Logo

तो राजहंस एक...

लेखिका - मंजूषा आमडेकर

३. विवाह आणि कारकिर्दीतील स्थैर्य

आणि दोनाचे चार झाले…

त्या काळी मुलामुलींची लवकर लग्नं होत असत. लहान वयात ही मुलं पालकही बनायची. जबाबदार्‍या आणि कर्तव्यकर्मं यात बुडून जायची. सर्वसाधारणपणे सरळमार्गानं पापभिरू होऊन आयुष्य जगून पुढे निघून जाणे एवढीच जीवनाकडून माफक अपेक्षा असायची. मात्र कलेच्या क्षेत्रात काम करणार्‍यांना इतकं सरधोपट आयुष्य जगायला मिळणं फार अवघड जायचं. कारण लोकांचा बघण्याचा साशंक दृष्टीकोन. नाटकात काम करणारी माणसं रंगेल आणि बेताल असतील अशीच सर्वसाधारण समजूत होती. त्यामुळे नाटकात काम करणार्‍यांना लोक आपल्या मुली देत नसत. त्यामुळे किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश करण्याची परवानगी देण्याआधी नारायणाच्या आईने अशी अटच ठेवली होती की, ‘या मुलाच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे. याचं जर लग्न होणार नसेल तर मी याला नाटकात काम करू देणार नाही.’

ही अट मान्य करूनच चालक आणि मालकांनी नारायणाला आपल्या नाटक कंपनीत सामावून घेतलं होतं. पुढे बालगंधर्व म्हणून ते लोकप्रिय झाले तरी त्यांच्यासाठी मुली पाहण्याचा कार्यक्रम आधीपासूनच सुरू झालेला होता. त्यांना दरमहा शंभर रुपये पगार होता खरा; पण त्यांच्या एकट्याच्या जिवावर संपूर्ण राजहंस कुटुंब चालत होतं. बालगंधर्वांच्या वडिलांची तब्येत सुधारलीच नाही. त्यामुळे ते सेवानिवृत्त होऊन घरी बसलेले होते. त्यातून सुरुवातीच्या काळात नारायण म्हणून नवखेपणानं वावरणार्‍या मुलाचं नाट्यविश्‍वात भवितव्य काय आहे याचा कुणालाच अंदाज नव्हता. त्यामुळे त्यांच्या आईचा धीर सुटत चाललेला होता. बरं, आपण दिलेला शब्द पाळला पाहिजे, नाहीतर चांगला मुलगा नाटक कंपनीच्या हातातून निसटून जाईल याचं मंडळींना पण भय होतं. त्यामुळे तेही सगळे उतावळेपणा करत होते.

या सगळ्या दबावाखाली पारगावकरांची एक सावळी, सर्वसामान्य मुलगी पसंत करण्यात आली आणि १९०७ साली घाईगडबडीनं नारायणाला मुंडावळ्या बांधण्यात आल्या. त्याचे एकदाचे दोनाचे चार करून सर्व मंडळींनी हुश्श केलं. गमतीची गोष्ट म्हणजे, मुलीला आईनेच पसंत केलं होतं. नारायणाला काय वाटतं हे विचारायची कुणीही तसदीसुद्धा घेतली नव्हती. नारायणानं पुन्हा एकदा परिस्थितीशी जुळवून घेतलं. १९०६ ला सुरुवात केल्यापासून ते १९१० सालापर्यंत पुणे, मुंबई, बेळगाव, हुबळी, सोलापूर, बार्शी, कोल्हापूर, नगर, नाशिक, जळगाव, अकोला इत्यादी गावी प्रयोगांच्या निमित्तानं ते फिरत राहिले. कंपनीचा फायदा करून देत राहिले. लोकप्रियतेचा कळस गाठून बालगंधर्व म्हणून घडत राहिले.

नट मंडळींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला

एरवी लोक नाटकात काम करणार्‍यांकडे तुच्छतेच्या नजरेनं पहात. पण बालगंधर्वांच्या लोभस, लाघवी, गोड, निरागस स्वभावामुळे ते सर्वांच्या गळ्यातले ताईतच होऊन बसले होते जणू काही. या सगळ्यामुळे नट मंडळींचा सामाजिक दर्जा सुधारायला लागला. या काळात जे दोन तरुण बालगंधर्वांच्या निकटवर्तीयात सहभागी झाले त्यात गोपाळराव भोंडे आणि परशुराम ऊर्फ बाळासाहेब पंडित याची भूमिका ठळक ठरली.

