Logo

तो राजहंस एक...

लेखिका - मंजूषा आमडेकर

७ . कर्ज चढलं आणि फेडलं

सांसारिक जबाबदारी

बालगंधर्व रंगमंचावर जितक्या समर्थपणे वावरत तितक्याच समर्थपणे त्यांनी सांसारिक जबाबदारी पण पेललेली होती. त्यांनी किर्लोस्कर मंडळीत प्रवेश केल्यानंतर दोनएक वर्षांतच त्यांचे वडील सेवानिवृत्त होऊन घरी बसले. त्यांना पेन्शन नसली तरी त्यांचा आणि अन्नपूर्णाबाईंचा खर्चिक स्वभाव मुळीच बदललेला नव्हता. बालगंधर्वांचे मोठे भाऊ शंकरराव देवी डॉक्टरची परिक्षा पास झालेले होते आणि नोकरीही करत होते. त्यांच्यासोबत पत्नी आणि मुलगा होते. पण बालगंधर्वांची पत पाहता भावाने सामान्य नोकरी करणं बरं दिसत नाही असं मानलं गेलं आणि त्यांना नोकरी सोडून घरी बसायला लावण्यात आलं. बालगंधर्वांची बहीण वेणूताई पतीशी न पटल्यानं माहेरी येऊन राहिलेली होती. बालगंधर्वांचे वडील १९१८ साली वारले. बालगंधर्वांचे धाकटे भाऊ व्यंकटेश यांनी टंकलेखक म्हणून नोकरी धरली. पण तोपर्यंत त्यांचीही जबाबदारी बालगंधर्वांवरच होती. पुढे व्यंकटेश यांनी काही काळ नाटकात भूमिका केल्या. मग बखलेबुवांकडे शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली.

बालगंधर्वं आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांची अपत्यं एकापाठोपाठ गेली. हिरा, कृष्णा, नागनाथ ही मुलं बाल्यावस्थेतच वारली. नंतर कमला आणि सरोजिनी या मुली १९२० साली हयात होत्या.

बालगंधर्व इतक्या मोठ्या कुटुंबाला चालवत होते तरी त्यांनी कधी आपपर भेदभाव केला नाही. त्यांची वागणूक सदाचरणाची होती. ते कुणाला दुखवत नसत. वहिनी सुस्वरुप नव्हत्या आणि अपत्यसुखही नव्हते, असं असूनही बालगंधर्वांची स्त्रीकडे बघण्याची दृष्टी वाईट कधीच नव्हती. चहा, पान, तंबाखू आणि कधीतरी पोर्ट वाईन एवढीच त्यांची माफक आवड होती. वडिलांचा मृत्यू झाल्यावर त्यांनी पान सोडलं आणि लोकमान्यांचा मृत्यू झाल्यावर चहापान सोडलं ते कायमचंच.

गणितं चुकली

त्यांनी व्यवहाराच्या बाबतीत बाळासाहेबांवर पूर्ण विश्‍वास ठेवलेला होता. आपण आपली कला बहराला आणावी आणि पैशाचं काय ते बाळासाहेब बघतील अशीच त्यांची धारणा होती. पण बाळासाहेब स्वत:च एक बेहिशोबी गृहस्थ असल्यानं पुढे सगळीच गणितं चुकली!

बालगंधर्व बाळासाहेबांच्या अक्षरश: अर्ध्या वचनात होते. इतके की महिनाअखेरीस वाटण्या झाल्यावर बोडसांना एक हजार रुपये दिले गेले. बालगंधर्वांच्या वाट्याला सतराशे रुपये आल्यावरही त्यांच्या खिशात स्वत:च्या खर्चासाठी एक रुपयाही नव्हता अशी वेळ आली. कारण ते सगळेच्या सगळे पैसे घेऊन बाळासाहेब तीर्थयात्रेला निघून गेले होते. दादा काटदरे यांना हे कळताच ते म्हणाले, ‘हे असंच चालू राहिलं तर एक दिवस तुमचा हिस्सा तुम्हाला सावकाराकडे गहाण टाकावा लागेल.’

