Logo

तो राजहंस एक...

लेखिका - मंजूषा आमडेकर

११. उपसंहार

राजहंस कुटुंब श्रद्धाळू होतं. देवाधर्मावर त्यांचा विश्‍वास होता. तरीही बालगंधर्वांनी त्याचं जाहीर प्रदर्शन कधीच केलं नाही. सौंदर्यदृष्टी, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा, गुरुजन आणि मातापित्यांवर श्रद्धा, कलेवरील भक्ती, प्रामाणिकपणा, सरळपणा ही त्यांची काही स्वभाववैशिष्ट्यं होती. मोठ्या एकत्र कुटुंबाचा सांभाळ करताना त्यांनी कधीच आपपर भेदभाव केला नाही. पत्नी फारशी सुस्वरुप नसूनही जवळपास पन्नाशीपर्यंत त्यांनी कधी तिच्याशी प्रतारणा केली नाही. त्यांच्या अवतीभोवती सुंदर स्त्रिया वावरत असूनही त्यांनी कधी कुणाकडे सैल दृष्टीनं पाहिलंही नाही. संपूर्ण कारकीर्दीत अनेक आप्तस्वकीयांचा मृत्यू पहावा लागला तरी खचले नाहीत. वयाच्या तेहतिसाव्या वर्षी त्यांच्यावर अचानक दीडदोन लाखांच्या कर्जाचा भार पडला आणि तेही विश्‍वासघाताचे सल देऊन, तरीही डगमगले नाहीत. नादारी घोषित केली नाही. प्रामाणिकपणे काम करून साडेसहा वर्षात ते अवाढव्य कर्ज फेडलंदेखील.

बालगंधर्वांच्या पतीवरच नाटकं चालत आणि उत्पन्न होत असे. तरीही सगळा पैसा बँकेत भरला जाई. घरच्या लोकांनी कंपनीच्या पैशातून हवी तशी उचल केली असं कधीच घडत नसे. तरीपण संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी बालगंधर्व यथायोग्य प्रकारे निभावत असत. ते वृत्तीने गंभीर होते. गोविंदराव टेंबे यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे की, ‘मी नारायणरावांना सुसंस्कृत मनुष्य समजतो. कारण ते स्वत:बद्दल कधीही बोलत नाहीत.’

बालगंधर्वांना कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून ठेवायची आवड होती. ते आपल्या सर्व वस्तूंची नीट निगा राखत असत. वालावलकर एकदा म्हणाले होते की, ‘नारायणराव कपड्यांची जेवढी निगा राखतात तितकी पैशाची राखतील तर त्यांना कधीच कर्ज होणार नाही.’ लोकांना खायला प्यायला घालणे, त्यांचं आदरातिथ्य करणे वगैरे बाबतीतही ते अतिशय दिलदार होते.

वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी पान सोडलं. लोकमान्यांच्या मृत्यूनंतर चहा सोडला. कधीमधी ते मद्य पीत असत. पण एकदा रेकॉर्डिंग चांगलं होत नाही असं लक्षात आलं. त्यांचा आवाज फाटल्यासारखा वाटत होता. एका मद्यपानाच्या बैठकीत त्यावरून यजमान म्हणाले की, ‘नारायणराव, मी तुम्हाला प्रेमाने बोलावतो आणि तुम्ही येताही. पण मला असं वाटतं की तुम्ही मद्यपान करू नये.’

हे ऐकताच बालगंधर्वांनी हातातला मद्याचा पेला जो खाली ठेवला तो कायमचा. असा त्यांचा निश्‍चयी स्वभाव होता. त्यांची शाकाहारी, मांसाहारी खाण्याची आवड मात्र टिकून राहिली. एके काळी त्यांना कपड्यांचा शौक होता. त्यांच्याकडे उंची शालूंपासून ते विलायती कपड्यांपर्यंत बरंच काही असायचं. पण मग 1921 नंतर त्यांची ही आवड कमी झाली. ते हाफ पँट आणि शर्ट घालायला लागले. त्यांनतर खादी चळवळीचा परिणाम होऊन खादीच्या धोतर सदर्‍यात वावरायला लागले.