यातले भोंडे मिलीटरी अकाउंटसमध्ये नोकरी करणारे होते. ते दिसायला ओबडधोबड होते पण नकलाकार होते. तर बाळासाहेब पंडित हे कोल्हापूरच्या मामलेदारांचे चिरंजीव होते. माणूस वृत्तीनं दिलदार असला तरी नादिष्ट होता. बालगंधर्वांच्या कौतुकासाठी कितीही पैसा खर्च करायला मागेपुढे बघत नसे. बालगंधर्व स्वत: स्वभावानं खर्चिक होते. ते या बाबतीत त्यांच्या आईवडिलांच्या वळणावर गेले होते. त्यामुळे त्यांना नेहमीच पैशांची चणचण भासायची. अशा वेळी पंडित त्यांच्या मदतीसाठी धावून जात असे. तरीपण बालगंधर्वांच्या दृष्टीनं हा सगळा काळ सुवर्णकालच होता. वाढता पगार आणि चढता नावलौकिक यामुळे ते आनंदात असायचे. किर्लोस्कर मंडळीत होणारं कौतुक, तरुणाईतली लोकप्रियता, रुचकर भोजनाची आणि भारी भारी अद्ययावत पोषाखाची भरपूर हौस पुरवली जात होती. ते स्वत:च्याच लोकप्रियतेत हरवून गेले होते. त्यांना शिक्षणाची आवड फारशी नव्हतीच. त्यामुळे शिक्षण बेताचेच होते आणि वाचनही. प्रयत्न करूनही वाचन सुधारले नाही. ते रात्री बाराला झोपले की थेट सकाळी दहालाच जागे व्हायचे. भूमिकेला आवश्य तेवढीच मेहनत घ्यायचे, पण मन लावून. त्याहून अधिक गाणं कसदार करण्यासाठी जास्तीची मेहनत काही त्यांच्या हातून घडत नव्हती. तरीपण नाटकाच्या व्यतिरिक्त त्यांच्या गाण्याच्या जागोजागी खास मैफिली होत. पण यासाठी ते वेगळं मानधन काहीच घ्यायचे नाहीत.

उशिरा उठल्यावर निवांत चहापाणी, पान, तंबाखू सेवन करून स्वत:चे प्रातर्विधी आवरायचे. तोपर्यंत जेवणाची पंगत बसायची वेळ यायची. पण यांची अंघोळच दीड वाजता व्हायची. मग दोन वाजता थंडगार जेवण झालं की संध्याकाळी पाचपर्यंत तालमीला जायचे. ती नसेल तर दुपारची झोप काढायचे. सहा वाजता पुन्हा चहापाणी घेतलं की त्यांना भेटायला आलेल्या लोकांमध्ये जाऊन बसायचे. गावातील श्रीमंत बड्या बड्या असामी, कॉलेजमध्ये शिकणारे नवतरुण त्यांना भेटण्यासाठी तिष्ठत बसलेले असायचे. आता या सगळ्यात शास्त्रीय संगीताचा रियाझ करण्यासाठी वेळ तरी कुठून आणणार होते ते?

मात्र काही झालं तरी बालगंधर्व जोगळेकर आणि मुजुमदारांच्या आज्ञेत रहायचे. त्यांना नाराज करण्याची बेअदबी त्यांनी कधीच केली नाही. फार काय, गाण्याचा कार्यक्रम जरी चालून आला तरी या दोघांच्या परवानगीशिवाय ते होकार देत नसत. आपला रोजचा दिनक्रम चालू ठेवत बालगंधर्व आनंदात आयुष्य जगत होते. ते आस्तिक होते, पण त्यांनी आपल्या श्रद्धेचं कधीच प्रदर्शन केलं नाही. जोगळेकरांचा स्वभावही प्रेमळ आणि मनमिळाऊ असल्यामुळे बालगंधर्व आणि इतरही लोक या मंडळीमध्ये कुटुंबाप्रमाणे राहिले. एखादा अपरिचित माणूस महिना दोन महिने मंडळीत फुकट राहून, जेऊनखाऊन, नाटकं बघून गेला तरी सहज खपून जात असे. अगदी कुणी आजारी असेल तर इतर लोक प्रेमानं त्याची सेवासुश्रुषा करायला कचरत नसे.

काकासाहेब खाडिलकर आणि किर्लोस्कर नाटक मंडळी

त्या काळी ‘महाराष्ट्र नाटक मंडळी’ नावाच्या कंपनीसाठी कृष्णाजी प्रभाकर ऊर्फ काकासाहेब खाडिलकर हे उत्तमोत्तम नाटकं लिहीत असत. ‘कीचकवध’, ‘बायकांचे बंड’, ‘भाऊबंदकी’, ‘सवाई माधवरावाचा मृत्यू’, ‘कांचनगडची मोहना’ अशी एकाहून एक सरस नाटकं त्यांनी लिहिली होती. याशिवाय राजकारणातही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. लोक त्यांना लोकमान्य टिळकांचे पट्टशिष्य म्हणूनच ओळखत. ते ‘केसरी’ वृत्तपत्राचे उपसंपादक होते.

किर्लोस्कर नाटक मंडळीचा १९१० साली पुण्यात मुक्काम होता. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी नुकतंच एक नवीन नाटक लिहिलेलं होतं. त्या ‘प्रेमशोधन’ नावाच्या नाटकाच्या तालमी सुरू होत्या. कोल्हटकरांनी खाडिलकरांना खास विनंती केली की त्यांनी नाटकाच्या तालमीवर शेवटचा हात फिरवावा आणि आपल्या मौलिक सूचना द्याव्यात. त्यांनीही मोठ्या मनानं ते मान्य केलं. हा तात्पुरता जुळलेला संबंध पुढे आणखीनच दृढ झाला. लवकरच खाडिलकर किर्लोस्कर नाटक मंडळी साठी नाटकं लिहायला लागले. या कंपनीसाठी त्यांनी लिहिलेलं पहिलं नाटक होतं, ‘मानापमान’. हे नाटक बालगंधर्वांच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय नाटक ठरलं.

