Logo

तो राजहंस एक...

लेखिका - मंजूषा आमडेकर

९. आयुष्याला लागलेली विदारक कलाटणी

गंधर्व मंडळीला पुन्हा उतरती कळा

१९३७ च्या सप्टेंबर अखेरीस गंधर्व मंडळीचा मुक्काम मुंबईहून हलला आणि एक अनपेक्षित दुर्दैवी घटना घडली. बालगंधर्वांच्या वाढत्या वयामुळे त्यांना नवीन संचाची नितांत गरज होती. नगरच्या मुक्कामात हरी देशपांडेनी कंपनी सोडली. त्याच्या पाठोपाठ लोंढे, वालावलकर, भांडारकर आणि अभ्यंकरही बाहेर पडले. एकेक करून सर्वजण सोडून गेल्यानंतर फक्त दोनच गोष्टी मागे उरल्या – एक स्वत: बालगंधर्व आणि दुसरी त्यांच्या गंधर्व मंडळीची पाटी. मग अतिशय सुमार दर्जाच्या नटांना बरोबर घेऊन बालगंधर्वांनं येवल्याला ‘स्वयंवर’चा प्रयोग केला. मोठ्या अपेक्षेने लोकांनी गर्दी केली खरी, पण सगळ्यांचा विरसच झाला. आता गंधर्व मंडळीला इतकी उतरती कळा लागलेली होती की पुन्हा मंडळी स्थापन झाल्यानंतर गर्दी खेचणारा तो पहिला आणि शेवटचा प्रयोग ठरला. ज्या गंधर्व मंडळीत नटांची रांग उभी असायची, लोक त्यांच्याकडे यायला धडपडायचे तिथे आता एकही कलाकार शिल्लक उरलेला नव्हता.

अखेरीस कृष्णराव चोणकर नावाचे एक नट कंपनीत आले. ते देखणे होते आणि सुरेल गायकही. तरीपण प्रेक्षकांचा प्रतिसाद थंडच होता. बालगंधर्वांच्या हितचिंतकांचं मत असं होत होतं की आता इथून पुढे बालगंधर्वांनी नाट्यव्यवसायाचा अंत पाहू नये. बालगंधर्वांच्या दहा हजाराच्या विम्याची लवकरच रक्कम मिळणार होती. त्यासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता करायला ते मुंबईला गेले असता डॉ वामनराव सातपुते यांच्या घरी गिरगावात गेले होते. त्यांच्यासोबत कृष्णराव चोणकर, दुर्गाराम खेडेकर आणि बापूराव ओळकर ही मंडळी देखील होती.

या बैठकीत आता नाट्यसंस्था चालू ठेवण्यात तथ्य नाही असं सर्वांनी आपलं मत मांडलं. ते बालगंधर्वांना पटलं. पण कर्जफेड कशी करायची हा प्रश्‍न शिल्लक होताच. आणि त्याही पेक्षा पुढे स्वत:चा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा जास्त बिकट प्रश्‍न होता. कराचीच्या लालजींनी वेळोवेळी दिलेल्या रकमांसकट एकूण ऐंशी हजाराचं कर्ज शिल्लक होतं. हे कर्ज फिटणं आताच्या परिस्थितीत अशक्य होतं. सावकार तरी किती काळ गप्प बसणार होते? त्यांनी कोर्टात जाऊन गंधर्व मंडळीच्या सामानाचा लिलाव पुकारून वसुली करावी यासारखी मानहानी दुसरी कुठलीही नाही असं सगळ्यांना वाटत होतं. यावर कंपनी बंद करून नादारीचा अर्ज करणं हाच एकमेव उपाय दिसत होता. पण बालगंधर्वांना ते पटेना. ते म्हणाले, ‘देवा, नादारी नको!’

सर्वांनी त्यांना परोपरीनं समजावण्याचा प्रयत्न केला की, ‘नादारीमुळे कर्जाचा प्रश्‍न तरी संपेल. शिवाय आता नाटकं चालणार नाहीत. वहिनी, पद्मा आणि आईची जबाबदारी तुमच्यावर आहे ती निभावावीच लागेल. तुम्ही नुसते गाण्याचे किंवा भजनाचे कार्यक्रम केलेत तरी तुमचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटेल. तुमच्यावर भक्तीभाव ठेवणारी माणसं तुम्हाला बोलावत आहेत. कराचीचे शेट बोलावत आहेत. नागपुरचे बाबूराव देशमुख बोलावत आहेत. तिकडे जाऊन राहिल्यास पुढील निवृत्तीचा काळ तरी सुखाचा जाऊ शकेल. हे लोक तुम्हाला गाण्याचे, भजनाचे कार्यक्रम मिळवून देत राहतील आणि पैशाचा प्रश्‍न तरी सुटेल. तुमच्याकडे गाणं शिकायला उत्सुक असलेली माणसं आहेत. त्यातूनही चार पैसे जोडता येतील.’

