Logo

तो राजहंस एक...

लेखिका - मंजूषा आमडेकर

 १. उगवली शुक्राची चांदणी…

किर्लोस्करांचा भाग्योदय

ही गोष्ट आहे, साधारण १२० वर्षांपूर्वीची…पण त्या चमत्काराची जादू आजही लोकांना भुरळ घालतेय…आजही ती मोहिनी रसिकांच्या मनावरून ओसरलेली नाही…हो ना…

मराठी नाट्य रंगमंचावर, नाटकांच्या क्षितिजावर एक शुक्र तारा उगवला होता, पण चांदणी बनून. जन्मानं पुरुष, पण कर्मानं रंगमंचावर अत्यंत देखणी, अविस्मरणीय स्त्रीपात्र म्हणून शतकाहून अधिक काळ नाट्य-विश्‍वाच्या आकाशात ठळकपणे, अढळपणे लखलखणारी चांदणी बनून वावरलेल्या असामान्य गायक नटाची ही जीवनकहाणी आहे.

त्या अनन्यसाधारण गायक नटाचं खरं नाव नारायण श्रीपाद राजहंस. पुढे त्यांचा बालगंधर्व या नावानं जगात लौकिक झाला. पण हा जातिवंत कलावंत मानस सरोवरातील राजहंसासारखाच कायमचा दिमाखात वावरत राहिला आहे. जिवंतपणीही आणि देहपातानंतरही. चिरंजीव होऊन राहिला जणू काही.

१९०६ च्या सुमारास किर्लोस्कर नाटक मंडळींच्या शाकुंतल या नाटकाचा मिरजेत प्रयोग लागलेला होता. तो पहायला अफाट गर्दी उसळलेली होती. 13 फेब्रुवारी 1901 साली नायिकेची भूमिका करणारा कसदार नट, भाऊराव कोल्हटकर यांचं निधन झाल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळीची जणू काही रयाच गेली होती. त्या पार्श्‍वभूमीवर आजची गर्दी पाहताना व्यवस्थापक शंकरराव मुजुमदार यांना आनंदाचं भरतंच आलं होतं. कारण आज शकुंतलेची भूमिका एक नवीन नट करणार होता. मिरजेच्या आसपासच्या सर्व गावांमधून लोक आतुरतेने गोळा झालेले होते. कोल्हापूरहून दस्तुरखुद्द छत्रपती शाहूमहाराजही आलेले होते. कारण प्रत्यक्ष रंगमंचावर येण्यापूर्वीच नवीन शकुंतलेच्या रुपाची आणि सुमधूर आवाजाची ख्याती सगळीकडे जाऊन पोचलेली होती.

गोविंदराव देवल, नानासाहेब जोगळेकर, चिंतोबा गुरव, गणपतराव बोडस वगैरे सर्व मंडळी नवीन शकुंतलेला नटवण्यात आणि तिचा पहिलाच प्रयोग असल्यानं तिला धीर देण्यात गुंतलेली होती. प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांचाही तिला आशीर्वाद लाभलेला होता. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आतुरता, अधीरता, उत्कंठा शिगेला पोचलेली होती. आणि…आणि काही वेळातच नवीन शकुंतलेनं आपल्या सख्यांसह रंगमंचावर पदार्पण केले…लोकांनी तिला इतकं डोक्यावर घेतलं की त्यानंतर तिनं कधी मागे वळून पाहिलंच नाही !

मुनीकन्येला शोभेलसा साधा पोषाख आणि साजशृंगार केलेल्या शकुंतलेनं ‘वृक्ष वेल या दोहींची जोडी शोभते,’ ‘सखये अनसूये थांब की गं बाई,’ वगैरे पदं गात जी काही मोहिनी घातली त्यामुळे प्रेक्षकांचं तिच्यावर प्रथमदर्शनीच प्रेम जडलं. कोरांटीत अडकेली साडी नाजुकपणे सोडवत दुष्यंताकडे कटाक्ष टाकत जेव्हा ती गजगामिनीप्रमाणे सख्यांच्या मागोमाग जायला लागली तेव्हा दुष्यंत तर सोडाच, पण प्रत्येक प्रेक्षकाच्या काळजाचा ठोका चुकला होता.

भाऊराव कोल्हटकरांचा मृत्यू झाला तेव्हा शंकरराव मुजुमदार म्हणाले होते की, ‘आम्ही आमचं सौभाग्य गमावलं आहे!’ पण या प्रयोगानंतर ते रुसलेलं सौभाग्य लक्ष्मीच्या पावलांनी किर्लोस्कर नाटक मंडळींकडे पुन्हा एकदा चालत आलेलं होतं. जणू काही किर्लोस्करांचा भाग्योदयच झाला होता. लक्ष्मीच्या पावलांनी चालत आलेल्या शकुंतलेची भूमिका करणार्‍या नटाचं नाव होतं, नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व!