मानापमान

काकासाहेब एकीकडे प्रेमशोधनाच्या तालमींवर कष्ट घेत होते तर दुसरीकडे मानापमानाचं लेखनही करत होते. प्रेमशोधन रंगभूमीवर येताच लगोलग मानापमानाच्या तालमी सुरू झाल्या. किर्लोस्कर मंडळीनी एक बंगला भाड्यानं घेतलेला होता. तिथे त्यांचा मुक्काम होता. तर बालगंधर्व आणि दादा लाडू समोरच रहायला लागले होते. सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी अडीच ते सहा या वेळात तालमी होत असत. काकासाहेबांचा स्वभाव शिस्तीचा होता. कोणतीही आगळीक ते खपवून घेत नसत. तालमीला उशीरा येणार्‍या मंडळींना ते जोरदार खडसावत असत. सुरुवातीचा काही काळ काकासाहेब बालगंधर्वांवरही नाराज असत. पण त्यांचं गाणं ऐकल्यावर मात्र त्यांचा राग कुठल्या कुठे विरघळला. मग क्वचित कधीतरी बालगंधर्व उशिरा आले तरी ते रागवत नसत. फार काय, त्यांची भूमिका सोडून इतरांच्या भागाच्या तालमी सुरू करत असत.

गोविंदराव टेंबे

सुरुवातीला श्रीपाद कृष्ण कोल्हटकर नाट्यगीतांच्या चाली बांधत असत. आधी नाटककारानं पद लिहायचं मग नटानेच चाल लावायची अशी पद्धत नव्हती. संगीत रंगभूमीवर किर्लोस्करांनी एक नवीन प्रथा पाडली. नाटकाच्या कथेच्या मध्ये मध्ये गाण्याला अनुकूल प्रसंग निवडायचे, मग त्याला अनुकूल राग आणि चालीची रचना करायची. मग त्यावर शब्द लिहिले जायचे. खाडिलकरांनी मानापमान नाटकातील नाट्यगीतांची जबाबदारी गोविंदराव टेंबे यांच्यावर सोपवली. गोविंदराव उत्तम पेटीवादक तर होतेच, पण त्यांनी संगीतप्रेमासाठी दिवसरात्र एक केलेले होते. उत्तमोत्तम गायन ऐकलं होतं. मोठमोठ्या लोकांना साथ केली होती. संगीतकलेचा अभ्यास आणि व्यासंग केलेला होता. पुढे ते संगीत दिग्दर्शक म्हणूनही नावारुपाला आले. त्याची सुरुवात मानापमान पासून झाली.

खरं तर शाकुंतल आणि सौभद्र मधील चाली लोकांच्या पसंतीला पडलेल्याच होत्या. पण पुन्हा पुन्हा त्याच चाली वापरल्या तर रसिकजनांचा विरस होईल या कल्पनेनं नवीस चाली बांधायचं ठरलं. त्यानुसार ‘वीरतनय’ पासून वेगळ्या चाली रचल्या गेल्या. या चाली पारशी आणि उर्दू रंगभूमीवर गाजलेल्या होत्या. तशा त्या चाली ओठांवर बसण्यासारख्या आकर्षक होत्या; पण गायकाच्या गायकीला आणि नाटक जास्त उठावदार करण्याच्या दृष्टीनं त्या कमी पडत होत्या. गोविंदरावांना असं वाटलं की, मौजुद्दीन, मलकाजान, गोहरजान सारखे गायक जे काही गात ते अजून महाराष्ट्रात रुजलेलं नव्हतं, ते जर बालगंधर्वांच्या गळ्यातून काढलं तर नक्कीच लोकप्रिय होईल. त्यानुसार त्यांनी सगळं नियोजन केलं. तबल्यावर दादा लाडू आणि पेटीवर राजारामबापू पुरोहितांना घेतलं. सर्व पात्रांना त्यांच्या तोंडी असलेल्या नाट्यगीतांसाठी उत्तम चाली बांधून दिल्या.

मानापमानाच्या सुरुवातीलाच गालबोट

मग १२ मार्च १९११ रोजी पुण्यात मानापमानचा पहिला प्रयोग ठरला. जाहिरात झाली. लोकांनी उदंड प्रतिसाद दिला. बालगंधर्वांच्या हिरा नावाच्या लहानगीला अचानक आजारपण आलं. तिचं दुखणं विकोपाला जाईल याची कुणाला कल्पनाही आली नाही. बघता बघता तिची प्रकृती खालावली आणि अकरा तारखेला रात्री तिनं या जगाचा निरोपही घेतला. बालगंधर्व तेव्हा अवघ्या तेवीस वर्षांचे होते. एकीकडे इतका मोठा आघात आणि दुसरीकडे नवीन नाटक यशस्वी करून कंपनीला दिलेला शब्द पाळण्याची जबाबदारी. बालगंधर्वांची काय मन:स्थिती असेल याची कल्पनाच केलेली बरी.