बालगंधर्व सगळं ऐकत होते. त्यांना कळत होतं पण वळत नव्हतं. नादारी पत्करायला त्यांचं मन तयार होत नव्हतं.

त्यांचे हितचिंतक पुढे आणखी समजवायला लागले, ‘नारायणराव, तुम्हाला सोबत दिल्याशिवाय इतके दिवस कुठेही पाठवलं जात नव्हतं. आता या वयात तुम्ही एकटेच सैरावैरा धावपळ करत आहात हे बरं वाटत नाही. आता इथून पुढे नाटकं चालू ठेवायची तुम्ही ठरवलीच तरी यश येण्याऐवजी आणखी पेचात पडाल. आम्ही सांगतो तो मार्ग स्वीकारलात तर निदान अब्रू तरी झाकली राहील. तुमच्या कलापूजनाचे धिंडवडे समाजाला दिसणार नाहीत.’

आपापल्या परीनं समजावून सांगूनही बालगंधर्व काही बोलत नाहीत असं पाहून लोक चुळबुळायला लागले. रात्रीचे आठ वाजत आले होते. अखेरीस बालगंधर्व म्हणाले, ‘तुम्ही सर्वजण माझ्या हिताचेच सांगत आहात. मी बापूरावाशी बोलून ठरवतो काय करायचं ते.’

गोहरबाई नावाची निसरडी वाट

मग क्षणभर थांबून ते बापूराव ओळकरांना म्हणाले, ‘बापू, आता निघालं पाहिजे. गोहरबाईकडे जायला पाहिजे.’

ते ऐकून सर्वजण थक्कच झाले. सर्वांनी विचारलं, ‘गोहरबाईकडे? आत्ता यावेळी? कशासाठी?’

त्यावर चोणकरांकडे बोट दाखवत बालगंधर्व म्हणाले, ‘त्यांच्या शिफारसीमुळे ही स्वारी आम्हास लाभली. बाईंचे आभार मानले पाहिजेत.’

हे सर्वस्वी अनपेक्षित असलं तरी केवळ शिष्टाचार म्हणून गोहरबाईंना भेटून येण्यात कुणालाच काही गैर वाटलं नाही. पण तिच्याकडे घेऊन जाणारी मोटार बालगंधर्वांना त्यांच्या विनाशाकडे नेतेय याची चाहूल इतर कुणाला सोडाच, पण खुद्द बालगंधर्वांनाही लागली नाही!

तो दिवस होता 30 डिसेंबर 1937. या काळ्या दिवसानं बालगंधर्वांच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ घडवून आणली. आयुष्यभर राजासारखा जगलेल्या माणसावर त्या बाईनं तब्बल सव्वीस वर्षं निरंकुश सत्ता गाजवली. 1938 सालापूर्वीचे बालगंधर्व आणि नंतरचे बालगंधर्व या दोन वेगवेगळ्या व्यक्ती असाव्यात की काय असं वाटण्याइतका त्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाला. त्यांचा उर्वरीत जीवनकाल हा कुणाचाही विश्‍वास बसणार नाही असा आश्‍चर्याच्याही पलिकडचा होता. त्यांचं आणि गोहरबाईंचं नातं हे सर्वसामान्य नीतीअनितीच्या कोणत्याही निकषांवर बसणारं नव्हतं. कुणाला ते चेटूक वाटत होतं, कुणाला मनाचा गेलेला तोल वाटत होता… तर कुणाला तो अन्याय वाटत होता – अन्याय स्वत:वर, रसिकांवर, कुटुंबावर…सगळंच अगम्य होतं. कल्पनातीत होतं.

