दूषण वगळुनी भूषण मात्रे….
कै. आचार्य प्र. के. अत्रे
पुण्याला मी १९१० च्या अखेरीस आलो, पुण्यामध्ये कसबा पेठेत सरदार पुरंदऱ्यांच्या जुन्या कोटात राहात होतो आणि ‘ नानाच्या हौदा ‘ समोरील भावे स्कूलमध्ये शिकत होतो (नानाचा हौद आता बुजवण्यात आलला आहे आणि भावे स्कूलही तेथून दुसरीकडे हालवण्यात आले आहे.) शाळेला जाण्याचा माझा रस्ता शनिवार वाड्याच्या उजव्या भिंतीकडून अन् गणेश दरवाजावरून जात असे. त्या दगडी भिंतीसमोर असलेल्या एका जुनाट लांबलचक घराच्या पहिल्या मजल्यावर बालगंधर्वांच्या आईचे बिऱ्हाड असे. त्या बिऱ्हाडात मी बालगंधर्वांना कधीच पाहिले नाही. कारण, ते त्यावेळी किर्लोस्कर कंपनीच्या बिऱ्हाडी राहात असावेत. पण घराच्या गॅलरीत बालगंधर्वांची आई थोरले बंधु दादा आणि धाकटी बहीण वेणू यांना मी पुष्कळदा पाहात असे गंधर्वांची आई मोठी गगंशा बाई होती. तिची आरडाओरडा कधी कधी खाली रस्त्यावर ऐकू येत असे, ती अंगाने थोराड असून तिचा चेहरा पुष्कळसा गंधर्वांसारखा दिसे. तिच्या कपाळावरचे भले मोठे कुंकू तिला शोभून दिसे. गंधर्वांची धाकटी बहीण वेणू ही खूपच गोरी असन तिचा चेहरा तर तरुणपणी हुबेहुब गंधर्वांसारखा दिने पण तिला जन्मतः एक व्यंग होते. ती कुबडी होती. त्यामुळे तिच्या सौंदर्यमध्ये फारच मोठे वैगुण्य निर्माण झाले होते. कुंकवाला आधार म्हणून लहानपणी तिचे लग्न लावून देण्यात आले होते. पण ती नवऱ्याकडे कधीही राहात नसे. त्याने दसरे लग्न केले होते. गंधर्वांचे थोरले बंधू, दादा हे रुपाने ओबडधोबड अन स्वभावाने अर्धवट होते. आपण गंधर्वांचे थोरले भाऊ आहोत हे ज्याला त्याला ते सांगत. गंधर्वांचे वडील श्रीपादरावराव राजहंस हे हाडकुळे. किरकोळ बांध्याचे नि मध्यम उंचीचे होते. त्याच्या भुवयात शेंदर आणि कानात रुद्राक्षाची कुंडले असत ते आपल्या घरी राहात असलेले मी कधीच पाहिले नाहीत. त्यांचा अहर्निश मुक्काम तेथून थोडयाच अंतरावर शनिवार वाड्याच्या पिछाडीला असलेल्या श्रीमंत बिनीवाल्यांच्या वाड्यात असे. त्यांना गाण्याचा नाद होता असे म्हणतात, पण वृत्तीने ते धार्मिक असावेत असे त्यांना पहाताच वाटे.
गंधर्वांचे पहिले नाटक मी पाहिले मानापमान १९१२ साल असावे ते गंधर्व यावेळी तेवीस चावीस वर्षाचे असावेत नारायणराव जोगळेकर त्याच्या आधीच वारलेले होते. जोगळेकरांना मी रंगभूमीवर असे कधीच पाहिले नव्हते फक्त एकदाच त्यांना पुण्याच्या बुधवार चौकातून घाईघाईने जाताना प्रत्यक्ष पाहिले होते. भरदार शरीरयष्टी, डोक्याला जरीच्या काड्याच्या करवंदी रंगाचा रुमाल, कानात टपोरी बिगबाळी, अंगावर करवती काठी, उपरणे असा स्वारीचा नोकझोक पाहून मी सर्दच झालो. ते गेल्यानंतर ‘ मानापमान ‘ नाटकाचा जो मी प्रयोग पाहिला त्यात धैर्यधराचे काम गोविंदराव टेंबे ह्यांच्याकडे देण्यात आले होते. बालगंधर्व हा जसा स्त्री सौंदर्याचा आदर्श तसा गोविंदराव हा परुष सौंदर्याचा आदर्श आणि संगीताचे तरते दर्दी गोविंदरावाचा आवाज पुढे बसला पण ज्या काळी त्यांनी धैर्यधराचे काम करण्यास प्रारंभ केला. त्या काळात अदमासे सहा महिनेपर्यंत त्याचा आवाज आणि त्यांची तान म्हणजे एक चमत्कार होता धैर्यधर टेंबे, भामिनी गंधर्व आणि लक्ष्मीधर बोडस म्हणजे सौंदर्य, संगीत आणि विनोद ह्यांचा महान त्रिवेणी संगम होना एक गेला की दुसरा अन् दुसरा गेला की तिसरा ! कोणाला किती पाहावे, कोणाला किती ऐकावे अन् कोणाचे किती कौतुक करावे ह्यांच्या भोवऱ्यात प्रेक्षक बेभान होत असत.