कंपनीवरही जणू काही आकाश कोसळलं. दु:खाची दाट छाया पडली. जो तो हळहळत होता. नाटकाची तारीख पुढे ढकलावी असंही अनेकांना वाटायला लागलं होतं. पण तिकिटं खरेदी करण्यार्‍या प्रेक्षकांची निराशा होणार होती. मुजुमदारांनी मनावर दगड ठेवून कठोर निर्णय घेतला. ते बालगंधर्वांना घेऊन कंपनीत आले आणि सर्वांना म्हणाले की, ‘आजचं नाटक रद्द करुया.’

त्यावर मान खाली घालून बसलेल्या बालगंधर्वांनी चमकून वर पाहिलं. ते निश्‍चयी स्वरात म्हणाले, ‘ईश्‍वराच्या इच्छेनं जे झालं ते होऊन गेलं. नाटक रद्द करायचं नाही.’

हे ऐकून सगळेजणच थक्क झाले. मग ठरल्याप्रमाणे नाटकाचा प्रयोग करायचं निश्‍चित झालं. त्या दिवशी दुपारी कुणीच जेवलं नाही. प्रत्येक नट उदास मनानेच रंगमंचावर प्रवेश करता झाला. स्वत: बालगंधर्वांचा प्रवेश नाटकाच्या अगदी सुरुवातीलाच होता. त्यांनी सुरुवात धीमेपणानं केली. पण उत्तरोत्तर भूमिका आणि गाणं खुलतच गेलं. प्रेक्षक आणि नाटकाशी संबंधित सर्वजणच फार खुश झाले. बालगंधर्व खूप सुंदरही दिसत होते. ‘नाही मी बोलत नाथा’ हे पद तर त्यांनी इतकं जीव ओतून गायलं की प्रेक्षक त्या रंगात रंगून गेले अगदी.

खरं तर बालगंधर्वांची मन:स्थिती बघता प्रयोग कदाचित रंगणार नाही असं सगळ्यांना वाटलं होतं. पण एकदा का त्यांनी भूमिकेत प्रवेश केल्यावर ते बालगंधर्व राहिलेच नाहीत. पूर्ण वेळ ते भामिनी बनूनच वावरले. ते नाटक रसिकांच्या मनावर राज्य करायला लागलं. तिकीटं मिळेनाशी झाली इतकी गर्दी उसळायला लागली. एरवी नाटकाचं भरतवाक्य सुरू झालं की प्रेक्षक जागा सोडून जायला लागतात असा अनुभव होता. पण मानपमान नाटकाची शानच काही वेगळी होतं. संपूर्ण भरतवाक्य संपेपर्यंत प्रेक्षक जागेवरून हलतही नसत. हे संपूर्ण नाटक, त्यातील सर्व पात्रं, कथाभाग, गायन, अभिनय आणि बालगंधर्व सर्वांच्या वाटणीला फक्त स्तुतीसुमनंच येत होती.

या नाटकाचं संगीत किर्लोस्कर देवलांपेक्षा वेगळं होतं. ख्यालगायकीच्या धाटणीचं हे नव्या वळणाचं संगीत लोकांच्या मनाचा ठाव घेणारं ठरलं. शृंगार रस तर यात विशेष खुलला होता. खरं तर खाडिलकर गद्य नाटकं लिहायचे. त्यांनी लिहिलेलं मानापमान हे पहिलंच संगीत नाटक होतं. असं असूनही त्याला इतकं यश मिळावं यात त्यांचं असामान्य लेखनकौशल्य सामावलेलं होतं यात शंकाच नव्हती. जोगळेकरांना नट म्हणून प्रथमच मान्यता मिळाली. लक्ष्मीधराची विनोदी भूमिका आत्तापर्यंतच्या सर्व विनोदी भूमिकांमध्ये सर्वश्रेष्ठ ठरली. बालगंधर्वांच्या तर कारकिर्दीचा जणू काही चढता आलेखच सुरू झाला होता.

मानापमान नाटकात गद्यापेक्षा पद्य जास्त सशक्त होतं. बालगंधर्वांना हा बदल नवीन होता. पण त्यांनी भास्करबुवा आणि गोविंदरावांच्या मदतीनं आपलं गाणं अधिक कसदार कसं होईल याचं शिक्षण मनापासून घेतलं. त्यामुळे गंधर्वतुल्य गायक नट असा त्यांचा प्रचंड बोलबाला होऊ लागला. त्याचा परिणाम असा झाला की थिएटरमध्ये मराठी तरुणांसोबतच कानडी आणि गुजराती तरुणही गर्दी करायला लागले होते. या नाटकातील निवडक पदांच्या ध्वनिमुद्रिकाही मोठ्या प्रमाणावर खपायला लागल्या होत्या. यापूर्वी सौभद्र, मूकनायक वगैरे नाटकांच्याही अशाच प्रकारच्या ध्वनिमुद्रिका तयार करायचं काम बेका नावाच्या कंपनीनं केलं होतं.