गोहर नक्की कोण होती

ज्याअर्थी बालगंधर्वांनी गोहरबाईला जवळ केलं त्याअर्थी ती त्यांच्या तोलामोलाची कलावंत असली पाहिजे असंही अनेकांना वाटलं. तिची योग्यता काय होती आणि काय नव्हती यावरच थोडा विचार केला जायला पाहिजे. पूर्वी कलकत्त्याला एक गोहरजान नावाची अतिशय देखणी आणि गोड गळ्याची गायिका होती. ती ही नव्हे. त्याचप्रमाणे सिनेजगतात जिला ‘सिनेसाम्राज्ञी’ म्हणून ओळखलं जात होतं तीही ही नव्हे. ती गोहर रणजित फिल्म कंपनीची भागीदार होती. या दोन्ही गोहर वेगळ्या आहेत.

बालगंधर्वांच्या आयुष्यात आलेल्या गोहरला ‘गोहर कर्नाटकी’ म्हणून ओळखलं जात असे. ती आधी विजापुरात रहात होती. सुप्रसिद्ध नट शंकर ऊर्फ नाना चापेकर यांनी तिला मुंबईत आणलं होतं. त्यांच्याच मदतीनं ती मुंबईत स्थिरावलेली होती. केशवराव भोसले गेल्यानंतर ललितकला नाट्य कंपनी नाना चापेकर आणि बापूराव पेंढारकर यांनी हातात घेऊन नावारुपाला आणली. पुढे 1924 साली ती कंपनी विसर्जित झाल्यावर नानांनी किर्लोस्कर मंडळी चालवायला घेतली. कंपनीच्या विजापूर मुक्कामात त्यांची गोहरबाईशी ओळख झाली. गोहर आणि तिची बहीण अमीरबाई कर्नाटकी कानडी अणि हिंदी चांगलं बोलत असत. त्यांना मराठी कळायचं, पण बोलता यायचं नाही. दोघींचे गळे गोड असल्यानं त्या फार छान गात. गोहरला तबला आणि पेटीदेखील वाजवता येत असे. नानांनी तिला मराठी शिकवून आपल्या नाटकांमध्ये नायिका म्हणून झळकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पण त्याला यश आलं नाही.

१९३२ साली गोहरला अचानक असं वाटलं की कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रात आपल्या कलेचं चीज होईल. म्हणून ती चापेकरांना काहीही न कळवता अकस्मात मुंबईला आली आणि तिनं चापेकरांच्या बिर्‍हाडातच आपला बाडबिस्तारा टाकला. ती ध्वनिमुद्रिका लावून बालगंधर्वांचं गाणं ऐकून तसं गायचा प्रयत्न करायची. चापेकरांनी तिला आकाशवाणीत काही कार्यक्रम मिळवून दिले. खटपटी लटपटी करून तिच्या दोन ध्वनिमुद्रिकाही प्रकाशित करवून घेतल्या. ‘ना पेळुवे’ या कानडी गीताची तिची ध्वनिमुद्रिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. १९३३ ते ३७ या काळात तिचं सिनेमापर्वही चालू होतं. प्रथम तिनं शारदा सिनेटोन मध्ये तीनशे रुपये दरमहा पगारावर नोकरी केली. त्यानंतर भवनानी प्रॉडक्शन आणि इंडियन लिबर्टी या संस्थांसाठीही तिनं काम केलं. त्यातून मिळणार्‍या पैशात तिला चरितार्थ चालवता येतच होता. पण म्हणावी तशी लोकप्रियता काही तिला मिळाली नाही. ती गंधर्व मंडळीची नाटकं पहायला जायची. पण एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून.

बालगंधर्वांची भेट घेण्यासाठी गोहर आणि चापेकर जीव तोडून प्रयत्न करायचे. पण यश येत नव्हतं. बालगंधर्वांना तिच्याबद्दल काही खास कौतुक वाटत नव्हतं. एकदा तर कठोर शब्दांनी तिची संभावना करून त्यांनी तिला हाकलूनही दिलं होतं असं आचार्य अत्रे यांनी त्यांच्या दैनिक मराठाच्या बालगंधर्व विशेषांकातच लिहून ठेवलं आहे. १९३२ पर्यंत गोहर आणि चापेकर एकत्र रहात होते. पण पुढे त्यांचं आपापसात पटेनासं झालं. मग ती आपली बहीण अमीरबाईकडे रहायला गेली. पुण्यातील मामा मिटकरांचा बालगंधर्वांशी स्नेह होता. चापेकरांमुळे मिटकर आणि गोहरची ओळख झालेली होती. बालगंधर्वांशी ओळख व्हावी म्हणून गोहर प्रयत्न करतच होती. तिनं खटपटी करून बालगंधर्वांच्या आईच्या घरी एक अनौपचारिक गाण्याचा कार्यक्रमही घडवून आणला होता. हेतू हा की या निमित्तानं तरी बालगंधर्वांशी ओळख होईल. अगदी मोजक्या लोकांच्या समक्ष तिनं जी गाणी गायली त्यात कान्होपात्राची भजनं देखील गायली. ती सर्वांनाच आवडली होती.