साक्षात स्त्री संचार गंधर्वांच्या मुद्रेत, नजरेत, हसण्यात, लाजण्यात, मुरकण्यात, चालण्यात, बोलण्यात, नेसण्यात साक्षात स्त्रीचा संचार झालेला होता. पुरुषाच्या देहातून स्त्रीचे सौंदर्य इतक्या मोहकतेने कधीच प्रकट झाले नसेल. त्यामुळे स्त्री रूपात जेव्हा गंधर्व रंगभूमीवर प्रकट होत, तेव्हा परुष तर पागल होत असतच, पण म्वियाही अक्षरशः वेड्या होऊन त्याच्याकडे अपक्ष्म लोचनानी पाहात बसत. मी प्रथम पाहिलेल्या ‘ मानापमान ‘ नाटकात जेव्हा ‘ हा टकमक पाही ‘ हे गाणे गात गंधर्व पहिल्याने प्रकट झाले तेव्हा एकदम थंडगार वाऱ्यातून मोगऱ्यांच्या फुलांचा घमघमाट एकदम अंगावर यावा तसा नाट्यगृहाच्या सर्व भागातून ‘ अहाहा ‘ चा सौम्य धुंदकारा उमटला. गंधर्वांचे गाणे हे नुसते श्रवणीयच नव्हते तर प्रेक्षणीय होते, म्हणजे गंधर्वांच्या गाण्याला प्रतिक्षणी प्रेक्षकांची जी साद मिळे ती पाहिल्याखेरीज त्या गाण्याची गोडी अनुभवता येत नाही. त्याकाळी ध्वनिक्षेपणाची सोय नसल्याने गंधर्वांचा गद्य आवाज फार दूरवर ऐकू येत नसे. निदान मला तरी ते काय बोलत आहेत हे पुष्कळदा ऐकू आले नाही. तथापि, गंधर्व काय बोलताहेत ह्याची कोणाला परवा होती ? गंधर्वांचे गाणे सर्वांना ऐकू येत होते आणि त्यांचे सौंदर्य सर्वांना दिसत होते. मग यापेक्षा लोकांना आणखी काय पाहिजे होते ?
बालगंधर्वांना व्यक्तिशः मी कधीच पाहिले नव्हते. त्यानंतर थोड्याच दिवसानी मी बुधवार चौकातून येत असताना बरेचसे लोक एका दिशेने धावताहेत असे मी पाहिले. मला कळेना काय भानगड आहे ती ? मीही त्या गर्दीत घुसलो. पाहतो तो बालगंधर्व ! रंगभूमीवर जितके सुंदर दिसले तितकेच ते सुंदर होते. तेजस्वी, गौरवर्ण, हसतमुख, डोक्यावरचा काळाभोर केशसंभार, उंच काळया फरच्या टोपीचे झाकलेला, स्वच्छ पांढरा सदरा आणि पांढरी लांडी विजार, कर्दळीच्या रंगाच्या निमुळत्या सुंदर पोटऱ्या नि पायात कोऱ्या कोल्हापुरी चपला अशी स्वारी चालली होती. लोक त्यांच्या भोवती गर्दी करून राहिले होते आणि गंधर्व खाली मान घालुन लाजत लाजत, हसत चालले होते. ते त्यांचे कमनीय दर्शन अद्याप मी विसरलो नाही.