खर्चिक स्वभाव

बालगंधर्वांना हायसं वाटलं. कारण नाटक मंडळीत दाखल झाल्यापासून ते आपल्या भूमिका, गायन, लोकप्रियता, मित्रमंडळी, चाहते यातच गुंग होऊन गेले होते. त्यांना व्यवहाराची बाजू अगदीच कंटाळवाणी वाटत होती. ते मुळातच रसिक आणि कलावंत होते. त्यांच्या संवेदनशील मनाला व्यवहारदक्षता न रुचणं हे अगदी स्वाभाविक होतं. दरमहा पंचाहत्तर रुपये पगारावर सुरुवात करणारे बालगंधर्व आता २०० रुपये पगार घ्यायला लागले होते. खरं म्हणजे त्यांना एवढ्या पैशात आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणं सहज शक्य होतं. पण त्यांचे चाहते त्यांच्यावर वारेमाप खर्च करत. त्यामुळे चहा आणि पान तंबाखूशिवाय कोणताही शौक नसलेले बालगंधर्व खर्चिक वृत्तीचे झाले. उत्तम कपडे, अनेक उंची टोप्या, अनेक वेगवेगळी पादत्राणे बाळगणं त्यांना गरजेचं वाटायचं. एखादी गोष्ट जरा जुनी झाली की लगेच ती आपल्या सोबत्याला देऊन टाकायची आणि नवीन खरेद्या करायच्या अशी त्यांना सवय लागली. बरं, पगाराच्या वर खर्च गेला तर बाळासाहेब पंडित लगेच हात पुढे करायचे. त्यामुळे काटकसर करायची बालगंधर्वांना गरजच वाटेनाशी झाली.

मानापमान आणि विद्याहरण पासून बालगंधर्वांची आणि त्यांच्या नाट्यगीतांची लोकप्रियता इतकी वाढली होती की सामान्य माणूस सुद्धा ही गाणी गुणगुणायला लागला. आरशासमोर उभी असलेली भामिनी किंवा मधुवनात केशसंभार नेटका करणारी देवयानी, अशी छायाचित्रं जागोजागी पहायला मिळू लागली. घरोघरी ग्रामोफोन विकत घेणं आणि बालगंधर्वांच्या ध्वनिमुद्रिका बाळगणं प्रतिष्ठेचं लक्षण होऊन बसलं. रंगभूमीवरचे बालगंधर्व प्रत्यक्षात कसे दिसतात हे पहायला लोक गर्दी करत असत. ज्यांनी भाऊराव कोल्हटकरांची स्त्रीपात्रं बघितलीच नव्हती त्यांच्या दृष्टीनं बालगंधर्व हे एकमेव कलावंत होते. पण ज्यांनी भाऊरावांना पाहिलं होतं तेही बालगंधर्वांवर खुशच असत हे विशेष. त्यामुळे बालगंधर्व व्यवहारापेक्षा आपल्या कलागुणांमध्ये आणि चाहत्यांमध्येच रमून रहात.

असं असूनही वयाच्या तेहतिसाव्या वर्षी त्यांच्या मागे जो व्यवहार लागला तो शेवटपर्यंत सुटलाच नाही. कायदेशीररीत्या कंपनीचा मालकीहक्क शंकरराव मुजुमदारांकडे होता. पण आता ते फारच मनमानी करायला लागले होते. गोविंदराव टेंबे हे खरं तर बालगंधर्वांचे हितचिंतक. पण आयत्या वेळी बालगंधर्वांनी मालकीहक्कावर पाणी सोडल्यामुळे ते नाराज झाले होते. त्यामुळे त्यांच्या मदतीशिवायच बालगंधर्वांनी विद्याहरण नाटकाची पदं बसवली. काही काळानं खाडिलकरांनी या दोघांमध्ये समेट घडवून आणला. टेंबे बालगंधर्वांच्या बाजूचे आहेत हे स्पष्ट झाल्यापासून मुजुमदार त्यांच्यावर विश्‍वास ठेवीनासे झाले. गणपतराव बोडसांना मालकी हक्क हवा असल्याने मुजुमदार त्यांना प्रतिस्पर्धी मानत. स्वत: बालगंधर्व खाडिलकर आणि पंडित यांच्या मर्जीप्रमाणे वागतात हे पाहून मुजुमदारांनी त्यांनाही जमेस धरायचे सोडून दिले. अशा परिस्थितीत कंपनी चालवण्याच्या दृष्टीनं आपलं विश्‍वस्त मंडळ उभं करण्याच्या खटपटीला मुजुमदार लागले.

मालकीहक्काबाबतचा वाद आणि तोड

मानापमान नाटकाच्या आदल्याच दिवशी बालगंधर्वांनी आपलं कन्यारत्न गमावलेलं होतं. आणि नाटक रंगभूमीवर आल्यानंतर अवघ्या आठच महिन्यात नानासाहेब जोगळेकर वयाच्या अवघ्या छत्तिसाव्या वर्षी मृत्यूमुखी पडले. हा केवळ मृत्यू नव्हता, तर बालगंधर्वांच्या कलाजीवनावर झालेला फार मोठा आघातही होता. 

जोगळेकर हे मानापमान मध्ये धैर्यधराची भूमिका तर करत होतेच, पण त्याचबरोबर ते कंपनीचे मालकही होते. जोगळेकर स्वभावानं विनम्र, सालस, मनमिळावू आणि दिलदार होते. त्यांच्यामुळेच किर्लोस्कर नाटक मंडळी एका कुटुंबाप्रमाणे एकत्र बांधून रहात होती. मात्र त्यांच्या पश्‍चात कंपनीच्या मालकीहक्कासाठी वादंग निर्माण झाला. वातावरण गढूळ झाले. गणपतराव बोडस जुने-जाणते असूनही ते केवळ विनोदी नट होते. याउलट बालगंधर्वांच्याकडे संगीत नाटक कंपनीच्या मालकाला शोभतील असे सर्व गुण होते. पण ते वयाने लहान आणि अनुनभवी होते.