बालगंधर्वांना माणसांची अचूक पारख होती. पण व्यवहाराच्या बाबतीत ते डोळेझाक का करत कोण जाणे. कोणतेही नाटक हे अनेकांच्या सहकार्यानं उभं राहतं. आजच्या भाषेत टीमवर्क असतं, याची त्यांना जाण होती. ते सर्वांना आपले कुटुंबीयच मानत असत. मात्र पैशाच्या बाबतीत ते कायम उदासीनच राहिले. रंगभूमी सजवण्याचं त्यांना व्यसनच होतं जणू काही. सौंदर्याचा त्यांना ध्यास असायचा. त्यापायी वाट्टेल तितका पैसा खर्च करायला ते मागेपुढे पहात नसत. पण जमेपेक्षा खर्चाची बाजू अधिक होतेय हे त्यांच्या गावीही नसायचं. कलावंत म्हणून ते असामान्य होते यात शंकाच नाही. पण त्यांच्या बेहिशोबी स्वभावामुळे त्यांना कर्जबाजारी होऊन अखेरीस रंगभूमीला रामराम ठोकावा लागला.

पण त्यांनी उत्तमोत्तम माणसं आणि कलाकार जमवलेली होती. त्यांच्या अंगी गुणग्राहकता होती. त्यामुळेच त्यांच्याकडे आलेला कलावंत आणखी मोठा होत असे. काही कलाकार कितीही चांगले असले तरी ते जनसामान्यांपर्यंत पोचलेले नसायचे. पण एकदा का एखादा कलाकार बालगंधर्वांच्या छत्राखाली आला की संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचं नाव होत असे. बालगंधर्वांबाबत काहीवेळा मत्सरापोटी अफवाही पसरवल्या जायच्या. पण त्या सर्वथा अनाठाई होत्या. ते आपल्या सहकलाकारांना सांभाळून घेत असत. एका मुक्कामात त्यांचा आवाज बसलेला असूनही सहकलाकाराच्या पट्टीत त्यांनी जमवून घेतलं. ते म्हणाले की, ‘माझ्यामुळे नानासाहेबांची कामं बिघडायला नकोत. माझं मी नंतर पाहून घेईन.’

बालगंधर्वांना कर्जं झाली ती व्यक्तिगत उधळपट्टीमुळे मुळीच नाहीत. रंगभूमी उत्तम करण्यासाठी ते वाट्टेल तितका खर्च करत. तिथे वापरायची अत्तरं ते खाजगी जीवनात एकदाही वापरत नसत. पुढे टक्कल पडल्यावर परदेशातून त्यांनी उत्तम टोप मागवले खरे; पण ते केवळ स्वत:पुरते नाहीत तर बोडस आणि रानडेंकरताही मागवले होते. लौकिक शिक्षणही न घेतलेल्या त्यांच्यासारख्या एका असामान्य कलावंतानं वयाच्या तेहतिसाव्या वर्षी समोर आलेलं प्रचंड कर्ज प्रामाणिकपणानं स्वत:च्या हिंमतीवर फेडलं हा त्यांचा मोठेपणाच म्हटला पाहिजे. साथीच्या वाद्यात त्यांनी हार्मोनियमच्या जागी ऑर्गनला स्थान मिळवून दिलं. शास्त्रीय संगीताला नाटकात स्थान देऊन त्यांनी केवळ एकट्याच्या ताकदीवर ते घराघरात नेऊन पोचवलं. त्यांचं हे कर्तृत्व असामान्यच मानायला हवं.