बालगंधर्वांनी केवळ सचिंत चेहर्‍यानं हे ऐकून घेतलं. नंतर बाळासाहेब तीर्थयात्रेहून परत आल्यावर त्यांच्या कानी हे गेलंच, आणि ते अर्थातच बालगंधर्वांकडूनच! त्याचा परिणाम एकच झाला. तो म्हणजे दादा काटदरेंना कंपनीतून काढून टाकण्यात आलं. आपल्या कारभारात कुणाची ढवळाळवळ होऊ नये याची बाळासाहेब पुरेपूर काळजी घेत. बालगंधर्वांच्या कुटुंबियांनाही त्यांनी कंपनीच्या व्यवहारापासून दूरच ठेवलेलं होतं.

बालगंधर्वांचं खाजगी गाणं बाळासाहेबांच्या परवानगीशिवाय ठरत नसे. ते सहजासहजी कुणाला भेटूही शकत नसत. त्यामुळे बालगंधर्वांविषयी काही दंतकथा जन्माला आल्या. बालगंधर्व बाळासाहेबांना व्यवहारविषयक कोणताही प्रश्‍न विचारत नसत. आणि तेही आपण काय व्यवहार केले आहेत याविषयी कुणाशीही काहीही बोलत नसत. पण काय चाललंय हे ज्यांना कळू शकत होतं असे एकमेव व्यक्ती होते काकासाहेब खाडिलकर. पण त्यांनी अलिप्तपणाचं धोरण स्वीकारलेलं होतं. कुणी काही विचारलं, सल्ला मागितला तरच बोलायचं असं त्यांनी ठरवलेलं होतं.

द्रौपदी नाटकानंतरच बाळासाहेबांवर सोलापूरला दाखल झालेल्या फौजदारी खटल्यानिमित्त त्यांना वारंवार तिकडे जावं लागायला लागलं. कंपनीवरचं नियंत्रण त्यामुळे हरवल्यासारखं झालं. याचा परिणाम असा झाला की डोअरकीपरला खाजगी पैसे देऊन लोक आत घुसायला लागले. कंपनीला वस्तू पुरवणारे लोक वाट्टेल ती बिलं फाडायला लागले. सगळा अनागोंदी कारभार सुरू झाला.

पण बाळासाहेब इतके हुशार होते की त्यांच्या इतर व्यवसायांचा डोलाराच मुळी कंपनी आणि बालगंधर्वांच्या समाजातल्या पतीवर अवलंबून होता हे पुरेपूर समजून होते. त्यामुळे कंपनीची घडी विस्कटू नये, दुसरा संच व्यवस्थित तयार रहावा याकडे त्यांचं लक्ष असायचं. बोडसांनी पुन्हा कंपनीत यावं अशी बालगंधर्वांची इच्छा होती. मग कुंटे पितापुत्र आणि लाड सॉलिसिटरांनी प्रयत्न करून त्यांना पुन्हा कंपनीत आणलं. त्यांना दरमहा तीनशे रुपये पगार द्यावा असं ठरलं. ते येताच नाटकं पुन्हा रंगायला लागली.

कर्जाचा फुगा

दरम्यान द्रौपदी नाटकावर केलेला भरमसाठ खर्च आणि बाळासाहेबांवर चालू असलेला खटला यामुळे बालगंधर्वांवर प्रचंड कर्ज झालेलं असल्याची बातमी सगळीकडे फुटलेली होती. नाटकं खूप चालत असल्याने उत्पन्नही खूप होतं. त्यामुळे हे कर्ज कधी ना कधीतरी फिटेल असं प्रत्येकानं गृहीत धरलेलं होतं. पण गंमत अशी होती की कर्जाचा नक्की आकडा किती हे खुद्ध बाळासाहेबांनाही माहीत नव्हतं. बालगंर्वांच्या जिवावर पैसा मिळत होता आणि बाळासाहेब तो पैसा हवा तसा उडवत होते. अखेरीस मुंबईहून मंडळी पुण्याला यायला निघाली असताना सावकारायच्या पठाणानं त्यांना अडवलं तेव्हा सर्वांची पाचावर धारण बसली. जिकडे तिकडे ही बातमी वार्‍यासारखी पसरली. बालगंधर्वांना सावकारानं अडवावं हेच मुळी कुणाच्या कल्पनेत न बसणारं होतं.