भास्करबुवा बखले यांचा किर्लोस्कर नाटक कंपनीशी जुना संबंध होता. त्यांना रंगभूमीचा अनुभवही होता. त्यामुळे त्यांनी हे पद स्वीकारावं असं सर्वांना वाटायला लागलं. पण बखले बुवा एव्हाना गायकीत शिरलेले असल्याने त्यांनी रंगभूमीच्या झगमगाटात सहभागी व्हायला स्पष्ट नकार दिला. दरम्यान गोविंदराव टेंबे हे मानापमान मध्ये धैर्यधराची भूमिका करायला लागले. ती सर्वांच्याच पसंतीला पडली. त्यांची योग्यता, त्यांचा अनुभव वगैरे लक्षात घेता किर्लोस्कर नाटक मंडळीची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. त्यांनी ती स्वीकारलीही. ते स्वत: सुशिक्षित होते. कोल्हापूर संस्थानात त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलेलं होतं. ते दिसायला देखणे तर होतेच, शिवाय नाट्यसंगीतातले तज्ञ होते. उत्तम पेटीवादक होते. नटही होते. त्यामुळे मालक होण्यास ते सर्वतोपरी योग्य होते. त्यामुळे मालकीहक्काबाबतचा वाद संपला. सर्व काही सुरळीत चालू लागले.

विद्याहरण

मालकपदावर टेंबे आरुढ होताच खाडिलकरांनी आपल्या नवीन नाटकाची तयारी सुरू केली. ‘विद्याहरण’ नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. विद्याहरण नाटकातील काही पदांच्या रचनांमध्ये गोविंदरावांचा सहभाग जरी असला तरी मुख्यत्वेकरून स्वत: बालगंधर्वांनीच ही धुरा सांभाळली होती. जानकीबाई आणि गोहरजान यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकून बालगंधर्वांनी देवयानीच्या तोंडची पदं बसवलेली होती. काही चाली भास्करबुवांनी बसवल्या होत्या. आणि ते तालीमही करून घेत होते.

या नाटकात शृंगाररस जितका महत्वाचा होता तितकाच शुक्राचार्यांची शोकांतिकाही महत्वाची होती. त्यामुळे या नाटकात गद्य, पद्य आणि संगीत सगळ्याच गोष्टींचा विशेष परिपोष झालेला होता. बालगंधर्वांनी रंगवलेल्या भामिनीपेक्षा देवयानीची भूमिका वेगळी होती. ती नुसतीच लाडावलेली नसून ती अनुभवी, तेजस्वी आणि स्वभावानं थोडी उग्र, तामसी होती. अभिनय करण्याच्या दृष्टीनं बालगंधर्वांना यात नवीन आव्हान पेलावं लागत होतं. पण भास्करबुवांच्या शिकवणुकीमुळे त्यांनी तेही समर्थपणे निभावलं.

३१ मे १९३१ रोजी पुण्याच्या किर्लोस्कर नाट्यगृहात विद्याहरणचा पहिला प्रयोग झाला. खाडिलकरांचं मानापमान इतकं गाजलं होतं की त्यांच्या या नवीन नाटकाकडूनही प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. त्यामुळे थिएटरमध्ये चिक्कार गर्दी झालेली होती. यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला आणि भरपूर उत्पन्न व्हायला लागलं. ‘लग्न होईना’, ‘मधुकर वनवन’, ‘आता राग’ वगैरे पदं लोकांना भलतीच आवडली. कृष्णराव गोरे हे किरकोळ शरीरयष्टीचे नट त्यांच्या धारदार डोळे, स्पष्ट शब्दोच्चार आणि वजनदार आवाजामुळे शुक्राचार्य म्हणून फारच शोभून दिसत होते. बोडस विनोदी भूमिका तर टेंबे नायकाची भूमिका करत होते. बालगंधर्व तर रंगमंच व्यापून उरले होते. कचदेवयानीची अशी जोडी पुन्हा रंगली नाही असं रसिक मानतात.

शंकरराव मुजुमदारांचं योगदान

या नाटकाच्या सुरुवातीला बालगंधर्व काहीसे नाराज होते. मानापमानच्या वेळी त्यांना छान भरजरी पोषाख मिळाला होता तसाच याही वेळी मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. शंकरराव मुजुमदारांनी या खेपेला नाटकातील सर्वांनाच नवे पोषाख आणले. पण खास बालगंधर्वांसाठी जास्त उंची वस्त्रं त्यांनी आणली नव्हती. त्यामुळे रागावलेले बालगंधर्व एक पांढरं शुभ्र लुगडं नेसून रंगमंचावर सरस्वतीच्या आसनावर जाऊन बसले. हा सगळा प्रकार पाहून मुजुमदार आणि खाडिलकर यांच्यात चांगलीच जुंपली.