मात्र या वेळी बालगंधर्व काही तिचं गाणं ऐकायला तिथे नव्हतेच. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर बालगंधर्व तिला भेटायला गेले हेच मित्रमंडळींसाठी आश्‍चर्यकारक होतं. तरीही त्या भेटीत विशेष काही घडेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. फार काय, खुद्द बालगंधर्वांच्याही ध्यानीमनी काहीच नव्हतं. बालगंधर्व गोहरकडे गेले तेव्हा त्यांच्या मनात पुढे काय करायचं या विचारांनी थैमान चालू होतं. ठिकाण येताच चालकानं मोटार थांबवून दार उघडलं. आजवर आपला मानसन्मान राखून असलेले बालगंधर्व खाली उतरून गोहरबाईच्या घराचा जिना चढायला लागले.

 संयम सुटला

‘अ‍ॅना क्वेटो’ नावाच्या इमारतीच्या सज्जात उभी राहून गोहर तासाभरापासून त्यांची वाट बघत होती. बराच वेळ झाला तरी बालगंधर्व येत नाहीत असं पाहून ती निराश झाली होती. पण मोटार दारात उभी राहताच तिला काय करू आणि काय नको असं झालं. बालगंधर्व आत येताच तिनं त्यांच्या पायांवर गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आणि त्यांच्या चरणांवर आदरानं मस्तक टेकवलं. चार शब्द बोलून आभार मानून निघून जायचं असं ठरवून आलेले बालगंधर्व गोंधळूनच गेले. त्यांना हे असं काही अपेक्षितच नव्हतं.

तिनं खास बालगंधर्वांसारखा शालू तयार करवून घेतला होता आणि त्यांच्याच पद्धतीनं नेसलाही होता. बालगंधर्व पान खात नाहीत हे माहीत असल्यानं तिनं आज पानही खाल्लं नव्हतं. ती जिथे रहात होती तो एक आलीशान फ्लॅट होता. उच्च अभिरुची संपन्नतेनं सजवलेला होता. तिथे उंची अत्तराचा सुगंध दरवळत होता. मातीच्या एका पात्रात ऊद जळत होता. वातावरण फारच भारावलेलं होतं. आजवर तिला सामान्य गायिका समजून आपण उगीचच तिचा अपमान केला अशी अपराधीपणाची भावना बालगंधर्वांच्या मनात निर्माण झाली. पण त्यांना हे माहीत नव्हतं की हा फ्लॅट गोहरबाईचा नाही. तो फ्लॅट हिमालयवाला नावाच्या माणसाचा होता. तो अमीरबाईसह तिथे रहात होता. आणि तिची बहीण या नात्यानं सध्या गोहर तिथे रहात होती.

तो वैभवसंपन्न फ्लॅट पाहून बालगंधर्वांच्या मनातली उदासीनता दूर पळाली. आतमध्ये उत्मोत्तम पदार्थ तयार होत होते. त्याचाही सुगंध दरवळत त्यांच्यापर्यंत पोचत होता. ते काहीसे प्रसन्न झाले. गोहर त्यांच्याशी अत्यंत अदबीनं बोलत होती. ती म्हणाली, ‘आपल्या समोर गायची माझी लायकी नाही, पण दुसरी मी काय सेवा करू शकते?’ असं म्हणून तिनं जवळच असलेली पेटी हातात घेतली. तबलजी तिथे होताच. या क्षणी ती यजमान होती. तिचं मन मोडायचं नाही म्हणून बालगंधर्व, ‘जशी आपली इच्छा,’ असं म्हणाले.