संगीत नाटकांचं नवयुग

विष्णुदास भावे यांनी १८४३ साली ‘सीतास्वयंवर’ नाटक रंगभूमीवर आणलं. त्यांच्या नाटकांची एक विशिष्ट शैली होती. तीच आणखीही इतर नाटककारांनी आपलीशी केली. देव दानव यांच्यातील एखादा प्रसंग निवडून तो फुलवलेला असायचा, विनोद फक्त विदुषक करायचा आणि गायनाची जबाबदारी फक्त सूत्रधाराकडे असायची. लोकांना ते सगळं आवडत जरी असलं तरी तो नाटकाचा ओबडधोबड प्रकारच होता. लवकरच इंग्रजी शाळांमध्ये शिकलेल्या मंडळीना ते सगळं पसंत पडेनासं झालं. काही नवीन प्रयोग झाले पण ते गद्यच असल्याने लोकांना रसपूर्ण, भावपूर्ण वाटेनात. लोकांची बदलती आवड ओळखून त्यांची अचूक नस पकडून अण्णासाहेब किर्लोस्करांनी ३१ ऑक्टोबर १८८० रोजी गद्य-पद्य मिसळून ‘शाकुंतल’ नाटक रंगमंचावर आणलं आणि संगीत नाटकांचं नवयुग सुरू झालं.

त्या काळी स्त्रिया नाटकात काम करणं तर सोडूनच द्या, पण नाटक बघायलाही जात नसत. त्यामुळे स्त्रीपात्र रंगवायची जबाबदारी पुरुष नटांवरच येऊन पडली. पहिली शकुंतला शंकरराव मुजुमदारांनी रंगवली होती. पण ते गायक नव्हते. त्यामुळे सुरुवातीला शकुंतला नाटकात गात नव्हती. स्वत: अण्णासाहेब सूत्रधार आणि शारंगरवाची भूमिका करत. नाट्यक्षेत्रात त्यांनी आपली अमिट अशी छाप सोडली होती. संगीत नाटकांचे ते आद्य प्रवर्तक ठरले. त्यांनी नाट्यकलेला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. एका रात्रीत त्यांनी पूर्वीची नाट्यशैली इतिहासजमा करून टाकली.

सुप्रसिद्ध लेखक ना.सी.फडके म्हणाले होते की, ‘अण्णांनी महाराष्ट्रीय रसिकांना नवे कान आणि नवे डोळे दिले… रंगभूमीवर एक नवयुग सुरू केले…!’

त्यानंतर १८८२ साली भाऊराव कोल्हटकर या दिसायला सुरेख आणि गायला सुरेल असलेल्या नटानं किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला. ते शकुंतला रंगवायला लागल्यावर शकुंतला गायलाही लागली. मग अखेरपर्यंत त्यांनी रंगभूमी गाजवली अक्षरश:. त्यांचं गाणं ऐकून लोक मंत्रमुग्ध व्हायला लागले. त्यानंतर अण्णासाहेबांनी ‘सौभद्र’ नाटक रंगभूमीवर आणलं. त्या नाटकानं तर लोकप्रियतेचा कळस गाठला. मोरोबा वाघोलीकर, बाळकोबा नाटेकर, स्वत: अण्णासाहेब, शंकरराव मुजुमदार, भाऊराव कोल्हटकर यांनी सौभद्र गाजवलं.

अण्णासाहेबांनी जगाचा रंगमंच सोडला

मग १८८४ साली अण्णासाहेबांनी याच संचासोबत भास्करराव बखले यांना घेऊन ‘रामराज्यवियोग’ रंगमंचावर आणलं. परंतू त्यानंतर अण्णासाहेबांची प्रकृती खालावत गेली आणि ते २ नोव्हेंबर १८८५ रोजी निधन पावले. हा माणूस द्रष्टा होता, प्रयोगशील होता, कसदार अभिनेता होता, पण त्याचबरोबर रसिक आणि उदारही होता. त्यांच्या नाटकांचे प्रयोग इतरांनी केले तरी ते त्यावर काहीही आक्षेप घेत नसत. मोबदला मागत नसत. ते म्हणायचे की, ‘मी केशराचं शेत लावलं आहे, मग त्यात गाढवं का चरेनात…!’ ते गेल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळींचे कोणतेही नाटक रंगमंचावर आले की सर्वप्रथम अण्णासाहेबांच्या प्रतिमेची पूजा केली जायला लागली. प्रतिमेला नमस्कार करूनच पहिला नट रंगभूमीवर प्रवेश करत असे.