त्यांना जी लोकप्रियता मिळाली ती केवळ गायक म्हणून नाही तर गायक नट म्हणून मिळाली होती. त्यांनी रंगभूमीला देवतेसमान दर्जा दिला होता. ते साध्या तालमीच्या ठिकाणीसुद्धा कधी टोपी घातल्याशिवाय आले नाहीत. त्यांनी भूमिकेसाठी प्रामाणिकपणे अविरत कष्ट घेतले. कोणतीही भूमिका असो, ते तिच्याशी एकरूप होऊन जायचे. प्रत्यक्ष नाटकाच्या दिवशी तर ते व्रतस्थाप्रमाणे रहात. खाडिलकरांनी सांगितल्याप्रमाणे ते दुपारी झोप आली नाही तरी दोन तास नुसते डोळे मिटून पडून रहात. दुपारी चार वाजता हजामत करत. मग अंघोळ झाल्यावर मेकअप साठी बसत. त्यांना साधारण दोन ते अडीच तास रंगरंगोटीसाठी लागत असे. टोप वापरायला लागल्यापासून तर तो त्यांच्या डोक्यावर इतका आवळून बांधलेला असायचा की काढल्यावर कपाळावर वळ उमटलेले दिसायचे. मग तिथून ते त्यांच्यासाठी खास तयार केलेल्या खोलीत जायचे. तिथे प्रत्येक प्रवेशासाठी तयार ठेवलेले वस्त्रालंकार असायचे. प्रयोग होईपर्यंत ते कुणाशी फारसे बोलत नसत. रात्रीच्या नाटकानंतर पिठलं भात किंवा खिचडी खायची कंपनीत पद्धत होती. पण बालगंधर्व नाटक चालू असताना घेतलेला रस किंवा दूध यावरच भागवत असत. धोंडी जामदार त्यांना स्त्रीवेषात सजवत असे. आपली वेषभूषा समाधानकारक झाल्याशिवाय ते रंगभूमीवर पाऊलही टाकत नसत. त्यामुळे काही वेळा प्रयोग सुरू व्हायला उशीरही होत असे. एखाद्या धर्मार्थ खेळानंतर केल्या जाणार्‍या आभारप्रदर्शनाच्या कार्यक्रमात ते कधीच भाग घेत नसत. बाकीच्या नटांना अधूनमधून विश्रांती मिळत असे. पण बालगंधर्वांना कधीच नाही. कारण एकतर ते मुख्य कलाकार होते. त्यामुळे त्यांच्या वाट्याला येणारे संवाद आणि पदांची संख्या जास्त असायची. आणि त्यांना इतक्यांदा वन्समोअर मिळत की ते खरोखरच थकून जात.

बालगंधर्वांना रंगमंचावर समोर बघणंही प्रेक्षकांसाठी मेजवानी असायची. ते कधीच छचोर दिसले नाहीत. ते अतिशय खानदानी सुंदर स्त्री दिसायचे. प्रेक्षकांना आपल्या स्वप्नातली राजकुमारी दिसल्यासारखं वाटायचं. पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, एकदा का मेकअप उतरवला आणि ते भूमिकेतून बाहेर पडून नारायणराव झाले की त्यांच्या वागण्या-बोलण्यात किंवा हावभावात कधीही बायकीपणा दिसत नसे. शिवाय रुपासोबतच त्यांचं गायनही प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेत असे. खरंतर पूर्वी त्यांचा आवाज तेजस्वी आणि पल्लेदार नव्हता. निकोपही नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर पुष्कळ उपचार करावे लागले होते. लंघनासारखा उपास, औषधांच्या गुळण्या, वाफारे, औषधोपचार करून उत्तम रियाझ करून घेतल्यानंतर त्यांचा आवाज सुधारला आणि नाटकांचा ताण घेण्याइतका सक्षम झाला होता. केवळ सक्षमच नव्हे तर वैशिष्ट्यपूर्ण झाला होता. नादमाधुर्य, दाणेदार ताना, संथपणा आणि पाहिजे तसा आवाज वळवण्याची ताकद ही त्यांच्या गाण्याची खास वैशिष्ट्ये बनून गेली होती. लांबलचक पल्लेदार ताना ते अगदी सहज घेत असत. पुढेही भूमिकेच्या निकडीनुसार त्यांनी कव्वाली, गझल, ठुमरी सारखे गायनप्रकारही आत्मसात करून घेतले होते. सुस्वरांचं पटल तयार करून नाट्यगृहातलं वातावरण भारावून टाकण्याची किमया त्यांना साधलेली होती. असंख्य रागांवर आधारित पदं गाताना त्यांचा आवाज लीलया सर्व स्वरांमध्ये फिरत असे. पुढे तिरखवा आणि कादरबक्ष यांच्या साथीनं तर त्यांच्या गायनाला आणखीनच रंग चढायला लागला होता.

गोविंदराव टेंबे म्हणत की, ‘नारायणराव एका रागातून दुसर्‍या रागात गेले की राग बदलला असं न वाटता नवीन रागच तयार झाला की काय असं वाटायचं.’