पुढे बऱ्याच दिवसांनी किर्लोस्कर कंपनी फुटली आणि बोडस, टेंबे ह्यांच्या सहकार्याने बालगंधर्वांनी स्वतःच्या नावाने गंधर्व नाटक मंडळी काढली. नव्या कंपनीचा मुक्काम तपकीर गल्लीत सांगलीकरांच्या वाड्यात होता. मी आणि माझे मित्र त्या वाड्यावरून उगाच इकडून तिकडे चकरा मारावयाचे आणि आत काय चालले आहे त्याचा बाहेरून सुगावा घ्यावयाचे ! बाहेरून काय सुगावा लागणार ? लांब केसांची गोरी गोमटी कारटी अधूनमधून दिसायची. पण तेवढ्यावरच आम्ही खूष असावयाचे, गंधर्व मंडळी जणू काही आम्हीच काढली अशा अभिमानाने आम्ही दिवसभर त्या मंडळीसंबंधी मनाला जे सुचेल ते बोलत रहायचे किर्लोस्कर कंपनी मोडली त्याचे आम्हाला सुतक नव्हते. पण गंधर्व मंडळी निघाली त्यामुळे स्वर्ग आम्हाला दोन बोटे राहिला होता.
बादशाही झुंबड
नव्या गंधर्व नाटक मंडळीची नाटके जेव्हा पुण्यात किर्लोस्कर नाट्यगृहात सुरू झाली तेव्हा आमची पण धांदल आणि तारांबळ ! नाटकाच्या सर्व व्यवस्थेचे काम आमच्याकडे आले होते. कोठल्या ! रस्त्यावरच्या ! संस्थानिकांच्या गाड्या कशा येताहेत, बाहेर त्या कशा लागताहेत हयाचा बंदोबस्त पोलीस तर करीत होतेच पण आम्ही लांबून त्यावर देखरेख करीत होतो आणि काय आम्ही काय सांगितले होते ? अशा अविर्भावाने एकमेकांच्या हातावर हर्षभराने टाळया मारीत होतो. गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांच्या गाड्या, मोटरी आणि गर्दी पाहणे हाच एक अद्भुतरम्य अनुभव होता. मोठमोठे श्रीमंत सरदार, जहागिरदार, संस्थानिक, राजे महाराजे तसे आणि त्यांच्या एकापेक्षाही एक सुंदर नि सालंकृत बायका ह्यांची अगदी झुंबड तूटून पडायची. खिशात पैसे नसल्याकारणाने नाट्यगृहात प्रवेश मिळवणे आम्हाला मुष्किल होते. पण जोगळेकरांच्या हॉटेलात दोन पैशाचा चहा मागवून ही बाहेरची गंमत आम्ही पुष्कळदा पाहात बसावयाचे.
अशाही परिस्थित सहा-सहा आण्याच्या दरात गंधर्वांची मी अनेक नाटके पाहिली. नूतन आर्यभूषण नाट्यगृहात कंपनीचा एकदा मुक्काम असताना ‘सौभद्र’ नाटक हे मी पाच सहा वेळा तरी पाहिले. दुसऱ्या अंकात गंधर्व आपल्या संगीताची नि अभिनयाची पराकाष्ठा करीत असत. एकदा किर्लोस्कर नाटयगृहात ‘स्वयंवर’ नाटक चालू असताना गंधर्वांचे ‘नरवर कृष्णा समान ‘ हे पद सुरू झाले. मधे ऑर्गनची साथ, बाजूला दोन सारंग्या नि त्यातून अमृताच्या कारंजासारखा वर उचंबळणारा गंधर्वांचा ‘हा- हा- हा- नरवर कृष्णा-समान ! हा गंधर्वतुल्य आवाज, सर्वत्र स्वरब्रह्म निर्माण झाल्याचा साक्षात्कार त्या क्षणी मला झाला. शेकडो प्रेक्षक अर्धोन्मीलीत नेत्रानी त्या स्वरसमाधीचा ब्रह्मानंद अनुभवीत होते- तो प्रसंग मी कधीच विसरणार नाही. गंधर्वांच्या गाण्याचे किती वर्णन करावे – अन् काय सांगावे ?