त्यांची आज्ञा घेऊन तिनं कान्होपात्रातील दोन भजनं गाऊन दाखवली. ते अभंग स्वत: चापेकरांनी तिच्याकडून बालगंधर्वांच्या पद्धतीनं घोटून घेतलेले होते. त्यामुळे काही हरकती तिनं इतक्या सुरेख घेतल्या की बालगंधर्व फारच खूष झाले. खरं तर ती काही असामान्य सुंदरी मुळीच नव्हती. पण तिथलं भारावलेलं वातावरण, वैभवसंपन्न फ्लॅट, तिच्या चेहर्‍यावरचा आनंद आणि तिनं गायलेली बालगंधर्वांची भजनं या सगळ्यामुळे बहुतेक बालगंधर्वांना तिच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली असावी.

थोड्या वेळानं ते जायला निघाल्यावर गोहरनं त्यांना आग्रहानं जेवणासाठी थांबवून घेतलं. त्यावेळी झालेल्या गप्पांमध्ये तिनं गंधर्व कंपनीत आपण काम करायला तयार असल्याचंही सांगितलं. बालगंधर्व चकित झाले. कारण असं काही कधी घडेल याची कुणी कल्पनाही केली नव्हती. गोहर सहज बोलून गेली होती आणि बालगंधर्वांनीही, ‘प्रभू काय करेल ते खरं,’ असं म्हणून त्या कल्पनेचा सभ्यपणे स्वीकार केला होता.

थोड्या वेळाने बालगंधर्व आणि त्यांचे स्नेही जायला निघाले. खाली जाऊन ते गाडीत बसणार तोच गोहरनं बालगंधर्वांना पुन्हा वर बोलावून घेतलं. पंधरा मिनिटांनी ते खाली आले. पण तेवढ्या वेळात काय झालं कोण जाणे…पण पन्नास वर्षं ज्या बालगंधर्वांनी आपल्या चारित्र्यावर कोणताही डाग लावून घेतला नव्हता त्यांची नाव डगमगली हे खरं.

गोहरचा कंपनीत शिरकाव

पुढे ३१ डिसेंबर १९३७ रोजी बालगंधर्वांनी मुंबईला गोहरबाईकडे एकट्यानेच जाऊन यायचं ठरवलं. त्यानंतर वारंवार असं घडायला लागलं. हळुहळू काय घडतंय ते सर्व परिचितांच्या लक्षात यायला लागलं होतं. बालगंधर्व गोहरच्या आहारी गेलेले होते. गायिका म्हणून कोणतंच श्रेष्ठत्व नसलेली, नावलौकिक नसलेली गोहर गंधर्व मंडळीचा उद्धार करणार असल्याच्या थाटात वावरायला लागलेली होती. एरवी बालगंधर्व आई आणि पत्नीचा शब्द मोडत नसत. पण व्यवहाराच्या बाबतीत या दोघींचा कसलाही हस्तक्षेप नसायचा. स्वत: बालगंधर्व तर कुठल्याही व्यावहारिक गोष्टीत लक्ष घालायचे नाहीत. स्वभाव खर्चिक. त्यामुळे किती पैसे येतात, किती जातात आणि किती कर्ज होतं याकडे त्यांचं लक्षच नसायचं.

गोहरनं कंपनीत यावं याला सर्वांचाच विरोध होता. पण तिचा शिरकाव झाला. आणि  बालगंधर्वांनी सगळ्यांना निक्षून सांगितलं की, ‘तुम्हाला पसंत पडो वा न पडो, मला धंदा चालवायचा आहे आणि त्यासाठी गोहरला सोबत घेणं आवश्यक आहे.’ असं म्हणून ते तिला घेऊन मुंबईला निघून गेले. गोहर कालखंड सुरू झाल्यानंतर रामचंद्र वासुदेव बाकरे हे बालगंर्वांच्या निकट पण होते आणि त्यांचे हितचिंतकही. या दोघांबद्दल बाकरेंनी लिहिलेल्या एका लेखात, ‘गंधर्व मंडळीत नायिकेच्या भूमिका करण्यास आपण लायक असूनही केवळ आपण मुसलमान आहोत म्हणून लोक आपल्याला विरोध करतात,’ असं गोहरनं सांगितल्याचा उल्लेख आहे.