त्या वेळी स्वत: बाळासाहेब सोलापुरात होते. त्यामुळे बालगंधर्वांसकट सर्वजण भयभीत आणि चकित झाले. बाळासाहेबांनी काय आणि कुणाशी व्यवहार केले आहेत याची कुणालाही कल्पना नव्हती. बाळासाहेब समोर ठेवतील त्या कागदावर बालगंधर्व विश्‍वासानं फक्त सह्या करत असत. आता अशा प्रसंगी कुणी कुणाला धीर द्यायचा हाच खरा प्रश्‍न होता. काय करायचं, तो भाग तर कुणालाच माहीत नव्हता. अशा वेळी सॉलिसिटर लाड पुढे सरसावले. त्यांनी गंधर्व मंडळीचे जमाखर्च आणि कर्जाची वगैरे कागदपत्रं पाहिल्यावर त्यांना असं आढळलं की बालगंधर्व बहात्तर सावकारांचे एकूण एक लाख ऐंशी हजार रुपये देणं लागतात. आणि यातील बरीचशी कर्ज भरमसाठ व्याजदरावर काढण्यात आलेली होती. बालगंधर्वांच्या इंद्रप्रस्थात मयसभा उभारणार्‍या बाळासाहेबांच्या कर्ज काढण्याच्या द्यूतसदृश्य व्यसनाने कंपनीला धुळीला मिळवलेलं होतं.

कर्जफेडीची जबाबदारी घेतली

हे सगळं कर्ज फेडण्याचं ओझं आता एकट्या बालगंधर्वांवर येऊन पडलेलं होतं. आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे त्यांच्या कलेविना दुसरं कुठलं साधनही नव्हतं. सावकारांनी त्यांच्यावर खटला चालवून त्यांच्यावर तुरुंगात जाऊन बसण्याची वेळ आणली असती तर त्यांच्या कलाजीवनावर कायमचा कठोर प्रहार झाला असता. 

अखेरीस सॉलिसिटर लाडसाहेबांनीच यावर तोडगा शोधून काढला. जे काही अवाढव्य कर्ज होतं त्यात मुंबईच्या काशीनाथ दामोदर खोटे यांचं तब्बल साठ हजारांचं कर्ज होतं. लाडसाहेबांनी गंधर्व मंडळींची सगळी मालमत्ता त्या कर्जाच्या बदल्यात गहाण टाकली. त्यांच्या वतीनं 29 मे 1921 रोजी लाडसाहेबांनी ही सगळी मालमत्ता आपल्या ताब्यात घेतली. अनेक सावकारांशी सामोपचाराची बोलणी करून त्यांना काही काळ थांबायला सांगितलं. आणि जे सावकार ऐकायलाच तयार नव्हते त्यांचे पैसे देऊन टाकले. कित्येकांना, ‘नारायणरावांचा नादारीचा अर्ज तयार आहे,’ असं सांगून धाक घातला.

बालगंधर्वांची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की संपूर्ण रसिक मायबाप या बातमीनं व्यथित झाले. मुंबईतील पुढारी आणि धनिक मंडळींनी एकत्र येऊन बालगंधर्वांना मदत करायचं ठरवलं. सर्वांनी पैसे गोळा करून एका आठवड्यात एक लाख ऐंशी हजार उभे करायचं ठरवलं. पण हे जेव्हा बालगंधर्वांना कळलं तेव्हा ते गहिवरून म्हणाले, ‘देवा, माझ्यासाठी फंड जमा करू नका. हे कर्ज माझ्या चुकीमुळे झालं आहे आणि ते मलाच फेडलं पाहिजे. ते फिटेपर्यंत आपणा सर्वांचा आशीर्वाद आणि प्रभूची कृपा कायम असावी एवढीच प्रार्थना आहे.’

