तो राजहंस एक...
लेखिका - मंजूषा आमडेकर
६ . आणखी तुकडे
सुरुंग पेरले गेले
आत्तापर्यंत कोणतीही नाट्यसंस्था म्हणजे एक विशाल कुटुंबच असायचं. एकत्र राहणं, खाणंपिणं, मौजमजा, चेष्टामस्करी करणं, आजारपणात एकमेकांची सेवासुश्रुषा करणं…असं चालायचं. सर्वांना एकमेकांची सोबत असायची. कंपनीत सतत मोठमोठे कलाकार, समाजातले धनिक, रसिक लोकांनी येतजात राहण्याचा राबता असायचा. नवीन गावी मुक्काम असेल तेव्हा नवीन लोक भेटायचे. आसपासच्या परिसरातील चांगली चांगली ठिकाणं बघायला मिळायची. नवीन अनुभव मिळायचे. कधी कधी मालक लोकांची बिर्हाडेही सोबत असायची.
पण इतर व्यवसायांपेक्षा यातील भागीदारीचं स्वरुप वेगळं होतं. इथे एकमेकांच्या स्वभावदोषांचा चटकन अंदाज येत असे. त्यातून आसपासच्या इतर लोकांचीही मतं, कल, काही स्वार्थ या गोष्टी भागीदारीवर परिणाम करत असायच्या. बालगंधर्व हे नाटक मंडळीचं सौभाग्य होतं यावर कुणाचंच दुमत नव्हतं. खाडिलकर आणि पंडितांना तर पहिल्यापासूनच बालगंधर्व हे एकटेच कंपनीचे मालक असावेत असं वाटत होतं. पण कुणाची ना कुणाची भागीदारी चालतच राहिली होती. स्वयंवर आणि एकच प्याला जोरदार चालणारी नाटकं असल्यानं कंपनीच्या फायद्याला तोटाच नव्हता. तरीपण बालगंधर्व आणि गणपतरावांच्या भागीदारीला सुरुंग लावण्याचं काम पडद्याआडून केलं जात होतं यात शंकाच नव्हती. नाटकाच्या जोडीलाच काही ना काहीतरी जोडधंदा असावा आणि उत्पन्न वाढत रहावं अशी बाळासाहेब पंडितांची कल्पना होती. ते त्यानुसार प्रयत्नही करत असत. पण ते सगळे अंगलट येऊन कर्जाचा बोझा वाढत असे. या व्यक्तिगत कर्जांची फेड करण्याकरता बालगंधर्व मंडळीच्या उत्पन्नावर संपूर्ण कब्जा मिळवणं त्यांच्यासाठी अपरिहार्य होऊन बसलेलं होतं. पण जोपर्यंत गणपतराव भागीदारीत होते, तोपर्यंत काही ते शक्य नव्हतं.
बाळासाहेबांच्या कारवाया
धंदा करण्याच्या दृष्टीनं मुंबईत राहून गुजरात्यांशी हातमिळवणी करणं गरजेचं होतं. त्यामुळे बाळासाहेबांनी आग्रह धरला की मुंबईतच कायमचा मुक्काम करावा. बुधवार, शनिवार, रविवार आणि सुट्टीचे दिवस बालगंधर्वांनी भूमिका कराव्यात. आणि इतर वारी एक दुय्यम संच तयार करावा अशी त्यांची योजना होती. पण यामुळे खर्च वाढला असता, म्हणून गणपतरावांनी या योजनेला विरोध केला.
बाळासाहेब सोलापूर बँकेत असताना एका व्यवहारातील घोटाळ्यासंदर्भात त्यांच्यावर फौजदारी खटला चालू झाला होता. त्यातून सुटण्यासाठीही त्यांना पैशांची गरज होती. सुरुवातीच्या काळात आपला पैसा बालगंधर्वांसाठी खर्च करण्यात बाळासाहेबांनी कधीच मागेपुढे पाहिलं नव्हतं. आणि आता अशी वेळ येऊन ठेपलेली होती की त्यांना स्वत:च्या गरजा भागवण्यासाठी बालगंधर्वांचा पैसा वापरणं भाग होतं.