शृंगाराचे बादशहा
सोळा-सतरा साली ‘संशय कल्लोळ’ नाटक रंगभूमीवर आले तेव्हा गंधर्वांनी लोकप्रियतेचे ‘गौरीशंकर गाठले तर बीस साली ‘एकच प्याला’ नाटक येताच ते कीर्तीच्या कांचनगंगे ‘ वर विराजमान झाले. महाराष्ट्रात त्यांच्या लोकप्रियतेला काही सीमाच राहिली नाही सारा महाराष्ट्र गंधर्वमय होऊन गेला. लोकमान्य टिळकांची पगडी महाराष्ट्रात त्यांच्या काळी जेवढी लोकप्रिय झाली नसेल तेवढी ‘ गंधर्व टोपी ‘ झाली आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाच्या डोक्यावर जाऊन ती बसली नुसती ‘ गंधर्व टोपी ‘ च काय पण ‘ गंधर्व सुपारी ‘ पासून गंधर्व चपला ‘ पर्यंत ‘ गंधर्व ‘ हे स्थिरचर व्यापूनि दशांगुले उरले ! घराघरातन गंधर्वांच्या ध्वनिमुद्रिका वाजू लागल्या भिंतीभिंतींवरून गधर्वांची स्त्री भूमिकेतील आकर्षक चित्रे हसू लागली. ‘मानापमान’, ‘विद्याहरण’ ‘ स्वयंवर ‘, ‘ संशयकल्लोळ ‘ ह्या नाटकांनी गंधर्व हे गंधर्वतुल्य गायक आणि शृंगाराचे बादशहा आहेत हे जगाला पटवून दिले तर ‘ एकच प्याला ‘ नाटकाने गंधर्व हे महान अभिनेते आणि करुणरसाचे सम्राट आहेत याचा जगाला प्रत्यय आणून दिला आणि त्याच कीर्तीशिखरावर पुष्कळ वर्षेपर्यंत ते स्थिर होऊन बसले. त्यानंतर त्याची गायनात वा अभिनयात प्रगती झाली नाही. एका नाटकाचे वेळी कपडे नेसावयाला गंधर्व हे तसे निर्व्यसनी होते. किर्लोस्कर मंडळीत दारूचे फार मोठे प्रस्थ असे. त्यांच्या संगतीत त्यावेळी बालगंधर्व दारू प्यायला लागले. ‘ब्लॅक अँड व्हाईट व्हिस्कीची निम्मी बाटली ते तशीच तोंडाला लावून संपवीत असत एकदा ते सोलापुरात एका श्रीमंताच्या घरी बसले असताना त्यांचा तो मद्यपानाचा अघोरी प्रकार पाहून श्रीमंत उद्गारला, ” नारायणराव, तुम्ही जर अशा रीतीने दारू प्याल तर लवकर म्हातारे व्हाल- आणि सौंदर्य हे तर तुमच्या आयष्यातले मुख्य भांडवल !” त्याक्षणी गंधर्वांनी हातातली दारूची बाटली ताडकन खाली आपटून तिचा चक्काचूर केला. त्यानंतर उभ्या आयुष्यात त्यांनी दारूच्या थेंबाला स्पर्श केलेला नाही. लोकमान्य टिळक वारले तेव्हा त्यांनी चहा सोडला. त्यानंतर त्यांना फक्त तंबाखू व्यसन उरले. रंगभूमीवरचे गाणे संपवून ते विंगमध्ये आले म्हणजे त्यांचा नोकर तंबाखू चुन्यात मळून तयार ठेवीत असे. एकदा तेथे त्यांच्या पत्नी उभ्या होत्या. नारायणराव तंबाखू तोंडात टाकणार तोच त्यांना टोचून त्या म्हणाल्या, ” अमक्यासाठी तुम्ही दारू सोडली, तमक्यासाठी तुम्ही चहा सोडलात, मग माझ्यासाठी तुम्ही काय सोडणार- का मी मेल्यानंतर काही सोडणार ? तोंडाजवळ नेलेली तंबाखू तशीच खाली फेकून देऊन गंधर्व म्हणाले, “तू मेल्यानंतर कशाला ! ही आजपासून तुझ्यासाठी मी तंबाखू सोडली !” त्यानंतर त्यांनी तंबाखूला कधी स्पर्श केला नाही.