प्रत्यक्षात बालगंधर्वांनी आजवर ज्या स्त्रीभूमिका केल्या होत्या त्यांच्या आसपाससुद्धा गोहर नव्हती. तिचं कर्नाटकी हेल काढत मराठी बोलणंही खटकत होतं. तिला फार काही रुपही नव्हतं. फारसं अभिनय कौशल्य नव्हतं… बालगंधर्वांच्या तोडीचं गायन तर नव्हतंच…तिच्याकडे यातलं काहीही नसून ती गंधर्व मंडळीसाठी काम करू शकेल असं तिला आणि बालगंधर्वांना वाटत होतं. जुलै 1983 च्या ‘शब्दश्री’ अंकात शरदचंद्र विष्णु गोखले यांनी तर उघडपणे लिहिलं आहे की, ‘गोहरसारखी दुसरी लोचट बाई पाहिली नाही. तिचं दर्शनही किती विरूप आणि अमंगल होतं… त्या बाईनं नटसम्राटाला लाज आणली. लाचारी आणि दैन्याचं बावळट प्रदर्शन करायला शिकवलं. काय तिचं ते रंगरूप आणि उच्चार…’

सर्वांच्या दृष्टीनं गोहर एक असंस्कृत बाई होती. तिच्या हाती गंधर्व मंडळीची सूत्रं जाणं हे दुर्दैवच होतं. आता आपल्याला गोहरचे आदेश मानायला लागतील या कल्पनेनंही कंपनीतील इतर लोक नाराज झालेले होते. बालगंधर्वांच्या पत्नी तर आता हतबुद्धच झालेल्या होत्या. जे होईल ते अगतिकपणे पहात राहणे, इतकंच त्यांच्या हाती होतं. गोहरनं कंपनीत पाऊल टाकताच बालगंधर्वांचे भाऊ बापूराव राजहंस कंपनीतून बाहेर पडले. त्यांच्याविरुद्ध बालगंधर्वांचे कान भरणं गोहरला अजिबातच जड गेलं नसावं. २१ नोव्हेंबर १९४० रोजी बालगंधर्वांच्या पत्नी निवर्तल्या.

लाखीमचंद गेले

आता तर बालगंधर्व गोहरसोबतच वेगळं बिर्‍हाड करून रहात होते. ते तिला ‘गोहरबाबा’ म्हणायचे. ती त्यांना ‘दादा’ म्हणायची. ते मुसलमानी पद्धतीनं केस रंगवायला लागले. ते आता मुसलमान होणार आणि गोहरशी लग्न करणार अशा बातम्या पसरायला लागल्या. कराचीचे शेट, लाखीमचंद यांच्या कानावर हे गेलं. ते नाशिकला बालगंधर्वांना भेटायला गेले. त्यांनी बालगंधर्वांचं मन वळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ‘शक्य नाही…सुटका नाही…’ असंच ते म्हणत राहिले. ते ऐकत नाहीत असं पाहून बालगंधर्वांच्याच भल्यासाठी शेटजींनी त्यांना दिलेल्या रकमांच्या पोटी गंधर्व मंडळीची सर्व मालमत्ता आणि पेरुची बाग जमीन आपल्या नावे करून घेतली. पण ते म्हणाले, ‘नारायणराव, तुम्ही या ग्रहणातून सुटलात की तुमचं सगळं तुम्हाला जसंच्या तसं परत करून टाकेन.’

दु:खी मनानं शेटजी कराचीला परत गेले. त्यांचं आता जगण्यावरचं लक्षच उडून गेलं होतं. शेवटच्या दिवसात त्यांची बालगंधर्वांना भेटायची इच्छा होती. शेटजींचे अखेरचे दिवस बघता बालगंधर्व विमानानं गेले असते तर बरं झालं असतं. पण विमानाला अपघात झाला तर, या धास्तीनं गोहरनं त्यांना रेल्वेनं जायला भाग पाडलं. १० फेब्रुवारी १९३९ रोजी शेटजींनी बालगंधर्वांची ध्वनिमुद्रिका ऐकत ऐकतच प्राण सोडले. त्याच्या दुसर्‍या दिवशी बालगंधर्व तिथे पोचले पण फार फार उशीर झाला होता….