गणपतरावांची योग्यता बालगंधर्व आणि बाळासाहेब, दोघेही जाणून होते. त्यांच्याच धोरणी स्वभावामुळे सगळी कर्जं फिटून आता कंपनी कर्जमुक्त झालेली होती. हे जरी खरं असलं, तरी जोडधंद्यांच्या प्रयोगांमुळे बाळासाहेबांना जे व्यक्तिगत कर्ज झालेलं होतं त्याचं काय करायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न होता.
वादविवाद
त्यातून स्वत:च्या मर्जीप्रमाणे चालायचं असेल तर भागीदारी नसलेली बरी या मताला स्वत: बालगंधर्वच येऊन ठेपलेले होते. शिवाय दोघेही सहकुटुंब कंपनीत रहायला लागल्यापासून त्यांच्यात आणि गणपतरावांमध्ये मतभेदही व्हायला लागले होते. एकच प्यालाचे दिमाखदार प्रयोग केल्यानंतर कंपनीनं वार्षिक सुट्टी घेतलेली होती. ती संपल्यावर १५ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईला जो पहिलाच प्रयोग झाला तोपर्यंत भागीदारीतला वाद सल्लागार समितीपर्यंत जाऊन पोचलेला होता. गणपतरावांविरुद्ध पहिली तक्रार अशी होती की, ‘रंगभूमीसाठी खर्च करायचा झाला तरी वेळप्रसंगी कर्ज काढण्यास गणपतरावांचा विरोध असल्यानं बालगंधर्वांची कुचंबणा होते’.
आता अगदी हातघाईवर आलेली ही समस्या इथवर पोचली होती की कंपनीत एकतर बालगंधर्वांनी रहावे, नाहीतर गणपतरावांनी. वैद्य आणि लाडांनी तडजोड करण्याचे खूप प्रयत्न करून पाहिले. पण त्याचा काहीच उपयोग न झाल्यानं २४ नोव्हेंबर १९१९ रोजी गणपतरावांनी कंपनीतून आणि भागीदारीतून मुक्त व्हावं असं ठरलं. गणपतरावांच्या हिश्श्यासाठी बालगंधर्वांनी त्यांना सत्तावीस हजार देण्याचं कबूल केलं आणि १ डिसेंबर १९१९ पासून बालगंधर्व कंपनीचे सर्वेसर्वा झाले. ते एकमेव मालक बनले.
बोडस कंपनीतून गेल्यावर त्यांच्या विनोदी भूमिका कृष्णाप्पा भांडारकर आणि सुधाकरची भूमिका विद्याधर जोशी करू लागले. पण त्या भूमिका गणपतरावांइतक्या उत्तम वठत नसल्यानं नाटकांना मिळणार्या प्रतिसादात फरक पडला. तरीपण संशयकल्लोळ सोडल्यास इतर नाटकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला नाही. नाटकाविषयी लोकांचा अभिप्राय असा होता की, ‘बालगंधर्वांचं सुभद्रेचं काम आता जास्त स्पेशल झालेलं असून स्वयंवराप्रमाणेच सौभद्राकडेही प्रेक्षक जोराने खेचला जात आहे. सौभद्र हे नाटक श्रीमंत असून गंधर्व कंपनीमुळे ते जास्तच श्रीमंत दिसतं.’
पुण्याला गंधर्व कंपनीनं आपला सातवा वर्धापनदिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला. पण बोडसांची उणीव सर्वांनाच भासली. बाळासाहेबांनी त्यांच्या योजनेनुसार दुहेरी संच निर्माण केला. कंपनीची कॅलेंडर्स तयार करून कंपनीचा महिन्याचा कार्यक्रम जाहीर करायला सुरुवात केली. सीझन तिकिटाची प्रथासुद्धा बाळासाहेबांनी सुरू केली.