असा होता दिनक्रम
संत्र्याचा रस आणि थंडगार पाणी एवढ्यातच नंतर त्यांच्या जीवनाची आसक्ती उरली. मात्र पाण्यात बर्फ घालून ते थंड केलेले त्यांना चालत नसे. भोवताली बर्फ घालून थंड केलेल्या पाण्याने भरलेले चार-पाच थर्मास नेहमी एक गडी घेऊन त्यांच्या सान्निध्यात सिद्ध असे. रात्री नाटक असले म्हणजे सहा साडेसहा वाजता ते थंडगार पाण्याने आंघोळ करीत थंड पाण्याने काठोकाठ भरलेल्या एका पिंपाशेजारी ते लंगोट घालून ओणवे उभे राहात. नंतर एक गडी एक मोठा टोप घेऊन ते पिंप रिकामे होईपर्यंत त्यातून त्यांच्या अंगावर पाणी ओतीत असे. नारायणराव अंगाला साबण कधी लावीत नसत. ‘ साबणाने कातडी खराब होते ‘ असे त्यांचे मत होते, स्नान झाल्यावर ते रंगपटात जात. तोंड रंगून झाल्यानंतर लुगडे नेसण्यापूर्वी हिन्याचे अत्तर चांगले ऑजळभर ओतून ते आपल्या सर्वांगाला चोपडीत असत. आपल्या अंगाच्या अत्तराचा सुगंध प्रेक्षकांच्या पहिल्या सात-आठ रांगापर्यंत तरी पोहोचला पाहिजे असा त्यांचा त्याबाबत युक्तिवाद असे. नंतर जमादार नावाचा त्यांचा नोकर त्यांची वस्त्रभूषा करीत असे, ती पूर्ण झाली आणि नारायणरावांनी डोक्यावर एकदा पदर घेतला म्हणजे मग ते त्या स्त्री भूमिकेत इतके तन्मय होत असत की अगदी ओळखीचा माणूस जरी रंगपटात आला तरी त्याच्याकडे ते ढुंकून पहात नसत. बाकीचे स्त्री पार्टी पडद्याच्या आत आले म्हणजे गळ्याभोवती पदर गुंडाळून बिड्या फुंकीत बसताना पाहिले म्हणजे ओकारी येत नाही. नारायणरावांचा स्त्री भूमिका म्हणजे साक्षात कायाप्रवेश होता.
नाटक संपले म्हणजे बि-हाडी जाऊन आंघोळीचा तोच प्रकार पन्हा चाले. थंडगार पाण्याचा सबंध हौद ते आपल्या अंगावर रिकामा करून घेत. त्यानंतर मग पूजा अन् पढे जेवण. जेवायला रात्रीचे तीन तरी होत. रात्री जेवायला कोंबडीच लागे. त्यांना एक आचारी असा मिळाला होता की तो कोंबडी शिजवताना तिच्यात अफूची बोंडे घाली त्यामुळे कोंबडीची लज्जत वाढे अन् ती खाता खाता खाणाऱ्याला गुंगी येई. हे जेव्हा नारायणरावांना समजले तेव्हा त्यांनी त्या माणसाला काढून टाकले. नारायणरावांची शय्या पाहण्यासारखी असे. अगदी कातणीच्या घरासारखी पांढरी सफेद चादर अन् उशी त्यांना लागे.
प्रचंड खर्चिक माणूस
खर्चाकडे नारायणरावांनी कधीच पाहिले नाही अत्तरे घ्यायची म्हणजे हजारो रुपयांची घ्यायची. कापडवाला आला की तोच प्रकार, गरज असो वा नसो हजारो रुपयांची पातळे, लुगडी नि पैठण्या, जरीचे कपडे म्हणजे खऱ्या जरीचे कपडे सोन्याचे मुकुट म्हणजे चांदीच्या मुकुटाला खऱ्या सोन्याचे पाणी द्यावयाचे ‘ कान्होपात्रा ‘ नाटकातला विठ्ठल मंदिराचा देखावा म्हणजे भरीव आणि कांतीव खांबाचे खरे विठ्ठल मंदिर तो एक देखावा परगावी न्यायला एक वॅगन लागे. सुग्रास भोजन सामान्य गड्यापासून मालकापर्यंत मिळावयाचे. त्यामुळे कंपनीत येणाऱ्या नटाचा आकार जर प्रारंभी बाटलीसारखा सडपातळ असला तर सहा महिन्यांचा आत तो बरणीसारखा भरभक्कम दिसावयाला लागावयाचा. या बिनहिशेबी खर्चिकपणामुळे लाखो रुपयांचे उत्पन्न होऊनही कर्जाच्या राक्षसाने गंधर्वांची पाठ कधीही सोडली नाही. पण काहीही असले तरी रंगभूमीने नारायणरावांचे जेवढे लाड पुरविले, त्यापेक्षाही नारायणरावांनी रंगभूमीचे अधिक लाड पुरविले.
