नाही. श्री. नारायणरावांनी या अशा सुरेल वाद्याची निवड करून रंगभूमीवर एक नवीन उपयुक्त योजना केली याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. त्याचप्रमाणे नारायणरावांनीं सारंगी या वाद्याला ऑर्गनइतकेंच महत्त्व देऊन त्याचा चांगुलपणा लोकांच्या नजरेस आणून दिला. नाटकांतील गाणें नेहमीं ठरलेल्या पद्धतीचेंच असतें. त्यामुळे गाण्यांत विशेष प्रगति होऊ शकत नाहीं.

आतां अशा मोजक्या व ठराविक गाण्याची बैठकींत विशेष छाप पडत नाहीं हें जरी खरें असलें, तरी बालगंधर्वांनी बैठकीला लागणाऱ्या शास्त्रोक्त गाण्याकडे अधिक लक्ष दिल्यास रंगभूमीशिवाय ते बैठकींतही उत्तम गाऊं शकतील यांत शंका नाहीं. श्री. नारायणरावांचे आतापर्यंतचे ठराविक राग म्हणजे भीमपलास, विहाग, यमन, भूप, बागेश्री, तिलककामोद, मालकंस, भैरवी, जोगी, पिलु, मांड, पहाडी कंगला, काफी, वगैरे होत. या रागांतील पदें ते व्यवस्थितपणानें म्हणतात. याशिवाय एकाद दूसरा राग नाटकांतील पदांकरितां त्यांना दिलाच तर ते तो म्हणावयास उत्सुक असतात. “शिकवा, म्हणजे मी म्हणतो ” असें ते म्हणतात. गुरू बुवासाहेबांनीं वर लिहिलेल्या रागाशिवाय दुसरे, देसकार, ललत, देशी हे राग पदांकरितां त्यांना नाटकांतून दिले. मलाही गुरुवर्यांच्यामागे चाली देण्याचें काम करावें लागतें: आणि माझाही अनुभव हाच असून मीही त्यांना धानी, जीवनपुरी, शंकरा असे भिन्न भिन्न राग पदांकरितां दिले. त्या रागांतील पदें ते व्यवस्थित गातात. हल्लीच्या नाटकांतील गाण्यातही बैठकीच्या शास्त्रोक्त गाण्याचा प्रादुर्भाव पुष्कळ झालेला आहे व आतांपर्यंत शास्त्रोक्त गांणारे गवई या नाटकधंद्यांत बरेच असून त्यांचा बोलबालाही बराच झाला आहे.

वीसपंचवीस वर्षापूर्वीची महाराष्ट्रांतील संगीत रंगभूमी व त्यानंतरची रंगभूमि यांमध्यें संगीताच्या दृष्टीनें बरीच क्रांति घडून आल्याचें जनतेच्या नजरेस आलेंच आहे. आतां त्या वेळच्या संगीतामध्ये कांहीं दोष, म्हणजे त्या वेळच्या बहुतेक नटांना नाटकांतील पदांमध्ये निरनिराळ्या रागांची भेसळ करण्याची संवय असे. याला कै. बाळकोबा नाटेकरांसारखे कांहीं अपवाद होते. श्री. बालगंधर्व यांचे त्या वेळचें रंगभूमीवरचें गाणें ज्यांनी ऐकलें असेल त्यांनाही या म्हणण्याची सत्यता पटेल. त्या वेळचे ‘उगिच का कांता’ हें पद रेकॉर्डमध्ये अजून लोकांच्या ऐकण्यांत आहे. यानंतर श्री. बालगंधर्वांना गुरूवर्य बुवांचेकडून शिक्षण घेतल्यानंतर शास्त्रोक्त गाण्याची जबाबदारी ओळखून वर सांगितलेला दोष बराचसा नाहींसा केला आणि कोणतीही भूमिका घेतली असतां तिला बाध न येईल असें व रसहानि होऊं न देतां, त्याला पोषक उठावदारपणा आणून रंगभूमीवरील संगीताला निराळे वळण लावलें ही मोठी अभिनंदनीय गोष्ट आहे. नाटकांतून गवयांचें शास्त्रोक्त गाणें उपयोगी नाहीं असें कोणी म्हणतील. मी असें स्पष्ट म्हणावयास तयार आहें की, अलीकडील रंगभूमीवरील गाणें त्याच पद्धतीचें आहे.

आतांपर्यंत जेवढे संगीत नट झाले आहेत ते सर्व गवयांकडे शिकलेले आहेत; यांत बालगंधर्वांची गणना आहेच. आतां तें गाणें वाईट नसून गाण्याबरोबर वृथा हावभाव करण्याची जी गवयांना संवय असते ती वाईट आहे; व या निष्कारण संवयीमुळे गवयांच्या गाण्यावरचें प्रेम उडून जाणें वाईट असें सर्रास लोक म्हणतात. तरी यापुढे गवयांनी व नटांनी गाण्याशिवाय बाकीच्या आगंतुक गोष्टी टाकून दिल्यास त्यांना रंगभूमि हें स्थान आपले गुण जनतेपुढें आणण्यास योग्य प्रकारे उपयोगी पडेल. अशा रीतीने श्री. बालगंधर्वांच्याप्रमाणे त्यांना रंगभूमीची सुधारणा करतां येईल, असो. परमेश्वरानें श्री. बालगंधर्वांना पूर्ण आयुरारोग्य देऊन आतांपर्यंत त्यांना जें यश मिळालें तसेंच निरंतर किंबहुना जास्त यश देऊन रंगभूमीची व त्याबरोबरच जनताजनार्दनाची सेवा त्यांच्या हातून घडवून आणावी अशी परमेश्वरापाशीं व गुरूचरणीं मनःपूर्वक प्रार्थना करून मी त्यांना हा अल्प लेख अर्पण करतो.

Scroll to Top