मान्यवरांचे मनोगत
“बालगंधर्वांच्या अभिनयाचे आणि वेषभूषेचे अनुकरण करून लाखो महाराष्ट्रीय महिलांनी आपल्या पतींना मुठीत ठेवून आपले संसार सुखाचे केलेले आहेत. मराठी मनावर बालगंधर्वांच्या स्वरमाधुर्याची आणि रूपसौंदर्याची जी एकदा नशा चढून बसलेली आहे ती नाहीशी होणे अशक्य आहे. बालगंधर्वासारखा लोकोत्तर कलावंत शतकामध्ये एकदाच जन्माला येतो हे प्रत्यक्ष आपल्यास पहावयास सापडलेले आहे !”
आचार्य प्र. के. अत्रे (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - ३४)
“गंधर्वांच्या मुद्रेत, नजरेत, हसण्यात, लाजण्यात, मुरकण्यात, चालण्यात, नेसण्यात साक्षात स्त्रीचा संचार झालेला होता. पुरुषाच्या देहातून स्त्रीचे सौंदर्य इतक्या मोहकतेने कधीच प्रगट झाले नसेल. त्यामुळे स्त्री रुपात जेंव्हा गंधर्व रंगभूमीवर प्रकट होत, तेंव्हा पुरुष तर पागल होत असतच, पण स्त्रियाही अक्षरश: वेड्या होऊन त्यांच्याकडे अपक्ष्म लोचनानी पाहात बसत.”
आचार्य प्र. के. अत्रे (लोकराज्य बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक पृष्ठ - १५)
“त्यांनीच गाव्यात ह्या चाली. तशा सुंदरतेने गाणं मलासुद्धा जमायचं नाही. सोन केलं त्यांनी माझ्या चालींच.”
लावणी गायिका सुंद्राबाई जाधव (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - ३४)
“त्यांच्या सुराला – आवाजाला निसर्गानेच प्रविविक्त म्हणजे नितांत सुंदर केले आहे. त्यांना जन्मही मिळाला राजहंसाच्या कुळात. बालगंधर्वांनी म्हटले नाही – पण म्हणता येईल ‘ दैवायुक्तम कुले जन्म – मदायंतम तू पौरुषम’ हे त्यांनाच लाभलं.”
पं विनायकराव पटवर्धन (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - ५६)
“- – पण नटसम्राट बालगंधर्वांच्या युगातील प्रेक्षक अपार संतुष्ट होते हा चक्षुर्वै सत्यम असा इतिहास आहे. त्यांच्या युगातील माणसे आजही तो इतिहास सांगताना भारावून जातात. प्रेक्षक हे आपले अन्नदाते आहेत असे मानत असल्यामुळे त्यांच्या सेवेसाठी तनमन लावून रंगभूमीवर हा सम्राट उभा राहत असे. त्या आनंदात पहाटेचा कोंबडा केंव्हा आरवला याचे प्रेक्षकांना भान रहात नसे.”
“आज व्यवसायात ‘एकच प्याल्याच्या’ आणि ‘मानपमानाच्या’ शेकडो प्रयोगात अनेक आधुनिक नटींच्या बरोबर मी काम करतो. परंतु सतत माझ मन सांगत असतं, “नाही, तसा बालगंधर्व पुन्हा होणे नाही.”
शरद तळवलकर (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - ५९ व ६१)
“आता वर्ज्य स्वर लावतो असे बुद्धया कधीच त्यांनी केले नाही. ते नाटक झाले असते आणि गंधर्व नाटक जगत असत, करीत नसत. तल्लीनता हाच त्यांचा धर्म, आणि तल्लीनतेनेच त्यांना मरेपर्यंत सावरले. त्यांचा लयातच लय झाला.”
शरदचंद्र गोखले (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - ६९)
“नारायणरावांचे गाणे म्हणजे ईश्वरी देणेच होते. कोणाला चांगला गळा असतो. कोणाला नुसतीच बुद्धी असते तर कोणाच्या गायकीत सहजता असते. पण नारायणरावात या तिघांचाही ‘सर्वांगी सुंदर’ असा अपूर्व संगम झाला होता. ‘पुनश्च’ घेऊन अर्धा अर्धा ताससुद्धा ते एक पद गायचे. ते ऐकताना आम्हाला असं वाटायचं की भर उन्हाळ्यांत आम्ही स्वरांच्या थंडगार शॉवरबाथखाली बसलो आहोत. त्या गळ्यात यत्किंचितही दोष नव्हता. गळ्याचा मोड अप्रतिम. त्यामुळे त्यांच्या गायकीतल्या हरकती अगदी पेळूतून सूत कॉतल्या इतक्या विनासायास येत. गातांना ते इतके तल्लीन होऊन गात की हा गृहस्थ आत्मानंदासाठी गात आहे हे समोरील प्रेक्षकाला लगेच कळून येई.”
पंडित मल्लिकार्जुन मन्सूर (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - ७५)
“अनाघती उठणे आणि सूरपारंब्या खेळल्यागत गात राहून सम गाठणे ही खासियत जयपुर गायकीची. नारायणरावांच्या गाण्याचा गाभा तो होता.”