ब्रह्मदेव जरी आला….!
गंधर्वांसारखा गायक नि अभिनेता महाराष्ट्रात आजपर्यंत कधी झाला नाही हे सर्व सांगून झाल्यानंतर आता त्यांच्या व्यक्तिगत स्वभावाबद्दल बोलणे क्रमप्राप्त आहे. गंधर्व अत्यंत खर्चिक होते. व्यवहार त्यांना फारसा समजत नसे. हेही मान्य केले तरी जेवढे दिसत किंवा दाखवीत तेवढे बावळट मात्र मुळीच नसत. त्यांनी एखादी गोष्ट करावयाची ठरविली. मग ती कितीही मूर्खपणाची असो. म्हणजे ब्रह्मदेव जरी खाली उतरला तरी ते केल्यावाचून कधीही राहात नसत. हे त्यांच्या स्वभावाचे मुख्य सूत्र होते. एखाद्याबद्दल त्यांच्या मनात पूर्वग्रह निर्माण झाला की ते त्याचे तोंडही पाहात नसत. नकट्या नाकाची किंवा गरूड नाकाची माणसे त्यांना कधीही आवडत नसत. ‘देवा, तसल्या नाकाची माणसे फार वाईट !’ असे ते विव्हळून म्हणत. नारायणरावांना दुसऱ्याचा मत्सर करावयाचे काही कारण होते का ? पण कंपनीत एकादा नट तानबाजी करू लागला की नारायणराव त्याची कानउघाडणी करायचे, ” कशाला उगाच शिरा ताणून गाताय ” तुमचे गाणे ऐकायला का लोक माझ्या नाटकाला येतात ? “
अर्धवटांचा बाजार
पण एवढे असून नारायणराव अर्धवटच होते. एक बापूराव राजहंस वजा केले की स्वतः नारायणराव, त्यांची आई आणि त्यांचे थोरले बंधू दादा ही मंडळी म्हणजे अर्धवटांचाच बाजार होता. एकदा बोडसाच्या मुलीला पोटाचा काही आजार झाला. तेव्हा त्याबद्दल ते नारायणरावांच्या आईशी बोलत होते. तेव्हा आई म्हणाल्या, ” तुम्ही गणपतराव, आपल्या मुलीला गाढवीचे दूध द्या. आम्ही आमच्या नारायणाला लहानपणी गाढवीचे दूधच द्यायचे !” तेव्हा गणपतराव गंभीरपणे म्हणाले, ” तरीच !” त्यांच्या बोलण्याची खोच आईच्या कोठून लक्षात येणार ?
‘घराबाहेर’ ची भानगड
१९२८ पासून माझी नि नारायणरावांची प्रत्यक्ष ओळख होती. पण मी नाटक लिहू शकेन हयाची त्यांना कल्पना नव्हती. १९३३ साली माझे ‘साष्टांग नमस्कार’ हे नाटक रंगभूमीवर येताच ‘नाटककार’ म्हणून माझे नाव सर्वतोमुखी झाले. एका प्रयोगाला ते आले होते. त्यांना ते नाटक आवडले की नाही हे सांगता येणार नाही. पण जाता जाता ‘बाबूराया, आमच्यासाठी एखादे लिहा की चांगले!” असे हसत हसत ते म्हणाले. मी मान हलवल्यासारखे केले. पुढे त्याच वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये मी ‘घराबाहेर’ हे नाटक लिहिले. शं. कु. देवभक्तांनी नारायणरावांना कळविले. तेव्हा’ नाटकाच्या वहया घेऊन मुंबईला या’ अशी त्यांची मला तार आली. त्याप्रमाणे वहह्या घेऊन मी मुंबईला गेलो. कंपनीत माझे नाटक मी वाचून दाखविले. सर्वांना ते आवडले. नाटक बसवण्याचे नारायणरावांनी ठरविले. माझा मुक्काम कंपनीतच होता. संध्याकाळी नारायणराव मला म्हणाले, “तुमचे नाटक तर फार चांगले आहे. पण आमच्या आईला नाटकाचे नाव आवडले नाही. ती म्हणते ‘घराबाहेर ‘हे नाव अशुभ वाटते.” मी हसून म्हणालो, “तुमची आई असे म्हणते, पण आमची आई म्हणते की ह्या नावासारखे दुसरे चांगले