ते गेल्यानंतरही नाटक कंपनीचं उत्पन्न चालूच राहिलेलं होतं. अण्णासाहेबांच्या पश्‍चात नाटककार आणि नाट्यशिक्षकाची भूमिका त्यांचे शिष्य गोविंद बल्लाळ देवल यांनी निभावली. त्यानंतर ‘विक्रमोर्वशीय,’ ‘शापसंभ्रम’ आणि ‘मृच्छकटिक’ ही नाटकं रंगमंचावर आली. ‘वीरतनय’ नाटकापासून भाऊरावांनी स्त्रीपात्र रंगवणं कमी केलं. तिशी उलटल्यावर आपल्याला अशा भूमिका शोभणार नाहीत असं त्यांना वाटायला लागलं होतं. त्यांच्या काळातच गणपतराव बोडसांचा नाटक मंडळीत प्रवेश झाला.

भाऊरावही गेले

पुढे ‘शारदा’ नाटक ऐन बहरात असतानाच भाऊराव हे जग सोडून निघून गेले. तेव्हा प्रत्येकाला आपल्या कुटुंबातीलच कुणीतरी आप्त गेल्याचा शोक झाला होता. कारण या कंपनीतलं वातावरणच तसं होतं. कंपनीच्या मालकापासून ते छोटीमोठी कामं करणार्‍या प्रत्येक माणसाला ही नाटक मंडळी म्हणजे आपलं कुटुंबच वाटत असे. अण्णासाहेबांच्या फोटोला नमस्कार केल्याविना कुठलंही काम सुरू व्हायचं नाही. भोजनाची रोजची व्यवस्था तर अतिशय उत्तम असायचीच; पण गणपती उत्सवात दहा दिवस रोज पक्वानांच्या जेवणाचा थाट असायचा. गायिका गोहरजान, गायक अल्लादिया खांसाहेब, कांताप्रसाद तबलजींसारखे दिग्गज येतजात असत. जवळपास पन्नास साठ माणसांचं भलं मोठं कुटुंब एकदिलानं रहात असे. प्रयोगाच्या निमित्तानं जिथे जिथे ही मंडळी जात त्या त्या गावातील आणि परिसरातील मोठमोठी प्रस्थं त्यांना भेटायला येत असत. एरवी निषिद्ध गोष्टींचं कुणावरही बंधन नसलं तरी रंगभूमीचं पावित्र्य राखण्याचा कटाक्ष प्रत्येकजण पाळत असे. ज्या दिवशी प्रयोग असे त्या दिवशी कुणीही मद्याच्या थेंबालाही स्पर्श करत नसे. थोडक्यात सांगायचं तर कलेचा प्रांत आहे म्हणून कुणीही मनमानी करत नसे, जी तत्वं, आदर्श, नीतीनियम ठरवले गेले होते त्याचं कसोशीनं पालन केलं जात असे.

या नाटकमंडळीची स्थापना जरी अण्णासाहेबांनी केली असली तरी त्यांनी स्वत:ला कधीच मालक मानले नाही. त्यामुळे ते गेल्यानंतर कंपनीनं त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन देऊ केली आणि मोरोबा, वाघोलीकर, भाऊराव कोल्हटकर आणि रामभाऊ किंजवडेकर हे कंपनीचे मालक झाले. पुढे मोरोबा निवृत्त झाले आणि त्यांनाही पेन्शन दिली गेली. त्यानंतर भाऊरावांचे आजारपण आणि निधनामुळे एकटे रामभाऊ मालक झाले. पुढे नानासाहेब जोगळेकर यांचा कंपनीत प्रवेश झाला. १८९३ पासून शंकरराव मुजुमदार कंपनीचे व्यवस्थापक म्हणून काम पहायला लागले.

अण्णासाहेबांच्या मृत्यूनंतर कंपनी विस्कळीत जरी झाली नसली तरी प्रेक्षकांना अण्णासाहेबांचं नसण्याची उणीव भासत होती. पण तरीही सुरुवातीचा काही काळ नाटकं चालत राहिली, उत्पन्न होत राहिले. पण नंतर भाऊरावही गेल्यानंतर अनेक चांगली चांगली नट मंडळी आली पण पहिल्यासारखा रंग भरेना. प्रेक्षक दुसर्‍या नाटक मंडळींच्या नाटकांना गर्दी करायला लागले होते. मूकनायक, सौभद्र, शकुंतला, गुप्तमंजूष, चंद्रहास, सुमति सारखी नाटकं आणूनही किर्लोस्कर मंडळी तग धरू शकेना. तशातच कृष्णराव गोरेही कंपनी सोडून स्वदेश हितचिंतक मंडळीत प्रवेश करते झाले.

या सर्व पार्श्‍वभूमीवर १९०६ साली बालगंधर्वांनी किर्लोस्कर नाटक मंडळींच्या माध्यमातून रंगभूमीवर जी एंट्री घेतली त्यानं कंपनीचा आणि मराठी नाट्य इतिहासाचा कायापालट झाला, या सगळ्याला वेगळीच कलाटणी मिळून झळाळी मिळाली.

 

Scroll to Top