पंडित वामनराव सडोलीकर (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - ८१)
“ – – गातांना त्यांचे शब्दोच्चार स्वच्छ आणि मधुर असत. स्वच्छ शब्दोच्चार आणि मधुर व स्वच्छ शब्दोच्चार करणारे अपवादात्मक. या अपवादात्मक व्यक्तींत बालगंधर्व सर्वश्रेष्ठ! – – – ते अधिक सुरेल की ऑर्गन अधिक सुरेल हे सांगता येणार नाही. – – गंधर्वांची तान म्हणजे जणू मोत्याची लडी. एकेक मोती सफाईदारपणे आणि डौलात गुंफला जाऊन ती दाणेदार तान लड बने.”
संगीतकार सुधीर फडके (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - ८५)
“भारतीय संगीताबाबत खास करून सद्गुण ठरणारा एक ध्वनिशास्त्रीय नियम आहे. त्याला म्हणतात ‘स्वन’ सलगता. गाण्याचे सूत तुटू नये, नारदीय शिक्षेत स्वरांनी एकमेकापासून कसे यावे याचे सुंदर वर्णन केले आहे. नारद म्हणतो, उन्हाला लगटून सावलीने यावे! बालगंधर्वांच्या गानलयीने प्रवाह राखला जाई तो असा.”
संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - ९६)
“ साऱ्या साकार जगाच्या मागे असलेल्या निराकार चिच्छक्तीचा प्रत्यय जसा आपल्याला अखेर साकार मूर्तीतूनच येतो, तशीच स्वर म्हणून जी काही एका निराकार शक्तीबद्दलची आपली धारणा आहे तिची प्रत्यक्ष आकारास आलेली मूर्ती म्हणजे नारायणराव, अस मला वाटत!”
श्रीमंत रसिक बाबूराव देशमुख (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ-९९)
“बालगंधर्व नावाचं कोडं अद्याप सोडवते आहे. त्राऐंशीच्या उंबरठ्यावर उभी आहे. पण हे कोडं काही सुटत नाही पहा. गंधर्वांची माझ्यावर इतकी मोहिनी का ? नाही सांगता येणार. आजही कुणी त्यांचा उल्लेख केला, त्यांच्याविषयी कुठे काय वाचलं की मनात आठवणींचा महापूर दाटून येतो. वाटतं या क्षणाला गांधर्वांना मी पाहतेय! त्यांच्याशी बोलतेय ! त्यांच गाणं ऐकतेय !
सिनेतारका दुर्गा खोटे (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - ९९)
“नारायणराव बालगंधर्व म्हणजे एक असामान्य कलावंत ! सारे काही कलेसाठीच न्योछावर करणारा एवढा महान कलावंत मी आयुष्यात दुसरा पहिला नाही !”
दिग्दर्शक व्ही शांताराम (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - १०५)
“ – – आणि या क्षणी ५६ वर्ष वयाची रेवती एखाद्या षोडशी प्रमाणे जो अभिनय करते तो एवढा विलक्षण असतो की मी तो आयुष्यात विसरू शकलो नाही. – – अनेक स्त्रियांनी किंवा पुरुष नटांनीही केलेल्या रेवतीच्या भूमिका मी पहिल्या आहेत. पण बालगंधर्वांनी जी अभिनयाची जागा दाखविली ती कुणातही मला आढळली नाही.”
मामा पेंडसे (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - १०५)
“द्रौपदी नाटकात ते एकदा जे शालू नेसून सुरवातीला उभे राहत ते शालूची घडी मोडेल म्हणून नाटक संपेतो बसत नसत. त्यांच्या बद्दल काय काय नी किती किती सांगणार? आख्यायिकाच वाटतील, असंच सारं होतं.”
“स्वराची जात त्यांची अशी, मंद्र सप्तक, मध्य सप्तक, तर सप्तक, आवाजाचा फोकस एकसारखा, असा कुणाकडेही मिळत नसे. त्यांच्या सुराबद्दल तर कुणी बोलायचं काम नाही. तानेचे प्रत्येक खटके मोत्यासारखे. प्रत्येकाचं वजन सारखं. शब्दांची ओढाताण कधीच होत नसे.”
गायकनट जयराम शिलेदार (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - १०८)
“त्यांच्या स्वर्गीय संगीतावर नजर टाकली तर असे हमखास म्हणता येईल की, त्यांनी रंगभूमीवर जी चाल गायली, त्या गोडव्याने तीच चाल मोठमोठ्या गवयांना रंगभूमीवर अगर रंगभूमीबाहेर गाणे शक्य झाले नाही. गाण्यातील स्वर्गीय स्वरमाधुरीला रागाच्या ‘सच्चेपणाची’ जोड नसली तरी ‘स्वरांचा सच्चेपणा’ निर्विवाद!”
“बालगंधर्वांचे सौंदर्य इतके सोज्वळ आहे की, वृद्धांना आपली मुलगी अशी असावी असे वाटते, तर तरुणांना वाटते की आपली सहचारिणी अशी असावी!”