पण बालगंधर्व गाताना रसहानी होणार नाही याचंही अचूक भान ठेवत. प्रसंग असेल त्यानुसार त्यांचं गाणं आकार घेत असे. श्रृंगार रस असलेलं पद गाताना त्यांचा स्वर मोहक होई, तर करुण रस असलेलं पद ते गायला लागले की प्रेक्षकांच्या काळजाला पाझर फुटत असे. गाताना चेहरा वेडावाकडा करणं, उगीचच हातवारे करणं, बरोबर काम करणार्‍या पात्रांचा किंवा रसाचा संबंध सोडून गाणं, मैफिलीत खपतील अशा ताना हरकती घेणं अशा गोष्टी बालगंधर्वांनी कधीच केल्या नाहीत. कोणतं पद लांबवायचं आणि कोणतं नाही, याबाबतही काही प्रसंगानुसार संकेत होते. ते संकेत बालगंधर्व आवर्जून पाळत असत.

बालगंधर्वांनी शिष्य तयार केले नाहीत असं म्हटलं जातं. पण ते स्वत:च रंगभूमीशी इतके एकरूप होऊन गेले होते की त्यांना तसा वेळही मिळाला नाही. हे स्वाभाविकच आहे. इतरही कितीतरी कलाकारांच्या बाबतीत असं घडलेलं आपल्याला आढळतंच की. पण गंमत म्हणजे, तेही स्वत: कुणा विशिष्ट गुरुंचे शिष्य होते असंही म्हणता येत नाही. ते स्वयंभू, स्वतंत्र प्रज्ञा असलेले प्रतिभाशाली गायक होते. म्हणून तर ते गंधर्व होते. ते जन्माला येताना आपल्यासोबत अनन्यसाधारण कलागुण घेऊनच आलेले होते. एखाद्या पदाची आणि प्रसंगाची शान वाढणार असेल तर ते बिनदिक्कतपणे त्यात निषिद्ध स्वर लावत असत. पण तो कधीच खटकत नसे. त्यांची लयकारी तर असामान्य होती. अशा प्रकारे बालगंधर्वांनी आपल्या उत्तम गायनानं सामान्य प्रेक्षक आणि श्रोत्याच्या मनात शास्त्रीय आणि अभिजात संगीताची गोडी निर्माण केली. याचं संपूर्ण श्रेय त्यांनाच जातं.

पुरुषानं केवळ साडी नेसल्यानं तो स्त्रीसारखा दिसू शकत नाही. कितीतरी अडथळे असतात, ते पार करावे लागतात. त्यांनी स्त्रीवेष धारण केला तरी त्यांचे अवयव स्त्रीसारखे दिसत नाहीत. दाढीमिशीची नैसर्गिक वाढ लोभसपणा येऊ देत नाही. पुरुषांमध्ये विशिष्ट वयात आवाज फुटतो. गोडवा नष्ट होतो. वय होऊ लागल्यावर स्थूलता येते, पोट सुटतं, टक्कल पडतं…असे कितीतरी अडथळे असतात. पण बालगंधर्वांनी या सर्व अडथळ्यांना पार करून वयाच्या सतराव्या वर्षापासून ते पस्तीशीपर्यंत स्त्रीभूमिका समर्थपणे पेलल्या. इतक्या की आपल्या मनातली सुंदरी म्हणजे बालगंधर्व असं समीकरणच प्रेक्षकांच्या मनात रुजून गेलं होतं.

त्यातून त्यांना निसर्गदत्त सौंदर्याचीही देणगीच मिळालेली होती. त्यांचे हात कोपरांपासून ते पंजापर्यंत इतके आखीवरेखीव होते की त्यात राकट पुरुषीपणा कुठेच दिसायचा नाही. त्यांचे दात खोटे वाटावेत इतके सुंदर होते. आणि ते स्त्रीभूमिका करताना इतकी काळजी घेत की त्यांचे सोंग उत्तम वठत असे. स्त्रीवेष इतक्या सुंदरतेनं परिधान करत की समाजातील बायका त्यांचं अनुकरण करायला लागल्या होत्या. त्यांच्यासारखी साडी नेसणं, दागिने, अंबाडा, गजरा घालणं प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जायला लागलं होतं. त्यांच्या स्त्रीरुपाची अशी काही प्रेक्षकांवर मोहिनी पडलेली होती की खरी स्त्री असावी तर अशीच अशा प्रकारची लोकांची धारणा होऊन बसलेली होती. रंगभूमीवर आल्यानंतर ते काय बोलतात, कसे बोलतात, कसे वागतात, कसे वावरतात, कशी साडी सावरतात, कसे हावभाव करतात याकडे प्रेक्षकांची उत्कंठापूर्ण नजर लागून राहिलेली असायची.