बालगंधर्वांच्या गोहरविषयी विशेष भावना सोडल्यास त्यांनी तिच्याबद्दल दुसरा कोणताही विचार केलेला नसावा असं दिसतं. उदाहरणार्थ, ती नाटकात कामं करायला लागल्यावर तिचे कानडी हेल असलेले मराठी कुणी सुधारायचे, शब्दांची फेक आणि संवादांचा अर्थ, कथानकांचा संदर्भ तिला कुणी समजावून सांगायचा? नाटकातील कथेला असलेले पौराणिक, ऐतिहासिक संदर्भ तिच्या कुणी लक्षात आणून द्यायचे ? तालमी कुणी द्यायच्या ? बालगंधर्वांनी ज्या भूमिका अजरामर करून ठेवलेल्या होत्या त्यांच्या पासंगाला तरी तिला पुरता आलं असतं का ? यावर त्यांनी काहीच विचार केला नव्हता. फार काय, चोणकरांना भूमिका शिकवण्याबाबतही त्यांनी काहीही विचार केला नव्हता. आणि हे सगळं यांच्याकडून करवून घेणारा तालीममास्तरच मंडळीत आता नव्हता. गणपतरावही परत येणं शक्य नव्हतं. एकतर बालगंधर्वांनी तसे प्रयत्नही केले नाहीत. आणि मुळात गोहर मंडळीत येताच गणपतरावांनी कडाडून विरोध केलेला होता.

गोहरचं अपयश

स्वत: बालगंधर्वांमध्येही आता पूर्वीची तडफ राहिली नव्हती. ना रुप, ना उत्साह, ना कष्ट घेण्याची ताकद…सर्व काही ते हरवून बसले होते. त्यामुळे गोहरची तयारी होईपर्यंत बाहेरगावीच रहायचं ठरवून गंधर्व मंडळी खानदेश, मराठवाडा, विदर्भ असं फिरत राहिली. काही काळानं औरंगाबादेत गोहरनं रंगमंभूमीवर पहिली भूमिका केली खरी, पण त्याबद्दल जगाला कळलंसुद्धा नाही. ५ नोव्हेंबर १९३९ रोजी मुंबईत गोहरनं मृच्छकटिक नाटकातून पदार्पण केलं. डिसेंबरमध्येही काही प्रयोग केले. त्यात अफाट अपयशच पदरी पडलं. पण तरीही तिच्यापासून मोकळीक करून घेण्यास बालगंधर्व तयारच होईनात. काहीतरी सबबी सांगून ते टाळतच रहात. आणि गोहरला रंगमंचावर यश आलं नसलं तरी तिच्या पूर्वाश्रमीच्या मुलीसह बालगंधर्वांनी तिला जवळ केलेलं असल्यानं ती उजळ माथ्यानं अहंभावानं वावरतच होती. तिला काहीच फरक पडला नाही. बालगंधर्वांचा सहवास, त्यांनी तिच्या ताब्यात असणं ही सुखावणारी भावना आणि गंधर्व मंडळीतील सर्वाधिकार तिच्याकडे होतेच.

पद्माचा विवाह आणि नादारी

२१ नोव्हेंबर १९४० रोजी बालगंधर्वांच्या पत्नी खंगून खंगून हे जग सोडून गेल्या. पद्माला सांभाळण्याची जबाबदारी मोठ्या बहिणीला घ्यावी लागली. पण पद्मा आणि दुर्गाराम प्रेमात पडल्यानं त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. ते दोघे बालगंधर्वांचे आशीर्वाद घ्यायला गेले तेव्हा ते म्हणाले, ‘गोहरबाबाला विचारा आणि ती सांगेल तसं करा.’ पण असं करण्याची त्या दोघांनाही गरज न वाटल्यानं १९४२ साली एका अनौपचारिक समारंभात ती दोघं विवाहबद्ध झाली.

आता बालगंधर्वांवर कोणतीही सांसारिक जबाबदारी उरली नव्हती. कराचीच्या शेटजींमुळे ते मोठ्या कर्जातून बाहेर पडले असले तरी अजून पंचवीस तीस हजारांचं कर्ज बाकी होतं. याकरता आता न पटणार्‍या गोष्टी करणं भाग आहे हे एव्हाना बालगंधर्वांना कळून चुकलं होतं. त्यामुळे अखेरीस त्यांनी १९४० साली नादारीचा अर्ज केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता कोणताही सावकार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू शकणार नव्हता. त्यामुळे इथून पुढे गोहरला फार मोठा त्याग करून बालगंधर्वांना उपकृत करत असल्याचा आव आणत राहण्याचीही गरज उरली नव्हती.