या कर्जाचा वापर कशाकशासाठी झाला होता? तर, बाळासाहेबांच्या सोलापूर खटल्यासाठी ५१,००० /-, बाळासाहेबांच्या घरखरेदीत झालेलं नुकसान भरण्यासाठी १५,०००, /-, गणपतरावांची भागी तोडताना त्यांना दिलेले २७,०००/-, आणि द्रौपदी नाटकावर केलेला वारेमाप खर्च ७२,००० /-. थोडक्यात बालगंधर्वांनी त्यांच्या व्यक्तिगत कारणांसाठी यातील काहीही पैसा खर्च केलेला नव्हता. पण ते कर्जच मुळात त्यांच्या पतीवर आणि नावावर घेतलं गेलेलं असल्याने ते फेडण्याची जबाबदारी त्यांच्या अंगावर येऊन पडलेली होती. आणि त्यांनी ती मोठ्या मनानं स्वीकारलेली होती.

पुढे पठाणानं अडवलेलं सामान सोडवून घेतल्यानंतर गंधर्व मंडळीनी पुण्याला परत फिरण्याऐवजी मुंबईचाच मुक्काम वाढवला. आता कर्जाचा मोठा भाग अदा करून झालेला होता. हे सर्व घडूनही नाटकं उत्तम चालत होती आणि उत्पन्नही घसघशीत होत होतं. इतका मनस्ताप आणि विश्‍वासघात होऊनही बालगंधर्व बाळासाहेबांबद्दल एकही वावगा शब्द बोलत नसत. बोडस पुन्हा कंपनीत आलेले होते. त्यांनी बालगंधर्वांना साथ द्यायची ठरवली. केशवराव भोसलेंनी त्यांच्या कंपनीत भागी देऊ केलेली असूनही ती नाकारून बोडस गंधर्व कंपनीतच राहिले. बालगंधर्वही त्यांच्याशी मोकळेपणानं सल्लामसलत करायला लागले.

दादा काटदरे

आणीबाणीच्या प्रसंगी लाडसाहेबांनी गंधर्व मंडळींना जी काही मदत केली त्याची कदर सर्वजणच करत असत. प्रत्येक नाटकाला त्यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवलेल्या असत. त्यांची मुलगी विठाबाई नाटकांना येत असे. पुढे तीच दुर्गाबाई खोटे या नावानं सिनेमात काम करायला लागली आणि प्रसिद्ध झाली. गंधर्व मंडळींसाठी लाडसाहेबांनी नियुक्त केलेल्या व्यवस्थापकाला नाट्यव्यवसायाची काहीच माहिती नसल्यानं सतत अडचणी यायला लागल्या. त्यावर मात करण्यासाठी लाडसाहेबांनी दादा काटदरेंना पुन्हा बोलावून घेतलं. तीन वर्षांपूर्वी त्यांनीच बाळासाहेबांचे उद्योग पाहून बालगंधर्वांना सावध करण्याचा प्रयत्न केलेला होता. पण त्यावर त्यांनाच कंपनीतून काढून टाकण्यात आलेलं होतं. आता त्याच माणसाची, ‘दादांसारखा हिशोबी आणि प्रामाणिक माणूस दुसरा मिळणार नाही,’ अशी खुद्द बालगंधर्वांनीच शिफारस केल्यामुळे लाडांनी त्यांची व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली.

दादांना पक्षघात आणि मधुमेह होता. त्यांना कौटुंबिक समस्या होत्या. ते विधूर होते. बालगंधर्वांना कर्जफेड करण्याकरता आपला उपयोग व्हावा या इच्छेने ते पुन्हा कंपनीत यायला तयार झाले. पण त्याचबरोबर रोजच्या व्यवस्थापनासाठी बालगंर्वांचे भाऊ बापूराव पुढे सरसावले. ते बखल्यांकडे शास्त्रीय संगीत शिकत होते. पण आत्ता या वेळी आपली भावाला जास्त गरज आहे असं समजून त्यांनीही आपला जबाबदारीचा वाटा उचलला. ते प्रेक्षकांचं हसतमुखानं स्वागत करणार होते आणि नोकरवर्गाची काळजी घेणार होते. तर दादा काटदरे कंपनीचं उत्पन्न आणि खर्च यावर नियंत्रण ठेवणार होते.