नाटककार वसंत शांताराम देसाई (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - ११२)
“ – – पण नटसम्राट ही पदवी खऱ्याखुऱ्या अर्थाने द्यावयाची झाली तर ती फक्त महाराष्ट्राच्या बालगंधर्वांनाच दिली पाहिजे. कारण सर्व रसांचा राजा जो करूण तो त्यांचा मांडलिक होता आणि मधाळ व लाडिक शृंगाररसाची तैनाती फौज त्यांच्या सदैव दिमतीला होती.”
दाक्षिण्यात्य नट बी एन चिन्नप्पा (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - १३६)
“संगता बद्दलच्या प्रेमानं पछाडल्यामुळे मी महाराष्ट्राच्या बालगंधर्वांना गुरु मानण्यासाठी आसुसलो होतो. – – – बालगंधर्वांच्या गायनानं मी नुसता मोहरून जात असे. बालगंधर्वांना दक्षिणेत तानसेनचा अवतार समजलं जाई.”
शिवाजी गणेशन (म.टा. ‘बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक’ पृष्ठ - १३९)
“गंधर्वांच्या पदांची लय अति विलंबित किंवा अति द्रुत नसून किंचित द्रुत अशी मध्य लय असे. त्यामुळे पदातील भावनेचा आविष्कार किंवा आशयाचा ओघ गाण्यामुळे न थांबता, त्यांच्या मुळात चपल व डौलदार गतीने जाण्याऱ्या आवाजाला शब्दांबरोबर लयीचे खेळ खेळता येत. रागदारी, ठुमऱ्या, लावणी, भजने अशा कुठल्याही बाजात त्यांना कधी कुठे अडखळलेले मी पाहीले नाही.”
“भिंगरीसारखी फिरणारी गंधर्वांची तान उत्तम लयकार व पेचदार असे. त्यांचे सहज चाललेले लाडिक गाणे हे वरपांगी सुगम व प्रासादिक वाटण्याऱ्या अभंगासारखे असे. त्यांच्या गाण्यामागील पक्की तालीम व खानदानीपण यांचा साक्षात्कार ज्ञानेश्वर, तुकोबांच्या अध्यात्मिक परिपक्वतेप्रमाणे “नेति नेति’ म्हणायला लावत होते.”
पं. वामनराव सडोलीकर (लोकराज्य बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक पृष्ठ - ५१)
“काही नटींनी बालगंधर्वांच्या भूमिका केल्या पण त्या भूमिका जवळ दहा मैल सुद्धा पोहोचल्या नाहीत.”
“बालगंधर्वांवर परमेश्वरापेक्षाही अधिक प्रेम केलेला मी माणूस आहे. त्यांच्यासारखा अष्टपैलू नट अनेक शतकांनी जन्म घेतो.”
महाराष्ट्रभूषण पु ल देशपांडे (लोकराज्य बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक पृष्ठ - ८३ व १००)
“माणुसकी आणि रसिकता यांची समृद्धी असलेल्या नाट्यसृष्टीचे बालगंधर्व हे सम्राट आहेत.”
पूर्व मुख्यमंत्री (महाराष्ट्र) यशवंतराव चव्हाण (लोकराज्य बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक पृष्ठ - ८३)
“अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ नट, प्रतिष्ठित नागरिक, सत्शील मनुष्य, प्रेमळ मित्र, उद्योगी कलावंत इत्यादी सार्थ विशेषणांनी अलंकृत असलेल्या बालगंधर्वांचे दीर्घायुरारोग्य सर्व महाराष्ट्र चिंतेत आहे. निर्मत्सरी स्वभाव आणि नट, नट आणि सत्यशीलपणा, नाट्य व्यवसाय आणि कर्तव्यतत्परता वगैरे गोष्टी प्राय: विरोधच दर्शवितात. या सर्व गोष्टी बालगंधर्वांमध्ये एकवटल्या आहेत इतकेच सांगितले म्हणजे त्यांचे चरित्र आदरणीय आणो अनुकरणीय कसे आहे, हे वेगळे दाखवण्याची आवश्यकता नाही.”
आचार्य प्र. के. अत्रे (लोकराज्य बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक पृष्ठ - ९४)
“अमृत मंथनाच्या प्रसंगी श्रीविष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले त्यानंतर बालगंधर्वांइतके मोहक स्त्री रूप कोणत्याही पुरुषाने धारण केले नसेल.”
“मराठी भाषा सुंदरीचे पावित्र्य श्री ज्ञानेश्वरीत, तिचे सामर्थ्य गडकरांच्या नाट्यकृतीत, आणि तिचे भावमाधुर्य बालगंधर्वांनी गायलेल्या नाट्यगीतात प्रकटते असे म्हणता येईल.”
नाटककार वसंत शांताराम देसाई (लोकराज्य बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांक पृष्ठ - ११९)
‘मी बालगंधर्वांचा ऋणी आहे”
नाटककार काकासाहेब खाडिलकर (बालगंधर्व – व्यक्ती आणि कला पृष्ठ - ९७)
“बालगंधर्वांच्या ऐन उमेदीच्या आमदानीत त्यांच्या भूमिकेतील भावपूर्ण अभिनय ज्यांनी पहिला ते धन्य होत.”