आता एवढं सगळं झाल्यावर गंधर्व मंडळी विसर्जित व्हायला काहीच हरकत नव्हती. पण ती चालूच राहिली. पण आता सर्व काही असंस्कृत गोहरच्या हातात होतं. त्यामुळे पूर्वीची शिस्त, संस्कार, स्वच्छता सगळं जाऊन त्याजागी बिर्‍हाडाला अस्वच्छ, गलिच्छ धर्मशाळेचं स्वरुप आलं होतं. लोकांना तिची अरेरावी सहन होईना. राजासारख्या राहिलेल्या, जगलेल्या बालगंधर्वांना अगतिकपणे तिच्या तालावर नाचताना पाहणं अहस्य होत होतं.  हजारो रुपये खर्च करून कलात्मकतेचा उत्तम नमुना वाटतील असे शालू बालगंधर्वांनी घडवून घेतलेले होते. पण ते ओरबाडून त्यातली चांदी वितळवणार्‍या गोहरला बालगंधर्व काहीही बोलले नाहीत. ते उघड्या डोळ्यांनी फक्त पहात राहिले. हे सगळं पाहून सर्वजणच अस्वस्थ होत होते. अखेरीस डॉ भडकमकरांनी मंडळीचा कारभार कृष्णाप्पा भांडारकर आणि सदाशिव नेवरेकर यांच्याकडे सोपवला.

गंधर्व मंडळीतून बालगंधर्वच बाहेर पडले

ही गोष्ट गोहर आणि बालगंधर्वांना मुळीच आवडली नाही. वाद विकोपाला गेले. अखेरीस दस्तुरखुद्द बालगंधर्वच गोहरला घेऊन गंधर्व मंडळीतून बाहेर पडले. एके काळी रंगभूमी गाजवणारे बालगंधर्व स्वत:च रंगाचा भंग करायला कायमचे बाहेर निघून गेले. चोणकरांसारखा सामान्य नट मिळवून दिल्याबद्दल गोहरचे आभार मानायला तिच्या घरी स्वत:च्या पायांनी चालत जाण्याची बालगंधर्वांच्या इभ्रतीच्या माणसाला गरज तरी काय होती? पण नियतीच्या पुढे कुणाचं काही चालत नाही हेच खरं! ती घटना घडलीच नसती तर हा सगळा पुढचा अनर्थही टळला असता!

इतकं सगळं घडलं तरी अजूनही बालगंधर्वांच्या मनाला पडलेली गोहरची भूल उतरलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या नशीबानं त्यांना पुन्हा तिच्याकडे फरपटत नेलं. आता त्यांच्या हाती पैसा आणि पत काहीच उरलं नव्हतं. बचत आणि निवृत्तीची व्यवस्था काहीच नव्हती. नाटकात काम करण्यापलिकडे काही व्यवसाय करण्याचा त्यांनी कधी आयुष्यात विचारही केलेला नव्हता. आता हातात उत्पन्नाचं कोणतंही साधन नव्हतं.

शताब्दी महोत्सव

या सगळ्या काळात कलेच्या जगात काही ना काही चळवळ चालूच होती. रंगभूमीचा शताब्दी महोत्सव साजरा करण्याचं ठरलं होतं. या महोत्सवात बालगंधर्व आणि जुन्या नटांनी सादर केलेली नाटकंही गाजली. महोत्सवाला रसिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता. महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आचार्य अत्रे होते तर अध्यक्षपद बालगंधर्वांनी भूषवलं होतं. या महोत्सवामुळे रंगभूमीला परत एकदा झळाळी प्राप्त झाली होती. गोहर तिथल्या झगमगाटात कुठेही दिसली नाही आणि कुणी तिची चौकशीसुद्धा केली नाही. बालगंधर्व बाईला सोडणार नव्हते. पण पुन्हा रंगभूमीवर उभं राहण्यासाठी ते कोणतीही तडजोड करायला तयार होते. त्यांनी वसंत देसाई यांना लिहिलेल्या पत्रात ते स्पष्टपणे म्हणतात की, ‘कंपनीच्या कारभारात गोहरबाई कोणताही हस्तक्षेप किंचितही करणार नाही! आणि नवीन व्यवस्थेत कोणत्याही कारणामुळे गोहरबाई सामील झाल्या नाहीत तरी मी त्याची पर्वा करणार नाही. गंधर्व मंडळीला हितकर कारभार चाललेला नाही असं वाटल्यास कंपनी परत ताब्यात घेण्याचा अधिकार डॉ भडकमकरांना राहील.’

या सर्व तडजोडी बालगंधर्वांनी केल्या हे नमूद करण्यासारखं आहे.

 

Scroll to Top