माणसांचे खरे रंग दिसले

लाडांनी सूत्रं हाती घेताच बालगंधर्वांच्या एका चाहत्यानं आपलं देणं दाखवून बालगंधर्वांवर दिवाणी तुरुंगाची नोटीस काढली तेव्हा बालगंधर्व घाबरून गेले. त्यावेळी लाडसाहेब म्हणाले होते की, ‘बेलीफ येताच मी तुमचे सर्व पैसे देऊन टाकणार आहे. काळजी करू नका. पण तुमच्या समोर नाचणारे काही मित्र प्रत्यक्षात कसे आहेत हे मला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे.’

आणि खरोखरच अनेक नमुने समोर आले. कुणाला बालगंधर्वांच्या पैशावर ताबा हवा होता, कुणाला कंपनीवर, कुणाला बालगंधर्वच आपले नोकर होऊन रहावेत असं वाटत होतं…! याउलट लाडांनी काटदरेंना सुरुवातीलाच सांगून ठेवलेलं होतं की, ‘आपण परावलंबी झालो आहोत असं नारायणरावांना वाटू देऊ नका. आपण पूर्वीसारखेच मालक आहोत असं समजून त्यांनी मिरवलं पाहिजे. ते कलावंत आहेत, त्यांना खुष ठेवलं तरच त्यांच्या हातून कलोपासना होईल आणि सावकाराचं कर्ज फिटेल.’

हाती सूत्रं घेतल्यापासून लाडांनी खरोखरच मनापासून बालगंधर्वांना प्रोत्साहन दिलं. वाद्ये जुनी झाली आहेत अशी बालगंधर्वांनी तक्रार करताच नवी घेऊन दिली.

संयुक्त मानापमान

केशवराव भोसले आणि बालगंधर्व या दोघांनीही लहानपणी शारदेची भूमिका केली होती. लोकांनी दोघांनाही डोक्यावर घेतलं होतं. पण केशवराव मुळातच रुपवान नव्हते आणि त्यांचा अभिनयही बालगंर्वांइतका सशक्त नव्हता. त्यामुळे त्यांनी हळुहळू पुरुष भूमिका करायला सुरुवात केली होती. रसिक प्रेक्षक जरी त्यांना प्रतिस्पर्धी मानत असले तरी दोघांना नायक-नायिका म्हणून एकत्र भूमिका करताना पहायची देखील उत्सुकता होती. त्यांच्यासाठी संयुक्त मानापमान घडवून आणण्यासाठी अच्युतराव कोल्हटकरांनी प्रयत्न केले पण त्याला यश आलं नाही.

पुढे १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य वारल्यानंतर महात्मा गांधी यांच्या नावानं ‘टिळक स्वराज्य फंड’ काढला गेला. यासाठी निधी गोळा करण्याकरता संयुक्त प्रयोग व्हावा अशी डॉ भडकमकरांनी इच्छा व्यक्त केली. बालगंधर्वांचे काही चाहते या कल्पनेच्या विरोधात होते. परंतू स्वत: बालगंधर्व याकडे स्पर्धा म्हणून न पाहता टिळकांची सेवा म्हणून पहात होते. त्यामुळे बालगंधर्व पुण्याला अचानक ललितकला मंडळीना भेटायला गेले. केशवराव आणि इतर लोक त्यांना पाहून चकितच झाले. केशवरावांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि संयुक्त मानापमानच्या प्रयोगाला संमती दर्शवली.

हा प्रयोग ८ जुलै १९२१ रोजी मुंबईत होणार होता. आता ज्याच्या त्याच्या तोंडी हा एकच विषय होता. ग्रँट रोडवरील बालीवाला ग्रँड थिएटरमध्ये होणार्‍या या प्रयोगाचे पहिले तिकीट शंभर रुपये तर शेवेटचे पाच रुपयांचे असणार होते. विक्रीला सुरुवात होताच केवळ अर्ध्या तासात तिकीटं विकली गेली. तब्बल सोळा हजार रुपये उभे राहिले. तिकीटं न मिळाल्यानं निराश झालेल्या प्रेक्षकांची संख्या तर प्रचंड होती. या प्रयोगासाठी दोन्ही मंडळीतील निवडक कलावंतांची निवड करण्यात आलेली होती. बालगंधर्व भामिनी, बोडस लक्ष्मीधर, केशवराव धैर्यधर, वालावलकर विलासधर, चापेकर अक्कासाहेब, पेंढारकर ऑर्गन आणि राजण्णा तबलजी, अशा प्रकारची निवड झाली.