नावच नाही !” तेव्हा ते बोलणे तितक्यावरच थाबले. पुढे मात्र योजना झाली. नटांची नावे बोर्डावर लागली. संगीताच्या चाली मास्टर कृष्णरावांनी द्यावयाचे ठरले. पण मास्टर तेवढ्यात कुठे बडोद्याला निघून गेले. त्यामुळे माझ्या नाटकाचे काम तसेच रखडून पडले. आम्ही दोन्ही वेळी कंपनीत पुख्ख्या झोडून ‘रॉयल ऑपेरा’ थेएटरामधल्या एका खोलीत मुक्काम करून होतो. १९३४ च्या हिवाळ्यात नारायणरावाचा आवाज बसला. काकासाहेब खाडिलकरांनी त्यांना सांगितले की, तुम्ही आता सोलापुरला जा. पण सोलापुरला जाण्यासाठी भाड्याला पैसे नव्हते. बायकोच्या समोर सुतकी चेहरा करून दिवसभर नारायणराव बसायचे. ते दृश्य मला बघवेना. माझ्या नाटकाची कुडली तर आता स्पष्टच दिसत होती. एक दिवस मी बापुरावांना म्हणालो, ‘मला यापुढे कंपनीत राहाणे अशक्य आहे. मला नानांचा चेहरा बघवत नाही.’ बापूराव हळूच माझ्या कानात म्हणाले, अहो बाबुराव, आमचे बंधू नट आहेत हे विसरू नका. सोलापुरच्या भाड्यासाठी बायकोने अंगावरचे दागिने विकावेत म्हणून आमच्या बंधुरायांनी हे नाटक चालवलेले आहे. त्यात खरे काही नाही !! तरी देखील मी नारायणरावांना न भेटता पुण्याला निघून गेलो. माझ्या नाटकाच्या वहया मागण्याची हिंमत मला झाली नाही. आजतागायत मला त्या मिळाल्या नाहीत. त्यांची दुसरी प्रत घरी होती ती मी लागलीच ‘ बालमोहन ‘ ला पाठवून दिली. नारायणरावांचा अभिनय यशस्वी झाला. वहिनीने दागिने विकले. कंपनी सोलापुरला गेली नि बंद पडली आणि नारायणराव धर्मात्मा’ चित्रासाठी ‘प्रभात’ मध्ये दाखल झाले.
आता पुढे काही फारसे सांगावयाचे उरले नाही. मुंबईस आल्यानंतर ते माझ्या घरापासून फारच थोड्या अंतरावर माहीम बाजारात राहात असत. मधूनमधून ते मला मुद्दाम घरी बोलावून घ्यावयाचे. पहिल्या नाट्यमहोत्सवात ते अध्यक्ष होते. मी स्वागताध्यक्ष होतो. त्यांचा अमृतोत्सव ‘ शिवाजी पार्क ‘ वर साजरा झाला. त्यावेळी मीच प्रमुख वक्ता होतो. ‘ दैनिक मराठा ‘ निघाल्यानंतर नारायणराव रोज नियमाने ‘ मराठा ‘ वाचीत असत.
ज्या दिवशी ते बेशुद्धावस्थेत गेले त्याच दिवशी मी प्रथम त्यांच्या घरी जाऊन त्यांना पाहिले. तारुण्याच्या नि सौंदर्याच्या शिखरावर ज्या डोळ्यांनी गंधर्वाला पाहिले त्याच डोळयांना त्यांचे ते भेसूर कलेवर पाहताना काय वाटले असेल? मारे ब्रम्हांड माझ्याभोवती फिरू लागले. अश्रूंनी डबडबलेले डोळे मी एकदम मिटले नि तसाच परत आलो. आपल्या स्वर्गीय गायनाने सतत चाळीस वर्षे महाराष्ट्राच्या हृदयसिंहासनावर ज्यांनी सम्राटासारखे राज्य केले, त्यांनीच आपल्या व्यक्तिगत अवगुणांनी आपल्या जीवनाचा शेवटी विध्वंस करून घेतला. पण आपल्याला त्याच्याशी काय करायचे आहे ? आपण त्यांच्या गंधर्वतुल्य गाण्याचे उन्मादक सूर मनसोक्त कानात नि मनात भरून घेऊन धुंद होऊ या-बेहोश होऊ या-
दूषण वगळुनि भूषणपात्रे प्रभुपूजन करी काळ असे तुम्ही आम्ही कष्टी होणे हा कुठला मग न्याय असे !