शंकरराव खरं तर किर्लोस्कर नाटक मंडळीतील फारच वजनदार व्यक्तिमत्व होते. सुरुवातीला त्यांनी शकुंतलेची आणि रुक्मिणीची भूमिका केलेली होती. पुढे १८८४ मध्ये भाऊराव आल्यावर त्यांनी कंपनी सोडली. ते सुशिक्षित असून उत्तम इंग्रजी बोलत असत. त्यांनी काही चरित्रलेखनही केलं होतं. अण्णासाहेब किर्लोस्कर आणि इतर काही नटमंडळींची त्यांनी लिहिलेली चरित्रं इतकी सशक्त आहेत की त्या काळच्या अभ्यासकाला इतिहास जाणून घेण्यासाठी या चरित्रांचा चांगला उपयोग होऊ शकतो. किर्लोस्कर सोडल्यावर ते एका वृत्तपत्रात नोकरी करत होते. १८९३ साली त्यांचा पुन्हा एकदा किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश झाला आणि ते व्यवस्थापक म्हणून काम बघायला लागले.

कालांतरानं ते मालकही बनले. ते सुशिक्षित होते. रुबाबदार होते. मोठी जबाबदारी पेलण्याची त्यांच्यात धमक होती. त्यांना सामाजिक प्रतिष्ठा पण होती. त्यामुळे त्यांना कंपनीत मान मिळत असे. पण पुढे त्याचाच गर्व होऊन ते स्वत:ला देवलांपेक्षाही सरस समजायला लागले. ही गोष्ट वगळता त्यांनी नाटक मंडळी मोठी करून नावारुपाला आणण्यासाठी अपार कष्ट घेतले हे ही वास्तव आहेच. त्यांना ही एक आदर्श आणि आघाडीची कंपनी व्हायला हवी होती. नाटकात काम करणार्‍या मुलांचे एका विशिष्ट वयात आवाज फुटतात. मग ते नट म्हणून उभे राहू शकत नाहीत. हे विचारात घेऊन त्यांची आयुष्ये वाया जाऊ नयेत म्हणून मुजुमदारांनी एक छोटासा छापखाना काढला. रंगभूमीवर निरुपयोगी ठरलेल्या मुलांना या छापखान्यात काम दिलं. पण इथे केवळ हस्तपत्रिकाच काढून न थांबता त्यांनी ‘रंगभूमी’ नावाचं एक मासिकही काढलं. १९०५ साली भरलेल्या पहिल्या नाट्यसंमेलनात मुजुमदारांचा फार मोठा सहभाग होता.

राम गणेश गडकरी

संस्थेतील लहान मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी मास्तरही नेमलेले होते. याच पदावर 1906 साली राम गणेश गडकरी यांची नेमणूक झाली होती. खरं तर याच वर्षी बालगंधर्वांनी पण नाटक मंडळीत आपली सुरुवात केली होती. पुढे गडकर्‍यांनी ‘गर्वनिर्वाण’ नाटक लिहिलं होतं आणि त्याच्या तालमीही सुरू झाल्या होत्या. पण ते नाटक अनेक कारणांनी रंगभूमीवर झळकू शकलं नव्हतं. थोडक्यात अजून गडकरी-बालगंधर्व युतीचा योग जुळून आलेला नव्हता.

गडकरी हे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर याना गुरुस्थानी मानत असत. आणि शंकररावही कोल्हटकरांबद्दल अभिमान बाळगून होते. त्यामुळे स्वाभाविकच या दोघांचे सूर जुळले. शंकररावांची अशी इच्छा होती की कंपनीत नेहमी सुशिक्षित, प्रतिष्ठित, कलावंत, जाणकार, रसिक लोकांची ये-जा, ऊठबस असावी. त्यासाठी ते सतत खटपट करत असायचे. सरकार दरबारी पण आपली जानपहचान असावी याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. जेणेकरून कचेर्‍यांमधली कंपनीची कामं सुलभपणानं पार पडतील अशी त्यांची अपेक्षा होती.

अण्णासाहेबांचं स्मारक

किर्लोस्कर थिएटरला अण्णासाहेब किर्लोस्करांचं स्मारक मानलं जात होतं. त्याचंच रुपांतर पुढे वसंत टॉकीजमध्ये झालं. किर्लोस्करांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावानं एक थिएटर बांधलं जावं ही कल्पना मुजुमदारांचीच होती. त्याप्रमाणे 1908 साली या बांधकामाला सुरुवात झाली. मार्तंडराव टापरे नावाचे सावकार आणि किर्लोस्कर नाटक मंडळींच्या भागीदारीत सुरू झालेले बांधकाम पूर्ण झाल्यावर 12 ऑगस्ट 1909 रोजी इथे शाकुंतलचा प्रयोग करण्यात आला. छत्रपती शाहूमहाराज आणि इतर कितीतरी मान्यवर मंडळी या प्रयोगाला हजर होती.