प्रत्यक्ष प्रयोग प्रचंड रंगला. केशवराव आणि बालगंधर्व यांची चांगलीच दिलजमाई झालेली होती. चौथ्या अंकात भामिनी धैर्यधराचे चढाव उचलते, असं दृश्य होतं. केशवराव हळूच म्हणाले, ‘नारायणराव, तुम्ही माझ्यापेक्षा वडील आहात, माझे चढाव उचलू नका.’

संयुक्त सौभद्र आणि केशवरावांचं निधन

टिळक फंडाला मदत म्हणून मानापमान करायचं ठरलं असलं तरी पुढे संयुक्त सौभद्र पण करायचा बेत आखला गेला. मात्र हे प्रयोग नफ्यासाठी होणार असल्यानं दोन्ही मंडळींनी नफा वाटून घ्यावा असं ठरलं. आणि याही प्रयोगाला तूफान गर्दी जमली. यात बालगंधर्व सुभद्रा, केशवराव अर्जुन, नारद मास्टर कृष्णराव, कृष्ण बोडस, रुक्मिणी रानडे अशी पात्रयोजना करण्यात आली होती. यानंतर अशा प्रकारचे अनेक नाटकांचे प्रयोग होतील अशी प्रेक्षकांनाही आशा होती आणि कलाकारांनाही. केशवराव तर मोकळेपणानं बालगंधर्वांना म्हणाले देखील की, ‘नारायणराव, कर्जाची काळजी कशाला करता? असेच संयुक्त प्रयोग करून एका वर्षात तुमचं कर्ज फेडून टाकू.’

हे शब्द ऐकून बालगंधर्वांच्या मनातल्या आशा देखील पल्लवित झाल्या. पण दुर्दैवानं केशवराव विषमज्वरानं आजारी पडले. आणि ४ ऑक्टोबर १९२१ रोजी ते चक्क निधन पावले. त्या वेळी ते जेमतेम एकतीस वर्षांचे असतील-नसतील! त्यांचं अकाली निधन हे रंगमंचासाठी, रसिकांसाठी आणि बालगंधर्वांसाठीही प्रचंड मोठा आघातच ठरलं. हे काय कमी होतं की काय, म्हणून गणपतरावही आजारी पडले. इतके की त्यांनी निवृत्ती घेतली. त्यांच्यामुळे जी काही मदत होत होती त्यालाही आता बालगंधर्व मुकले होते. ८ एप्रिल १९२२ रोजी बखलेबुवाही वारले. एकापाठोपाठ एक असे आधारस्तंभ सोडून चालले होते. भरीला भर म्हणून स्वत: बालगंधर्वच आजारी पडले. आता कसं होणार, या चिंतेनं सर्वांनाच ग्रासून टाकलं होतं. अशा परिस्थितीत आधार होता तो फक्त खाडिलकर आणि लाडांचा.

मुंबई मुक्कामात खाडिलकर रोज कंपनीत येऊन चौकशी करत. द्रौपदी नाटकामुळं नुकसान झालं असं कानी आल्यामुळे खाडिलकरांनी निश्‍चय केला होता की बालगंधर्वांचं कर्ज फिटेपर्यंत ते द्रौपदी नाटकाचे पैसे घेणार नाहीत. १९२३ मध्ये बालगंधर्व आजारी पडल्यावर लाडांनी त्यांना भरपगारी महिनाभर रजा देऊन आराम करण्यासाठी नाशिकला पाठवून दिलं होतं. या काळात काटकसर करून कंपनी व्यवस्थित चालवून काटदरे यांनी रीतसर जमाखर्च ठेवलेले होते.