पुरुष जेव्हा वेगवेगळ्या पुरुष पात्रांच्या भूमिका करतो तेव्हा स्वत:मध्ये लांब किंवा पांढर्‍या दाढीमिशा लावणं, वेगवेगळ्या प्रकारचे पागोटी, टोप्या वगैरे घालणं किंवा विभिन्न पोषाख करणं अशा प्रकारचे बदल ते करू शकत होते. पण बालगंधर्वांना कायम स्त्रीच दिसायचं होतं. तरीही ते रुक्मिणीची भूमिका करताना द्वारकाधीशाची पत्नी वाटत आणि सिंधू रंगवताना गरीब स्त्री वाटत.

बालगंधर्व तेच तेच राग घेतात, अनवट राग आळवत नाहीत असा काहीजणांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला होता. पण खरं तर भूमिकेला आणि प्रसंगाला साजेल अशाच रागाची रचना करणं त्या त्या पदाला आवश्यक असायचं. केवळ गायनातलं वैविध्य दाखवणं हा त्यांचा हेतू नव्हता. त्यांना भूमिका समरसून करायची होती. रसहानी होणार नाही याची दक्षता घ्यायची असायची. त्याकरता चपखल ठरतील असेच राग त्यांनी निवडलेले असायचे.

बालगंधर्वांना वाचन आणि लेखनाची आवड नव्हती. कुणालातरी पत्र लिहिणं आणि सही करणं इतपतच त्यांचं लेखन मर्यादित होतं. हे करणंही एक समारंभच असायचा. ते डोक्यावर आधी जरीची टोपी घालत. मग एकाग्रपणे पत्र लिहित. ज्यांना पत्र लिहित त्यांच्या घरातील लहानथोरांना योग्यतेनुसार नमस्कार आणि आशीर्वाद आवर्जून लिहीत. त्यांना वाचनाची आवड लागावी म्हणून गडकर्‍यांनी खूप प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही.

पण एकंदरीत बालगंधर्वांनी नवीन युग आणलं यात शंकाच नाही. गोविंदराव टेंबे लिहितात की, ‘बालगंधर्वांमुळे एकंदर नटवर्गाविषयीची अनिष्ट भावना समाजातून लुप्त होत चालली आहे.’

दादासाहेब खापर्डे म्हणत की, ‘बालगंधर्वांच्या वर्तनामुळे नटवर्गाबद्दल समाजात असलेला गैरसमज दूर झाला.’

गानमहर्षी अल्लादियाखान म्हणत की, ‘मला जर कधी गाणं ऐकावंसं वाटलं तर मी बालगंर्वांच्या नाटकाला जातो.’

कालांतरानं स्त्रियाही नाटकात काम करायला लागल्या. पण तरीही त्यांच्यापैकी कुणामुळेही रसिकांना बालगंधर्वांचा विसर पडू शकला नाही. उतार वयातही ते स्त्रियांच्या सद्गुणांचं मोहक दर्शन घडवून आणू शकत होते.

बालगंधर्वांवर वारंवार चढलेली कर्जं ही त्यांच्या कारकीर्दीला लागलेली एक प्रकारची काजळीच होती. पण ती त्यांनी प्रामाणिकपणे पुसून टाकली आणि आपली प्रतिमा लख्ख केली. पण या कर्जफेडीच्या प्रक्रियेत त्यांना ज्या ज्या कलावंतांनी, हितचिंतकांनी, सल्लागारांनी, व्यवस्थापकांनी साथ दिली ते योगदान मुळीच नाकारता येणार नाही.

तसंच गोहरबाई हे त्यांच्या आयुष्याला लागलेलं एक दुर्दैवी ग्रहण होतं असंच मानावं लागेल. बालगंधर्व तिच्यात का गुंतले आणि त्यांच्या उत्तर आयुष्याची परवड का झाली याला अविचारी दैवगतीच म्हणावी लागेल. ते ग्रहण मात्र सुटलंच नाही.

तरीही असा बालगंधर्व पुन्हा होणे नाही हेच खरं!

 

Scroll to Top