मुजुमदारांची ही तळमळीची इच्छा पूर्ण तर झाली खरी; पण त्यांच्या बेहिशोबी स्वभावामुळे एक गडबड झाली. किर्लोस्कर मंडळीतील सर्व सदस्यांचा या स्मारकात सामुदायिक मालकी हक्क आहे अशीच सगळ्यांची भावना होती. त्यामुळे कंपनीच्या वाट्याचे भांडवल पुरवण्याकरता कंपतीनील नटांना तीन ऐवजी पाच प्रयोग करायला लागले. आता पैशांचा सगळा ओघ नाट्यगृहाकडे वळवला गेल्यामुळे कंपनीच्या खर्चात काटछाट करावी लागायला लागली. त्यामुळे खाण्यापिण्याचीही आबाळ व्हायला लागली. अण्णासाहेबांच्या काळापासून सर्वांना वार्षिक सुट्टी मिळायची. तीही बंद होऊन बाराही महिने काम करायला लागावे लागले. वेळेत पगार होईनात. कुटुंबांचे हाल व्हायला लागले. सुरुवातीला पंचवीस हजार खर्च येईल असं वाटलं होतं. पण नाट्यगृह बांधून पूर्ण झालं तेव्हा बहात्तर हजार खर्च आल्याचं लक्षात आलं. आता मार्तंडराव कंपनीचे सावकार झाले. सामुदायिक मालकीहक्कामुळे कर्जफेडीची जबाबदारी कंपनीतील सर्वच सदस्यांच्या अंगावर येऊन पडल्यामुळे सर्वजण नाराज झाले. पण तरीही जोगळेकरांकडे पाहून सगळेजण शांत रहात होते.

मालकीहक्क घेतला

पण जोगळेकर वारल्यानंतर परिस्थिती आणखीनच चिघळली. या मंडळीचा एक शिरस्ता होता. तो असा की, मुख्य नटानं कंपनीचा मालक व्हावं. तो निवृत्त झाल्यास त्याला अथवा तो मृत झाल्यास कंपनीने त्याच्या  पत्नीला पेन्शन द्यावं. पण कंपनीत सुरू झालेल्या वादंगामुळे किंजवडेकरांनी आपला भाग जोगळेकरांच्या कुटुंबाला 2200 रुपयांना विकला. पण जोगळेकरांच्या पश्‍चात त्यांच्या कुटुंबाकडे कंपनीचा मालकीहक्क जावा हे कुणालाच मान्य नव्हतं. कारण ते कंपनीच्या धोरणातही बसत नव्हतं. मोरोबांनीही निवृत्त होताना जाहीर सांगितलं होतं की, ‘जो कंपनी चालवेल त्याच्या मालकीचं सामान होईल!’

आता हा सगळा विचार करता आणि बालगंधर्वांच्या लोकप्रियतेचा कळस पाहता कंपनीच्या मालकीवर त्यांचा पहिला हक्क पोचत होता. गोविंदराव टेंबेचेही तेच मत होते. स्वत: बालगंधर्वांना मालकीहक्काचा हव्यास नव्हता. पण खाडिलकर आणि पंडितांचा त्यांनीच मालक व्हावं असा आग्रह होता. तिकडे चिंतोबा गुरव यांना मालकी अजिबात नको होती, पण बोडसांना हवी होती. अखेरीस डिसेंबर 1911 मध्ये बालगंधर्व, मुजुमदार आणि गणपतराव हे तिघे किर्लोस्कर नाटक मंडळीचे मालक झाले. जोगळेकरांच्या पत्नीला दरमहा पन्नास रुपये पेन्शन आणि काशीयात्रा करण्यासाठी हजार रुपये द्यायचे ठरले. किर्लोस्कर नाट्यगृहाचा हिस्सा त्यावरील कर्जासकट नाटक मंडळीच्या मालकांकडे राहिला.

पण या सगळ्यात स्वत: बालगंधर्वांना काय वाटत होतं? तर ते अलिप्तच होते. इतर लोक मालकीहक्क घ्या म्हणाले, म्हणून घेतला, एवढंच! त्यांना हिशोबात काहीच गम्य नव्हतं. थिएटरचा हिशोब अजून पूर्ण झालेला नव्हता. त्यामुळे पुन्हा दुफळी माजली. मग १९१२ सालच्या सप्टेंबर महिन्यात दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या. त्यात असं ठरलं की मुजुमदारांनी पेन्शन घ्यावे, बोडसांनी नोकरी पत्करून आधीपेक्षा जास्त पगार घ्यावा, बालगंधर्व एकटेच मालक असावेत. हा पर्याय सर्वांना मान्य झाला. पेच सुटला. पण दुसर्‍याच दिवशी बालगंधर्वांनी जाहीर केलं की, ‘मला काही हा मालकीहक्क निभावणं झेपणार नाही. मला तो नको.’

कदाचित कुणीतरी त्यांच्या लक्षात आणून दिलं असावं की मालकीहक्कासोबत थिएटरच्या कर्जाचीही संपूर्ण जबाबदारी बालगंधर्वांना घ्यावी लागेल. त्यातून ते पडले कलासक्त व्यक्ती. त्यांना कला सोडून हिशोबात पडावं हे ही रुचलं नसावं. आता पुन्हा पेचप्रसंग ओढवला. पुन्हा बदल घडले. बालगंधर्वांना २०० रुपये, टेंबेंना १५० रुपये आणि गणपतरावांना ११० रुपये पगार द्यायचं ठरलं. त्यानंतर मुजुमदार एकटेच किर्लोस्कर कंपनीचे मालक बनले.

 

Scroll to Top