वय बोलायला लागलं, पण कर्ज फिटलं

या सर्व काळात आपली कलेवरील निष्ठा, प्रामाणिकपणे कर्ज फेडण्याची सचोटी आणि रसिक मायबापांचं प्रेम यांच्या आधारावर बालगंधर्व ठामपणे उभे होते. प्रेक्षकांनी फुललेलं रंगमंदिर पाहिलं आणि प्रेक्षकांना आनंदानं हरखून गेलेलं पाहिलं की बालगंधर्वांना आपल्या सर्व काळज्या आणि व्यथांचा विसर पडत असे. आता वाढत्या वयानुसार आपल्याला स्त्रीभूमिका शोभणार नाहीत, त्यामुळे आपण हळुहळू पुरुषभूमिकांकडे वळलं पाहिजे अशा विचारानं बालगंधर्वांनी वीरतनय नाटकातील शूरसेनाची भूमिका वठवली. पण प्रेक्षकांना ती फारशी पसंत पडली नाही. त्यांना स्त्रीवेषातील बालगंधर्वच हवे होते.

पण बालगंधर्व आता अडतीस वर्षांचे झालेले होते. त्यांच्या आवाजात काहीच फरक पडला नव्हता. पण डोक्याला टक्कल पडलेलं होतं. त्यांना आता टोप लावावा लागत असे. शरीरानं ते स्थूलतेकडे झुकायला लागले होते. निराशाजनक अनुभव, जवळच्या एकेक माणसांचा मृत्यू, कर्जाचं ओझं आणि कष्ट या सगळ्यामुळे त्यांच्या हालचाली आणि नजरेतली कोवळीक हरवून गेलेली होती. शृंगारसरप्रधान भूमिकांच्या दृष्टीनं ते आता वयस्कर होत चालले होते. कारण चाळीशी आली की माणूस म्हातारपणाकडे झुकायला लागला असं त्या काळी समजलं जात असे. फार काय, ते स्वत:च आता, ‘मी आता म्हातारा झालो,’ अशा प्रकारचे शब्द वरचेवर म्हणायला लागले होते. तरीपण वर्षानुवर्षं ज्या भूमिका त्यांनी केल्या त्या त्यांच्या रक्तात अशा काही भिनल्या होत्या की ते समोर येताच प्रेक्षक त्यांचं वय विसरून जात.

वय वाढलं तरी त्यांचा सौंदर्यदृष्टीकोन यत्किंचितही कमी झालेला नव्हता. त्यांनी स्वत: विणून घेतलेल्या शालूप्रमाणेच आपल्याकडेही शालू असावा असं थोरामोठ्यांच्या घरच्या लेकीसुना म्हणायला लागल्या होत्या. सोलापूरच्या दोन महिन्यांच्या मुक्कामात नाटकं खूप यशस्वी झाली होती. इतर खर्च वजा जाता बावीस हजार फायदा झाला होता. पण बालगंधर्वांनी लगेचच वीस हजारांचे नवे शालू खरेदी करूनही टाकले. यावर काय बोलावं तेच दादा काटदरेंना समजेना. बालगंधर्व आपल्या डोक्यावरचं कर्ज विसरले नव्हते. त्याची फेड चालूच होती. पण खर्चिक स्वभावातही काही बदल झालेला नव्हता. प्रत्येक गावच्या प्रयोगांना तुडुंब गर्दी व्हायची. लोक तिकीटं काढून उभं राहूनही नाटक बघायला तयार असत.

अशाच उदंड प्रतिसादामुळे सलग साडेसहा वर्षांच्या काळात विक्रमी उत्पन्न होऊन कंपनी प्रचंड नफ्यात आली होती. १९२७ च्या डिसेंबर अखेरीस संपूर्ण कर्ज फिटलं. गंधर्व मंडळी बालगंधर्वांच्या हाती परत आली. गहाणवट पडलेली मालमत्ता सुटली. या काळात बालगंधर्वांनी सावकारांना व्याजासकट एकंदरित तीन लाख नऊ हजार रुपये दिले होते. आणि हे केवळ रसिक प्रेक्षक मायबापांच्या उदंड प्रतिसादाच्या बळावरच शक्य झालं होतं. हाही एक पुरुषार्थच होता आणि तोही हातात बांगड्या भरून हे विशेष! स्त्रीचं रुप घेऊन केली गेलेली कलेची सेवा फळाला आली होती.

 

Scroll to Top