द्रौपदी
बोडस निघून गेल्यानंतर द्रौपदी नाटक रंगभूमीवर आलं. बालगंधर्वांना रंगभूमी सजवण्याची जणू आवडच लागलेली होती. दुसर्या महायुद्धापूर्वीच्या काळात या नाटकावर जवळपास सत्तर हजार रुपये खर्च झाला. पहिल्याच दिवशी नाटकाची तिकीटं खिडकीवर उपलब्ध झाली नाहीत कारण ती आधीच संपलेली होती. का कुणास ठाऊक, पण द्रौपदी नाटक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊ शकलं नाही. या नाटकावर केलेले सत्तर हजार रुपये वाया जातात की काय अशी परिस्थिती येऊन ठेपली. पण लवकरच बालगंधर्वांनी द्रौपदीच्या भूमिकेत असा काही जीव ओतला की बघता बघता ते स्वयंवर आणि एकच प्याला इतकंच लोकप्रिय होऊन बसलं.
१९०६ साली बालगंधर्वांना पहिल्यांदा पाहणार्या डॉ. रा.म.भातखंडे यांनी त्यांचं वर्णन ‘बावळट चेहर्याची मूर्ती’ असं केलं होतं. आणि आता बघता बघता त्याच मुलाचं राजहंसामध्ये रुपांतर झालेलं होतं. भातखंडेंना तरी बालगंधर्व असे भासले असले तरी लोकमान्य टिळकांना मात्र त्यांच्यात खरोखरच राजहंस दिसला होता. त्यांचं सुंदर रूप, आवाजातली गंधर्वता आणि बालभाव पाहून त्यांनीच नारायणाला ‘बालगंधर्व’ हे नाव दिलं होतं. ते पुढं त्यांनी सार्थही करून दाखवलं. त्यांचा चेहरा अतिशय बोलका आणि तरल होता. त्यांनी कोणतीही भूमिका साकारली तरी प्रेक्षक त्यांच्यावर मुग्ध होत असत. बालगंधर्व मुळातच प्रतिभासंपन्न नट आणि गायक होते. ते कुठल्याही भूमिकेशी समरस होत. अतिशय तन्मयतेनं ते आपली भूमिका वठवत.
बालगंधर्व हे उत्स्फूर्त कलावंत होते. ते आपल्या भूमिका निभावण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चिंतन, मननाची जोड देत नसत. कुणाशी भूमिकेबद्दल चर्चा करत नसत. माहिती मिळवत नसत. पण केवळ इशारा मिळताक्षणीच ते एखाद्या भूमिकेच्या अंतरंगात सहज शिरत आणि त्या भूमिकेशी एकरूप होऊन ती तन्मयतेनं साकारत. त्या काळी नाट्यसंस्था ही एखाद्या विशाल कुटुंबासारखी असायची. तिथे असणारा माणूस कलेला वाहून घेत असे. आपल्या नाट्यसंस्थेविषयी निष्ठा बाळगत असे. तालीममास्तर हा गुरुस्थानी असायचा. त्याची आज्ञा मोडली जाणं शक्यच नसायचं. एक प्रकारची अभिनयाची पाठशाळाच असायची ती. जे नट नाटकात काम करत नसत तेही तालमींना हजर असत. त्यामुळे एखाद्या नटाला आयत्या वेळी काही अडचण आली तर त्याच्या जागी हे नुसतेच तालमी बघायला हजर असणारे नट काम करू शकत असत.
बालगंधर्वांचं भाग्य इतकं थोर की त्यांना सुरुवातीपासूनच देवल, खाडिलकर, किर्लोस्कर, बोडस यांच्यासारख्या शिक्षकांकडे शिकायला मिळालं. गोविंदराव टेंबे, भास्करबुवा बखले यांच्याकडूनही शिकायला मिळालं. सुरुवातीच्या तेरा वर्षात त्यांना नऊ अविस्मरणीय भूमिका निभावण्याची संधी मिळाली. शकुंतला, शारदा, सुभद्रा, वसंतसेना, भामिनी, देवयानी, रेवती, रुक्मिणी आणि सिंधू या त्यांनी रंगवलेल्या नायिका इतिहासात अजरामर होऊन बसल्या.
याच भूमिकांच्या भरवश्यावर खाडिलकरांनी बालगंधर्वांना द्रौपदीची भूमिका दिली. तीही त्यांनी प्रचंड लोकप्रिय करून दाखवली. पण इतकं समर्थपणे रंगभूमी गाजवणारं हे शेवटचं नाटक ठरलं.